Sunday, July 31, 2011

महसूल प्रशासन पारध्याच्या दारी

समाजव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या आणि ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत गुरफटून राहिलेल्या स्त्री, पुरुष, मुलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन मुळ प्रवाहात आणण्यासाठी चिखलीचे तहसीलदार प्रा. संजय खडसे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना ठाणेदार इंगळे यांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे पारधी वस्तीत सुधारणेची किरणे पोहोचली आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरानजिकच्या साकेगावात पारधी झोपडपट्टी वस्तीवर प्रा. खडसे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक पोहोचले तेव्हा तेथील लोकांना, ग्रामस्थांना पारध्यांनी आता काय नवीन गुन्हा केला असा समज होणे सहाजिकच होते. परंतु तसं काही घडले नव्हते. समाज व्यवस्था, शासन व्यवस्थेपासून नेहमीच दूर राहिलेल्या या जमातीतील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून महसूल प्रशासन पारध्याच्या दारी आल्याचे पाहावयास मिळाले. 

पारधी वस्तीवर पोहोचल्यावर तेथे फक्त स्त्रियाच दिसल्या. पुरुष कोठे आहेत असे विचारले असता माणसं गेलीत शिकारीला असे सांगण्यात आले. पारधी वाड्यातील एका घरासमोर बसून तेथील परिस्थिती जाणून घेण्यात आली. पारधी वस्तीसाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करणारे माजी सरपंच देविदास लोखंडे यांनी या वस्तीवर ४० ते ५० घरं असल्याचे सांगितले. घर, जातीचा दाखला आणि इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी तहसिलदार खडसे यांना विनंती करण्यात आली. 

शासकीय चमूने उपस्थित पारधी स्त्री-पुरुषांकडून अडचणी जाणून घेतल्या. अनेकांना घर नाहीत तर काहींना जातीचे दाखले पाहिजेत. गावाच्या दक्षिणेस असलेल्या इ-क्लास जमिनीवर घरे नसलेल्या कुटुंबांना जागा तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. पारधी वाड्यातील किती मुलं शाळेत जातात, असे विचारुन अनेक विद्यार्थ्यांनी कविता व गाणी तसेच एबीसीडी म्हणून दाखविली. एका आठवीतील विद्यार्थ्यांने इंग्रजीत परिचय करुन दिला. येथील पारधी वस्तीतून सुशिक्षित पिढी घडण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पुढे आले आहे. शिक्षणासोबतच कुटुंब नियोजनाकडे वळा तसेच बालविवाह करु नका असा सल्ला यावेळी वस्तीवरील लोकांना देण्यात आला.

गटाने दिली प्रगतीची वाट

सायखेडे हे लहानशे आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. गावांची लोकसंख्या ४०० ते ५०० आहे. गावात माविम अंतर्गत ६ गटाची स्थापना करण्यात आली. माविमचे काम सन २००६ पासून या गावात चालू आहे. महालक्ष्मी गटाची स्थापना ऑक्टोंबर २००६ ला झाली. गटात एकूण १४ महिला आहेत. गटाची मासिक बचत ५० रुपये आहे. 

आज प्रत्येक सभासदांची एकूण बचत २७०० रुपये झाली आहे. गटाचे वय ५ वर्ष आहे. गटातून लहान-मोठ्या अडचणी भागविल्या जातात. त्याच बरोबर उद्योग सुरु करण्यासाठी सुध्दा गटातून कर्ज दिले जाते. त्याप्रमाणे सुधा कोडापे या महिलेने उद्योजकता प्रशिक्षणातून प्रेरणा घेवून त्यांनी किराणा दुकान सुरु करण्याचे ठरविले. घरात दोन व्यक्ती आहेत. उत्पन्न मिळविण्याकरीता दुसरे साधन त्यांच्याजवळ नाही.

गटातून त्यांनी २ एप्रिल २०१० ला १२००० रुपये कर्ज घेवून लहानशे किराणा दुकान लावले. सुरुवातीला दुकानात जास्त कोणी येत नव्हते, विक्री बरोबर व्हायची नाही. त्यामुळे सुरुवातील त्या नाराज झाल्या. परंतु गटाच्या हिंमतीने व सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने त्यांना बळ दिले. हळूहळू त्यांचे ग्राहक वाढू लागले.

आज त्यांनी गटाची पूर्ण कर्ज परतफेड केली. दुकानांमुळे त्यांच्या दोन व्यक्तीचा कुटूंब निर्वाह चालू लागला.दुकानाच्या भरवशावर गटात मासिक बचत भरतात. गटाचे कर्ज परतफेड केले.त्यांना हृदयाच्या झडपेचा आजार असून स्वत: दवाखाना करतात.त्या खंबीरपणे दुकानाचा व्यवसाय सांभाळत आहे. त्या नेहमी म्हणतात. मला माविमने खूप आधार दिला.आज गटामुळे मला दोन वेळचे जेवण आरामात मिळू लागले आहे. मला गटातून खूप शिकायला मिळाले, नविन ज्ञान मिळाले .गटामुळे मला चांगले वाईट कळायला लागले. माविममुळेच मी घडू शकली, गटामुळे माझी प्रगती होऊ शकली.

Saturday, July 30, 2011

शेळी/मेंढी गट वाटप योजना (भाग १)

राज्‍यामध्‍ये ठाणबंद पध्‍दतीने शेळी पालनाद्वारे शेतक-यांना पूरक उत्‍पन्‍न मिळवून देण्‍याच्‍या उद्देशाने विशेष राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत ती राबविण्‍यात येणार आहे.

राज्‍याचे सन २००९-१० वर्षातील एकूण मांस उत्‍पादन ५ लक्ष ४५ हजार मे.टन एवढे झाले आहे. यामध्‍ये गो/म्‍हैसवर्गीय जनावरांपासून १ लक्ष ४३ हजार मे.टन, शेळया/मेंढ्यांपासून ८८ हजार मे.टन, वराह मांस उत्‍पादन ५ हजार मे.टन आणि कुक्‍कुट मांस उत्‍पादन ३ लक्ष ९ हजार मे.टन एवढे आहे. 

कुक्‍कुट मांसाचा एकूण मांस उत्‍पादनामध्‍ये वाटा ५७ टक्‍के एवढा व सर्वात जास्‍त आहे. शेळ्या-मेंढ्यांच्‍या मांसाच्‍या तुलनेत कुक्‍कुट मांस स्‍वस्‍त असल्‍यामुळे सर्वसामान्‍यांना परवडू शकते. सर्वसाधारण अनुमानानुसार राज्‍यात कुक्‍कुट मांसाची प्रतिवर्ष आवश्‍यकता ४ लक्ष ८० हजार मे.टन एवढी आहे. 

