Tuesday, March 29, 2016

महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्यावर लिहिलेला जगातील पहिला पोवाडा


कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |काळ तो असे यवनांचा ||शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |असे तो डौल जाहागिरीचा ||पंधराशे एकूणपन्नास साल फळले |जुन्नर तें उदयास आले ||शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |जिजाबाईस रत्न सापडले ||हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |ज्यांनी कमळा लाजविले ||वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |स्पटिकापरी भासले ||सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |नांव शिवाजी शोभले ||राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |जसा का फणीवर डोले ||एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |मोती लडी गुंतविले ||रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |म्हणोन बोबडे बोल ||सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |विषादें म्रुग वनी गेले ||नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |ज्यांनी चंद्रा हाटविले ||सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |कुरळे केस मोघीले ||आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |चिन्ह गादिचे दिसले ||जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |धाकट्या बाळा लेविवले ||किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |कलाबतुचे गोंडे शोभले ||लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |डाग लाळीचे पडलेले ||हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |पायी घुंगरू खुळखुळे ||मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |चिन्ह पाळणी दिसले ||टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |पाळण्या हालवू लागले ||धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |गातों गीत तिने केले ||||चाल ||जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं |||| चाल ||मालोजी राजा | तुझा बा आजा ||यवनी काजा | पाळिल्या फौजा ||लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||विचारी पक्का | जाधवा धक्का ||शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||देवळे बांधी | तळी ती खांदी ||आगळी बुध्दी | गुणाने निधि ||लिहीले विधि | लोकांस बोधी ||संधान साधी | जसा पारधी ||भविषी भला | कळले त्याला ||सांगोनी गेला | गादी बा तुला ||उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |शिपाई होता बाणीचा ||खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा || १||
वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |धाकट्यासवे ख़ेळले ||उभयतांचे एकचित तालमीत गेले |फरीगदग्या शिकले ||आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |पवित्र दस्तिचे केले ||द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |घोडी फिरवू लागले ||अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |गोळी निशाण साधले ||कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |पुत्रा नीट ऐकविले ||अल्पवयांचे असता शिकार करू लागले |माते कौतुक वाटले ||नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |घर सक्‍तिने घेतले |छाती कोट करून सर्व होते साठविले|मुखमुद्रेने फसविले ||चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |पित्यास मनी त्यागिले ||पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |हीत उपदेशा योजिले ||मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |वृक्षाछायी बसविले ||पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |नेत्री पाणी टपटपले ||या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |सांगते मुळी कसे झाले ||क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |क्षेत्री सुखी राहीले ||अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |होते लपुन राहीले ||पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |गोमांसा भाजून धाले ||पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |झाडी उल्लघून आले ||लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |मुख्य ब्रम्हा नेमले ||बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |कैदी सर्वास केले ||सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |डौलाने क्षुद्र म्हणाले ||मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |त्याचे पुढे भेद केले ||ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |उरल्या क्षत्रिया पिडीले ||माहारमांग झाले किती देशोधडी केले |ब्राम्हण चिरंजीव झाले ||देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |सर्वास त्याही पिडीले ||शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |आज बोधाया फावले ||गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |बोली नही मन धाले ||||चाल ||क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||||चाल ||काबुला सोडी | नदांत उडी ||ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||बामना बोडी | इंद्रिये तोडी ||पीडिस फोडी | देऊळे पाडी ||चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||मुर्तीस काढी | काबूला धाडी||झादीस तोडी | लुटली खेडी ||गडांस वेढी | लावली शिडी ||हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||राज्यास बेडी | कातडी काढी ||गर्दना मोडी | कैलासा धाडी ||देऊळे फोडी | बांधीतो माडी ||उडवी घोडी | कपाळा आढी ||मीजास बडी | ताजीम खडी ||बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||गायनी गोडी || थैलिते सोडी ||माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |बेत मग केला लढण्याचा ||तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |स्नेह यशाजी कंकाचा ||मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |पूर करी हत्यारांचा ||मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |रोविला झेंडा हिदूंचा ||राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |भ्याला मनी विजापूराचा ||दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |दादोजी कोंडदेवाचा ||मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||२||
जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |चाकरी ठेवी लोकांस ||थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |मुख्य केले फिर्डोजीस ||थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |कैद पाहा केले मामांस ||सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |करामत केली रात्रीस ||मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |सिंहगड नाव दिले त्यास ||पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |कैद पाहा केले सर्वांस ||गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |मारले नाही कोणास ||वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |साठवी राजगडांस||राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||बाकी चारा किल्ल्यास ||मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |धूर्त योजी फितुरास ||सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |मुलान्या सुभेदारांस ||विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |योजना केली कपटांस ||कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |कैद तुम्ही करां शहाजीस ||भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |दग्याने कैद केले त्यास ||थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |खुशी मग झाली यवनांस ||चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |ठेविले भोक वार्‍यास ||शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |ऐकून भ्याला बातमीस ||पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |विचारी आपल्या स्त्रियेस ||साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |ताडा दंडी दुसमनास ||स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |पाठवी दिल्ली मोगलांस ||चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |सोडवा माझ्या पित्यास ||मोगल थैली गेली थेट मुसलमानास |ठेविले किल्ल्यावर त्यास ||बाजी शामराज का लाजला जात सांगायास |धरू पाही शिवाजीस ||धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |आडचण झाली बखरीस ||सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |काळे केले महाडास ||शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |हा पाजी मुकला जातीस ||करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |यवन भ्याला सिंहास ||वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |पिताभक्‍ती पुत्रास ||चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |दुसरे वासोट्या किल्ल्यास ||प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |नवे योजी हुद्यास ||आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |चलाखी दावी मोगलांस ||रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |पाठवी गडी लुटीस ||आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |लुटी हत्तिघोड्यांस ||उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |चाकरी ठेवी बारगिरास ||समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |चाकरी ठेवि पठाणास ||सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |उदासी लाभ शिवाजीस ||आबजूलखान शूर पठाण आला वाईस |शोभला मोठा फौजेस ||हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |कमी नाही दारूगोळिस ||कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |फितवीले लोभी ब्राम्हणास ||गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |चुकला नाही संकेतास ||माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |बरोबर आला बेतास ||समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |कमी करी आपल्या चालीस ||गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |भ्याला तुमच्या शिपायांस ||त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |लागला भेटू शिवाजीस ||वर भेटभाव वाघनख मारी पोटास |भयभित केले पठाणास ||पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |झोंबती एकमेकांत ||हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |पठाण मुकला प्राणास ||स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |राहिला उभा लढण्यास ||त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |तान्हाजी भिडे बाजूस ||दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |घाबरे केले दोघांस ||नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |लाथाळी जीवदानास ||तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |न्याहाळी प्रेती धन्यास ||उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |गेला जन्नत स्वर्गास ||छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |दुसर्‍या सरंजामास ||अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |पाठवि विजापूरास ||वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |फितुर्‍या गोपीनाथास ||नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|उपमा नाही आनंदास || ||चाल |||| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |आर्शिवाद घेई आईचा ||आलाबला घेई आवडता होता जिजीचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |पवाडा गातो शिवाजीचा ||३||
लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |केले मग सुरू खंडणीस ||रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |नेमिला कोल्हापुरास |स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |आला थेट पन्हाळ्यास ||मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |अति जेर केले त्यास |खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |परत मग आला गडास ||राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |मात गेली विजापुरास ||सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |सावंत सिद्दी कुमकेस ||बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |करी मग जमा बेगमीस ||वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |केले महाग दाण्यास ||त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |कोंडिले गडी फौजेस ||चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |योजनां करी उपायास ||कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|उपद्रव झाला रयतेस ||पासलकर बाजीराव पडाले वाडीस |दुःख मग झाले शिवाजीस ||सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |खुशाल गेला भेटीस||वेळ करून गेला उरला नाही आवकास |कच्चा मग ठेवी तहास ||सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |गेला थाप देऊन गडास ||सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |हयगय झाली जप्तीस ||तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |सविले मुसलमानांस ||सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |स्वारदळ लावी पाठीस ||चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |बंदुका लावी छातीस |बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |एकटा गेला रांगण्यास ||स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |हरवी नित्य मोगलास ||दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास| धन्य त्याच्या जातीस ||मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |खवळला बाजी युध्दास ||अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |पडला प्रभू भूमीस ||तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |अंती मनी हाच ध्यास ||बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |निघून गेला स्वर्गास ||सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |पाहून स्वामीभक्‍तीस ||विजापुरी मुसलमान करी तयारीस |खासा आला लढण्यास ||कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |वश करी चाचे लोकांस ||दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |मारले पाळेगारांस ||लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |राजगडी स्थापी देवीस ||मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |केली मग मोठी मजलस ||तानसैनी भले गवय्या बसवी गायास |कमी नाही तालस्वरास ||||चाल ||जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||||चाल ||आदी आंतन | सर्वा कारण ||जन्ममरण | घाली वैरण ||तोच तारण | तोच मारण ||सर्व जपून | करी चाळण ||नित्य पाळण | लावी वळण ||भूती पाहून | मनी ध्याईन ||नाव देऊन | जगज्जीवन ||सम होऊन | करा शोधन ||सार घेऊन | तोडा बंधन ||सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा || ४||
सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |मागे फौज कुमकेस ||बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |शिवाजी करी तयारीस ||खरा करून गेला छापा घाली मुधोळास |मारिले बाजी घोरपड्यास ||भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |घेतले बापसूडास ||सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |धमकी देई पोर्तुगीस ||नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||बांधिले नव्या जहाजास |जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |शोभला हुद्दा भंडार्‍यास ||विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |उभयता आणिले एकीस ||व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |शिवाजी लागे चरणास ||शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |थोडेसे गाऊ अखेरीस ||सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |उणे स्वर्गी सुखास ||अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |भेट मग देई यवनास ||पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |साजे यवनी स्नेहास ||विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |घेतले बहूता किल्ल्यास ||सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |घाबरे केले सर्वांस ||संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |जलदि केली घेई पुण्यास ||चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |फुकट मागे किल्ल्यास ||मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |खान खाई मनास ||आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |भीति आंतल्या मर्दास ||लागोपाठ मार देत हटवि पठाणास |खचला खान हिंमतीस ||प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |देई मुसलमानास ||फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |देऊन मान सोडी सर्वास ||शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |वाढवी मोठ्या पदवीस ||फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |पीढिजाद चाकरीस ||येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |मदत शाईस्तेखानेस ||सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |जाळून पाडिला ओस ||पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |जखमा केल्या नेताजीस ||राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |पाहून मोगलसेनेस ||जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |खान राही तेथे वस्तीस ||मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |होता, भित शिवाजीस ||लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |मावळे सोबत पंचवीस ||माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |कळाले घरांत स्त्रीयांस ||शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |लागला खाली जायास ||शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |तोडिले एका बोटास ||स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |भित्रा जपला जिवास ||आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |उपमा नाही हिजड्यास ||सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |परतला सिंहगडास |डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |दावी भय शिवाजीस ||समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |शत्रू पळाला भिऊन मारास ||करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |मुख्य केले माजमास ||राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |दावी भय पोर्तुगास ||सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |हुल कसी दिली सर्वास ||मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |दाखल झालो सुर्तेस ||यथासांग सहा दिवस लुटी शहरास |सुखी मग गेला गडास ||बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |आपण बसे ऐकायास ||शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |लागले हरणापाठीस ||घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |शाहाजी मुकला प्राणास ||पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |पार मग नाही दुःखास ||भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |घेई पुढे शिवाजीस ||||चाल ||अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||सवतीवर लोटती बाळा |डाग लाविला कुणबी कुळा ||सवतीला कसे तरी टाळा |कज्जा काढला पती मोकळा ||खर्‍या केसाने कापि का गळा |नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |अती पिकला चिंतेचा मळा ||झाला शाहाजी होता सोहळा |मनी भूलला पाहूनी चाळा ||बहुचका घेती जपमाळा |जाती देऊळा दाविती मोळा ||थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |विषचुंबनी देती गरळा ||झाला संसारी अती घोटाळा |करी कंटाळा आठी कपाळा ||मनी भिऊन पित्याच्या कुळा |पळ काढला गेले मुताळा ||छातीवरी ठेवल्या शिळा |नाही रुचला सवत सोहळा ||कमानीवर | लावले तीर ||नेत्रकटार | मारी कठोर ||सवदागर | प्रीत व्यापार ||लावला घोर | सांगते सार ||शिपाई शूर | जुना चाकर ||मोडक्या धीर | राखी नगर ||आमदानगर | विजापूरकर ||मंत्रि मुरार | घेई विचार ||वेळनुसार | देई उत्तर ||धूर्त चतुर | लढला फार ||छाती करार | करी फीतूर ||गुणगंभीर | लाविला नीर ||होता लायक | पुंडनायक ||स्वामीसेवक | खरा भाविक ||सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |बजावला धर्म पुत्राचा ||रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |शत्रु होता आळसाचा ||दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||५||
सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |शिक्का सुरू मोर्तबास ||अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |भौती औरंगाबादेस ||विजापूरची फौज करी बहुत आयास |घेई कोकणपटीस ||सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |ठोकून घेई सर्वास ||जळी फौज लढे भौती मारी गलबतास |दरारा धाडी मक्केस ||मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |पुकारा घेतो मोगलास ||जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |लुटले बारशिलोरास ||जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |लुटले मोगल पेठांस ||पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |आज्ञा जावे रायगडास ||स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |निघाला मुलखी जायास ||मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |लागले अखेर कडेस ||औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |दुसरे दिलीरखानास ||ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |वेढिले बहुता किल्ल्यास ||मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |सुचेना काही कोणास ||बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |सोडिले नाही धैर्यास ||हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |संभाळी पुरंधरास ||चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |फु्रसत दिली शिवाजीस ||फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |भिडला किल्ला माचीस ||बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |योजी अखेर उपायास ||हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |पिडीले फार मोगलास ||मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |काबीज केले माचीस ||यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |चुकले सावधपणास ||हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |मोगल हटले नेटास ||बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |भिडून मारी मोगलांस ||पळ काढी पाठ दिली मावळ्यास |मर्द पाहा भ्याले उंदरास ||लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |धीर काय देई पठाणास ||सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |जाऊन भिडला मावळ्यास ||बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |हटती पाहून मर्दास ||पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |लावीला तीर कमानीस ||नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |पाडिला गबरू धरणीस ||सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |सरले बालेकिल्ल्यास ||मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |धमकी देती मावळ्यास ||हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |पळवी इशानी कोणास ||वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |वरती चढवी तोफांस ||वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |आणले बहु खराबीस ||हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |आणले बहु खराबीस ||हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |मोगल भ्याला पाऊसाअ ||मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |घेती यवनी मुलखास ||कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |पाठवी थैली शिवाजीस ||शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |नजरकैद करी त्यास ||धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |ठेविले जवळ पुत्रास ||दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |जोडीला स्नेह सर्वास ||दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |गूल पाहा औरंगजेबास ||आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |जसा का मुकला जगास ||दानशूर बनला हटवी हातिमताईस |चुकेना नित्यनेमास ||औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |बाकी सोपी चाकरास ||जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |नेली युक्‍ती सिध्दीस ||मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |लावि पाठी माजमास |||| चाल ||औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||||चाल ||हैद्राबादकर | विजापूरकर ||कापे थरथर | देती कारभार ||भरी कचेरी | बसे विचारी ||कायदे करी | नीट लष्करी ||शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |बंदोबस्त केला किल्ल्याचा ||वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||६||
शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |बेत छाप्याचा सुचवीला ||तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |मावळी हजार फौजेला ||सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |योजिले दोर शिडिला ||दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |हळूच वर चढवीला ||थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |करी तयार लोकाला ||थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |घाबरा गढकरी केला ||रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |सुर्याजी येऊन ठेपला |धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |उगवी बंधु सुडाला ||उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |घेतले सिंहगडाला ||गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |झाले दुःख शिवाजीला ||संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |रुप्याची कडी मावळ्याला ||पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |पिडा जंजिरी सिद्द्याला ||सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |मोगल जेरदस्त केला ||कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |त्यामधी अनेक स्त्रियांला ||सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |सुरू केले चौथाईला ||जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |देई मोठ्या फौजेला ||औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |धिंगाणा दक्षिणेत केला ||गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |मोरोबा पठाण पंक्‍तीला ||लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |जसा खरा मोड झाला ||तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |आळसाने ढिला पडला ||गुजर संधी पाहून परत मुरडला |चुराडा मोगलाचा केला ||बेवीस उमराव पाडले रणभूमीला |नाही गणती शिपायाला ||लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |पाठवी रायगडाला ||मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |खिदाडी औरंगाबादेला ||रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |गोडबोल्या गोवी ममतेला ||एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |निवडले नाही शत्रूला ||जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |राहिले ठेवी चाकरीला ||शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |
शिवाजी धनी आवडला ||मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |हाजरी देती शिवाजीला ||पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |बंदरी किल्ला वेढीला ||मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |बनया धर्मा आड झाला ||दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |दुजे मोहबतखानाला ||उभयतांचा बदली खानजहान आला |
मुख्य दक्षीणेचा केला ||मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |गोवळकुंडी उगवला ||मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |सुखे मग रायगडी गेला ||मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |लुटले हुबळी शहराला ||समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |केले खुले देसाईला ||परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |आणिक चार किल्ल्यांला |||| चाल ||हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||||चाल ||आबदुल्याने | बेशर्म्याने ||फौज घेऊन | आला निघून ||राव प्रताप | झाला संताप ||आला घाईने | गाथी बेताने ||घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||घेई घालून | गेला मरून ||प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |पाठलाग मराठ्यांचा केला ||तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |गेले नाही शरण शत्रूला ||अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |हल्ला शत्रूवर केला ||गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |पळिवले विजापुरला ||शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |शिवाजी मनी सुखी झाला ||सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |पोशी सर्व कुटूंबाला ||प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |व्याही केले गुजराला ||काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |केला खेळ गारूड्याचा ||लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |खर्च नको दारूगोळीचा ||बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |पवाडा गातो भोसल्याचा ||कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||७||
विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |शिवाजी कोकणांत ||छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |जमाव फौजेचा केला ||गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |फितीवले कसे निजामाला ||करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |वाटणी मागे व्यंकोजीला ||लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |आशेने फिरवी पगडीला ||बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |बिर्‍हाडी रागाऊन गेला ||शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |कैदी नाही केले भावाला ||तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |खडा कानाला लावला ||दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |करनाटकी मुख्य केला ||हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |निघाला परत मुलखाला ||वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |तेथे ठेवी सुमंताला ||शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |घेतले स्वःता अपेशाला ||जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |शिवाजी रायगडी गेला ||विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |मोगल मुलखी सोडला ||मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |सोडिला नाही पिराला ||वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |ग़्हाबरा अतिशय केला ||भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |वाट पुढे चालू लागला ||दुसरी फौज आडवी माहारज राजाला |थोडेसे तोंड दिले तिजला ||काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |धूळ नाही दिसली शत्रूला ||फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |फसविले आयदी मोगलाला ||विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |आश्रय मागे शिवाजीला ||हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |बरोबर देई फौजेला ||नऊ हजार मोगलांचा पराभव केला |ज्यानी मार्ग अडीवला ||विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |केला महाग दाण्याला ||शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |मोगल भिऊन पळाला ||दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |पाठवी शाहजहानाला ||जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |लाविला नीट मार्गाला ||तह करून शिवाजी नेती विजापुरला |यवन घेती मसलतीला ||शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |व्यंकोजी मनी दचकला ||निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |निरा संन्यासी बनला ||शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |लिहीतो पत्र अर्थाला ||वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |हिरा का भ्याला कसाला ||आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |मळावाचून काटला ||कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |तुम्ही का मजवर रुसला ||बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |त्यागा ढोंगतोर्‍याला ||मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |संभाळा मुळ आब्रुला ||किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |नित्य जपतो या जपाला ||कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |सोड मनच्या आधीला ||सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |व्यंकोजी लागे कामाला ||शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |रोगाने अती जेर केल ||त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |शिवाजी सिसी दुःखाला ||यवनी विरास भिडता नाही कुचमला |शिवाजी रोगाला भ्याला ||सतत सहा दिवस सोसी तापदहाला |नाही जरा बरळला ||सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |एकटा पुढे आपण झाला ||काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |पडले सुख यवनाला ||कुळवाडी मनी खचले करती शोकाला |रडून गाती गुणाला ||||चाल ||महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||||चाल ||भिडस्त भारी | साबडा घरी ||प्रिय मधुरी | भाषण करी ||मोठा विचारी | वर्चड करी ||आस सोयरी | ठेवी पदरी ||लाडावरी | रागाचे भारी ||इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |उडवी फट्टा ब्रम्हाचा ||जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |मुख्य धनी पेशव्याचा ||जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |पवाडा गातो शिवाजीचा ||कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |छत्रपती शिवाजीचा ||८||