Sunday, July 28, 2013

शेततळयामुळे 300 हेक्टर संरक्षित सिंचन

चंद्रपूर जिल्हयातील वरोरा   कृषी विभागाच्या वतीने शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. मे महिण्यात तयार करण्यात आलेली शेततळे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरली आहेत. सिंचनाची कुठलीही सोय नसणा-या शेतक-यांसाठी शेततळे वरदान ठरणार आहेत. वरोरा तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषी विभागाने राबविलेला शेततळे कार्यक्रम शेतक-यांना नवी संजीवनी देणारा ठरला आहे. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव बु., शेगांव, खेकडी रिठ, जामणी रिठ या गावात करण्यात आलेल्या 105 शेततळयात काठोकाठ पाणी भरले असून यामुळे 325 हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे.

कोरडवाहू शेत्रातील शेतक-यांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम असून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने हा विशेष कार्यक्रम केवळ विदर्भातच राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव, शेगांव, खेकडी व जामणी या गावात कृषी विभागाच्या वतीने ढाळीचे बांध व शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत 105 शेततळे व 900 हेक्टर ढाळीचे बांध तयार करण्यात आले. ढाळीच्या बांधामुळे पावसाचे पाणी शेतातच जिरणार असून अतिरीक्त पाणी नालीवाटे निघून शेततळयात जमा होणार आहे. यामुळे शेतातील गाळ वाहून जाण्याचे प्रमाण कमी होवून शेताच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. 

सोयाबिन, कापूस व हरभरा या पिकासाठी शेततळे नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत. महालगांव परिसरातील शेतक-यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून कृषी विभागाच्या सहाय्याने शेततळयाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचे अभिनंदनीय पाउल उचलले आहे. या चार गावांत 30 बाय 30 चे 55 मोठे शेततळे व 20 बाय 20 चे 50 लहान शेततळे तयार करण्यात आले आहे. या शेततळयाच्या माध्यमातून 325 हेक्टर जमिनीचे संरक्षित सिंचन होणार आहे. 

वरोरा तालुका कोरडवाहू म्हणून गणला जात असून या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात. सोयाबिन, कापूस व हरभरा हे पिक घेणारे शेतकरी या परिसरात मोठया प्रमाणात असून या शेतक-यांना सिंचनासाठी शेततळयांचा मोठा हातभार लागणार आहे. शेततळयासोबतच ढाळीच्या बांधामुळे 900 हेक्टर जमिनीला पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे. कृषी विभागाचा ढाळींचे बांध व शेततळे कार्यक्रम राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, कृषी पर्यवेक्षक जी.एस.भोयर व मंडल अधिकारी मनोज केचे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. 

सिंचनासाठी शेततळे वरदान - राजवाडे
महालगांव परिसरातील शेतक-यांनी शेततळयाची योजना प्रभावीपणे राबवून 105 शेततळे तयार केले. याचा फायदा शेतक-यांना मोठया प्रमाणात होणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी असलेल्या कार्यक्रमातून घेतलेले शेततळे संरक्षित सिंचनासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत व यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल असे उपविभागीय कृषि अधिकारी शिवचरण राजवाडे यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी मोठया प्रमाणात शेततळे निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Monday, July 22, 2013

स्वावलंबन

‘चूल आणि मूल’ ह्या बंधनातून बाहेर पडलेल्या स्त्री ने आता घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही बाबी उत्कृष्टपणे सांभाळण्यात यश मिळविले आहे. उद्योग, व्यवसाय शिक्षण या क्षेत्रातील सर्व यशाची शिखरे महिलांनी सर केली आहेत. आता तर शासनही विविध स्तरावर स्त्रियांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांमधून मदत करीत आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात येत आहे.

गोंदिया येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी गृहोपयोगी वस्तू तयार करुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला आहे. गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जिल्हा असल्यामुळे शैक्षणिक बाबतीत फारसा विकास येथे झाला नाही. धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण बघता या भागात उद्योग व व्यवसायाला बराच वाव आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता येथील महिला पूढे सरसावल्या व त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्याचा निर्धार केला. त्याचेच फलित म्हणजे गोंदियातील रेलटोली, लाला लजपतरॉय वॉर्डातील बचतगटाच्या महिलांनी गृहउद्योग उभारुन विविध वस्तूंची निर्मिती केली. बाजारपेठेत भरपूर प्रमाणात मागणी असलेले फिनाईल, हार्पीक, भांडे धुण्याचे लिक्वीड, वॉशिंग पावडर या उत्पादनाची निर्मिती केली. त्यामुळे असंख्य महिलांना रोजगार मिळाला.

