Wednesday, November 30, 2011

बचतगट करीत आहे शेतीमध्ये नवीन प्रयोग

अमरावती जिल्हयातील बोरगाव ता. मालेगाव येथे वसंता अश्रुजी लांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला वैभव शेतकरी बचत गट आपल्या गट शेतीत विविध प्रयोग करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आठ एकर शेत जमिनीला केवळ एका तासात एकाच वेळी खत आणि पाणी देण्याचा प्रयोग या शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. परिणामी त्यांचे कष्ट, पैसा आणि वेळ यांची बचत होवून उत्पन्नात सातत्याने भर पडत आहे.

विदर्भात सिंचनाचा अनुशेष आहे. शेतकरी पावसावर आधारित कोरडवाहू शेतीत अत्यंत परिश्रम करावे लागतात. परंतु यावर कल्पकतेने मात करता येते, याची प्रचिती बोरगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून दिली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केल्यास कमी श्रमात आणि कमी खर्चात उत्तम शेती करता यते, 

हा आदर्श बोरगाव पॅटर्नने निर्माण केला आहे. शेतीला पाणी देणे हे कष्टाचे काम आहे. यापेक्षाही कष्टाचे काम म्हणजे पिकांना खत देणे आहे. त्यासाठी मजूर मिळत नाहीत, ही मोठीच अडचण पारंपरिक पध्दतीने कपाशी पिकाला खत देण्यासाठी शेतकऱ्याला खाद्यांवर फावडे आणि कमरेला ओटी बांधावी लागते, तर सोयाबीन पिकाला मोघ्याव्दारे प्रत्येक ओळीत फिरुन प्रत्येक झाडाच्या मुळापाशी खत द्यावे लागते. ही बाब खूप कष्टाची आहे. यासाठी वेळ आणि प्रचंड मेहनत लागते. पण लांडकर यांनी आपल्या सर्जनशीलतेतून यावर मात केली आहे. कपाशी पिकाला खत देण्यासाठी त्यांनी पोटाला ओटी बांधण्याची गरज ठेवली नाही. त्यासाठी प्रथम खताचे पाणी करायचे व त्या पाण्यावर टिल्लू मोटारपंप बसवून तो ठिबक सिंचनाच्या नळीला जोडायचा. यामुळे थेट झाडाच्या मुळांना, बुंध्यांना एकाचवेळी पाण्यासह खताची आवश्यकते नुसार मात्रा मिळते. यामध्ये खताचा अपव्यय सुध्दा होत नाही. 

गतवर्षी पाणीटंचाई असताना त्यांनी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करुन अत्यंत कमी पाण्यावर गहू, हरभरा यांचे भरघोस उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी मान्सूनपूर्व बीटी कापसाची लागवड केली होती. एक बाय चार फुटावर टोकन पध्दतीने कापूस लागवड करुन ठिबक सिंचनाव्दारे पाणी व खत दिले. परिणामी, २४ तासात एक च लांब आकाराचा अंकुर येऊन पाचव्या दिवशी पूर्ण कापूस उगवला. केवळ दोन ते तीन वेळा पाणी देऊन उत्पन्न घेतले. मात्र, कपाशीच्या मशागतीसाठी जास्त खर्च येतो म्हणून या पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेतले. परिणामी, कपाशीच्या पिकांवर झालेला पुर्ण खर्च निघून कपाशीचे पीक निव्वळ नफयात राहिले. दरम्यान, त्यांनी आपल्या गटशेतीत उन्हाळी मूग पेरुन समाधानकारक उत्पन्न घेतले. लांडकर यांच्या मतानुसार, अभ्यासपूर्ण सिंचनातून समृध्दी आणणे शक्य आहे. सर्वच व्यवसायांमध्ये मोजमापाचा वापर केला जातो. शेती व्यवसायातसुध्दा अशाच अचूक मोजमापाचीची गरज आहे. पाणी मोजून देणे गरजेचे आहे. पिकाच्या मुळया जर पाच से.मी. खोल असतील, तर अडीच से.मी. खोलीपर्यंत पाणी पिकालाद्यावे. असे पाणी दिल्यास ओलावा पाच से.मी. पर्यंत हमखास जाते. त्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर बोरगावच्या गट शेतीत केला जात आहे. हा पर्जन्यमापक तुषार सिंचनाखाली ठेवला जातो. त्याचवेळी एखादे रोपटे उपटून मुळे किती खोल आहेत, हे बघायचे, मुळयांच्या लांबीच्या निम्मे पाणी पर्जन्यमापकात जमा झाले की तुषार सिंचन संच बंद करायचा. पिकाला दिलेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी जमिनीत मुरते किंवा बाष्पीभवनाव्दारे वाया जाते.

उर्वरित केवळ दहाच टक्के पाणी पिकाच्या उपयोगाकरिता येते, त्यामुळे अभ्यासपूर्ण सिंचन करणे गरजेचे आहे. तसेच केल्यास निश्चितच कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही, हे लांडकर यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. 

Monday, November 28, 2011

अभ्यास, मनन, चिंतन त्रिसुत्री महत्वाची

दहिवडी सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या व उच्च माध्यमिक शिक्षण मंचर येथे पूर्ण करुन पुण्यातील बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. सचिन ओंबासे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये २२८ वा नंबर पटकाविला आहे.या परीक्षांबाबत त्यांच्याशी महान्यूजने केलेली ही बातचित 

प्रश्न- एक डॉक्टर आहात तरी देखिल आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय का घेतला? 
उत्तर : माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन असे वाटले की, मी जे डॉक्टर म्हणून काम करतो आहे त्याचा अंतीम प्रभाव खूप आहे. पण तेवढेच काम जर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून केले तर त्याचा इम्पॅक्ट समाजातील मोठय़ा घटकावर पडेल आणि आपले जे निर्णय आहेत, ज्या शासकीय योजना आपण राबविणार आहोत त्याचे इम्प्लिमेंटेशन खूप योग्य त-हेने करुन समाजासाठी जास्तीतजास्त उपयोग होईल. आधीपासून समाजाची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून मी या सेवेकडे वळलो.

प्रश्न- पूर्व परीक्षेला नेमका कसा अभ्यास केला? 
उत्तर : सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे पूर्णपणे विश्लेषण झाले पाहिजे. पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय हे वेगवेगळे घटक असतात. माझा वैकल्पिक विषय भूगोल होता. त्यात स्पेसिफिक अशी ट्रेंड असतात. ती लक्षात आली पाहिजे. या परीक्षेत पास होण्यासाठी काही महत्वाची पुस्तकेही असतात. ठराविक पुस्तकांचे सतत वाचन केल्यामुळे त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये ते खूप डीटेलमध्ये प्रश्न विचारतात. प्रश्नांचा एकंदरीत अंदाज मला आला की, कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि त्यामुळे मी पूर्व परीक्षेत यशस्वी होऊ शकलो. 

प्रश्न-मुख्य परीक्षेचा नेमका अभ्यास कसा केलात? 
उत्तर : काही क्लासेसकडून मार्गदर्शन घेऊन मी विषय निवडला. काही महत्वाच्या सात-आठ पुस्तकांचा मी व्यवस्थित अभ्यास करुन ठेवला. तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचाही अभ्यास केला. सविस्तर वाचनावर भ्‍र दिला. अभ्यास, मनन, चिंतन या तीन सूत्रानी अभ्यास होतो. अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा असा मार्गदर्शक लागतो. आपण वाचलेले मनन करणे गरजेचे आहे आणि सर्वात शेवटी चिंतन महत्त्वाचे आहे.

प्रश्न:- या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात काही गैरसमज असतात, की आपल्याला आता दिल्लीला जावे लागेल. यासंदर्भात आपला अनुभव काय आहे?
उत्तर:- दिल्लीला जाणे फायदेशीर नाही, असे माझे ठाम मत आहे. दिल्लीत क्लास करणार्‍यांची उत्तरे लिहिण्याची एक विशिष्ट पध्दत होऊन जाते. उत्तर तपासताना कळते, की हे अमुक क्लासचे उत्तर आहे. पण युपीएसला हे चालत नाही. तुमची स्वत:ची ओरीजनॉलिटी हवी. इंटिग्रिटी, तुमचे विचार हवेत. त्यामुळे आपण दिल्लीपासून लांब राहतो तेव्हा आपण स्वत:चा वेगळा विकास करतो. त्यामुळेच दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्राचा टक्का वाढत चालला आहे.

प्रश्न- ग्रामीण भागातील मुलांना काय मार्गदर्शन कराल? 
उत्तर : जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आणि मुख्य म्हणजे आपण ग्रामीण भागातून मातृभाषेतून शिक्षण घेत आहोत हा मनातील न्युनगंड ग्रामीण भागातील मुलांनी मनातून काढून टाकावा. मग यश आपलेच आहे. फक्त आपली अभ्यास आणि परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. 

Saturday, November 26, 2011

पैठणीचे नवरस

पैठणी शब्द कानावर आल्यावर मनात उमटतो भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पांरपारिक प्रकार. पैठणीचा गर्भरेशमी जरीचा आणि काठ रूंद व ठसठशीत वेलबुट्टीचा पदर. संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखीच वेलबुट्टी असणे, हे तिचे खास वैशिष्टय विवाह प्रसंगी नववधूचा श्रृंगार व इतर मंगलकार्यात गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात आजही दिसून येते. 

मराठी स्त्रीच्या सौदर्यांचा आविष्कार पैठणीमुळेच झाला.महाराष्ट्रायीन संस्कृतीत पैठणीचे महत्व हे स्त्रीच्या अस्तित्वाशी जोडले गेले आहे.आज महिला सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून पैठणी कडे बघितले जाते. जेथे मराठी स्त्रीच्या श्रृंगाराचा विषय निघतो तिथे सुरूवातच तिने नेसलेल्या पैठणीने होते. पैठणी महाराष्ट्रीयन स्त्रीच्या सौदर्यांच लेणं आहे, तीचं स्त्रीत्व जपणं आहे, तिची ओळख आहे, म्हणून ती आपल्या जीवन साथीला म्हणते राया मला एक तरी पैठणी घेऊन दया की, तिच्या कपाटात पैठणी असणे हीच तिची संपन्नता दर्शविते. 

सध्या दिल्ली येथील प्रगती मैदानात जागतिक व्यापार मेळा सुरू आहे. या दरम्यान प्रत्येक राज्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन येथे घडवावे लागते. यावर्षी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाने पैठणी हा विषय घेऊन पैठणीचे नवरस सादर केले. उपस्थित दर्शकांनी गुलाबी थंडीत भरजरी पैठणीचा मनसोक्त आनंद लुटला.