जागतिक आरोग्‍य संघटना आणि नॅशनल इन्‍स्‍टीट्यूट ऑफ न्‍यूट्रीशन यांच्‍या शिफारशीनुसार राज्‍यामध्‍ये पशुजन्‍य मांसाची (कुक्‍कुट मांसासह) प्रतिवर्ष अंदाजे १२ लक्ष १० हजार मे.टन एवढी आवश्‍यकता आहे. प्रत्‍यक्षात पशुजन्‍य मांसाची (कुक्‍कुट मांसासह) प्रतिवर्ष अंदाजे ५ लक्ष ४५ हजार मे.टन एवढी उपलब्‍धता आहे. 

या योजनेमुळे राज्‍याच्‍या प्रामुख्‍याने अविकसित भागांमध्‍ये अंशत: ठाणबंद पध्‍दतीने शेळी पालनाद्वारे शेतक-यांना पूरक उत्‍पन्‍न मिळवून देता येईल. 

नक्षलग्रस्‍त/आदिवासी भागाप्रमाणेच इतर ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्‍यासही मदत होईल.

राज्‍यामध्‍ये ठाणबंद पध्‍दतीने शेळी पालनाद्वारे शेतक-यांना पुरक उत्‍पन्‍न मिळवून देण्‍याच्‍या उद्देशाने विशेष राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. 

या योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे. ही योजना सन २०११-२०१२ पासून राबविण्‍यात येणार आहे.

योजनेचे स्‍वरुप (आर्थिक निकष)- 
या योजनेमध्‍ये लाभार्थ्‍यांना उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीच्‍या अथवा स्‍थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्‍या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड या प्रमाणे एका गटाचे वाटप केले जाईल. 

या गटाचा एकूण बाबनिहाय खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील.
• शेळ्या खरेदी- ६ हजार रुपये प्रति शेळी (उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीच्‍या पैदासक्षम- ६० हजार रुपयांत १० शेळया) किंवा ४ हजार रुपये प्रति शेळी (अन्‍य स्‍थानिक जातीच्‍या पैदासक्षम- ४० हजार रुपयांत १० शेळ्या ).
• बोकड खरेदी- ७ हजार रुपयांत एक बोकड (उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीचा पैदासक्षम नर), ५ हजार रुपयांत १ बोकड (अन्‍य स्‍थानिक जातीचा पैदासक्षम नर).
• शेळ्या व बोकडाचा विमा (विमा ४ टक्‍के अधिक १०.३२ टक्‍के सेवा कर) किमतीच्‍या ४ टक्‍के (उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीसाठी २ हजार ९५७ रुपये तर अन्‍य स्‍थानिक जातींसाठी १ हजार ९८६ रुपये).
• शेळ्यांचे व्‍यवस्‍थापन म्‍हणजे खाद्य, चारा यावरील खर्च लाभार्थीने स्‍वत: करावयाचा आहे.
• शेळ्यांचा वाडा प्रति शेळी १० चौ. फूट, प्रति करडू ५ चौ. फूट, प्रति बोकड १५ चौ. फूट याप्रमाणे (७० रुपये चौ. फुटाप्रमाणे ) २२५ चौ. फुटांकरिता १५ हजार ७५० रुपये.
• खाद्याची व पाण्‍याची भांडी यासाठी १ हजार रुपये
• आरोग्‍य सुविधा व औषधोपचारासाठी १ हजार १५० रुपये.
• उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीसाठी एकूण ८७ हजार ८५७ रुपये तर अन्‍य स्‍थानिक जातींसाठी ६४ हजार ८८६ रुपये इतका खर्च निश्‍चित करण्‍यात आला आहे.

या योजनेंतर्गत पश्‍चिम महाराष्‍ट्र, खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्‍ह्यांमध्‍ये उस्‍मानाबादी आणि संगमनेरी या जातींच्‍या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्‍यात येतील. 

कोकण आणि विदर्भ विभागातील जिल्‍ह्यांमध्‍ये स्‍थानिक हवामानामध्‍ये तग धरणा-या तसेच पैदासक्षम आणि उत्‍तम स्‍वास्‍थ्‍य असलेल्‍या स्‍थानिक जातीच्‍या शेळया व बोकड यांचे गट वाटप करण्‍यात येतील.

या योजनेंतर्गत खुल्‍या प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना ५० टक्‍के अनुदान म्‍हणजेच १० शेळया अधिक १ बोकड या गटासाठी उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीसाठी ४३ हजार ९२९ रुपये तर अन्‍य स्‍थानिक जातींसाठी ३२ हजार ४४३ रुपये अनुदान देण्‍यात येईल.

अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्‍यांसाठी ७५ टक्‍के अनुदान म्‍हणजेच १० शेळ्या अधिक १ बोकड या गटासाठी उस्‍मानाबादी/संगमनेरी जातीसाठी ६५ हजार ८९३ रुपये तर अन्‍य स्‍थानिक जातींसाठी ४८ हजार ६६५ रुपये अनुदान देय राहील.

अनुदानाव्‍यतिरिक्‍त उर्वरित रक्‍कम लाभार्थ्‍यांनी स्‍वत:/ बँकेकडून कर्ज घेऊन ( सर्वसाधारण लाभार्थ्‍यांसाठी किमान १० टक्‍के स्‍वहिस्‍सा व उर्वरित ४० टक्‍के बँकेचे कर्ज त्‍याचप्रमाणे अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांसाठी किमान ५ टक्‍के स्‍वहिस्‍सा व उर्वरित २० टक्‍के बँकेचे कर्ज) उभारावयाची आहे. 

बँक व वित्‍तीय संस्‍थांकडून कर्ज घेणा-या लाभार्थ्‍यांना प्राधान्‍य देण्‍यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष- 
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनूसूचित जाती/जमातींच्‍या लाभार्थ्‍यांची निवड पुढील प्राधान्‍यक्रमाने केली जाईल. 
• दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, 
• एक हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी, 
• १ ते २ हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अल्‍प भूधारक शेतकरी,
• रोजगार व स्‍वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षीत बेरोजगार, तसेच 
• वरील चारही गटात महिला बचत गटातील लाभार्थी.

