Tuesday, November 1, 2016

व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे

फेब्रवारी महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आंतरराष्ट्रीय नेव्ही डे कार्यक्रमाला 51 देशातील नौदलाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात नौदल अधिकारी सुनिल भोकरे यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. व्हाईस ॲडमिरल पदापर्यंत पोहोचलेल्या सुनिल भोकरे यांची ही यशोगाथा...

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गुढे हे सुनिल भोकरे ह्याचे जन्मगाव. त्यांचे आई-वडिल सध्या चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडील वसंत भोकरे हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असतांना सेवानिवृत्त झाले. नोकरी निमित्त होत असलेल्या बदलीमुळे मुलांचे शिक्षण हे वेगवेगळ्या गावामध्ये झाले. सेवानिवृत्तीनंतर ते चाळीसगाव येथे गेल्या 25 वर्षापासून स्थायिक आहेत. 

सुनिल भोकरे यांना लहानपणापासून नौदलात जाण्याची इच्छा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड तालुक्यातील नागद येथे झाले. पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर खडकवासला येथे शिक्षण घेऊन ते नौदल ऑफिसर झाले. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम भारतीय नौदलाकडून होते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. 1971 साली भारताच्या नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणम वरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या युद्धामध्ये भारतीय नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाल्याची माहिती व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडिल वसंत भोकरे यांनी भेटी दरम्यान दिली. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील वसंत भोकरे यांचे मोठे चिरजीव सुनिल भोकरे यांची भारतीय नौदलाच्या व्हाइस ॲडमिरलपदी नियुक्ती झाल्याची माहिती देतांना त्याचे डोळे पाणावले. ग्रामीण भागात जन्मलेले सुनिल भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने ग्रामीण भागातील इतर होतकरु तरुणांच्या प्रयत्नांना नक्कीच ऊर्जा मिळणार आहे. हे पद नौदलातील अत्युच्च पद असल्याने या नियुक्तीमुळे चाळीसगावच्या लौकिकात विशेष भर पडली आहे. सुनिल भोकरे यांची नियुक्ती ही चाळीसगावकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. सुनिल भोकरे हे केरळ राज्यातील इझिनाला येथील इंडियन नेव्हल ॲकडमीत व्हाइस ॲडमिरल म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. ऑक्टोबर 2013 मध्ये विशाखापट्टणम येथे रिअल ॲडमिरल म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. आतापर्यत सुनिल भोकरे यांनी नऊ विशेष सेवा पदके प्राप्त केली आहेत. त्याचप्रमाणे कारगिल युद्धाच्यावेळी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना तत्कालिन राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ग्रामीण भागातील अनेक तरुण संरक्षण खात्यातील आर्मी विभागाकडेच लक्ष केंद्रित करतात, मात्र संरक्षण खात्यातील नौदल, हवाई दल देखिल तितकेच महत्त्वाचे क्षेत्र आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी न्यूनगंड न धरता परिश्रम, चिकाटी, सातत्याने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्यास ते नौदलात सहभागी होऊ शकतात हे व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. 

एमईआरएस, एनएमईआर आयटी फिटर ॲक्रॅण्टिसेस आणि डायरेक्टर एण्ट्री डिप्लोमा होल्डर्स या पदासाठी दरवर्षी फेब्रवारी आणि ऑगस्टमधील रोजगार समाचार आणि सर्व आघाडीच्या राष्ट्र प्रादेशिक वृतपत्रांमध्ये नौदलाकडून जाहिरात दिली जाते. नौदल भरती संघटना नौदलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये असणाऱ्या मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालयांतर्गत नौदल भरती संघटना काम करते. नौदलामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी या संघटनेवर असते. भारतीय नौदलात खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

-निलेश परदेशी 
चाळीसगाव