श्रुंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स, अद्भभुत, शांत अश्या नवरसाचे दर्शन मराठी स्त्री पैठणी नेसून कसे व्यक्त करते हे येथे दर्शविण्यात आले. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती राधिका रस्तोगी यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून सादर झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित दर्शकांनी टाळयांच्या गजराने तसेच प्रशंसनीय शब्दांनी प्रतिसाद दिला.

या सांस्कृतिक कार्यक्रमात पैठणीचा जन्म, पैठणीचा उत्तरोत्तर विकास, पैठणीला मिळालेले राजाश्रय या सर्वाचा इतिहास नृत्य नाटिकाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. गेले दोन हजार वर्षे पवित्र गोदातीरी वसलेले पैठण हे कलेचे केंद्र म्हणून आजही त्याच अभिमानाने ओळखले जाते. पैठण नाववरूनच ‘पैठणी ’ हे नाव या महावस्त्राला मिळाले. पैठणच्या सातवाहन राज्याचा या कलेला राजाश्रय होता. - जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रूंद असून तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत. हे सगळं नृत्य नाटयाच्या माध्यमाने बघत असताना प्रेक्षक अगदी भारावल्यासारखे होत होते.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत पैठणीची परंपरागत शैली व उच्च दर्जा टिकून होता. नंतरच्या काळात लोकाभिरूचीत पालट होऊ लागला आणि पैठणीच्या परंपरागत शैलीमध्ये नवनवे आकृतिबंध निर्माण होत गेले. दोन हजार वर्षांपासून ते आजपर्यंतचे पैठणीचे बदलले रूपडे. 

आज पैठणी महावस्त्राने सलवार- कृर्ती , स्कट, टॉप इथपर्यंत नव्या फॅशनशी तिने जुळवून घेतले आहे. या सर्व बदलांना पैठणी या कार्यक्रमातून अतिशय सुंदररित्या दर्शविण्यात आले. जुन्या काळात पैठणी नेसून महिलेची दिनचर्या कशी असायची हेही दाखविण्यात आले. पैठणीवर फॅशन शो ही करण्यात आला तो उपस्थित दर्शकांना भावला देखील. दिल्लीकरांसह परदेशी लोकांनीही पैठणीचा मानाचा मुजरा स्वीकार केला. 

  • अंजु कांबळे- निमसरकर 
  • Wednesday, November 23, 2011

    जंगल. . .! हिरवीगार वनराई, उंचच उंच बांबू विविधरंगी फुलं. . .

    जंगल. . .! हिरवीगार वनराई, उंचच उंच बांबू विविधरंगी फुलं. . . अशी जंगलाची प्रतिमा चटकन डोळ्यासमोर उभी राहते !मात्र चार भिंतीच्या आत राहून जंगल, जंगलातील पशु-पक्षी व प्राण्यांच्या अद्भुत व सुरस कथा जर ऐकताना तुम्ही तल्लीन होत असाल तर प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने ते अनुभवले त्या व्यक्तीचे जीवन किती समृद्ध असावे ? 

    निसर्गाच्या सहवासात राहून, शासकीय सेवेसोबतच वनसंपदेवर भरपूर लिखाण केलेले पक्षितज्ज्ञ, वन्यजीवशास्त्रज्ञ मारुती चित्तमपल्ली यांच्या ७९ वाढदिवसाला जाण्याचा योग आला. . . त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात . . . चित्तमपल्लींनी जंगलात राहून केलेल्या अफाट संशोधनाला श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

    अस्वल . . . किंवा मादी अस्वलांत ही बेस्ट पॅरेंटीग असतं. अस्वल झाडावर चढून मध तोंडात गोळा करतात. नंतर ते गोळा केलेलं मध दगडावर उन्हांत गोल-गोल पसरवून त्याची पोळी करतात अन् नंतर ती आपल्या गुहेत नेतात. पावसाळ्यात मुला-बाळांना खाण्याची सोय म्हणून!

    एरव्ही वाघापेक्षाही क्रूर ओरबाडून ओरबाडून माणसाला विद्रुप करणाऱ्या अस्वलांनाही त्यांच्या पिल्लांविषयी असलेल्या ममत्वाचे हे उदाहरण.

    नवेगाव बांध, मेळघाट, पेंच या प्रकल्पामध्ये काम करताना किंवा निसर्गाची मुळातच आवड असल्याने चित्तमपल्लींना निसर्गातून शिकण्याची संधीच मिळाली. त्यामध्ये पदाचे काम समजून ओझे न बाळगता त्यांनी चकवा चांदण ,केशराचा पाऊस, वनोपनिषद लिहिणारे चित्तमपल्ली आमच्यात खुद्द श्रोता म्हणून उपस्थित होते. त्यापेक्षा वेगळा बहुमान तो काय असावा?

    निसर्गाशी एकरुप होऊन विद्यार्थ्यांसारखे ज्ञानकण गोळा करणारे मारुती चित्तमपल्ली घ्अरण्यऋषीचं ङ म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. याचं कारण या ह्दय सोहळ्याच्या अध्यक्षा, लेखिका आशा सावदेकर यांनी सांगितलं.. . चित्तमपल्लींचा जन्मच मुळी जंगलात झाला आहे.

    रात्री अपरात्री आदिवासी जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिला, इडियाडोह धरणात मासेमारी करुन पोट भरणारा मासे मारणारा गरिब ढिवर यांच्या सोबत राहून संशोधकवृत्तीने मत्स्यकोश लिहीणारे चित्तमपल्ली शासकीय नोकरीला आपल्या आनंदाच झाड समजून सेवा करीत राहीले.

    लहानपणापासून माकड म्हणजे आपल्या चेष्टेचा विषय म्हणूनच माकडचेष्टा करु 
    नकोस हा शब्दप्रयोग जडलेला. मात्र माकडाच्या कुतूहलाचे , बावळटपणाचे किस्से ऐकून उपस्थितांना जणू आपण सध्या जंगलात उभं राहून प्रत्यक्ष दृश्य पाहत असल्याचा भास झाला. खानदेश भागात माकडं जंगलात एकत्र मिळून काट्या-कुटक्या एकत्र करुन त्यांची मांडणी शेकोटीसारखी करतात ( ती पेटवत मात्र नाही) मात्र ही लाकडे कधीच पेटत नाही. म्हणूनच त्याला माकडाची लाकड म्हणत असावे .

    बहुतेक रानकुत्री शिकार करताना काय-काय (युक्त्या) वापरतात त्याही ऐकण्यासारख्याचं आहेत.माकड चतूर असतात ती सहजासहजी हाती लागत नाही.जंगलात जगण्यासाठी जीवोजीवस्य जीवनम:! व सव्हार्यव्हल फॉर द फिटेस्ट नुसार जगण्यासाठी खाणं आलं व खाण्यासाठी कोणाला तरी भक्ष्य करणे आलं. 

    त्याचाच एक किस्सा म्हणजे माकडांचा ग्रुप झाडावर बसलेला असतो. रानकुत्रे झाडावर चढू शकत नाही. मग दोन किंवा तीन रानकुत्री ज्या झाडावर माकड बसलेली असतात त्या झाडाच्या बुंध्याशी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यासारखे गोल-गोल चक्कर मारतात (वरुन निरीक्षण करताना) माकडाचे डोळे त्याच्या गणिक गोल-गोल फिरतात. लहान-लहान माकडाची पिल्लं भेलकांडून खाली पडतात व रानकुत्र्यांना आयतंच त्यांचं भक्ष्य सापडतं.

    जंगलातील कथाही सुरस रम्य असतात. त्यामध्ये तल्लीन होऊन ऐकताना आपण क्रॉक्रिटच्या जंगलात राहतो याची खंत वाटत राहते.

    वाघोबाच्या सहवासात राहूनही केशराचा पाऊस सारखं रोमॅटिक ललित लिहिणाऱ्या चित्तमपल्ली विषयीचा तो कृतज्ञ सोहळाच जणू. . .

    हॉलमधून बाहेर पडताना श्रोत्यांचे कान तृप्त होते कारण रानवाटांचा प्रवास सर्वांना भावला होता.

  • शैलजा वाघ- दांदळे
  • Monday, November 21, 2011

    मी कोण ? माझा जन्म कसा झाला ? माझ्या शरीरात काय दडले आहे ? माझ्या जीवनाचे उदिष्ट काय ?

    मी कोण ? माझा जन्म कसा झाला ? माझ्या शरीरात काय दडले आहे ? माझ्या जीवनाचे उदिष्ट काय ? असे एक ना अनेक शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक पातळीवर पडणारे प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहेत व या शंकाचे निरसन होणेही तितकेच गरजेचे आहे. अन् हया शंकेचे निरसन झाले ते कोssहम या कार्यक्रमातून. वेळ सकाळची होती कामाचा एक भाग म्हणून मी कोहम या अभिनव संग्रहालयाच्या उदघाटन कार्यक्रमास गेलो. पण तेथील वातावरण पाहून कामाचा भाग तर सोडाच पण एखादया रमणीय ठिकाणी गेल्यावर माणूस कसा तहान भूक विसरुन त्यात रममाण होतो अगदी त्याप्रमाणे मी रमलो होतो. अन् तेथे आलेले प्रेक्षकही हेच अनुभवत होते. 

    वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य चे संचालक प्रा.डॉ.प्रविण शिनगारे, जिल्हाधिकारी पी.वेलरासू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगूरू डॉ.अरूण जामकर यांच्या उपस्थितीत कोहम या अभिनव संग्रहालयाचे उद्घाटन झाले.

    मानवी जीवनाशी निगडीत ३२ संकल्पनांच्या मांडणीव्दारे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील असे डॉ.ज्ञानेश्वर चोपडे यांनी आपल्या प्रास्तविकात स्पष्ट केले. गेली २० वर्षे मानवी शरीररचनेचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानेश्वर चोपडे यांची ही संकल्पना आहे. २००० साली त्यांनी ही संकल्पना मांडली होती. १० वर्षाच्या अथक परिश्रमातून कोहमच्या रूपाने आज हे संग्रहालय त्यांनी जेनेटिक्स हेल्थ अँण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने साकारले आहे.

    कोहम हा मूळ संस्कृत शब्द याचा अर्थ मी कोण ? या नावाला सार्थ अशाच संकल्पना आणि प्रतिकृतींची मांडणी या संग्रहालयात केली आहे. एका सूक्ष्म पेशीपासून जीवनिर्मिती होते. संग्रहालयातील प्रतिकृतींची मांडणी मुख्यत: तीन प्रकारात मोडते यात जन्मापूर्वीचे आयुष्य, सुष्टीकर्त्यानी केलेली जीवनाची भाषा आणि अंतर्गत व बाहय शरीररचेनेची किमया यांचा यात समावेश आहे. मनोरंजनासोबत थोडयाच वेळात स्वत:च्या अस्तित्वाविषीच्या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच आपल्याला शरीररचना, कार्य आणि वाढ याविषयीचे ज्ञान येथे मिळू शकते.

