Pages - Menu

Friday, September 30, 2011

खडकसावंगा शाळेची गणितायन प्रयोगशाळा

विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय सोपे वाटावे आणि या विषयात त्यांची गोडी वाढावी म्हणून अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग राबवित असतात. यवतमाळ मधील बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगा येथील उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक चंद्रकिशोर कडू यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा वाटावा म्हणून गणितायन प्रयोगशाळा सुरू केली आहे. या अनोख्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी पध्दतीने, सहजपणे गणित या विषयाबद्दल आवड निर्माण झाली आहे.

आंनददायी पध्दतीने अनुभवातून, निरनिराळे साहित्य व खेळाच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन करता यावे याकरिता गणितायन ही प्रयोगशाळा श्री. कडू यांनी कल्पकतेने तयार केली. या प्रयोगशाळेला राज्यातील अनेक शिक्षकांनी भेटी दिल्या. त्यांचा उपक्रम राज्यातील सर्व शाळांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण या मासिकातून त्यांचा आमची गणित प्रयोगशाळा हा लेख प्रसिध्द झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईव्दारे ‘वेचक-वेधक’ या राज्यस्तरीय उत्कृष्ट उपक्रमावर आधारित पुस्तकात या उपक्रमाला स्थान देण्यात आले. उपक्रम संपूर्ण राज्यातील शिक्षकांपर्यत पोहचविण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी विशेष कार्यशाळेचे राज्यभर आयोजन केले होते.

गणित प्रयोगशाळेसोबतच येथे इंग्रजी प्रयोगशाळेची निर्मिती करुन इंग्रजी विषयाची मुलांना वाटणारी भिती दूर करण्याचा प्रयत्न चंद्रकिशोर कडू यांनी केला. स्पर्धा परिक्षेकरिता खेड्यातील विद्यार्थी तयार व्हावा या करिता त्यांचा कोण बनेंगा ज्ञानसम्राट ? हा उपक्रम प्रशंसेस पात्र ठरला आहे. शब्दांची बाग, संस्कार घडविणारे बालवाचनालय, आनंददायी वर्ग, एज्यू इंटरटेन झोन, पर्यावरण झोन, आमची शाळा सुंदर शाळा असे निरनिराळे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून त्यांनी शाळेला आदर्श शाळा बनविण्याचा प्रयत्न केला असून शाळेला शासनाचा साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार, सप्ततारांकित शाळा पुरस्कार मिळाला आहे.

सामाजिक बांधीलकी जपत तुकडोजी महाराजांच्या पालखी पदयात्रेतून ते गावागावात राष्ट्रीय एकता निर्माण होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच प्रेरणा मिळून त्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात नागरिक, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग घेवून खडकसावंगा गावाला हागणदारीमुक्त केले. त्याबद्दल गावाला राष्ट्रपतीच्याहस्ते निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

चंद्रकिशोर कडू हे राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून गणित विषय सोप्या पध्दतीने कसा शिकवावा यावर ते मार्गदर्शन करतात. आदर्श गुणवंत शाळा या उपक्रमात ते राज्यस्तरीय मार्गदर्शक, राज्यस्तरीय गणित अभ्यास गटाचे सदस्य आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार, अमरावती विभाग आयुक्त कार्यालयामार्फत नैदानिक चाचणीत उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, नागरी पुरस्कार, महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


  • अनिल आलुरकर

  • No comments:

    Post a Comment