भाषा, मानवी समाज जीवन सातत्याने पुढे नेण्याचे, सतत विस्तारित करण्याचे कार्य करीत असते. समाजात होणारे परिवर्तन भाषेतून होते, तर भाषिक परिवर्तन सामाजिक संदर्भातून होते. भाषा आणि समाज अशा रितीने परस्परावालंबी, परस्परपूरक व परस्परपोषक असतात. म्हणूनच स्वत:ची लिपीदेखील नसलेल्या एखाद्या आदिवासी भाषासमूहापासून, विश्वव्यापक सामाजिक संबंधांपर्यंतच्या सर्व भाषाव्यवहारांचा विचार व व्यवस्थापनात्म्क मांडणी सामाजिक भाषाविज्ञानाच्या अभ्यासात अंतर्भूत होते. म्हणूनच सामाजिक भाषाविज्ञान हे समाजविज्ञान व भाषाविज्ञान यांचे संयुक्त अभ्यासक्षेत्र आहे.
भाषाविज्ञान व समाजविज्ञान या अभ्यासक्षेत्रात समान असलेले काही विषय दोन्ही क्षेत्रात कसे अभ्यासले जातात, कोणकोणत्या अंगांनी अभ्यास करतात ते पाहू. उदाहरणार्थ `समाज` या घटकाकडे समाजविज्ञान कसे पाहते? `समाज` म्हणजे काय? समाजरचनेचे स्वरुप कसे आहे? समाजरचनेत कोणकोणत्या कारणांनी बदल होतात? सामाजिक संस्था कशा अस्तित्वात येतात? त्यांचा विकास - लय का होतो? समाजात प्रश्न केव्हा कसे निर्माण होतात? इत्यादी दृष्टिकोनातून समाजवैज्ञानिक `समाजा`कडे पाहात असतात. भाषावैज्ञानिक भाषाबदलाची समाजसापेक्ष कारणे कोणती, भाषाभेद का निर्माण होतात, लिंग, जात, वर्ग, संप्रद्राय, विचारसरणी, व्यवसाय, प्रदेश, पक्ष, स्थित्यंतरे, चळवळी, सत्ताकेंद्र यामुळे भाषेत बदल कसे होतात, त्याचा वर्णनात्मक अभ्यास करतात. असे अभ्यास `शास्त्रीय` असल्याने त्यासंबंधीच्या उपाययोजना कशा व कोणत्या करावयाच्या ते ठरविण्यासाठी उपयुक्त ठरतात. बर्नस्टनच्या निम्नस्तरीय वर्गाच्या भाषेच्या अभ्यासामुळे अमेरिकेत प्रथम मागासवर्गीयांना सवलती देण्यात आल्या आणि याचेच अनुकरण भारताने स्वातंत्र्यानंतर केले. आज या सिद्धांतावरही नव्या संशोधकांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे दृष्टिकोन बदलत आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून भाषेचा अभ्यास केल्यास लिंगानुसार भाषा बदललेली दिसते. परंपरेने एखाद्या लिंगाला (पुल्लिंगी वा स्त्रीलिंगी - पुरुषसत्ताक व मातृसत्ताक कुटुंबपद्धती, समाजरचना इ.) वर्चस्वी मानल्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न कोणते याचा विचार (स्त्रीवादी) भाषाभ्यासक मांडतात. तेव्हा भाषा बदलली तर सत्ताकेंद्र बदलतील अशा विचाराने काही स्त्रीवादी मंडळी विचार व आचरण करतात.
आज आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या पुनर्वसनाचा विचार होतो. त्यांना मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या भाषेचे स्वरूप (क्षमता) ही एक अडचण आहे समजून घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील गळतीच्या समस्येकडे पाहिले पाहिजे. तसेच त्यांच्या पारंपरिक व्यवसाय ज्ञानाची उपेक्षा, संस्कृती विषयक दृष्टिकोनाची न केली जाणारी अभिव्यक्ती ही भाषाभ्यासकच स्पष्ट करू शकतात.
आज भारतात २२०० भाषा बोलल्या जातात. त्यातील कित्येक फक्त मौखिक आहेत. त्या लिपीबद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे मौखिक अस्तित्व संपले की त्या नष्ट होतात. पण भाषा नष्ट झाली की संस्कृती नष्ट होते. त्या त्या मानवसमूहाने त्या त्या काळी केलेला विचार नष्ट होतो. म्हणून अल्पसंख्य बोलीभाषिकांचे त्यांच्या बोलींचे जतन होण्याची गरज जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही आहे.
बोली आणि प्रमाणभाषा यातील संघर्ष वास्तविक टोकाचा नाही. `बोली` ही भाषाच असते. फक्त तिला आज शासनमान्यता लेखनपद्धत विस्तारित वापरक्षेत्र नाही. आज असलेली प्रमाणभाषा कालची एकेकाळची बोलीच असते. कदाचित उद्याची `प्रमाण़` बदललेलीही असेल. भाषाभ्यासक याची शास्त्रीय कारणे देतात. ही जेव्हा समाजमानसाला समजतील तेव्हा याबाबतचे गैरसमज दूर होतील. म्हणूनच समाज भाषाभेदांचा अभ्यास, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नियोजनाला खूप उपयुक्त ठरतो.