    जेनेटिक्सच्या अभ्यासकांबरोबर सामान्य माणसाला देखील सहज आपले शरीर उमगू शकेल अशा पध्दतीने येथे प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. संग्रहालयात सृष्टी निर्मात्याने चूक केली तर ?' या प्रश्नाचा परिणाम दाखविणाऱ्या प्रतिकृती संपूर्ण संग्रहालयात मांडलेल्या संकल्पनांपेक्षा वेगळी संकल्पना ठरली आहे. यात सुष्टीनिर्मात्याच्या चुकीमुळे मानवी शरीररचनेवर होणारे परिणाम तंतोतंत दाखविण्यात आले आहेत.

    प्रमुख पाहुण्यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. डॉ.शिणगारे म्हणाले की, स्पर्धेची भीती असणारे वैद्यकीय अध्ययन क्षेत्रात येतात मात्र डॉ.चोपडे हे अत्यंत तळमळीन शिकवत. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे या मोठया विश्वात प्रवेश केला व ध्येयवेडया ध्यासातून त्रिमित प्रतिकृती (मॉडेल्स) तयार करून हे उत्कृष्ठ असे संग्रहालय उभे केले आहे. शालेय, महविद्यालयीन विद्यार्थी तसेच जिज्ञासू नागरिकांनी येथे जरूर भेट देवून शास्त्रीय माहिती जाणून घ्यावी त्यातूनच जागृती होईल. या अभिनव संग्रहालयाचा नाशिकच्या पर्यटनस्थळात समावेश व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

    जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी भविष्यात नाशिकसाठी कोहम संग्रहालय नवे आकर्षण ठरणार असल्याचे सांगितले. कोहम संग्रहालाची सध्या असलेली जागा अपूरी असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या प्रागंणात असलेल्या हिस्ट्री ऑफ मेडिसीन म्युझियम जवळ या संग्रहालयाला जागा उपलब्ध करून दिली जाईल .

    पुणे येथे विद्यापिठातर्फे सर्टिफिकेट कोर्स ऑफ जिनेटिक हा अभ्यासक्रम राबवला जातो तो डॉ.चोपडे यांना नाशकात राबविण्यासाठी दिला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगूरू डॉ.अरूण जामकर यांनी दिली. कोहम हे संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी एक ज्ञानाचे खुले दालन तर आहेच पण सामान्य माणसालादेखील आपले कुतूहल येथे शमवता येईल. अध्यात्म, जीवशास्त्र, जेनेटिक्स यांचा उत्तम संगम या संग्रहालयाने घातला आहे असेही मत त्यांनी मांडले.

    जगाच्या वैद्यकीय नकाशात नाशिकने स्थान मिळवले तर आहेच व त्यात या संग्रहालयाच्या रूपाने नाशिकच्या वैभवात भर घातली आहे. कोहम संग्रहालयाच्या रूपाने नाशिक शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

    किरण डोळस 

    Saturday, November 19, 2011

    प्रत्यक्ष गरजू व्यक्तींना लाभ देण्यासाठीच सामाजिक सर्वेक्षण ही संकल्पना - जिल्हाधिकारी श्याम वर्धने

    सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार वृद्ध, अपंग, विधवांना अर्थसहाय्य करण्यात येत असते. समाजातील अशा निराधार व्यक्तींना हा एक मोठाच आधार असतो. परंतु हे अर्थसहाय्य पात्र अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यासच शासनाचा अनुदान देण्यामागचा हेतू साध्य होईल. केवळ या उद्देशानेच सांगली जिल्ह्यामध्ये योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या हेतूने सामाजिक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. लोकांचा सहभाग यामध्ये महत्वाचा असल्याने ग्रामसभा हा घटक महत्वाचा समजून योजनेतील पात्रतेच्या अटी व योजनेची ग्रामसभेला माहिती देवून त्यांच्यामार्फतच अपात्र लाभार्थी शोधण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात आला. महसूल यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष लाभार्थी तपासणी व ग्रामसभेमार्फत कार्यवाही केल्यामुळे ही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचली. अपात्र लाभार्थी वगळण्यात आल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांच्या निधीची बचत झाली.

    या उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेऊन त्याची राज्यातील इतर जिल्ह्यात माहिती पोहोचावी या उद्देशाने सांगली येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी समाजातील निराधार घटकांपर्यंत या योजना जाव्यात म्हणून केलेल्या प्रयत्नामुळे सांगली जिल्हा हा राज्यात आघाडीवर राहिला आहे. या संदर्भात श्री. वर्धने यांच्याशी केलेली ही बातचीत ....

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात विविध योजना राबविल्या जात असतात. या योजनांचा फायदा खऱ्या, पात्र, गरजू लाभार्थ्यांनाच व्हावा हा खरा उद्देश आहे. परंतु या योजनेचे फायदे अनेक अपात्र लाभार्थी घेतात. यामुळे शासनाचा निधी वाया जातो. अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन राज्य शासनाच्या निधीच्या बचतीसाठी तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून सांगली जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येऊन सांगली जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून अनेक निराधारांना लाभ देण्यात आला. जिल्ह्याने आखलेल्या विशेष आराखड्यामुळे या आराखड्याला सांगली पॅटर्न हे नाव मिळाले. या संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत कोणकोणत्या कार्यवाही करण्यात आल्या अशी विचारणा केली असता श्री. वर्धने म्हणाले, समाजातील अत्यंत शेवटच्या तळागाळातील दुर्लक्षित घटकांकरिता अत्यंत कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने व उपक्रमशीलपणे या योजना राबविल्याने आम्हाला हे यश लाभले आहे.

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य संदर्भात जिल्ह्यात एक नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमागचा हेतू काय आहे ? यावर श्री. वर्धने उत्तरले, अंदाजे दोन वर्षापूर्वी शासनस्तरावर वेगवेगळे उपक्रमशील विचार मांडण्यात आले होते. या विचारांना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन क्रमांक एक वर आढल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. उदा. केंद्रशासनाने संपूर्ण देशामध्ये विशेष सहाय्य योजनेकरिता सोशल ऑडिटींग (सामाजिक सर्वेक्षण) लागू केले हे आमच्या सांगली जिल्ह्याच्या अनुभवावरुनच. शासनाला विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता www.ssp.maha.gov.in सॉफ्टवेअर करावयाचे आहे. यामुळे ३५ जिल्ह्याचे बायोमॅट्रिक तसेच अनुदान वाटपाचे संपूर्णपणे ऑनलाईन कार्यप्रणाली राबविता येईल. तसेच राज्यातील जो उपेक्षित, दुर्लक्षित असा निराधार घटक आहे त्यास वेळेवर मदत मिळेल. आणि यामुळेच गरीब, उपेक्षित अशा लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील यात शंका नाही.

    विभागामार्फत उपेक्षित तसेच वंचितांसाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जात आहेत? संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा आवास योजना, श्रावणबाळ योजना, अपंग निवृत्ती पेन्शन, आम आदमी बिमा योजना अशा विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. परंतु या गरीबांसाठीच्या योजनांचा अपात्र, निकषात न बसणारे लाभार्थी फायदा घेत असतात. यासाठी जिल्ह्यात गेले दोन वर्षे नियोजनबद्ध शोध मोहीम राबविली जात आहे. त्याची फलनिष्पत्ती आता चांगल्याप्रकारे दिसून आली असून कोट्यावधी रुपयांची आर्थिक बचत झाली आहे.

    सामाजिक सर्वेक्षण असे आपण जे म्हणता, ही नेमकी संकल्पना काय आहे अशी विचारणा केली असता, श्री. वर्धने म्हणाले, योजनांची माहिती गावागावात पोहोचावी, पात्र, अपात्र लाभार्थी यांच्या संदर्भात ग्रामसभेत चर्चा व्हावी हा खरा उद्देश असल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजना अशा सामाजिक स्वरुपाच्या व वैयक्तिक लाभाच्या या योजना असल्याने गरजू, पात्र आणि योग्य अशा लाभार्थ्यांनाच अनुदान मिळावे हा खरा उद्देश आहे. आणि योजना राबवित असताना प्रत्यक्षात गरजू व्यक्तींना हा लाभ मिळतो की नाही हे तपासणे गरजेचे आहे आणि केवळ या गरजेपोटी सामाजिक सर्वेक्षण (सोशल ऑडिट) ही संकल्पना पुढे आली.

    हे सामाजिक सर्वेक्षण करताना गरजूंना याचा लाभ होतो का. लाभार्थ्यांच्या निकषात ते बसतात का. मयत किंवा स्थलांतरीत व्यक्ती आहे का. दुसऱ्याच्या नावावर अर्ज भरला आहे का याची खातरजमा यामध्ये केली जाते. दरवर्षी प्रत्यक्ष लाभार्थी पाहूनच निकषानुसार चौकशी करुन पात्र व अपात्र व्यक्तींची नावे ग्रामसभेत जाहीर केली जातात. तसेच लाभार्थ्याला लाभ द्यावयाचा किंवा नाही याबाबतही ग्रामसभेत ठरविले जाते. अशी अपात्र आणि पात्र लाभार्थ्यांची तपासणी तलाठी करीत असतो. आणि ग्रामसभेत चर्चा करुनच हे निर्णय जाहीर केले जातात.