या बचतगटातील महिला सदस्यांना लघु उद्योगाकरता प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे असंख्य महिला बचत गटातील महिलांनी स्वबळावर उद्योग सुरु केले आहेत. शासनाच्या वतीने दारिद्ररेषेखालील महिला बचत गटांना विशेष सुविधा दिल्या जात आहे. प्रशासन, नगर परिषद व विविध बँकाच्या माध्यमातून महिला बचत गटांना कर्ज दिले जाते. गृहोउद्योगामध्ये विविध व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ बनविणे, कलाकुसरीचे कामे, हस्त कौशल्य, विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे त्याचप्रमाणे शिवणकाम, पाककला इत्यादींचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाते.

जिल्हा ग्रामीण विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 7 हजार 896 बचत गट असून यापैकी 5 हजार 321 बचतगट कर्ज व शासनाच्या निधी मिळविण्याकरीता पात्र ठरले आहे. 4930 बचत गटांना कर्जाचे वाटप झाले असून 2 हजार 657 बचतगटाच्या कर्जाचे प्रस्तावदेखील तयार करण्यात आले आहे. 959 बचतगटाच्या कर्जाची प्रकरणे बँकानी मंजूर केली आहे आणि त्या बचत गटाच्या सदस्यांना लघूउद्योगाकरीता प्रशिक्षणही देण्यात येत आहे. प्रशासन व बँकेच्या सहकार्याने बचतगटात सहभागी होणाऱ्या स्त्रीयांचा आत्मविश्वास तर दुणावलाच पण आर्थिक स्तरही उंचावला.

शेतात केलेल्या मजगीच्या कामामुळे सुरेश महल्लेचे शेती उत्पादन चौपट

कृषि विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ होते. याची अनुभूती नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील शिवनी गावच्या सुरेश धोंडबाजी महल्ले या शेतकऱ्याला आले. यापूर्वी सोयाबीन आणि हरबरा ही पिके तो घेत होता. शासनाच्या कृषि विभागाच्या गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम शिवनी, चिखली, निंबा गावच्या शिवारात राबविण्यात आला. आता हे शेतकरी धानाच्या पिकाबरोबर, भाजीपाला, गहू-हरबरा फूल शेतीचे नगदी पीक घेवू लागल्याने त्यांच्या शेती उत्पादनात चौपट वाढ झाल्याचे सुरेश महल्ले आत्म विश्वासाने सांगतात.

बदलत्या परिस्थितीनुसार शेतीमध्येही आता व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे. योग्य व्यवस्थापन करुन पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पाणलोट संकल्पने अंतर्गत लाईव्ह चेक डॅम, लुज बोल्डर स्टॅचर, दगडी बांध, गॅबियम बंधारे, शेततळे, सिमेंट नाला बांध, मजगी ग्रेडेड बेडींग यासारखी मृदसंधारणाची कामे कृषि विभागाने हाती घेतली. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत अडविले व मुरविले यातून शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता आली.

या पाणलोटाचे एकूण भौगोलिक 889.58 हेक्टर असून पाणलोटाची 2010 मध्ये कामे पूर्ण झाली होती. त्याचा लाभ सुरेश महल्ले या शेतकऱ्याने अचूक उचलला. मजगीची कामे केल्यामुळे भूपिक जमीन वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीचा पोत उंचावला. सहाजिकच शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत झाल्याचे सुरेश महल्ले आत्मविश्वासाने सांगतात.