लाभार्थी निवड समिती- 

लाभार्थ्‍यांची निवड जिल्‍हास्‍तरीय निवड समितीद्वारे करण्‍यात येईल. 

जिल्‍हाधिकारी या समितीचे अध्‍यक्ष तर जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त सदस्‍य-सचिव आहेत. 

विशेष जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प अधिकारी, जिल्‍हा महिला व बालकल्‍याण अधिकारी, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी हे समितीचे इतर सदस्‍य आहेत.

Friday, July 29, 2011

जाऊ मुक्त शिक्षणाच्या गावी !

अन्न ,वस्त्र,निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा पण याच बरोबरीला आता शिक्षण देखील मुलभूत गरजांपैकीच एक मानली जाते.पण बऱ्याच जणांना नियमित व पारंपरिक शिक्षण घेणे परवडत नाही. तसेच दहावी/बारावी परीक्षेत नापास झालेल्या निराश विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट् मुक्त विद्यापीठाने एक नवा पर्याय खुला करुन आशेचा किरण निर्माण केला आहे.

ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमात १० वी / १२ वी (माध्यमिक/उच्चमाध्यमिक) परीक्षा उत्तीर्ण अशी किमान अर्हता विहीत केलेली असेल त्या बाबतीत,महाराष्ट्र राज्य शिक्षण मडंळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होवून पदवी परिक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार हा पात्र समजण्यात येतो.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था,नवी दिल्ली यांच्यामार्फत माध्यमिक शालांत परीक्षेबाबत दिलेले प्रमाणपत्र,माध्यमिक शालांत परीक्षा अशी अर्हता असलेल्या पदांवर नियुक्तीसाठी ग्राहय धरण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था, नवी दिल्ली यांची (मराठी व इंग्रजीसह किमान ५ विषयासंह) शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सदर प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांनी, राज्य शासन सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अशी अर्हता विहीत केली असेल त्या त्या ठिकाणी शासन सेवेसाठी शालांत परीक्षा समकक्ष पात्रता आपोआप धारण केली आहे असे समजण्यात येते. समाजातील अविकसित घटकांपर्यंत पोहचून त्यांना सुशिक्षित करण्याचा वसा घेतलेल्या मुक्त विद्यापीठाने नुकतेच २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. 

प्रचलित शिक्षण पध्दतीने अपात्र ठरविलेल्या विदयार्थ्यांना कला,वाणिज्य, कृषी,आरोग्य,अभियांत्रिकी,संगणक, पत्रकारिता, या शिक्षणक्रमांच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी,पदव्युत्तर पदवीस सुलभतेने प्रवेश घेता येतो. कारण इथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट,मायग्रेशन सर्टिफिकेट इ. कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.केवळ शाळा सोडल्याचा दाखल्याची व गुणपत्रकाची साक्षांकित छायाप्रत या कागदपत्रांवरच विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो.

या विद्यापीठाचा एवढा एक फायदा नसून अन्य विद्यापीठात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला तेथील पदवीसोबत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए./बी.कॉम. पदवीसाठी प्रवेश घेता येऊ शकेल. म्हणजेच विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेवून बाहेर पडतो ते दोन पदव्या घेवूनच! 


थोडक्यात विद्यार्थी तीन वर्षात दोन पदव्या मिळवू शकतो. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना राज्यातील इतर विद्यापीठाच्या पदव्यांप्रमाणेच शासन आणि विद्यापीठ आयोगाची मान्यता आहे. या विद्यापीठाच्या पदव्या इतर विद्यापीठाच्या पदव्यांशी समकक्ष आहेत. आवड व सवड यानुसार शिक्षण घेता येत असल्यामुळे या विद्यापीठांकडे शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

नाशिक विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,अहमदनगर या जिल्हयातील अभ्यासकेंद्रावर शिक्षण घेणाऱ्यांची मागील वर्षाची संख्या ५०,००० पेक्षाही अधिक होती. नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शेतकरी,कामगार,महिला बचत गटाच्या सदस्या,वरिष्ठ पोलिस अधिकारी,सरकारी कर्मचारी व अधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,गृहीणी, व्यापारी यांचेसह तुरुंगातील कैदी,अंधजन,लष्करी जवान, मोलकरीण, नाभिक, चर्मकार,मुंबईतील डबेवाले,राज्य परिवहन महामंडळाचे वाहक व चालक, यशनिर्माण प्रकल्पांतर्गत दत्तक घेतलेल्या खेडयांतील आदिवासी विद्यार्थी तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी असे अनेक घटक या ज्ञानगंगेच्या प्रवाहात मिसळून त्यांनी आपलं कर्तुत्व सिध्द केलं आहे. २०११-१२ या शैक्षणिक वर्षात ज्ञानगंगा घरोघरी येण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

दिंनाक १ जुलै ते ३१ जुलै २०११ या कालावधीत मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु राहतील. या कालावधीत बी.ए./बी.कॉम, एम.कॉम,एम.बी.ए, एम.एस.डब्ल्यू, बी.लिब, एम.लिब, बी.सी.ए.,पत्रकारीता, शालेय व्यवस्थापन पदविका,एम.एड, आर्किटेक्चर, बालसंगोपन,रुग्णसहायक,डोटा, बी.एस्सी , एम.एल.टी.इत्यादी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल. 

अधिक माहितीसाठी ०२५३-२३१७०६३/२५७६७५६ या क्रमांकावर संपर्क साधावा. मुक्त विद्यापीठाच्या या दूरशिक्षण पध्दतीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं लाभ घ्यावा व भविष्यकाळ उज्वल करावा व आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सातासमुद्रापार न्यावा !

मोहिनी राणे

देशभक्तीचा जागर


युवा पिढीच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीबाबत बरेच बोलले जाते. आजच्या युवकांची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील युवापिढीशीदेखील केली जाते. मात्र शनिवारी सकाळी रत्नागिरीतील कोसळणाऱ्या पावसात लोकमान्य टिळकांच्या नावाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने 'स्मरणयात्रे'त सहभागी झालेल्या युवकांना पाहणाऱ्यांना ही तुलना निरर्थक असल्याचे निश्चितच जाणवले असणार आणि आजच्या युवापिढीबद्दल त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असणार हे नक्की...