    आपल्या गावात कोणते लाभार्थी लाभ घेत आहेत याची माहिती गावकऱ्यांना असली पाहिजे. लाभार्थी खरोखरच निकषात बसतात काय याची माहिती तलाठ्याने घेतली पाहिजे. अपात्र लाभार्थ्याविषयी ग्रामसभेत झालेली चर्चा प्रशासनाला कळविली पाहिजे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभेत चर्चा व्हावी. अशी ही सोशल ऑडीटची व्याप्ती आहे. सोशल ऑडिटींग या संकल्पनेचे मूळ म्हणजे अपात्र लाभार्थींचा शोध. जिल्ह्यात नियोजनबद्धतेने ही मोहीम राबविल्यामुळे या योजनेचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला आहे. इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेच्या तपासणीत ६ हजार बोगस लाभार्थी आढळून आले. यामुळे राज्य शासनाचे साडेतीन कोटी वाचणार आहेत. या योजने अंतर्गत निराधारांना महिन्याला ५०० रुपये मानधन देण्यात येते. योजनेत बोगस लाभार्थी असल्याचे आढळून आल्यावर स्वतंत्र पथकामार्फत तपासणी मोहीम राबविली. त्यामुळे राज्य शासनाच्या निधीची बचत होणार आहे. याशिवाय १ हजार ५४४ जणांना पेन्शन का बंद करु नये अशा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. उपजिल्हाधिकारी प्रदीप कडूस्कर यांनी यासाठी विशेष टीम तयार केली होती. पेन्शन मंजूर करताना स्थानिक पातळीवर आमदारांच्या अध्यक्षतेखालील समित्या असतात. या समित्या लाभार्थ्यांची निवड करीत असतात.
    जिल्ह्यात आम आदमी बिमा योजना तसेच अपंगांविषयीच्या योजनाही अत्यंत चांगल्यारितीने राबविल्या गेलेल्या आहेत. राज्यात ३२ लाख व्यक्तींना आम आदमी बिमा योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. अपात्र लाभार्थी सोशल ऑडिटींग केल्याने २००९-१० ते मार्च २०११ या कालावधीत विविध कारणांमुळे अपात्र ठरणारे लाभार्थी शोधून त्यांचे अनुदान बंद केल्याने जवळजवळ १ कोटी ६८ लाखांची बचत झाली आहे. हे सर्व करीत असताना अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप, अपंगांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्जाचे वाटपही या मेळाव्यात यशस्वीरित्या केलेले आहे.
    अपंगांसाठी विशेष मोहीम राबविताना त्या त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांनाही समाविष्ट करण्यात आले होते. अस्थीव्यंग, मतिमंद, नेत्रहिन, मूकबधीर रुग्णांची जागेवरच तपासणी करुन १६०० हून अधिक अपंगांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी वैद्यकीय महाविद्यालतयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात आले. प्रत्येक तालुक्यात किमान दोन मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात अडीच हजारहून अधिक अर्ज आले होते. या मेळाव्यांमुळे अपंगांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळाली. ४६७ अपंगांना पेन्शनही सुरु करण्यात आलेली आहे. मेळाव्यात तिथल्या तिथेच अर्ज भरुन घेऊन त्याचठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत असल्यामुळे अपंगांचा तसेच त्यांच्या नातेवाईकांचा वेळ आणि आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे या अपंगांचे नातेवाईक प्रशासनाला दुवा देत आहेत. अपंगांना प्रमाणपत्र देण्याच्या या योजनेमुळे जवळजवळ ८० टक्क्यांहून अपंगांची यादी कमी झाली.

    आम आदमी विमा योजने अंतर्गत जिल्ह्यात भूमीहीन कुटुंबांना संरक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात १८ हजार २९८ भूमीहीन कुटुंबांना या योजने अंतर्गत विम्याचे संरक्षण मिळाले आहे. या सर्वांना प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले आहे. आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असते. महसूल उपजिल्हाधिकारी प्रदीप कडूस्कर यांनी व्यक्तीश: लक्ष घालून ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली आहे. जिल्ह्यात ३ हजार ३४७ भूमीहीन लाभार्थी कुटुंबातील पाल्यास दरमहा ३०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. जिल्ह्याने आम आदमी विमा योजने अंतर्गत ३ लाखांचे उद्दिष्ट ठरविले असून आतापर्यंत १ लाख ३० हजार शेतकरी व शेतमजूरांची नोंदणी झालेली आहे.

    एचआयव्ही बाधीत बालक आणि कुटुंबांनाही या योजनांचा लाभ मिळावा म्हणून एडस् ग्रस्तांचे मेळावे जिल्ह्यात घेण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५६० अर्जांचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी २२२ अर्ज प्राप्त झाले असूुन १०६ जणांना पेन्शनही मंजूर झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष मेळावे आयोजित केले होते. या मेळाव्यात त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात आले. या सर्वेक्षणा संदर्भात पूर्वतयारी करीत असताना जिल्ह्यातील संबंधीत विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, समाजकल्याण अधिकारी तसेच तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि कार्यक्रमाची रुपरेखा ठरविण्यात आली. प्रत्येकाला त्याची जबाबदारी समजावून सांगण्यात आली. यासाठी तालुका व ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षक, आशा वर्कर्स, सेवाभावी संस्था, अपंग संघटना यांचीही मदत घेण्यात आली. विविध प्रकारचे आवश्यक असे अर्ज छापून घेण्यात येऊन त्याचेही वितरण अगदी शेवटच्या स्तरापर्यंत करण्यात आले. यामुळेच योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या. अपात्र लाभार्थी मिळाले आणि शासनाच्या योजनांची योग्य अशा व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचली याचे समाधान मला व्यक्तीश: झाले. माझे सहकारी प्रदीप कडूस्कर तसेच आमच्या कार्यालयातील शेवटचा घटक म्हणजे आमचे तलाठी, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनीही या मोहीमेत मनापासून सहभाग घेतल्याने आमची ही मोहीम यशस्वी झाली. जिल्ह्यातील ७३१ गावांचे सर्वेक्षण आम्ही करु शकलो असेही श्री. वर्धने यांनी यावेळी सांगितले.


  • अविनाश सुखटणकर

  • दिल्लीवर स्वार बारा बलुतेदार

    दिल्लीच्या व्यापार मेळयातील हस्तकला व बारा बलुतेदार ही प्रदर्शनीची थीम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यंत्र युगाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असणारी बारा बलुतेदारी संपुष्टात आली. मात्र ग्रामीण जीवनावर प्रभाव टाकणा-या या अर्थव्यवस्थेची आवश्यकता आजही गावगाडयात जाणवतेच. किंबहुना आजही ग्रामीण भागात त्यातील काही कामे पंरपरेने सुरूच आहेत.

    थोडया प्रमाणात ही परंपरा ‍िजवंत आहे.त्यातील शेती विषयाशी संबधित व्यवसाय अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.आता त्यासाठी जातीचे बंधन मात्र नाही.परंतु ही परंपरा केवळ महाराष्ट्राचीच नव्हती थोडयाबहुत अंतराने तमाम ग्रामीण भारताची ही अर्थव्यवस्था होती.

    या पंरपरेला भाषेनुसार व विभागानुसार वेगवेगळी नावे आहेत. मात्र हे चित्र शंभर-दिडशे वर्षापूर्वी तमाम भारतातील होते.आपल्या अस्तित्‍वाची जाणीव निर्माण झाल्यावर माणसाला भविष्याची आखणी करायचे स्फुरण चढते. अशा वेळी तो नकळत आपला इतिहासही जाणायला सुरूवात करतो. त्यामुळे नव्याने शिक्षित झालेल्या सर्व समाजाला आपण बलुतेदारीत कुठे हा प्रश्न कायम पडत असतो.

    हाच प्रश्न सध्या दिल्लीतील प्रगती मैदानावर जागतिक व्यापार मेळा पाहायला येणा-या हजारो भारतीयांना पडत आहे. विशेषत: प्रगती मैदानावरील महाराष्ट्र दालनाच्या दर्शनी भागातील बारा बलुतेदारांचे शिल्प आपला इतिहास शोधण्यास प्रवृत्त करते. 

    प्रगती मैदानावरील व्यापार मेळा आणि प्रत्येक राज्यांची अस्मिता तसेच या अस्मितेचे राजधानीत होणारे जाहीर प्रदर्शन या देशाच्या विविधतेतून एकतेचे प्रतिक असते. हा भारत इतक्या विविधतेत विभागला असतानादेखील, इतक्या वेगवेगळया अस्मितांना जपत असताना देखील एक देश म्हणून प्रभावीपणे जगापुढे कसा उभा राहतो याचे प्रात्याक्षिकही विदेशी पाहुण्यांना या ठिकाणी दिसते. 

    महाराष्ट्राचे यंदाचे दालन राज्याच्या लघु-उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका राधिका रस्तोगी यांच्या सर्व व्यापक व सर्व समावेशक भूमिकेतून आणि कल्पनेतून साकारले आहे. अस्सल ग्रामीण कला, कल्पकता आणि अभिव्यक्तीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्‍पद आहे.

    दालनाच्या बाहेरील प्रदर्शनी भागात बारा बलुतेदाराचे अप्रतिम शिल्प आहे. सोबतच बाराबलुतेदाराची माहिती देणारे विशाल माहितीपत्रकही लावण्यात आले आहे. शिल्पामध्ये बाराबलुतेदार असणारे चौगुला, महार, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सोनार, जोशी, परिट, गुरव, कोळी यांची कामे दर्शविली आहेत. तर आतमधील बहुतांश विक्री आणि प्रदर्शनाचे स्टॉल याच बलुतेदारीतून साकारलेल्या वस्तूंचे आहे. 

    आतमध्ये सर्वसमावेशक असा महाराष्ट्र आपआपल्या जिल्ह्याचे नाव घेऊन उभा आहे.धारावीच्या चामडयांच्या वस्तूंपासून कोल्हापूरच्या चपलेपर्यंत, पाचगणीच्या खाद्यपदार्थापासून लातूरच्या हस्तशिल्पापर्यंत सारेच दिसून येते. थोडक्यात गाव आणि गावगाडा चालविणारी बारा बलुतेदारी याचा ठसा संपूर्ण दालनात दिसून येतो. 

    महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या महिला बचतगटांच्या कार्यकुशलतेने हस्तशिल्पाला नवा आयाम मिळत असून त्याचे प्रात्यक्षिकही दिल्लीच्या या मैदानावर दिसत आहे. लहान मुलांच्या लाकडी खेळण्यांपासून गृहपयोगी अनेक वस्तू येथे उपलब्ध आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याची ओळख असणारे हातमाग, काचेच्या वस्तू, पैठणी साडया, दागिने, काष्टशिल्प व विविध भागातील सांस्कृतिक अभिव्यक्ती जपणारे पेहराव, राहणीमान, व जीवन पद्धती मांडणा-या वस्तूंचे प्रदर्शनही या दालनाचे आकर्षण ठरते. 

    यावर्षी दालनाच्या मुख्य दरवाज्याजवळ ग्रामीण भागातील धोतर अणि लुगडं घातलेल्या गावाचे पाटील आणि पाटलीण बाई यांचे ‍िजवंत शिल्प उभे आहे.पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या देहबोलीत हा पाटीलकीचा थाट दारावर उभा आहे.जणू प्राचीन गावाचे दर्शन घडवावे, बारा बलुतेदारी समजून सांगावी याचसाठी ही दोघे उभी असल्याचा भास होतो.ही जोडी प्रगती मैदानावर आमच्या अस्मितेला बहुराष्ट्रीय संस्कृतीशी मेळ घालण्याचे कार्य करीत आहे.

  • प्रवीण टाके 
  • Friday, November 18, 2011

    मसाला पिके यांची लागवड

    केंद्रात एक एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेली 'लाखी' बाग हे केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. केंद्रात आतापर्यंत झालेल्या पिक संशोधनावर आधाfरित ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. नारळ, मसालापिके आणि फळपिके यांची एकत्रित लागवड केल्यास प्रति हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल विकसित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मसाला आंतरपिकांची लागवड केल्यानंतर नारळाच्या उत्पादनात गेल्या २७ वर्षात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नारळ आणि जायफळ गटातून सर्वाधिक लाभ होत असल्याचे निष्कर्षही संशोधनाअंती मांडण्यात आले आहेत.

