गेल्या सत्तर वर्षापासून इथले १६९ श्रीमंत घराणे म्हणजे मोगलाई मराठा सत्ता चालवीत आहेत...असे असताना इथला गरीब मराठा आणखी गरीब होताना दिसत आहे.बाजार पेठ्यात हमाली करताना आणि वॉचमेनची नोकरी करतांना हा गरीब मराठा दिसत आहे.अशा मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका जर कोण घेताना दिसत असेल तर ते अॅड प्रकाश आंबेडकर घेताना दिसत आहे.
विषय असा आहे की मराठा समाज आरक्षण मागित आहे परंतु त्यांना आरक्षण मिळत नसल्याची भावना आता मराठा तरुणांमध्ये दिसत आहे.परंतु हे आरक्षण का मिळत नाही असा प्रश्न तो स्वत:ला विचारतो तेव्हा आता त्याच्या लक्षात येते की इथली राजसत्ता आपल्या मराठ्यांच्या हातात असताना आम्हाला वणवण का...? करावी लागत आहे.तर त्याच्या प्रश्नांना वाट करून देण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली दिसत आहे.आंबेडकर असे म्हणतात की,इथला श्रीमंत मराठा हा मोगलाई मराठा आहे म्हणजे वतनदार,जहागीरदार, सरमजामशाह ही घराणी मोगलाईने उभी केलेली घराणी होती.अशा मोगलाई मराठ्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारून इथल्या सामान्य मराठ्याला न्याय देण्याची भूमिका राबविलेली आहे.परंतु इथल्या पेशवाईने स्वराज्य संपवून पुन्हा ही घराणेशाही उभी केली होती.अशी घराणे स्वतंत्र नंतर काळात राजकीय घराणे म्हणून उभी राहिली आणि आज साखर कारखाने,दुध संस्था,शिक्षण संस्था,पतपेढ्या,बँका उभारून गडगंज झालेली आहेत.त्यामुळे अशा घराण्यांना गुलामी लादून इथल्या गरीब मराठ्यांना उभे राहू द्यायचे नाही.म्हणून मे उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण हे मे सर्वोच्च न्यायालयात टिकविले गेले नाही.त्यामुळे जो पर्यंत इथला गरीब मराठा या संदर्भात या मोगलाई मराठ्यांच्या विरोधात आवाज उचलीत नाही तो पर्यंत त्याला न्याय मिळणार नाही हे तेवढेच सत्य आहे.
गरीब मराठ्यांचे नेतृत्व करताना संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आज गरीब मराठे यांच्यासाठी लढत आहे परंतु हे मोगलाई मराठे यांच्या विरोधात निवडणुकीच्य रिंगणात उतरताना दिसत नाही.जर खरेच गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात सत्ता मिळविणेसाठीचा संघर्ष उभारावा लागेल.
प्रश्न असा आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे....आणि आम्ही त्यांना भावनिक आहोत याची ओळख इथल्या सत्ताधारी पक्षांना आणि काही आपल्या स्वार्थी नेत्यांना झालेली आहे.त्यामुळे नेहमी ते भावनिकतेचे राजकारण उभारू पहात असतात.आता त्यांना असे भावनिकतेचे राजकारण उभे करून देणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलेले आहे.त्याला तसे कारणही आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर काँग्रेसी मदतीने बी सी कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचा भावनिक प्रश्न उभा करून मृत्युच्या अहवालाची मागणी करू इथली एक पिढी उध्वस्त केलेली आहे.त्याच प्रमाणे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन उभारून भावनिक मुद्दा उपस्थित करून त्याचे राजकारण करून इथली आणखी एक पिढी उध्वस्त करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला बुद्धीजीवी समाज संपविण्याचा नेहमी घाट घातला गेलेला आहे.त्यामुळे इंदू मिलच्या माध्यमातून आता कोणतेही भावनिक राजकारण होऊ देणार नसल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्याची दिसते.एकंदरीत आता राजकारण करण्याची दिशा बदलत असल्याचे चित्र उभा राहताना दिसत आहे.
एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी उभारलेली राजकीय भूमिका एक वेगळे वळण घेताना दिसत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला डिप्रेस क्लासेस फेडरेशन आणि त्या माध्यमातून मागासलेला समाज सत्तेच्या दारात आणून ठेवला आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक घरात असणारा कामगार वर्ग लक्षात घेता उभारलेला स्वतंत्र मजूर पक्ष आणि या पक्षाच्या माध्यमातून कामगारांना दिलेला कायदेशीर हक्क यातून कामगारा संदर्भातील न्यायिक भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका गावागाड्याला न्याय देणारी भूमिका होती.जातीच्या याद्या तयार करून त्याचे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उभारून १९४२ ला राजकीय पक्ष स्थापन करून अलुतेदार,बलुतेदार,फिरस्ते आणि अल्पसंख्याक समाजाला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून सामजिक,आर्थिक आणि राजकीय न्याय देऊन मानव कल्याणकारी भूमिका राबविलेली आहे.
एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची कास धरीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सथापन करून अलुतेदार,बलुतेदार,फिरस्ते आणि अल्पसंख्याक आणि गरीब मराठा समाजाला सामजिक,आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची घेतली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.