...२३ जुलै हा लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतील गोरे यांच्या वाड्यात झालेला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ते याच वाड्यात रहात होते. त्यानंतर वडिलांना पुणे येथे नोकरीनिमित्त जावे लागले. टिळकांच्या जन्मभूमीचे महात्म्य नवयुवकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून लोकमान्य टिळकांची जयंती त्यांच्या जन्मस्थानी साजरी करण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष देव यांच्याकडून लोकराज्य वाचक मेळाव्याचेवेळी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी वर्णन केलेला 'चैतन्याचा सोहळा' अनुभवण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर महाविद्यालयात सहकारी किलजे यांच्यासह दाखल झालो.

पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने 'कॉलेज'चे विद्यार्थी येतील का, अशी सहज शंका मनात आली. महाविद्यालयाच्या मैदानावर पांढऱ्याशुभ्र वेशातील युवक पडत्या पावसात एका रांगेत उभे होते.मात्र फारशी गर्दी नव्हती. मात्र काही वेळातच युवक-युवती पावसाची पर्वा न करता इमारतीच्या बाहेर पडू लागले,तेदखील शिस्तीत..एका रांगेत. प्राचार्य देव यांच्या हस्ते 'स्मरणयात्रे'चा शुभारंभ झाला. टिळकांच्या जयघोषाशिवाय कुठलाही आवाज त्या प्रभातफेरीत नव्हता. पाऊस सुरू असूनही एकाही विद्यार्थ्यी किंवा प्राध्यापकाच्या हातात छत्री दिसली नाही. स्वत: प्राचार्य प्रभातफेरीच्या अग्रभागी होते. येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचे कौतुक वाटत होते. रहदारीला अडथळा न होऊ देता ही फेरी टिळक जन्मस्थानाजवळ पोहोचली.

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचा हा वाडा देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडे आहे. वाड्यातील घरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूस टिळकांचा जन्म झालाती खोली आहे. खोलीत टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर समई लावलेली होती आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली होती. याच खोलीच्या भिंतींना टिळकांच्या जन्माच्यावेळी स्वातंत्र्य गर्जनेचा पहिला स्वर ऐकण्याचे भाग्य लाभले होते. खोलीतील एका काचेच्या पेटीत त्याकाळची आठवण असणाऱ्या काही वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. इतर घरातील इतर भागात टिळकांची काही छायाचित्रे आणि हस्ताक्षर पहायला मिळतं. मागील बाजूस विस्तीर्ण वाड्यात बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे...

...एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. वाड्यात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याच्या सभोवती कुठलाही गोंधळ न करता सर्व विद्यार्थी शांततेत उभे राहीले आणि लोकमान्य टिळकांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
'आरती ओवाळू लोकमान्य टिळकांना
घ्याहो जन्म पुन्हा करण्या सुराज्य स्थापना'
आरती टिळकांची असली तरी युवकांच्या मनात दडलेल्या देशभक्तीला केलेले ते आवाहन असल्याचे आरतीचे शब्द ऐकतांना जाणवले. आरतीनंतर प्राचार्य डॉ.देव यांनी कार्यक्रमाची भूमीका विषद करतांना महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टिळक जन्मस्थानाचे महात्म्य कळून त्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. लोकमान्य टिळकांना संस्कृत भाषेविषयी असणारे प्रेम आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाची सांगड घालत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जीजीपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतेचा बारावा अध्याय सादर केला. त्यानंतर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. प्रा.चव्हाण यांनी आदल्या दिवशीच रचलेले टिळकांच्या जीवनावरील सुंदर गीत विद्यार्थ्यांनी एका दिवसात चाल लाऊन सादर केले.
'रत्नभूमी ही पावन सुंदर, देखणी आपल्या जन्माने
गीताईचा अंश मनोहर आला आपल्या रुपाने
देशक्तीचा शेला लेवूनी, लोकमान्य तो जाहला
सरस्वतीचा वरदहस्त हा महाराष्ट्राने गौरवीला'
अशा प्रेरक ओळी सादर होत असताना पावसाच्या सरीदेखील या जन्मोत्सवाच्या आनंदात सहभागी झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरीकदेखील भारावून याठिकाणी थांबले. साधारण सात-आठशे युवक-युवती असूनही त्या स्थानाचे पावित्र्य राखत शांत वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमानंतर टिळक आळीतील नानासाहेब भिडे यांनी परंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.('पेढे वाटले' असा मी उल्लेख करताच त्यांनी 'जन्मदिवस आहे, त्यामुळे तोंड गोड करतो आहे' अशी दुरुस्ती केली.) परततानाही विद्यार्थ्यांमधली शिस्त कायम होती. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये या स्थानाला भेट देऊन निर्माण झालेली ऊर्जा उत्साहाच्या रुपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अकरावीच्या विक्रांत पाटीलला कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला संस्कार तरुण पिढीतील टिळक निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे वाटते. तर त्याचा सहकारी असलेला जयंत अवेरे याने या स्थानाला भेट दिल्याने देशासाठी काहीतरी योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. स्नेहा जोशी हिला आपल्या युवा सहकाऱ्यांनी दाखविलेली शिस्त आवडली. त्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश गेल्याचे तीने सांगितले.

राम नाक्यापासून जयस्तंभापर्यंत विद्यार्थ्यांची एक सरळ आखलेली रेष दिसत होती. महाविद्यालयात प्रथमच प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची टिळक जन्मस्थानाला असलेली ही पहिलीच भेट त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्याचबरोबर ज्या परिसरात टिळकांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या रुपाने झालेले संस्कार विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा देतील. महाविद्यालयात अनेक उपक्रम होतच असतात. पण रत्नागिरीचं स्थानमहात्म्य लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 'देशभक्तीचा जागर' होता.


  • -डॉ.किरण मोघे
  • “ बालमजूर मुक्त ” गावाकडे वाटचाल

    बुलडाणा जिल्हयाच्या नांदुरा तालुक्यातील दहिगाव सह विटाळी, तांदुळवाडी, सातपुडी, औरंगपूर या पाच गावांचीही बाल मजूर मुक्त गावाकडे वाटचाल सुरु असून पुढील महिन्यापर्यंत ही गावे बाल मजूर मुक्त होणार आहेत.

    नांदुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने व महात्मा फुले समाज सेवा संस्था करमाळा जिल्हा सोलापूरच्या वतीने परिवर्तनसाठी बाल अधिकार हा प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकांना असलेले त्यांचे मुलभूत अधिकार यांची जाणीव बालकांना करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालहक्कासोबतच शासनाच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा कायद्याबाबत जनजागृती, शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती, महिलांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये असलेली २९ गावे डिसेंबर २०१२ पर्यंत बालमजूर मुक्त करण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असून पहिल्या टप्‍प्यात सध्या दहिगाव, विटाळी, तांदुळवाडी, सानपुडी, औरंगपूर या गावांची या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. प्रकल्पातील २९ गावांसह या पाच गावामध्ये १५ जुलै पर्यंत बालमजूर मुक्त गाव व शाळा भरती मोहिम सरु आहे. 

    बालमजूर मुक्त गावाच्या निकषाप्रमाणे ० ते ६ वयोगटातील सर्व बालक अंगणवाडीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत जातात, शाळेत १०० टक्के पटनोंदणी तसेच नियमित व पूर्णवेळ शाळेत, शाळा बाह्य विद्यार्थी गावात नसणे, ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुलं कामाला नसणे, पालकांना बालहक्क व बालमजूर कायद्याची जाण असणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार, कर्तव्य व जवाबदारीची जाणीव असणे, बाल संरक्षण समित्यांना कर्तव्य, जवाबदारीची जाण असणे, बाल गटांकडून बालहक्का विषयी जनजागृती,सर्व उपक्रमामध्ये गावातील पालक, बालक, शेतमालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांचा महिलांचा सहभाग असणे आदी सर्व बाबींवर वरील गावांमध्ये जनजागृती सुरु आहे.

    ही गावे या महिन्यात बालमजूर मुक्त होणार यात शंका नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील २९ गावे ज्यामध्ये नारखेड, भोटा, निमगाव, अवधा, इसापूर, भोरवंड, पिंपळखुटा, वडी, बेलुरा, नायगाव, मामुलवाडी, पोटडी, लोणवडी, वाडी, तिकोडी, सातपुडी, सिरसोली, कोकलवाडी, माळेगाव, खडगाव, मोमिनाबाद, मेंढळी ही गावे सुध्दा प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजू

    Thursday, July 28, 2011

    “ दरबार हॉलला आठवणीचा पाझर ”

    कर्तृत्व,वक्तृत्व आणि जनसंपर्क राजकीय व्यासपीठावरील यशस्वी व्यक्तिमत्वाच्या कीर्तीचे तीन मूलभूत अंग असतात...अशी कीर्ती मग चिरकाल टिकते. दरवेळी अशा व्यक्तींच्या इतिहासाला नवी झळाळी मिळते... नव्याने व्यक्तींची ओळख होते. गुरुवारी अशीच ओळख गेल्या पाऊण शतकात अनेक इतिहासाची पाने लिहिणा-या दरबार हॉलला झाली. राष्ट्रपती भवनातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमाचे घटनास्थळ ! आज या ठिकाणी देशाच्या प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांच्या धीरगंभीर आवाजात नव्या पिढीला एका महान गांधीवादी नेत्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळाली. औचित्य होते स्वर्गीय वि.स.पागे अर्थात विठठ्ल सखाराम पागे यांच्यावरील डाक तिकीटाच्या विमोचन कार्यक्रमाचे.

    वि.स.पागे यांच्या कर्तृत्वाची ओळख पत्रकार म्हणून काम करताना विधान परिषदेचे सलग १८ वर्षे सभापती या नात्याने होती. मात्र आज त्याच कालखंडात काम करणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्यांची वेगळी ओळख उपस्थितांना करुन दिली. ही केवळ ओळख नव्हती, एका ज्येष्ट नेतृत्वाची त्यावेळेच्या तरुण नेतृत्वावर पडलेली छाप होती. १९६२ च्या सुमारास महाराष्ट्राची निर्मिती आणि राज्य उभारण्याच्या प्रक्रीयेत स्वत:ला झोकून देणा-या पिढीतील समर्पणाच्या आठवणीची कहाणी होती. ही नवी ओळख महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी नवी होती.


    दुष्काळी काम,त्यातून रोजगार हमी योजनेचा जन्म, पुढे जलसंधारणाची मोहीम मात्र या दरम्यान वि.स. पागे यांनी नशाबंदी कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार यावर राष्ट्रपती महोदयांनी अधिक प्रकाश टाकला.. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या यशस्वीतेसाठी आणि दुष्काळाची झळ गरीबांना पोहचू नये यासाठी मजूरीचे भाव तिप्पट करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी मजुरांच्या हातात मोठया प्रमाणात पैसा आला होता. मात्र हा पैसा खरोखर कुठे जातो. यामुळे दुष्काळाच्या सावटातून परिवार बाहेर पडतात काय ? याचा अभ्यासही या लोकनेत्याने केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मोठया प्रमाणात संग्रही पैसा नशा करण्यात खर्च होतो. तेव्हा याच काळात वि.स.पागे यांच्या पुढाकाराने शासनाने नशाबंदी कार्यक्रम सुरु केला. रोजगार हमी योजनेसोबत पागे यांचे हे काम अविस्मरणीय असून तत्कालिन व्यवस्थेने त्यांचे कौतुकही केले होते, असे त्यांनी यावेळी वेगळी आठवण म्हणून सांगितले.

    पागे यांच्या संत साहित्याचा अभ्यास आणि समाजाच्या विविध घटकांसोबतची त्यांची जवळीक, त्या प्रश्नांची जाण,महात्मा गांधी,विनोबा भावे,साने गुरुजी अशा ऋषितुल्य समाज धुरिणांची त्यांच्यावर पडलेली छाप, यातून वि.स.पागे उभे राहील्याची आठवणही त्यांनी सांगितली. पूर्वीच्या काळात नव्याने निवडून येणा-या आमदारांचे बौध्दीक घेतले जायचे.. तेव्हा पागेंचे मार्गदर्शन प्रत्येकाच्या कायम अनुभवाच्या गाठीशी बांधले असायचे.नवी पिढी हुशार असल्याचे आता सांगितले जाते. परंतू अशा आदरणीय व्यक्तिमत्वातून आम्ही घडलो, हे सांगतांना मला आनंद होतो, असेही त्यांनी सांगितले. 

    अशा कितीतरी आठवणींना आज दरबार हॉलमध्ये उजाळा मिळत होता. एरव्ही महाराष्ट्राशी संबंधीत कार्यक्रमातही राष्ट्रपती महोदया राष्ट्रभाषेतच बोलतात. परंतू आजचे संबोधन सुरुवातीपासून मराठीत होते. मनातल्या आठवणी मातृभाषेतच बोलण्याची आमची संस्कृती त्यामुळे दरबार हॉल भारवला होता. पागे यांच्या जन्मशाताब्दी वर्षाला यापेक्षा वेगळी आदरांजली काय असू शकते... .. त्यांच्या उच्च कोटीच्या कर्तृत्वाला ही राष्ट्रपती भवनाची सलामी होती.

