Friday, March 22, 2013

संशोधनाची दैदीप्यमान परंपरा

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील कृषि संशोधन केंद्राने भात पिकामधील संशोधन, बीजोत्पादन, तंत्रज्ञान विकास आणि विस्ताराची 100 वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केली आहेत. भात संशोधन क्षेत्रात कोईबतुर नंतर सुरू झालेल्या देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या केंद्राची आपल्या कामगिरीमुळे अग्रगण्य संशोधन केंद्रात गणना होते.

केंद्राची स्थापना 20 मे 1913 रोजी त्यावेळच्या मुंबई राज्य शासनाने केली होती. सुरूवातीस दक्षिण कोकण भागातील उंच वाढणाऱ्या भाताच्या जातीमधून सुधारीत जाती विकसीत करणे हे या केंद्राचे मुख्य उद्दीष्ट होते. 1959 पर्यंत भाताच्या विविध जाती विकसीत करण्यात केंद्राला यश आले. पुढे हरीतक्रांतीच्या काळात या केंद्राने चीन आणि जपानमधील उन्नत जनूक भात संकरीकरणामध्ये समाविष्ट केला. त्यातून रत्नागिरी 24 ही अतिबारीक व उत्तम दाण्याचा प्रकार असलेली जात विकसित केली. त्यानंतर आणखी नऊ जाती विकसित करण्यात आल्या. केंद्राच्या 22 एकर क्षेत्रापैकी 18 एकर लागवडीखाली, 5.63 एकर फळ पिकाखाली व उर्वरीत हंगामी पिकाखाली आहे.

कालानुरूप संशोधनाची दिशा बदलताना त्यात आवश्यक भर घालून या केंद्राने स्थानिक गरजेनुसार भाताचे वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यातून सह्याद्री 5 हा उशीरा येणारा संकरीत भाताचा वाण कोकण विभागात विशेष ठरला आहे. भातामध्ये 17 वाण शोधून त्याची नोंदणी एनबीपीजीआर नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे.

केंद्रातील संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांना करून देण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण वर्ग, प्रथमरेषीय पीक प्रात्यक्षिक, शेतकरी मेळावे, बैठका आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन केंद्रातर्फे करण्यात येते. केंद्राच्या संशोधन कार्यामुळे कोकण विभागात 1960 मध्ये असलेली 1.8 टन प्रति हेक्टर उत्पादकता 3.4 टनापर्यंत पोहोचली आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय करून हे केंद्र भाताच्या वाणाची देवाण-घेवाण करीत असते.

केंद्राने 2009 पासून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने मंजूर केलेला अखिल भारतीय समन्वयित भुईमूग संशोधन प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे या पिकाकडे कोकणातील शेतकरी वळत आहेत. भुईमुगाच्या उत्पादकतेतही वाढ घडवून आणण्यात केंद्राला यश आले आहे. कोकणातील बदलते हवामान, पर्जन्यमान, मर्यादीत मजूरसंख्या आदी विविध घटक लक्षात घेऊन अधिक उत्पादनाचे उद्दीष्ट गाठण्याचे प्रयत्न केंद्रामार्फत होत आहेत. शेतकऱ्याचे उत्पादन वाढताना ग्राहकाची पसंतीदेखील नजरेसमोर ठेऊन सातत्याने नवनवीन संशोधन हाती घेण्यात येत आहे. त्यामुळेच हे केंद्र कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान तर ठरलेच शिवाय त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा लौकीक वाढविला आहे.


-डॉ.किरण मोघे

No comments:

Post a Comment