Friday, March 22, 2013

जलशिक्षण व जलसाक्षरतेची गरज

सर्वांनीच पाण्याचा जपून वापर करुन पाण्याचे योग्य नियोजन केले तरच भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. जलशिक्षण आणि जलसाक्षरता समाजात निर्माण होण्याची गरज आहे, २२ मार्च या संकल्प जागतिक जलदिनानिमित्त सर्वांनीच असा संकल्प  केला पाहिजे.

दरवर्षी 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो. या माध्यमातून गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे महत्त्व व त्यांचे शाश्वत व्यवस्थापन याबाबत जनजागृती निर्माण केली जाते. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्याबाबत घोषणा केली. यावर्षीच्या जागतिक जलदिनाची संकल्पना आहे "वॉटर फॉर सिटीज-रिस्पॉडिंग टू द अर्बन चॅलेंज"  शहरीकरण, औद्योगिकीकरण, प्रदूषण आदि कारणांमुळे गोड्या पाण्याच्या स्त्रोतांना धोका निर्माण झाला आहे. या स्त्रोतांना सुस्थितीत राखण्यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा पुनर्वापर, वर्षाजल संचयन, सांडपाणी शुद्धीकरणाबाबत अधिक कडक अंमलबजावणी, पाणलोट व्यवस्थापन, नदी-तलावांचे पुनरूज्जीवन अशा अनेक बाबी करणे आवश्यक आहे.

पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाणी ही अजूनही लोकसंख्येची पूर्ण न झालेली गरज आहे. विशेषत: ग्रामीण भागाची बहुधा सन 2050 पर्यंत भारतातील निम्मी लोकसंख्या शहरी भागात असेल. त्यातील बऱ्याचशा भागात पाण्याचे विविधांगी प्रश्न निर्माण होतील. पाण्याच्या विविध गरजा भागविण्यासाठी पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज सतत वाढत आहे. त्याबरोबरच उंचावलेल्या राहणीमानामुळे दरडोई पाण्याची गरजही वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या आधुनिक पद्धती आत्मसात करणे गरजेचे आहे. यामध्ये लोकसहभाग वाढल्यास या कार्यक्रमांना यश येईल. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्याची ताकद जलव्यवस्थापनामध्ये आहे. जुन्या आणि नव्या जलसंधारण व्यवस्थांचा सातत्याने विचार करून जलनियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक गावातला जलसुरक्षिततेचा, अन्न सुरक्षिततेचा आणि दारिद्र्यनिर्मूलनाचा प्रश्न तेथील जलव्यवस्थेशी निगडीत आहे.

जलसंधारणाच्या आधुनिक आणि कल्पक पद्धतींचा अवलंब करून आपण उत्तमरीत्या जलनियोजन आणि जलव्यवस्थापन करू शकतो. पाणी शोषण खड्डे, समतल चर, समतल बांध, घळ नियंत्रण, कच्चे नियंत्रक बंधारे, गॅबियन बंधारे, मातीचा नालाबांध, सिमेंटचा बंधारा, जलकुंड, भूमिगत बंधारे, छतावरील पावसाच्या पाण्याची साठवण, पोत्यांचा साठवण बंधारा, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, शेततळी अशा अनेक पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण पाणी आणि माती अडवू शकतो.

पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिला वाचविण्यासाठी आपण आपलीही जबाबदारी उचलायला हवी. पाण्याचा वापर जपून केला तरच या संपत्तीचा वरदहस्त राहून दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर आपल्याला मात करता येईल. पावसाचं पाणी साठवण्यासाठी छतावरील जलसंकलनाची पद्धत लोकप्रिय होताना दिसत आहे. एका माणसाची एका दिवसाची पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची गरज 5 ते 10 लिटर एवढी असते. उन्हाळ्याच्या 1000 दिवसांसाठी 5 कुटुंबाच्या पाण्याची गरज 2500 ते 5000 लिटर असते. 25 चौरस मीटर छतावरून सुमारे 400 मिलीमीटर पाऊस पडला तर 5000 लिटर पाण्याची टाकी सहज भरते. हे लक्षात घेतले तर पाणी जपून वापरण्याबरोबरच छतावरील जल संकलन करण्याची जबाबदारी उचलली तर केवढा फायदा होऊ शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे.

तसेच, पाण्याची उपलब्धता, दैनंदिन वापरासाठीची किमान गरज, मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा दुरूपयोग, टाळता येऊ शकणारी पाण्याची नासाडी याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होणे गरजेचे आहे. हे जलशिक्षण आणि जलसाक्षरता प्रत्येकाने आत्मसात करावी. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी वर्षा संचयन, पाण्याचे पुनर्चक्रीकरण आणि पाण्याचा पुनर्वापर यासारख्या गोष्टी सुरू करणे आवश्यक आहे.

डॉ.संभाजी खराट
जिल्हा माहिती अधिकारी ठाणे

No comments:

Post a Comment