    पहिल्या प्रकारात नारळाच्या मध्यभागी एक जायफळ, दोन नारळांच्या मध्ये एक दालचिनी आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरीची रोपे लागवड केली असता एकरी ७० नारळ, ५४ जायफळ, १२३ दालचिनी आणि १४० काळीमिरी रोपे बसतात व त्यापासून १० वर्षानंतर सरासरी एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. दुसऱ्या प्रकारात चार नारळाच्या मध्यभागी जायफळ व त्याचे सभोवती अननस, दोन नारळांच्या मध्ये साडेसहा फुटावर केळी आणि दोन केळींच्या मध्ये ४ फुटावर २ दालचिनी, प्रत्येक नारळाच्या कोमऱ्यावर १ सुरण आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरी लागवड केली असता एका एकरात ७० नारळ, ५४ जायफळ, २८० केळी, २४६ दालचिनी, १४० काळीमिरी, २१६ सुरण, आणि १३५० अननस एवढी लागवड करता येते. अशाच पद्धतीने इतरही पद्धतीचे संशोधन या लाखी बागेत सातत्याने करण्यात येत आहे. विशेषत: एका ठिकाणी लावलेल्या रोपाची जागा दुसऱ्या वर्षी रिक्त ठेवण्यात येते आणि आदल्या वर्षी रिक्त असलेल्या जागेवर लागवड करण्यात येते. त्यामुळे जमिनीचा कस चांगल्या प्रकारे राहतो.

    कोकणात सरासरी दहा गुंठे नारळाचे क्षेत्र धारण करणाऱ्या बागायतदारांची संख्या जास्त आहे. या बागायतदारांचा विचार करून दहा गुंठे क्षेत्रावर उत्पन्न कसे वाढविता येईल याचा प्रात्यक्षिक प्लॉट केंद्रपरिसरात १९९८ पासून सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पपई अननस, वांगी, मिरची, शेवगा, वेलवर्गीय भाजीपाला, मसाला पिके यांची लागवड करण्यात येत आहे. दरवर्षी या प्लॉटपासून १५ ते २० हजार उत्पन्न मिळते आहे.

    नारळासोबत बागायतदारांनी मिश्र पिकांची लागवड केल्यास त्यांना कसा लाभ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक या केंद्रात दाखविले जाते. त्याअंतर्गत मिरचीच्या ज्वाला आणि कोकणी किर्ती जातींची लागवड, घेवडा, टोमॅटो, ढोबळी मिरची, नवलकोल, वांगी, शिराळी, काकडी, पडवळ अदी आंतरपिकांच्या लागवडींची शिफारसही केंद्राने केली आहे. दालचीनीची 'कोकण तेज' जात विककरण्यात केंद्रातील संशोधक यशस्वी ठरले आहेत. या जातीची चव उत्कृष्ट असून ३.२ टक्के तेल त्यात आहे. जायफळाची 'कोकण स्वाद' ही जातदेखील इथे विकसित करण्यात आली आहे. एका वर्षात प्रति झाड १५० किलो उत्पादन असणारी कोकमची 'कोंकण हातीस' जातदेखील केंद्रात विकसित करण्यात आली आहे.

    केंद्रात दरवर्षी नारळापासून सुमारे ५ टन कचरा आणि मसाला पिकांपासून प्रति हेक्टरी सुमारे ४ हजार किलो कचरा उपलब्ध होतो. या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यासाठी केंद्राच्या परिसरातच दोन युनिट उभारण्यात आले आहेत. प्रति हेक्टर २ ते ३ टन गांडुळखत उपलब्ध होते. या खताचा वापर बागेतील झाडांसाठी करण्यात येतो. तसेच याच ठिकाणी तयार होणारे व्हर्मीवॉशही रोपांसाठी उपयुक्त असते.

    केंद्रातर्फे कीड रोग नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे. या ठिकाणी गेंड्या भुंग्यांच्या उपद्रवापासून रक्षणासाठी महत्वाच्या उपायांबाबत बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पाने खाणारी अळी आणि काळ्या डोक्याच्या अळीच्या जैव किड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केंद्राने शोधली आहे.

    मसाला पिकांच्या कलमांना कोकणातील शेतकरी वर्गातून मोठी मागणी येऊ लागली आहे. या वर्गातील पिकांची कलमेदेखील केंद्रात केली जातात. दालचीनीची गुटी कलम पद्धत, जायफळाची कोय कलम आणि मृदकाष्ट पद्धत, जायफळासाठी मायफळाचा खुट अशा विविध पद्धती विकसीत करून केंद्राने कोकणातील शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखविला आहे. 

    संशोधन केंद्रामधील डॉ.नागवेकर यांच्यासह प्रा.विशाल सावंत आणि प्रा. संदीप गुरव अशा प्रकारच्या संशोधनात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात व्यस्त असतात. केंद्राच्या महसूली उत्पन्नातही वाढ होत असून ते गतवर्षी ३६ लाखापर्यंत पोहचले आहे. परिसरातील नागरिकांना येथील विक्री केंद्रात या ठिकाणचे उत्पादन अल्पदरात उपलब्ध करून दिले जाते. संशोधनाला नियोजनाची जोड देऊन इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या परिश्रमामुळेच केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. हा सन्मान निश्चितपणे इथल्या संशोधन कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरेल!

  • डॉ.किरण मोघे
  • Thursday, November 17, 2011

    नाशिक जिल्ह्यात मोबाईल ब्लाईंड स्कूल

    अंध मुले, मुली यांच्या जीवनात प्रकाशाचा किरण पसरवण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. अंध म्हणून जीवनात दु:खी न राहता त्यांना माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल ब्लाईंड स्कूल सुरु करुन जीवनाचा नवा तेजोमय प्रकाश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे प्रायोगिक तत्‍वावर मोबाईल ब्लाईंड स्कूल सुरु झाले असून हळूहळू जिल्ह्यातील १५ तालुक्यातही हे स्कूल सुरु होणार आहे. मुलांना शाळेत आणण्याऐवजी या प्रकल्पांतर्गत शाळा त्यांच्या घरापर्यंत नेण्यात येणार आहे. 

    या शाळेची मूळ संकल्पना चेन्नई येथील विद्यावृक्ष संस्थेची आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाची जबाबदारी नॅबने उचलली असून जिल्ह्याच्या समन्वयक म्हणून निरजा संगमनेरकर काम पहात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन स्तरावर या प्रकल्‍पाचे प्रत्यक्ष काम सुरु आहे. तालुक्यात ३०० ते ३५० गावे आहेत. एकाच वेळी या गावाचे सर्वेक्षण सुरु असून त्यावेळी ६ ठिकाणी शाळा सुरु झाली आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणासाठी सर्व शिक्षा अभियानाशी समन्वय साधला जात आहे. त्याशिवाय घरातील व्यक्तींबरोबरच तेथील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, शाळा यांच्याशी संपर्क साधला जातो आहे. यात ५ वर्षापर्यंतच्या अंध मुलांना शोधून त्यांना शाळेच्या वतीने पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंत १०० गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

    शंभर गावांमध्ये सापडलेल्या ज्योती शिंदे-मुळेगांव, मनोज गायकवाड-तळवाडे, देवीदास उघडे-वेळुजे, सौरभ शिंदे-लव्हाळी पाडा (वाधेरा) आणि तुकाराम शेवरे (खरवळ ) या ६ अंध मुलांची शाळा सुरु झाली आहे. ३ दिवस शाळा आणि ३ दिवस सर्वेक्षण असे वेळापत्रक आहे. 

    या शाळेत या मुलांना शाळापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना ब्रेल किट देण्यात येत आहे. या किटमध्ये बाराखडी असलेली एक पाटी आहे. ज्यात सामान्य बाराखडी आणि त्याखाली ब्रेलमधील बाराखडी आहे. ज्यावरुन त्यांना अक्षर ओळख करुन देणे सुरु आहे. याच किटमध्ये स्टायलस म्हणजे लेखक पाटी आहे. जिच्या मदतीने या मुलांना लिहायला शिकवले जाणार आहे. यातच गणित पाटीदेखील आहे. मोठी गणिते शिकवण्यासाठी अबॅकसचा आधार घेतला जाणार आहे. या मुलांची पहिलीला शाळेत जाण्यासाठीची पूर्ण तयारी करुन घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त या मुलांना मूलभूत प्रशिक्षण देखील दिले जाते आहे. ज्यात वैयक्तिक स्वच्छता, स्वावलंबन, संवाद कौशल्य शिकविले जात आहे. 

    याच्या व्यतिरिक्त शाळेसाठी या मुलांच्या कागदपत्राची तयारीदेखील पूर्ण केली जाणार आहे. यात सिव्हिल सर्जनचे त्यांच्या अंधत्‍वाबद्दलचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला व शाळेसाठी लागणाऱ्या अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. पालकांमध्ये जागरुकता वाढविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. पालकांमधील जागरुकता वाढवून मुलांची घरी उजळणी करुन घेण्यासाठी त्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. हा प्रकल्प जरी ४ ते ५ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी राबवला जात असला तरी सर्वेक्षणात जर यापेक्षी मोठी मुले आढळली तर त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उदाहरणार्थ ज्योती भोरु नावाची साडेनऊ वर्षाची मुलगी अद्यापही शाळेत गेलेली नाही. तिला नॅबच्याच विशेष शाळेत दाखल करण्यात आले असून तिची अक्षर ओळख सुरु झाली आहे. 

    चेन्नई येथील संस्थेतर्फे एक गाडी नॅबला देण्यात आली आहे. तिचेच सध्या शाळेत रुपांतर केले जात आहे. या गाडीतच एक वर्ग तयार केला जाईल. त्यात अंध मुलांना शिकविण्यासाठीच्या आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या आहेत. महिनाभरात हे काम पूर्ण होईल. सध्या ६ मुलांना त्यांच्या घरी शिकवले जाते. गाडीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही मुले गाडीतल्या शाळेतच शिकतील. मुलं शाळेत येण्याऐवजी अशा पध्दतीने शाळाच त्यांच्या दाराशी जाईल. त्र्यंबकेश्वर नंतर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असून प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षाचा राहील. 

    नारळ संशोधन केंद्र भाग १

    रत्नागिरी शहराजवळच्या भाट्ये गावातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा प्रथम पुरस्कार मिळाला. कोकणातील शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून नारळाच्या नवनवीन जाती विकसित करण्याच्या केंद्राच्या कार्याला ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता आहे.