निंबा गावचे नरेंद्र बोंबाळे यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला. त्यांच्याही शेती उत्पादनात भरीव वाढ झालेली ते सांगतात. बोंबळे यांनी उताराच्या दिशेला वाहून जाणारी माती व पाणी अडविले त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. यापूर्वीचे सोयाबीन हरबरा याचे केवळ 5/6 क्विंटल एवढे उत्पन्न मिळत होते. वर्षाचा शेतीचा खर्च वजा जाता शिल्लक काहीच पडत नव्हते. मृसंधारणाची कामे केल्यानंतर शेतामध्ये ते सोयाबीन इगल-11 व धान करिश्मा ही पिके आता घेत आहेत. सोयाबीनचे 8-9 क्विंटल हेक्टरी तर धानाचे 25-26 क्विंटल हेक्टरी घेत आहेत. त्याच्या जोडीला गहू लोकवण आणि हरभरा विजय या वाणाचे पिके, भाजीपाला ही खात्रीची शेती उत्पादन ते घेत आहेत. खर्च वजा जाता 50,000/- रुपयांचा निव्वळ फायदा होत असल्याचे बोंबळे अभिमानाने सांगतात.

हंबीरराव देशमुख

Sunday, July 14, 2013

पावसाच्या पाण्याचं करून संकलन जयदेववाडी करणार जलपुनर्भरण

मित्रहो,पावसाळा आलाय. . . दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या मनाला गारवा देणारा आणि नवनिर्माणाची ग्वाही घेऊन सुजलाम् सुफलामतेचा संदेश देणारा तुमचा-माझा सगळ्याचा लाडका पाऊस आलाय. तेंव्हा ज्या दुष्काळानं आपल्याला त्रास दिलाय त्या दुष्काळाला आता आपल्या गावात पुन्हा येऊ द्यायचं नाही. गावातलं पाणी गावातच अडवायचं. शेततळी, पाझरतलाव, वनराईबंधारे, सलग समतलचरशिवकालीन पाणी साठवण योजना, ज्या ज्या माध्यमातून आपण पावसाचं पाणी अडवू शकू, मातीत जिरवू शकू त्या त्या सगळ्या माध्यमांचा नेटाने उपयोग करायचा आणि गावात "जलस्वराज्य" आणायचं. . .

175 कुटुंबसंख्या आणि जेमतेम 1336 लोकसंख्या असलेल्या जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव अर्थात जयदेववाडीच्या ग्रामस्थांनी हा संकल्प केला आणि पाहता पाहता गाव कामाला लागले. 175 पैकी जवळपास 35 कुटुंबानी आपल्या घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाचं पाणी संकलित करण्याची सुविधा निर्माण केली. ते विहिर अथवा विंधनविहिरीत सोडलं.

डोंगराच्या कुशीत वसलेली आणि निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघणारी जयदेववाडी ही औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि जळगाव या चार जिल्हयाच्या सीमांनी बंदिस्त झालेली. गावाला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मलकापूर तर सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद.

पर्यावरणपूरक- शाश्वत विकास करतांना गावानं अपारंपरिक उर्जा वापरलाप्राधान्य दिलं. निर्णय झाला आणि सुरवातीलाच 16 कुटुंबांनी सौर उर्जेचा वापर सुरु केला. 5 कुटुंबाने बायोगॅसचा तर 16 कुटुंबांनी निर्धूर चुलीचा वापर सुरु केला.

सुमनबाई उदरभरे या महिला सरपंचाच्या नेतृत्वाखाली गावाची विकासाकडे वाटचाल सुरु असून निकेतन सोळंकेहे ग्रामसेवक म्हणून काम करतांना प्रशासनाला नवी दिशा आणि गती देण्याचं काम करीत आहेत. गाव विकासाची ही सुरुवात आहे. आपल्याला ही विकास दिंडी अतिशय यशस्वीपणे खांद्यावर पुढे न्यायची आहे, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे त्यासाठी उपसाव्या लागणाऱ्या कष्टात देखील त्यांना आनंद मिळतो आहे.

गावात एकूण सहा बचतगट कार्यरत असून त्यातील तीन बचतगट हे दारिद्र्य रेषेखालील लोकांनी एकत्र येऊन स्थापन केले आहेत. उषाताई आंबेकरांच्या अध्यक्षतेखाली गावात महिला सक्षमीकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावात ग्राम आरोग्य, पोषण आणि पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कार्यरत असून ग्रामपंचायतीची इमारत स्वत:च्या मालकीची आहे. गावात अंगणवाडी, भक्तनिवास, दवाखाना आहे.