`भाषा` हा असाच एक दोन्हीकडे समान असणारा विषय आहे. समाजशास्त्रज्ञ भाषेकडे पुढील दृष्टिकोनातून पाहतात. समाजात ज्या निरनिराळ्या कारणांनी गट तयार होतात त्यापैकी एक कारण म्हणजे भाषा. भाषाधारित समाज म्हणजे मराठी भाषिक समाज. मारवाडी, गुजराथी, धनगरी, वारली, पावरी, ठाकूर इत्यादी बोली भाषिकांचा एक गट ओळखला जातो. अशा अल्पसंख्य बोलीभाषिकांचे विविध प्रश्न असतात. त्यांची वैशिष्ट्ये, लक्षणे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न समाजशास्त्रींचा असतो. तसेच सर्व शास्त्र-कला यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम भाषाच असते. भाषेचे एक समाजशास्त्रही असते.
भाषेच्या अभ्यासातून मनोविज्ञान, मानववंश विज्ञान, इतिहास, समाजशास्त्र यांना उपयुक्त माहिती मिळत असते. भाषा व साहित्य हे अशा सामाजिक शास्त्रांचे अभ्यास-साधन असते. तर भाषावैज्ञानिक भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाचा प्रयत्न करतात. बोलल्या जाणाऱ्या भाषेचे स्वरूप (ध्वनी, वर्ण, शब्द, वाक्य, अर्थ) पाहण्याबरोबर व्यक्तीच्या औपचारिक व अनौपचारिक भाषेतील भेद, व्यक्तीची भाषिक संज्ञापनक्षमता त्यातील व्यक्तिगत व सामाजिक अडथळे, लघुक्षेत्रानुसार होणारे `भाषिकभांडार`, व्यवसायबोली, भाषाबदलावर परिणाम करणारे सामाजिक वा अन्य घटक हे समजून घेऊन भाषाभेदांची कारणे समजून घेण्याचा भाषावैज्ञानिक प्रयत्न करतात. अशा अभ्यासातून बोलींची स्वतंत्र व्याकरणे लिहिण्याचे प्रयत्न होतात. कोशांचे पुरवणीकोश वेळोवेळी काढले जातात. स्वतंत्र शास्त्र व व्यवहारानुरुप परिभाषाकोशा तयार होतात.
भारत हा एक बहुभाषिक देश आहे. तेव्हा किमान ५० टक्के नागरिकांचे बहुभाषिकत्व ही एक भाषेच्या माध्यमातून प्राप्त करावयाच्या ज्ञानासाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे भाषार्जन, परभाषांचे आत्मसातीकरण व त्यामुळे भाषेत होणारी परिवर्तने - यामुळे भाषाशुद्धीचे, स्थिरभाषेचे प्रश्न टोकाला जाऊन न सोडविता भाषेचे प्रवाहित्व, गतिमान स्वरूप लक्षात ठेवून सोडविले पाहिजेत, ही जाणीव अशा भाषावैज्ञानिक अभ्यासातून प्राप्त होते.
संस्कृती - या समान घटकाचा अभ्यास दोन्ही शाखेतील अभ्यासक करतात. समाजवैज्ञानिक संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीची घडण कशी होते, समाज कोणत्या सांस्कृतिक चिन्हांची जपणूक करतो, समाजात कोणकोणते सांस्कृतिक प्रश्न आहेत, (धर्म, अध्यात्म प्रदेश, भाषिक गटानुसारच्या रितीपरंपरा नीतिनियम त्यांचे बदललेल्या परिस्थितीतील पालन अथवा बंड समाजातल्या भिन्न गटांचे सामाजिक अस्मितेच्या संदर्भातील प्रश्न इ.) याचा अभ्यास समाजवैज्ञानिक करतो.
भाषावैज्ञानिक भाषेतून संस्कृती कशी व्यक्त होते, भाषा हे संस्कृतीचे प्रतिबिंब कसे आहे, भाषेने त्या त्या समाजगटाचा धर्म अध्यात्म, नीति, शिष्टाचार, कलाव्यवहार, व्रते, विधी-विधाने, सण उत्सव यांना कसे अभिव्यक्त केले आहे, - असा सूक्ष्म अभ्यास होतो.
शिक्षण - हा असाच एक दोन्ही विद्याशाखांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षित - अशिक्षित, साक्षर - निरक्षर, संगणकसाक्षर, उच्चशिक्षित, बुद्धिजीवी - असे गट समाजात शिक्षण या कल्पनेमुळेच होतात. या प्रत्येक गटाची लक्षणे, घडण, परस्परसंबंध समाजाच्या शैक्षणिक गरजा, धोरणे यांचा विचार समाजवैज्ञानिक करतात.