    भारतात पामवर्गीय महत्त्वाची चार पिके असून त्यात नारळ, तेलताड, पालमेरा (तोडगोळे) आणि सुल्पी (सुरमाड) आदींचा समावेश आहे. या पिकांवर देशातील २२ केंद्रात संशोधन सुरू आहे. यापैकी सर्वाधिक १३ केंद्रांवर नारळावर संशोधन सुरू आहे. या सर्व केंद्रांची द्वैवार्षिक सभा भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. त्यामध्ये दोन वर्षात झालेल्या संशोधनावर आधारित शिफारस करण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येते. या वर्षात कासारकोड (केरळ) येथील 'केंद्रीय रोपण पिके संशोधन केंद्र' येथे घेण्यात आली. सभेत उत्कृष्ट काम करणाऱ्या संशोधन केंद्राची निवड करून त्यांना 'कै.अमित सिंग मेमोरीअल फाऊंडेशन पुरस्कार' देण्याचे निश्चित करण्यात आले. या पुरस्काराचा मान प्रथमच रत्नागिरी येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठांतर्गत स्थापण्यात आलेल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मिळाला.



    या प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना १ जुलै १९५५ रोजी झाली. डॉ.व्ही.पी. लिमये यांच्यासारखे संस्थापक आणि त्यानंतरच्या अनेक संशोधकांनी हे केंद्र विकसित करण्यात परिश्रम घेतले. केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सदस्य राजाभाऊ लिमये यांचेही मार्गदर्शन केंद्राच्या विकासात महत्वाचे आहे. कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्राचे संशोधन संचालक आणि केंद्रप्रमुख यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नातून गेल्या ५५ वर्षात केंद्राने लक्षवेधक प्रगती केली आणि त्याचा लाभ स्वाभाविकपणे कोकणातील शेतकऱ्यांना झाला.



    भाट्ये गावाच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या केंद्राच्या परिसरात सर्वसाधारणपणे वार्षिक ३००० सेंटीमीटर पाऊस पडतो. वालुकामय पोयटा जमीन आणि आवश्यक असणारे तापमान असे अनुकूल वातावरण परिसरात उपलब्ध असल्याने संशोधनाला चांगली चालना मिळते. इथल्या २५.८४ हेक्टर जमिनीवर संशोधन केंद्र उभारले असून २२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. केंद्राची स्थापना भारतीय मध्यवर्ती नारळ समितीतर्फे करण्यात आली होती. १९६९ मध्ये ते राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडे आणि कोकण कृषि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर १९७२ मध्ये या विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. केंद्राची ७५ टक्के आर्थिक जबाबदारी अखिल भारतीय तेलताड प्रकल्प आणि २५ टक्के महाराष्ट्र शासन उचलते.



    संशोधन केंद्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि संकरित वाणांचा संग्रह करून त्यांचा अभ्यास केला जातो. नारळ लागवडीची आदर्श पद्धती आणि त्यातील मिश्रपिकांबाबत अध्ययनावर केंद्रात भर दिला जातो. किड रोगावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून उपाय सुचविण्यात येतात. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात मसाला पिकांची लागवड करून त्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मसाला पिकांची कलमे तयार करून ती शेतकऱ्यांना केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येतात.केंद्रामार्फत नारळ आणि मसाल्याच्या कलमांची अत्यल्प दरात विक्री करण्यात येते. त्यामुळे केंद्राला महसूल मिळतो.



    केंद्रात एकत्रित केलेल्या २७ जाती आणि १३ संकरीत जाती यामधून लक्षद्वीप ऑर्डीनरी, टी x डी-केरासंकरा, प्रताप, फिलीपीन्स ऑर्डीनरी, चंद्रसंकरा, कोकण भाट्ये कोकनट हायब्रीड, केराबस्तर आणि गौतमी गंगा या जाती राज्यात लागवडीसाठी विकसित करण्यात आल्या आहेत. नारळ पिकाच्या मशागतीबाबत अनेक प्रयोग करण्यात येऊन पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण, आंतरपिके आदींबाबत मांडण्यात आलेले महत्त्वाचे निष्कर्ष शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.



    नारळासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची शिफारस, उंच नारळासाठी सेंद्रीय खताची शिफारस, कीड नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती, सूक्ष्म सिंचन पद्धती आदी उपयुक्त संशोधनामुळे कोकणातील नारळशेतीला मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी केंद्रातून २० हजार नारळाची रोपे आणि एक लाख बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. केंद्राला वर्षातून २० ते ३० हजार शेतकरी भेट देतात. अनेक शेतीसहलींच्या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येते. पावसाळ्यात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागत असल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ.दिलीप नागवेकर यांनी दिली.



    केंद्रात दररोज सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्यानंतर ' खरा तो एकची धर्म ' ही प्रार्थना घेतली जाते. प्राणीमात्रावर प्रेम करताना निसर्गाला समृद्ध करणाऱ्या वनस्पतींवर प्रेम करण्याची प्रेरणा कदाचित या प्रार्थनेतून सर्वांना मिळत असावी. केंद्राने संशोधनाबरोबरच सामाजिकतेचा पैलू सोबत ठेवीत काही उपक्रमही राबविले. केंद्रात तयार होणाऱ्या गवती चहाच्या रोपांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमधून ५० पैशाला रोप वाटण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लागवडीचे क्षेत्र विस्तारलेले असूनही त्यातील स्वच्छता आणि नेटकेपणा तेवढाच आनंद देणारा आहे. बागेत फिरताना पिवळे, नारंगी, हिरव्या रंगाचे नारळ ठिकठिकाणी दिसतात. नारळाच्या मधोमध जायफळ, दालचिनी, अननस, केळी आदी रोपे डौलाने उभी असलेली दिसतात.

    (क्रमश:)

    Monday, November 14, 2011

    शोभिवंत माशांचे संगोपन

    एखाद्या काचेच्या पेटीत रंगीत आणि चमकणारे मासे पाहिल्यावर माणसाला आल्हाददायक वाटते. सौंदर्याबरोबरच आपल्या हालचालींनी हे मासे आपला थकवाही दूर करतात. असे मासे आपल्याला नदी किंवा समुद्रात क्वचितच पहायला मिळतात. त्यामुळे ड्रॉईंगरूमची शोभा वाढविण्यासाठी लहानसे का होईना ॲक्वेरीअम घरात आणले जाते. पूर्वी हा छंद महानगरातून दिसत असे. मात्र आता लहान शहरातूनही हा छंद जोपासणारी मंडळी दिसू लागली आहेत. म्हणूनच वाढत्या मागणीप्रमाणे त्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी शोभिवंत माशांच्या संगोपन आणि संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग या अभ्यासाकडे वळताना दिसतो आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात 'शोभिवंत माशांचे संगोपन आणि बिजोत्पादन' या विषयावरील पाच दिवसांच्या प्रशिक्षण सत्रात हेच चित्र पहायला मिळाले.

    मत्स्यशेतीत शोभिवंत मत्स्यपालनाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. शोभिवंत मासे पाळणे हा फक्त छंदच नसून तो विस्तारणारा व्यवसाय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या क्षेत्राकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता शोभिवंत माशांच्या व्यवसायाकडे मत्स्यविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संशोधन केंद्रात गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कोळंबी उत्पादन, शोभिवंत माशांचे उत्पादन, ॲक्वेरिअम तयार करणे आदी विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्रांचे वर्षभरात आयोजन करण्यात येते. मूलभूत स्वरुपाच्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी करता यावा यादृष्टीने विषयाच्या प्रात्यक्षिकासह त्याचे सूक्ष्म पैलू प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांसमोर मांडले जातात. त्यामुळे अशा प्रशिक्षण सत्रांना राज्याबाहेरूनही प्रतिसाद मिळतो. शोभिवंत माशांच्या संगोपनाबाबत आयोजित या सत्रात गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. भाषेचा कुठलाही अडसर न येऊ देता या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा पूरेपूर लाभ घेतला.

    एमपीइडीएच्या आकडेवारीप्रमाणे भारतात साधारण 10 लक्ष लोक शोभिवंत मासे पाळण्याचा छंद जोपासतात आणि त्यामुळे अंतर्गत बाजारपेठेत 15 कोटी रुपयांची उलाढाल होते. तर एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची दरवर्षी निर्यात होते. जागतिक पातळीवर पाच अब्ज डॉलर्सपर्यंत आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होते. प्रतिवर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे नवी पिढी याकडे आकर्षित होत आहे. तरुण उद्योजकांना या व्यवसायातील बारकाव्यांची माहिती झाल्यास त्यातून ते चांगला व्यवसाय विकसित करू शकतात. प्रशिक्षणा दरम्यान या सर्व पैलुंना स्पर्श करण्यात आला.

    शोभिवंत मासे पाळताना त्यांचे प्रकार, त्यांची जात, खाद्य, वागणूक, त्यांचे प्रजनन आदीबाबत सविस्तर माहिती असणे आवश्यक असते. त्यातील काही माहिती अत्यंत रोचक असते. शोभिवंत माशाला एकूण 7 मऊ व टोकरी काट्यांपासून बनलेले पर असतात. गप्पी मासा, स्वेर्डटेल, मोली, प्लॅटी मासा, बार्ब मासे, गोल्डफिश, सिंगल टेल, डबल टेल, रासबोरीनी, डॅनिओ, कॅरासिडी असे विविध प्रकार प्रशिक्षणा दरम्यान अभ्यासता येतात. प्रत्येक माशाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. हे मासे कोणत्या देशात आढळतात, त्यांचे बीज कसे प्राप्त करता येते, माशांचे संगोपन करताना काय काळजी घ्यावी आदी गोष्टी कळल्यावर या व्यवसायात होणारी हानी टाळता येते आणि स्वाभाविकपणे फायद्याचे प्रमाण वाढते.

    डॉ. विजय जोशी आणि डॉ. राघवेंद्र पै यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण सत्रात मत्स्यालयाची बांधणी, कृत्रिम खाद्यनिर्मिती, मत्स्यालयातील पाणवनस्पती असे नाविन्यपूर्ण विषय हाताळले गेले. माशांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या पाणवनस्पतींचा व्यवसायदेखील मोठा फायदेशीर असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले. या व्यवसायाच्या क्षेत्रात तरुणांना प्रचंड संधी आहे. मत्स्यपालनाचे विविध तंत्र प्रकल्प भेटीतून समजावून सांगताना बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवावे, याचेदेखील प्रशिक्षण बँक अधिकाऱ्यांना पाचारण करून देण्यात आले. सोबत परिपूर्ण संदर्भ पुस्तिका भेट देण्यात आल्याने प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन चांगल्या प्रकारे होऊ शकले.