घर तिथे शौचालय बांधून गावानं 2005-06 मध्ये संपूर्ण गाव निर्मल केलं. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याहस्ते गावाच्या कामाचा सन्मान झाला आणि गाव तालुक्यातलं पहिलं निर्मलग्राम ठरलं. 2007-08 मध्ये गावातील सर्वच्या सर्व म्हणजे 175 कुटुंबाचा विमा उतरवण्यात आला आणि गाव " विमा ग्राम" झालं. गावातील तंटे दूर करून गाव तंटामुक्त करण्याचा निर्धार गावाने केला आणि त्यातही गावाला यश मिळालं 2007-08 मध्ये गावाला "महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम" पुरस्कार मिळाला.

गाव विकासाच्या कामात आणि स्वच्छतेत सातत्य ठेवत ग्रामपंचायतीने 2010-11 मध्ये जिल्हा स्तरावर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. 2013-13 मध्ये ही गावानं हा पुरस्कार मिळवून आपल्या यशाची कमान चढती ठेवली.

गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 2006-07 मध्ये गावानं जलस्वराज्य प्रकल्पात सहभाग घेतला. गावासाठी 70 फुट खोल विहर बांधली. विहिरीजवळ पंपगृह उभारण्यात आला आणि त्यातून पाणी उपसुन ते 45 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेण्यात आलं. तेथून नळाद्वारे लोकांना घरापर्यंत पाणी पोहोंचविण्यात आलं. लोकांची गरज आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आता आणखी 60 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी गावाने बांधलीच पण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनि‍क पाणी पुरवठा विहिर देखील खोदली आहे.

गाव टँकरमुक्त व्हावे यादृष्टीने यावर्षी गावानं विशेष प्रयत्न केले. गावात असलेल्या 10 लाख लिटर क्षमतेच्या पाझर तलावातील सुमारे 1500 ब्रास गाळ काढण्यात आला आणि त्याची ऊंची सुमारे 10 फुटांनी वाढविण्यात आली. गावात 9 वैयक्तिक सिंचन विहिरीचे काम करतांना पाणंद रस्ता दुरुस्तीचे कामही गावानं रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण केलं.

गावानं "पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजने" त देखील सहभाग घेतला. पहिल्या वर्षी 550 आणि दुसऱ्यावर्षी जवळपास 500 अशी मिळून गावानं हजाराहून अधिक झाडं गावात लावली. त्यापैकी 725 झाडं जगवण्यात गावकऱ्यांना यश आलं. गावानं केवळ झाडं लावली असं नाही तर त्याची रजिस्टरमध्ये नेांद घेऊन प्रत्येक झाडला त्याचा क्रमांक असलेला टॅग लावला, वृक्ष ज्या ठिकाणी लावला त्या जागेचा हात नकाशा ही तयार केला.

गावाने योजनेतील पहिल्या दोन वर्षीचे निकष यशस्वीरित्या पूर्ण केल्याने गावाची " पर्यावरण संतुलित समृद्ध गाव ' म्हणून पुरस्कारासाठी निवड झाली आणि विकास कामांसाठी विशेष अनुदानही मिळाले.

गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात 69 टक्के तर यशवंत पंचायतराज अभियानात 64.5 टक्के गुण मिळवले आहेत.

या योजनेने ग्रामपंचायतीच्या कामालाही शिस्त लावली. योजनेमधील करवसुलीच्या निकषाने ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम झाली. आज गावाची करवसुली 100 टक्के आहे.गावात घर तिथे शौचालय असून 16 सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. गावात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे. गावातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सवमूर्तींचे विर्सजन करण्याची सोय गावाने केली आहे. गावात 60 पथदिवे असून त्यात24 सोलर दिवे, 36 सी.एफ.एल बल्ब चा समावेश आहे.गावातील आश्रमामध्येही सौर दिव्यांचा वापर केला जातो.

गावाने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनात आघाडी घेतली असून गावातील 100 टक्के कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन होते. गावात जवळपास 12 हजार लिटर सांडपाणी निर्माण होते त्याचेपरसबाग, शोषखड्डे यांच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात आले आहे.

गाव विकास कामांचा केवळ संकल्प करून थांबले नाही तर त्याच्या पुर्ततेच्यादृष्टीने अग्रेसर झाले आहे. जो निर्धार कृतीत उतरतो तो पूर्ण होतो असं म्हणतात. त्यामुळे जयेदववाडीच्या लोकांनी केलेला "जलस्वराज्य" चा संकल्प असो किंवा ग्रामसुधारणेचा तो पुर्ण होणार हे नक्की.
डॉ. सुरेखा म.मुळे