    प्रवीण टाके

    संधी रोजगाराची खात्री नोकरीची

    कर्मचारी निवड मंडळामार्फत स्टेनोग्राफर परीक्षा २०११ ची घोषणा
    कर्मचारी निवड मंडळामार्फत (स्टाफ सिलेक्शन कमिशन) स्टेनोग्राफर परीक्षा २०११ ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६-२२ जुलै २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http:ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ५० जागा 
    सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य व्यवस्थापक-तांत्रिक (१० जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (४० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २७ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात २९९ जागा 
    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता-स्थापत्य (८३ जागा), दुय्यम अभियंता-यांत्रिकी व विद्युत (१४ जागा), दुय्यम अभियंता- वास्तुशास्त्रज्ञ (४ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (१४९ जागा), कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी व विद्युत (४९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट भरती होणार असून ती १० ऑगस्ट २०११ ते २९ ऑगस्ट २०११ या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामना, लोकसत्ता व सकाळमध्ये दि. २५ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

    व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नागपूर विभागात प्रशिक्षकाच्या १५९ जागा 
    व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नागपूर विभागात प्रशिक्षक (१५९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १५ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

    भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात १६ जागा 
    भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात शिपाई (१ जागा), स्वयंपाकी (९ जागा), कामाठी (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    विधी व न्याय विभागात ७ जागा 
    महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात स्टेनो (१ जागा), लिपिक नि टंकलेखक (३ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १५ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

    राष्ट्रीय माहिती केंद्रात ६२ जागा 
    राष्ट्रीय माहिती केंद्रात (एनआयसी) शास्त्रीय अधिकारी/अभियंता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://recruitment.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    खादी आणि ग्रामोद्योग आयोगात २३ जागा 
    खादी आणि ग्रामोद्योग आयोगात लघुलेखक - इंग्रजी (७ जागा), लघु लेखक - हिंदी (१ जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (१० जागा), मल्टिटास्किंग स्टाफ-शिपाई (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०११ आहे. अधिक माहिती http://www.kvic.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकतमध्ये दि. २२ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

    सीबीआयमध्ये कंत्राटी तत्वावर १४२ जागा 
    केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) स्टेनोग्राफर (७१ जागा), पैरव्ही ऑफिसर (७१ जागा), हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०११ आहे. अधिक माहिती http://www.cbi.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    एमपीएससीमार्फत विविध १४ जागांसाठी भरती 
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागातील उपसंचालक-बाष्पके संचालनालय (६ जागा), मत्स व्यवसाय विभागातील जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी/मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. यापदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. २१ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    एमपीएससीतर्फे सहायक पदाच्या ६० जागांसाठी परीक्षा 
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक पूर्व परीक्षा २०११ ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे सहायक पदाच्या ६० जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. २० जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंत्यांसाठी १७२ जागा 
    भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंत्यांसाठी विविध पदांच्या १७२ जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६-२२ जुलै २०११च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://bhelrpdcareers.bhelrpt.co.in किंवा www.careers.bhel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    सीबीआयमध्ये विधी अधिकाऱ्यांच्या ७१ जागा
    केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) विधी अधिकारी (७१ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०११ आहे. अधिक माहिती http://www.cbi.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    बृहन्मुंबई महानगरपालिकेत ४ जागा 
    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक अणू जीवशास्त्रज्ञ (२ जागा), सहायक रसायनशास्त्रज्ञ (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. २६ जुलै २०११ या दिवशी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. १७ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

    भारतीय सैन्य दलात एनसीसी कॅडेटसाठी ५६ जागा
    भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसाठी अधिकारी भरती करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मुलांसाठी ५० जागा व मुलींसाठी ६ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६-२२ जुलै २०११च्या अंकात आली आहे. 

    इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहायकाच्या ३४ जागा
    इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहायक (३४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६-२२ जुलै २०११च्या अंकात आली आहे.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ७ जागा
    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात समावेशित शिक्षण विशेष तज्ञ (१ जागा), मानसोपचार तज्ञ (१ जागा), फिरस्ती विशेष शिक्षक (४ जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १३ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

    नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात कुशल कारागिराच्या २२ जागा
    नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात कुशल कारागिर (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६-२२ जुलै २०११च्या अंकात आली आहे.

    नवी मुंबई महानगर पालिकेत २ जागा
    नवी मुंबई महानगर पालिकेच्या टेबलटेनिस प्रशिक्षण वर्गासाठी मुख्य मार्गदर्शक (१ जागा), सहायक मार्गदर्शक (१ जागा) हे पद मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १५ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

    राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयात १२ जागा
    मुंबईतील राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयात सहायक (१ जागा), लिपिक टंकलेखक (२ जागा), लघु टंकलेखक (१ जागा), सहाय्यक खाद्यपेय अधिक्षक (१ जागा), खाद्यपेय सहायक (१ जागा), जलतरण तलाव प्रशिक्षक व जीव रक्षक (१ जागा), माळी (१ जागा), टेनिस बॉय (२ जागा), पॅन्ट्री मॅन (१ जागा), सफाईगार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्राप्त होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १३ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://rajbhavan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    सार्वजनिक बँकांमध्ये भरतीसाठी संयुक्त लेखी परीक्षेची घोषणा 
    इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन तर्फे १९ सार्वजनिक बँकांतील प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी संयुक्त लेखी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://www.ibps.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    नगररचना व मूल्य निर्धारण विभागात रचना सहायकाच्या ३० जागा 
    नगररचना व मूल्य निर्धारण विभागातील कार्यालयांत रचना सहायक/कनिष्ठ अभियंता (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०११ आहे. या संबंधीची जाहिरात व सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    अर्थ व सांख्यिकी संचालनालयात अपंगांसाठी ८ जागा 
    मुंबई येथील अर्थ व सांख्यिकी संचालनालयात अपंगांसाठी संशोधन सहायक (१ जागा), सांख्यिकी सहायक (४ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    म्हाडामध्ये ७ जागा
    महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणात (म्हाडा) आयसीटी ऑफिसर (२ जागा), वरिष्ठ प्रोग्रामर (२ जागा), कनिष्ठ प्रोग्रामर (२ जागा), सर्व्हर अँड नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जुलै २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mhada.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात ८८४ जागा 
    सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात हेडकॉन्स्टेबल-रेडिओ चालक (६७९ जागा), हेडकॉन्स्टेबल-फिटर (२५ जागा), सहायक उपनिरीक्षक-रेडिओ मेकॅनिस्ट (१८० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०११ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २-८ जुलै २०११ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षण सेवकांच्या १०४२ जागा
    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक या पदाची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदी माध्यम (३२४ जागा), इंग्रजी माध्यम (२६५ जागा), कन्नड माध्यम (२४ जागा), उर्दू माध्यम (२६४ जागा), मतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षण सेवक (१७ जागा), मुंबई पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यम (१४८ जागा) ही पदे आहेत. या पदांसाठी थेट भरती हिंदी माध्यमासाठी दि. १३ व १४ जुलै २०११, इंग्रजी माध्यमासाठी १५ व १८ जुलै २०११, कन्नडसाठी १९ जुलै २०११, उर्दू माध्यमासाठी २०, २१, २२ व २५ जुलै २०११, मतिमंद मुलांच्या शाळेसाठी २६ जुलै २०११, मुंबई पब्लिक स्कूलसाठी २७ व २८ जुलै २०११ या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जून २०११ या दिवशी प्रसिद्ध झाली आहे. 