    प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी साठी ओलांडलेल्या दिलीप पेडणेकर या ज्येष्ठ प्रशिक्षणार्थीने '52 वर्षापासून करीत असलेल्या व्यवसायात अनेक त्रुटी असल्याचे प्रशिक्षणानंतर जाणवले. त्यात सुधारणा करून आणखी व्यवसाय वाढवीन' अशी दिलेली प्रतिक्रीया प्रशिक्षणाचे यश मांडणारी आहे. वर्षातून असे आठ ते दहा सत्रांचे आयोजन केंद्रामार्फत करण्यात येते. प्रशिक्षणार्थींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी केंद्रातील तज्ज्ञ डॉ.बी.आर. चव्हाण, सचिन साटम, रविंद्र बोंद्रे आणि त्यांचे सहकारी आनंदाने तयार असतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थींचा उत्साहदेखील वाढतो. कोकणात मत्स्य संवर्धनासाठी असणारी अनुकुलता लक्षात घेतल्यास इथल्या युवकांसाठी हे प्रशिक्षण निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. शिवाय महिला प्रतिनिधींचा प्रशिक्षणातील सहभागही तेवढाच आश्वासक आहे.

    Saturday, November 12, 2011

    विदर्भाचे जागृत शक्तीपीठ : मालखेडची अंबामाता

    जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या व अमरावतीपासून १५ किलोमीटर अंतर असलेल्या मालखेड रेल्वे येथील पुरातन काळातील अंबामातेचे मंदिर म्हणजे एक जागृत शक्तीपीठच आहे. त्यामुळे अलीकडे भक्तांची संख्या वाढली असून घटस्थापनेपासून देवीच्या दर्शनासाठी रीघ लागत आहे. 

    येथे भानुमती नदीच्या किनाऱ्यावर अंबा मातेचे मंदिर असून भगवान शिवशंकर व माता अंबा यांचे एकाच परिसरात असलेले मंदिर हे या मंदिराचे वैशिष्ठय आहे. या मंदिराची आख्यायिका पुरातन आहे. सत्यव्रत मनु वंशातील वृषभदेव नावाचा राजा विदर्भात राज्य करीत होता. त्याला १० मुले होती. वृषभदेवने आपल्या पुत्रांना राजधानीच्या चारही बाजूने निवासस्थान बनवून दिले होते. 

    आपल्या मुलांचेच नाव त्या परिसराला दिले होते. त्यापैकी केतुमाल नावाचा पुत्र असलेल्या वस्तीला मालकेतु असे नाव देण्यात आले होते. याच शब्दाचा अपभ्रंश होऊन मालखेडा असे नाव गावाला पडले. या गावाचा उल्लेख श्रीमद् भागवत तथा देवी भागवतात आहे. याच गावापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या भानुमती नदीच्या किनाऱ्यावर बसून केतुमाल देवीची आराधना करीत असे. त्याची भक्ती पाहून मॉ भगवती प्रसन्न झाली व ‍ितने साक्षात प्रगट होऊन केतुमालला इच्छित वर मागण्यास सांगितले. केतुमालने संपत्ती, किर्ती न मागता ज्या रुपात देवीने दर्शन दिले त्याच रुपात येथे निवास करुन सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या असा वर त्याने मागितला. 

    मॉ अंबेने तथास्तु म्हणून स्वयंभू मुर्ती येथे प्रकट झाली. तिच मालखेड निवासी अंबादेवी होय. याचे दाखले आणि भानुमती नदीचा उल्लेख स्कंध पुराणात करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली आहे. या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली महादेवाची पिंड व शंकरजींचे मंदिर आहे. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरील भक्तही या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 

    नवरात्रात अखंड ज्योत मंदिरात पेटविली जाते. अखंड ज्योतीचे हे आठवे वे वर्ष असून यावर्षी ३५० ज्योती लावण्यात आल्या आहे. श्री. देवेश्वर महाराज या मंदिराची देखरेख करीत असून नारायणभाऊ हेडा यांच्यासह अनेकांनी देणग्या देऊन मंदीराचे काय्र पुर्णत्वास नेले आहे. 

    मालवणी जगौत्सवात दशावतार

    'कोकणाची माणसं साधी भोळी, अंगात त्यांच्या भरली शहाळी` असं एक चित्रपट गीत आहे. शहाळय़ासारख्या गोड कोकणी माणसांचे मालवणी जत्रोत्सव हे मुंबई व उपनगरातील दिवाळीतील मोठं आकर्षण असतं. दशावतार ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अस्सल लोककला. गोरे भटजी, श्यामजी नाईक या दशावताराचे जनक. पूर्व रंगातील संकासूर-भटजी-गणपती, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू ही पात्रे आणि उत्तर रंगात रामायण, महाभारत पुराणांमधील आख्यान अर्थातच नाट्यरूपात सादर झालेले. असा हा दशावतार कोकणात दशावताराची नऊ पांरपरिक पथके आहे. ते पिढय़ान-पिढय़ा दशावतार सादर करतात. मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकार, कळिंगण, आजगावकर, पार्सेकर वालावलकर, गोरे दशावतार अशी त्यातील काही मंडळी ही सर्व मंडळी आणि कोकणातील अन्य दशावतारी पथके दिवाळीला मुंबईत येतात. भांडूप, मुलुंड, कांदिवली, ठाणे, काळाचौकी अशा विविध ठिकाणी मालवणी जत्रौत्सव आयोजित होतो. झण झणीत सुके बांगडे, गोड मालवणी खाजे, गाठय़ा, षेव-रेवडय़ा, मालवणी मसाले यांच्या दुकानांनी मालवणी बाजार पेठे सजले व रात्री दशावतार सुरू होतो. 

    ठाण्यात लोकमान्य नगर येथील मालवणी जत्रोत्सवाचे प्रेरणास्थान आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे. रवी फाटक, विजय चिंदरकर, बाळ परब आदी मंडळींनी मालणी जत्रोत्सव सुरू केला असून बाबी नालंग दशावतार नाट्य मंडळ, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वालावलकर दशावतार मंडळ, लहुराज कांबळी दशावतार मंडळ, बाळकृष्ण गोरे दषावतार मंडळ, नाईक मोचेमाडकर दषावतार मंडळ अशी मंडळी या मालवणी जत्रोत्सवात सहभागी झाली आहेत.

    तुळशीच्या लग्नापासून विविध जत्रांमध्ये कोकणात दशावतारी खेळ सुरू होतात ते मे महिन्यापर्यंत चालतात. पूर्वरंग हा दषावताराचा आत्मा असतो. आता मात्र पूर्वरंगाला दषावतारात फाटा दिलेला असतो.

    महिला शक्तीमुळे दारू हद्दपार

    महिलांनी आपली शक्ती पणाला लावल्यास काय होऊ शकते याचा परिचय यवतमाळ जिल्ह्यातील एका गावाने नुकताच अनुभवला. जिल्ह्यातील दाभडी (बोरगाव) येथील २० महिलांनी एकत्र येऊन कुटुंबाची वाताहत करीत असलेल्या दारूला हद्दपार केले. महिलांच्या आक्रमकते पुढे दारुड्यांनी हात टेकले असून, गावात १०० टक्के दारुबंदीचा प्रयोग यशस्वी केला आहे. 

    अडीच हजार लोकवस्तीच्या दाभडीत पूर्वी सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दारुड्यांचा हैदोस होता. त्यामुळे गावात वारंवार भांडणे होऊन गाव विकासाकडे जाण्याऐवजी विकासापासून दूर जात होते. अलीकडचे येथे शाम रणनवरे यांनी तलाठीपदाचा प्रभार घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारामुळे प्रभावित झालेले रणनवरे महाराजांनी या गावात राष्ट्रसंताच्या विचारांची पेरणी करण्यास प्रारंभ केला.

    रणनवरे, चव्हाण, सरपंच संतोष टाके व प्रकाश राऊत यांनी गावात दारुबंदीच्या उपाययोजना आखण्यास सुरवात केली. त्यात महिलांची भूमिका खूप महत्तवाची ठरणारी होती. त्यासाठी गावातील विविध बचतगटांतील, पण जिद्दी व कठोर हृदयाच्या २० महिलांच्या हाती दारूबंदीची हा प्रयोग सोपविला.

    चार महिन्यापूर्वी गावात ३८ दारुच्या भट्ट्या होत्या. पण महिलांनी पदर खोचला आणि थेट दारुभट्ट्यावर धाड टाकायला सुरवात केली. काहींना समजुतीचा सल्ला, काहींनी धमकी, तर काहींना पोलिसांच्या स्वाधीन केले आणि गावात शंभर टक्के दारुबंदी केली. दारूबंदीमुळे दाभळी (बोरगाव) हे गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आले आहे.

    Wednesday, November 9, 2011

    तरुणांनो सैन्याधिकारी व्हा ! पार्ट टाईम आर्मी ... फूल टाईम इंडियन!

    आपलं वय १८ ते ४२ या वयोगटातील आहे काय ? तर मग हा लेख जरूर वाचा !

    काही कारणास्तव जर आपल्याला नियमित सैन्यदलात जाण्यास अपयश आले असेल तर निराश होऊ नका... भारतीय सैन्यात सैन्याधिकारी म्हणून काम करण्याची तुमची अजूनही इच्छा असेल तर प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून आपले स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते.

    आपल्या स्वप्नपूर्तीसाठी खास तुमच्यासाठीच हा लेख...

    स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी.राजगोपालाचारी यांनी ९ ऑक्टोबर १९४८ साली प्रादेशिक सेनेची स्थापना केली. हुद्दा, वेतन,सोईसुविधा,सवलती सर्व काही नियमित सैन्यदलासारखेच....

    वर्षातून काही आठवडे आपण नियमित सैन्यदलाच्या एका युनिटबरोबर राहायचे तर बाकी दिवस मात्र आपला दैनंदिन व्यवसाय, नोकरी जे काही असेल ते करायचे.

    ही संधी फक्त पुरुष उमेदवारांकरिता आहे.


    प्रादेशिक सेनेची असलेली विविध कमांड्स -
    • प्रादेशिक सेना मुख्यालय - ॲडिशनल डायरोक्टोरेट जनरल प्रादेशिक सेना, जनरल स्टाफ ब्रान्च, आयएचक्यू ऑफ एमओडी (आर्मी), एल ब्लॉक, चर्चरोड, न्यू दिल्ली -११०००१
    • दक्षिण कमांड - हे कार्यालय घोरपडी, पुणे ,पश्चिम कमांड - हे कार्यालय चंदीगढ, पूर्व कमांड - हे कार्यालय कोलकता तर मध्य कमांड हे कार्यालय लखनऊ येथे आहे.


    प्रादेशिक सेनेमध्ये सैन्याधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेबद्दल आपण जाणून घेऊ या ...

    शिक्षण - कोणत्याही शाखेचा पदवीधर
    वय - १८ ते ४२ वर्ष.
    शारिरीक पात्रता - शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम.

    इतर - कोणत्याही विहित सनदशीर मार्गाने मासिक उत्पन्न कमीत
    कमी ५ ते ७ हजार असणे आवश्यक.
    (खाजगी किंवा सरकारी नोकरी करीत असलेले तसेच स्वत:चा व्यवसाय करणारे पुरूष उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.)