भाषावैज्ञानिकांना माणूस भाषा कशी शिकतो, बालकांचे भाषासंपादन, त्यातील व्यक्तिभिन्नता व सार्वजनिक संपादणुकीचे स्वरूप, अडचणी भाषिक चुका, निजभाषेचे, परभाषेचे शिक्षण, शिक्षणाची धोरणे, अभ्यासक्रम, भाषाशिक्षणाचे स्वरूप, यासारखे प्रश्न जाणून घेण्याची गरज वाटत असते. शैक्षणिक माध्यमाचा प्रश्न हा राजकारण्यांनी सोडवायचा विषय नसून भाषावैज्ञानिकांनी केलेल्या शिफारशींचा विचार शासनाने करावयाचा असतो. प्रत्येक व्यवसायातील भाषिक वर्तन कसे असायला हवे - याचा विचार / अभ्यास भाषावैज्ञानिक करीत असतो म्हणून प्रत्येक व्यवसायात, औद्योगिक क्षेत्रात, विधीक्षेत्रात प्रशासनीय अंमलबजावणीच्या ठिकाणी एका भाषावैज्ञानिकाची उपस्थिती महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. भाषेचे जतन, संवर्धन विकास हा शासनाने आपला विषय मानल्यावर त्याची अंमलबजावणी करताना भाषावैज्ञानिकांची मदत घेणे जरुरीचे आहे.
साहित्याचा अभ्यास समाज वैज्ञानिक एक साधन म्हणून करतात. साहित्य हे एकाअर्थाने समाजाचा दस्तऐवज आहे. साहित्यात समकालीन जीवन प्रश्न प्रतिबिंबित होत असतात. याआधारे कालिक समाजस्थिती, मानवी प्रगती, कौटुंबिक नातेसंबंध, मानवी मूल्ये - याचा परिचय होतो. समाजाच्या बदलत्या गरजेनुसार साहित्याचा रूपबंध कसा बदलतो, कोणते वाङ्मयप्रकार अस्तित्वात येतात याचा अभ्यास समाजवैज्ञानिक करतात तर भाषा वैज्ञानिक लेखकाच्या भाषेच्या शैलीचा भाषावैज्ञानिक समीक्षा दृष्टीने अभ्यास करतात. लेखकाचा भाषाविचार, कालिक भाषिक परिवर्तने (साहित्यातील साहित्याच्या भाषावैज्ञानिक (वर्णनात्मक + संख्याशास्त्रीय) अभ्यासाधारे लेखकाचा नाम निर्णय करता येतो या विविध मुद्दयांचा आधारे सामाजिक भाषाविज्ञान हे एक संयुक्त अभ्यासक्षेत्र कसे आहे ते स्पष्ट व्हावे.
अशा या जोड अभ्यासाचा उपयोग अनेक क्षेत्रात होतो.
१. शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारचे निर्णय देणे.
२. कायद्याची परिभाषा ठरविणे, विविध प्रकारच्या कायदेविषयक मजकुराचे भाषांतर करणे.
३. मानसोपचारात भाषेचे, संवाद भाषेचे महत्त्व अपार आहे. रोगोपचारासाठी देखील उचित भाषाव्यवहार फलदायी ठरतो.
४. विद्यार्थी, बालके, ग्रामीण जनता यांच्या भाषिक चुकांचे विश्लेषण करुन त्यावर उत्तम भाषाध्यापनाचा उपाय सुचविणे.
५. भाषेची निर्मिती शीलता वाढविण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होतो.
६. वाचादोष दूर करताना भाषेच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत होते.
७. संगणकाची भाषा, तारायंत्रे, टंकलेखन यंत्रावरील अक्षरफलक, छपाई यांच्या प्रक्रियेत समाज भाषावैज्ञानिक अभ्यास उपयुक्त ठरतो.
८. सांकेतिक लिपी, गुप्तहेरांची भाषा, अंधासाठी लिपी ची निर्मिती यासाठी भाषावैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे.
९. कोशनिर्मिती क्षेत्र आणि कोशविज्ञान क्षेत्र हे पूर्णत: भाषावैज्ञानिक अभ्यासावरअवलंबून आहे. त्यातल्या त्यात कोशात कोणते शब्द समाविष्ट करावयाचे किंवा नाही हे ठरविण्यासाठी समाजभाषा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास उपयुक्त ठरतो.
१०. राष्ट्रांचे भाषानियोजन, आंतरभाषिक समाजवास्तव, बहुभाषिक समाजरचना डोळ्यांसमोर ठेवून करावे लागेल याची जाणीव समाजभाषा वैज्ञानिक अभ्यासानेच दिली आहे.
फारच अध्ययन पूर्ण, उपयुक्त व महत्वपूर्ण लेख आहे. लेखिकेचे हार्दिक अभिनन्दन..
ReplyDelete