    चेन्नई येथील हेडक्वॉर्टर कोस्ट गार्ड रिजन (ईस्ट) मध्ये २३ जागा
    चेन्नई येथील हेडक्वॉर्टर कोस्ट गार्ड रिजन (ईस्ट) मध्ये स्टोअर किपर (१ जागा), असिस्टंट स्टोअर किपर (३ जागा), इंजिन चालक (२ जागा), एमटी फिटर (२ जागा), आयसीई फिटर (६ जागा), इलेक्ट्रिकल फिटर (१ जागा), शिप फिटर (२ जागा), मेकॅनिस्ट (२ जागा), इन्स्ट्रुमेंट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ जून २०११च्या अंकात आली आहे. 

    केंद्रीय जलसंपदा मंत्रालयात ८ जागा
    केंद्रीय जलसंपदा मंत्रालयात ॲसेसोर (२ जागा), प्रधान खासगी सचिव (२ जागा), खासगी सचिव (१ जागा), सहायक (२ जागा), उच्चस्तर लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ जून २०११च्या अंकात आली आहे.

    इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये ६५३ जागा
    इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल/पायोनियर (२०२ जागा), कॉन्स्टेबल-ट्रेडसमन (४५१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात २१ जागा
    महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात कार्यकारी संचालक (१ जागा), संचालक-प्रशासन व वित्त (१ जागा), संचालक- विद्युत अभियांत्रिकी (१ जागा), संचालक-वीज दर (१ जागा), संचालक-विधी (१ जागा), उपसंचालक-प्रशासन व वित्त (४ जागा), उपसंचालक-तांत्रिक (८ जागा), उपसंचालक-विधी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १ ऑगस्ट २०११ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व लोकसत्तामध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

    Wednesday, July 27, 2011

    उद्योगाची भरारी

    हिंगणी हे गाव सेलु तालुक्यातील बोरधरण रोडवर बसलेले आहे. त्या गावाची लोकसंख्या २००० पर्यंत आहे. गावात एकूण ४० ते ४५ गटांची स्थापना झालेली आहे. त्यापैकी माविम अंतर्गत त्या गावामध्ये ५ गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच उन्नती स्वयंसहाय्यता गटाची स्थापना १५ मे २०१० रोजी झालेली असून, त्या गटातील सदस्या सौ.ज्योत्स्ना रमेश उरकुडे हया गटामध्ये येण्यापूर्वी फक्त चूल आणि मूल इतपतच मर्यादित होत्या. तसेच घराबाहेर निघण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण मनात उद्योग करण्याची खूप इच्छा होती, पण काय करणार. असं त्या सांगतात.

    माविम सहयोगीनी मार्फत जेव्हा उन्नती बचत गटाची स्थापना झाली. तेव्हापासून त्या गटामध्ये सक्रीय सभासद म्हणून सहभागी आहे. गटाच्या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यातून उद्योजकता जाणिवजागृती प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग करण्याची इच्छा निर्माण झाली. गटातून रुपये ४०००/- कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपडयांच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाच्या उत्पन्नातून गटाच्या कर्जाची परतफेड केली. त्यानंतर माविम सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले महामंडळातील योजनेच्या माध्यमातून रुपये २००००/- कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायामध्ये वाढ केली. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून वर्षामध्ये कर्जाची परतफेड झाली. 

    ज्योत्स्नाताईची उद्योगातील प्रगती व कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडिया,हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. त्यांनी व्यवसायात वाढ करण्याकरिता बँक ऑफ इंडिया हिंगणी शाखेकडे रुपये ५००००/- कर्जाची मागणी केली. बँकेने रुपये ५००००/- चे कर्ज दिले. ज्योत्स्ना ताईच्या उद्योगाला भरभराट आलेली असून, व्यवसायातून तिला चांगल्या प्रकारे नफा मिळतो.

    तिच्या हया आदर्शामुळे गावात झालेल्या गाव विकास समितीमध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली. गाव विकास समितीच्या माध्यमातून सर्व गटातील महिलांच्या सहभागाने गावामध्ये वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एडस जाणिवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम गावात घेतले.

    गटात येण्यापूर्वीची परिस्थिती व व्यवसायाच्या माध्यमातून घेतलेली भरारी हे यशस्वी उद्योजक म्हणून आदर्श घडविणारे आहे.

    संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना ( भाग-१)

    आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.

    राज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. 

    या राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे. 

    ही योजना खालील तपशीलानुसार सन २०११-२०१२ मध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.

    योजनेचे स्‍वरुप (आर्थिक निकष)- 
    • सहा संकरित गाई/म्‍हशींचा गट प्रति गाय/म्‍हैस ४० हजार रुपयांप्रमाणे २ लक्ष ४० हजार रुपये, जनावरांसाठी गोठा ३० हजार रुपये, स्‍वयंचलित चारा कटाई यंत्र २५ हजार रुपये, खाद्य साठविण्‍यासाठी शेड २५ हजार रुपये, ५.७५ टक्‍के (+१०.०३ टक्‍के सेवाकर) दराने तीन वर्षाचा विमा १५ हजार १८४ रुपये अशी एकूण ३ लक्ष ३५ हजार १८४ रुपये सहा संकरित गायी/म्‍हशींच्‍या एका गटाची किंमत ठरविण्‍यात आलेली आहे.

    • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना ६ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना ५० टक्‍के अनुदान म्‍हणजेच १ लक्ष ६७ हजार ५९२ रुपये तर अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना ७५ टक्‍के म्‍हणजेच २ लक्ष ५१ हजार ३८८ रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

    • खुल्‍या प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना अनुदाना व्‍यतिरिक्‍त उर्वरित ५० टक्‍के रक्‍कम तसेच अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना अनुदानाव्‍यतिरिक्‍त उर्वरित २५ टक्‍के रक्‍कम स्‍वत: अथवा बँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेऊन उभारावी लागेल. 

    • बँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेणा-या (खुल्‍या प्रवर्गासाठी १० टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व ४० टक्‍के बँकेचे कर्ज व अनुसूचित जाती/जमातीसाठी ५ टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व २० टक्‍के बँकेचे कर्ज) लाभार्थ्‍यांना या योजनेंतर्गत प्राधान्‍य दिले जाईल.

    लाभार्थी निवडीचे निकष- 
    • सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनूसूचित जाती/जमातींच्‍या लाभार्थ्‍यांची निवड पुढील प्राधान्‍यक्रमाने केली जाईल. १)दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, २) एक हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी, ३) १ ते २ हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अल्‍प भूधारक शेतकरी, ४) रोजगार व स्‍वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षीत बेरोजगार, तसेच ५) वरील चारही गटात महिला बचत गटातील लाभार्थी.

    लाभार्थी निवड समिती- 
    • लाभार्थ्‍यांची निवड जिल्‍हास्‍तरीय निवड समितीद्वारे करण्‍यात येईल. 

    • जिल्‍हाधिकारी या समितीचे अध्‍यक्ष तर जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त सदस्‍य-सचिव आहेत. 

    • विशेष जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प अधिकारी, जिल्‍हा महिला व बालकल्‍याण अधिकारी, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी हे समितीचे इतर सदस्‍य आहेत.

    सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती- 
    • या योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी लाभार्थ्‍याने करावयाच्‍या अर्जाचा नमुना व त्‍यासोबत जोडावयाची इतर आवश्‍यक कागदपत्रे याचा तपशील तसेच गोठयाचा आराखडा पशुसंवर्धन आयुक्‍त त्‍यांच्‍या स्‍तरावर निश्‍चित करुन क्षेत्रीय अधिका-यांना पाठवतील. 

    • तसेच अर्जाचा नमुना पशुसंवर्धन आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयाच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिला जाईल. 

    • या योजनेचे विहीत नमुन्‍यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार), पंचायत समिती स्‍तरावर उपलब्‍ध असतील.

    • लाभार्थी निवडतांना ३० टक्‍के महिलांना लाभार्थ्‍यांना प्राधान्‍य दिले जाईल.

    • तालुकास्‍तरीय अधिकारी (पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) लाभार्थ्‍यांचे अर्ज स्‍वीकारुन प्राप्‍त झालेले सर्व अर्ज जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा पशुसंवर्धन अधिका-यामार्फत जिल्‍हास्‍तरीय लाभार्थी निवड समितीच्‍या मान्‍यतेसाठी जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांकडे सादर करतील. 

    • प्राप्‍त झालेल्‍या सर्व अर्जांची तारीखनिहाय नोंद स्‍वतंत्र नोंदवहीत ठेवण्‍यात येईल.

    • लाभार्थ्‍यांचे अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी एक महिन्‍याची मुदत दिली जाईल. या मुदतीनंतर अर्ज स्‍वीकारले जाणार नाहीत. 

    • या अर्जांची वैधता ही त्‍या आर्थिक वर्षातील उपलब्‍ध तरतुदीच्‍या मर्यादेच्‍या अधीन असेल. तसेच कोणत्‍याही स्‍वरुपात सदरील अर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

    • प्राप्‍त झालेल्‍या सर्व अर्जांची छाननी करुन एका महिन्‍याच्‍या कालावधीत जिल्‍हा निवड समितीमार्फत पात्र लाभार्थ्‍यांची निवड व प्रतीक्षा यादी करण्‍यात येईल. 

    • जिल्‍हास्‍तरीय लाभार्थी निवड समितीने निवड केलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी पशुसंवर्धन आयुक्‍त तसेच संबधित जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या कार्यालयाच्‍या सूचनाफलकावर तसेच संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन दिली जाईल. याशिवाय निवड झालेल्‍या लाभार्थ्‍यांना त्‍याबाबत कळविले जाईल. 

    • या योजनेसाठी लाभार्थ्‍यांची निवड झाल्‍यावर लाभार्थ्‍यांनी एका महिन्‍याच्‍या कालावधीत लाभार्थी हिश्याची रक्‍कम अथवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्‍यक राहील. असे न केल्‍यास प्रतीक्षा यादीवरील पुढील लाभार्थ्‍यास या योजनेंतर्गत लाभ दिला जाईल. 

    • एका कुटुंबातील एकाच व्‍यक्‍तीस या योजनेचा लाभ दिला जाईल. 

    • या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्‍या लाभार्थ्‍यांस पुन्‍हा सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. 

    • ही योजना शक्‍यतो क्‍लस्‍टर स्‍वरुपात आणि अस्‍तित्‍वातील/प्रस्‍तावित दूध संकलन मार्गावरील गावांमध्‍ये राबविली जाईल आणि त्‍यानुसार लाभार्थ्‍यांची निवड केली जाईल.

    • या योजनेमध्‍ये वाटप करावयाच्‍या दुधाळ जनावरांमध्‍ये एच एफ, जर्सी या संकरित गायी तसेच मु-हा व जाफराबादी या सुधारित जातीच्‍या म्‍हशी, प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्‍पादन असलेल्‍या दुस-या/तिस-या वेतातील असाव्‍यात. शक्‍यतो १-२ महिन्‍यापूर्वी व्‍यालेल्‍या संकरित गायी/म्‍हशींचे वाटप करण्‍यात यावे. दुधाळ जनावरे लाभार्थ्‍यांच्‍या पसंतीने खरेदी करावीत, अशा मार्गदर्शक सूचना करण्‍यात आलेल्‍या आहेत.


  • राजेंद्र सरग