    आता जाणून घेऊ या की, प्रादेशिक सेनेत अधिकारी पदासाठी निवड कशा प्रकारे होते ? -

    • प्रत्येक वर्षी दोन वेळा अर्ज करता येतात.
    • साधारणत: मे आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये एम्लॉयमेंट न्यूज, टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, डीएनए यासारख्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात येते.
    • यावेळी दिनांक ५ नोव्हेंबर २०११ च्या एम्लॉयमेंट न्यूज या वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली आहे.
    • विहित नमुन्यातील अर्ज प्रादेशिक सेना, गृप हेडक्वॉटर्स , दक्षिण कमांड, घोरपडी, पुणे ४११००१ येथे सादर करावा.
    • अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांक ३१डिसेंबर २०११ आहे.
    • फेब्रुवारी आणि ऑगष्ट महिन्याच्या साधारणत: शेवटच्या रविवारी लेखी परीक्षा होते.

    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
    • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र(दहावी, बारावी आणि पदवी).
    • एमबीबीएस डॉक्टरांनी दिलेले शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र.
    • मासिक उत्पन्न ५ ते ७ हजार किंवा त्याहून अधिक असल्याचा पुरावा.
    • रेशनकार्ड, पॅनकार्ड, स्वत:चे छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र.
    • ज्या ठिकाणी आपण नोकरी करीत आहात, तेथील सक्षम अधिकाऱ्याचा ना-हरकत दाखला.

    आता लेखी परिक्षेविषयी -

    • लेखी परीक्षा शंभर गुणांची असते.
    • यापैकी ५० गुण सामान्य ज्ञान तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असलेल्या प्रश्नांना असतात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकरिता चार पर्याय दिले जातात.
    • १० गुण बुद्धीमत्ता चाचणीकरिता दिले जातात.
    • ३० गुण निबंध लेखनासाठी असतात. आणि उर्वरित १० गुण संक्षिप्त टिपणीसाठी असतात.
    • निबंध लेखनाचे विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असतात.
    • निबंध एकूण चार विषयांपैकी एका विषयावर साधारणत: ३०० शब्दांमध्ये लिहावयाचा असतो.
    • लेखी परीक्षेचा निकाल दुसऱ्याच दिवशी सायंकाळपर्यंत जाहीर केला जातो.
    • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लागलीच मौखिक चाचणी घेण्यात येते.
    • मौखिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना साधारणत: दोन महिन्यानंतर अलाहाबाद, भोपाळ, बंगळूर यापैकी एका सर्विस सिलेक्शन सेंटरकडून एसएसबी इंटरव्ह्यूकरिता बोलाविण्यात येते.
    • एसएसबी इंटरव्ह्यू एकूण ५ दिवसांचा असतो. या इंटरव्ह्यूमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होते.
    • वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील तीन महिन्यात सैन्यात लेफ्टनंट या पदावर नियुक्त केले जाते...आणि सैन्याधिकारी म्हणून त्यांची पुढील वाटचाल सुरु होते.
    • या अधिकाऱ्यांना योग्य वेळी प्रथम देवळाली, नाशिक येथे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि यानंतर डेहराडून येथील भारतीय सैन्य प्रशिक्षण संस्थेमध्ये (IMA) प्रशिक्षण दिले जाते.

    अधिक माहितीसाठी -
    www.joinindianarmy.nic.in आणि www.indianarmy.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा मनोज सानप, सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय यांच्याशी ८६५२ १९८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.

    प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून आपले सैन्याधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते. तर मग...लागताय ना तयारीला... जय हिंद !



  • मनोज सानप

  • युवा शेतकऱ्याने पिकविली पपई बाग

    उमरखेड पासून ६ किलोमिटर अंतरावर बेलखेड नावाचे गाव आहे. या गावातील युवा शेतकऱ्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी एक गट तयार केला आहे. गटातील हे शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतावर राबवित असतात. या युवा शेतकऱ्यांपैकी सुदर्शन नारायण कदम या शेतकऱ्याने परंपरागत शेती व पिक पध्दतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पपईची उत्कृष्ठ बाग फुलविली आहे. अवघ्या साडेसात महिन्याच्या कालावधीत या युवा शेतकऱ्याच्या पपईला चांगली बाजारपेठ देखील मिळू लागली आहे. त्यांची बहरलेली पपईची शेती पाहता अन्य शेतकऱ्यांची मार्गदर्शसाठी त्यांच्याकडे गर्दी दिसते.

    सुदर्शन कदम यांनी मागील वर्षी १२ डिसेंबर २०१० रोजी आपल्या शेतामध्ये ७२ गुंठ्यामध्ये पपई पिकाची लागवड केली. पपईच्या दोन झाडांतील अंतर त्यांनी १० X ४.५० एवढे ठेवले. आधुनिक ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर करुन या झाडांच्या सिंचनाची सुविधाही त्यांनी करून घेतली. अवघ्या सोडसात महिन्यात त्यांच्या पपईच्या फळ बागेला बहर आला आहे. एका झाडाला खालून वरपर्यंत लदबद पपईची फळं लगडली असून आजच्या स्थितीत एका झाडाला एक क्विंटलच्यावर पपई आहेत.

    मागील वर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात असलेल्या थंडीमुळे पपईची रोपे लागवडीनंतर पिवळी पडली होती. त्याचवेळी तज्ञांचा सल्ला घेऊन डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येकी एक फवारणी केली. त्यानंतर कुठल्याही प्रकारची फवारणी अथवा इतर खर्च या बागेवर आपण केला नसल्याचे सुदर्शन कदम यांनी सांगितले.

    ७२ गुंठ्यामध्ये १ लाख ४० हजार रुपये एवढा उत्पादन खर्च झाला असून आजच्या बाजार भावाप्रमाणे १८०० रुपये प्रति क्विंटल असलेले पपईचे भाव पाहता येत्या वर्षभरात या बागेतून ९ लाख रुपयांचे उत्पन्न होईल, ते म्हणाले. पाटील बायोटेकच्या माध्यमातून बेलखेड मधील ४ ते ५ युवा प्रगतशिल शेतकऱ्यांचे एक ग्रुप तयार झाला असून या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे डाळींब व हळद लागवडीचा प्रयोगही बेलखेडच्या शिवारात राबविणार असल्याचे सुदर्शन कदम यांनी सांगितले.

    Monday, November 7, 2011

    कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

    ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचेच उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे. 
    उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात. 

    सदर बचतगटास काही तरी उदयोग करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच कालावधीत राज्य सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाकडून बचतगटाच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्ताव मागविले होते. या महामंडळाने कांदा बीज उत्पादनास प्राधान्य देण्याचें ठरवले. कारण नाशिक जिल्हयात कांदयाची मोठी बाजारपेठ असली तरी दरवर्षी कांदा बीज मिळविण्यासाठी शेतक-यांना नेहमीच अडचण येते. त्यामुळे कांदा बीज हा मुख्य प्रकल्प हाती घेतला. त्यादृष्टीने शहर परिसराचा अभ्यास केला. हा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीची आवश्यकता होती. परंतु जमीनीची किंमत लोक अव्वाच्या सव्वा सांगत होते. यावेळी बचतगटाच्या महिलांनी माविमच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक अधिकारी ज्योती निंभोणकर यांची भेट घेतली . त्यांना कांदा बीज शेती करावयाचे सांगितल्यावर ज्योती निभोणकर यांनी नायकवाडी परिसरास भेट दिली. चर्चेच्या अंती या बचतगटाच्या महिला सभासदाची एक एकर ३० गुंठे शेत जमीन कांदा बीज उत्पादनासाठी १० वर्षासाठी भाडे तत्त्वार घेतली. तसेच भाडयापोटी विहिर दुरुस्त करण्याचे देण्याचे ठरले.हा संपूर्ण खर्च एकंदरीत ४० ते ५० हजार रुपयापर्यंत होता. यासाठी माविमने २८ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले तर महिलांनी तेरा हजार रुपये जमा करुन एकुण ४५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा उपयोग कांदा बीज उत्पादनाची सामूहिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात येवुन शेतीचा उत्पादन काढण्यासाठी प्रगतीचे पाऊले पडू लागले. 

    महत्वाचे म्हणजे कांदा बीज लागवडीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव येथील द्राक्ष कृषी संशोधन केंद्रास महिलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यास राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले. या प्रतिष्‍ठानकडून परतीच्या बोलीवर बियाणे घेण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये कांदा लागवडीस सुरुवात झाली. बचतगटाच्या महिला सदस्यांना या कामासाठी पाठींबा मिळावा यासाठी त्यांच्या पतीची समज काढण्यात आली की यातून मिळणारा पैसा हा घरची आर्थ्रिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर महिलांना घरचा सदर उदयोग करण्यास उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. 

    कांदयाला जेव्हा पालवी फुटली तेव्हा आलेली पालवी काढून टाका म्हणजे नवीन पाने आल्यावर चांगले उत्पादन येते असे मत गावातील मंडळीनी व्यक्त केले. असा गैरसमज पसरवणारा सल्ला समन्वयक ज्योती निभोणकर यांना समजल्यावर त्यांनी महिलांची बैठक घेऊन कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कांदयाची पाने कापणे चुकीचे व अत्यंत धोकादायक असल्याचे स्पषट केले. कोणाचे ऐकण्यापेक्षा बचतगटाच्या सदस्यांनी माविम अथवा कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून असलेल्या अडचणी शंकाचे निरसन करावे असाही निभोणकर यांनी मोलाचा सल्ला दिला. या बचतगटाने इंटरनेट , वेगवेगळी पुस्तके, कृषी प्रदर्शने अशा माध्यमतून कांदा उत्पादना विषयी माहिती घेत या प्रकल्पाकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला सुरु केले. महिलांनी वेळोवळी कांदा बीज व्यवस्थेत यावे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. एनएचएफाआरडीच्या वतीने दर महिन्यास कांदयाच्या पिकाचे अवलोकन केले जाते. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज फळ आले कांदा बीज उत्पादनाची शेती या महिलांनी यशस्वीपणे करुन दाखविली . या हंगामात बचतगटास या शेतीव्दारे अडीचशे क्विंटल बीज हाती आले आहे. हे बीज त्यांनी कराराप्रमाणे एनएचएफआरडीकडे सूपूर्द केले असून त्यांची गुणवत्ता तपासून त्यांची रक्कम लवकरच त्यांची हाती पडेल. 
    ग्रामीण भागातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे येत असून उत्तम प्रकारे उदयोग करुन रोजगार उपलब्धतेबरोबर स्वावलंबी होण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर रोजगार मिळून स्वावलंबी होऊ शकतो. हे खरोखरच महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे.