Friday, July 11, 2014
'शेतीच्या प्रगतीचे दशक (भाग १) -शरद पवार'
कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी काय केलं? भारतीय कृषी क्षेत्राला त्यांच काय योगदान आहे? अशा प्रश्नरूपी अस्रांचे संधान बहुतेक वेळा माझ्यावर होत असते. अशा प्रश्नांचं मी स्वागतच करतो. त्यांचा परामर्श घेणं आवश्यक आहे. विषयाच्या अनुषंगाने सखोल युक्तिवाद करण्यावर माझा विश्वास आहे. पण माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी काही आकडेवारी मांडली तर अनाठायी ठरू नये.
विविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशात कृषी हे अतिशय गुंतागुंतीचे क्षेत्र आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि लक्षद्वीपपासून अरुणाचलपर्यंत दरवर्षी पावसाचं प्रमाण ५० मि.मी. पासून ते १२ हजार मि.मी. पर्यंत बदलत जातं. जमीन, जमिनीचा पोत, आणि हवामानात असलेल्या प्रचंड विविधतेमुळे प्रांताप्रमाणे उत्पादकतेत फरक पडत जातो.
देशातील कृषीउत्पादनात भरीव वाढ झालेली असली तरी, डाळी आणि खाद्यतेल यांच्या आयातीवर वाढत चाललेला खर्च ही चिंतेची बाब आहे. साधनसामुग्रीचा योग्य आणि वाजवी वापर, तंत्रज्ञानाचा अंगिकार व विस्तार, संशोधन आणि विकास, जोमदार मार्केटिंग, शेतकऱ्यांना किफायतशीर भाव याद्वारे हा पेच सोडवला जाऊ शकतो. यासाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना अधिकाधिक स्वायत्तता देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतीचे एका सक्षम आणि व्यवहार्य व्यवसायात रूपांतर करणे सहजशक्य होईल.
यूपीएचे पहिले सरकार केंद्रात आले तेव्हा मी काही दृष्टिकोन मनाशी बाळगून स्वेच्छेने कृषी खाते मागून घेतले. देशाचं अन्नधान्य वाढवण्यासाठी एक विकास आराखडा माझ्या मनात तयार होता. तेव्हा देशाचं धान्य उत्पादन २०० दशलक्ष टनांच्या आसपास होतं. आपल्या देशाची गरज भागवण्यासाठी ते जेमतेम होतं. प्रत्यक्षात लगेच आपल्याला सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात करावी लागली होती. त्यामुळे मग योग्य विचारविमर्श करून आम्ही आरकेव्हीवाय म्हणून ख्यात असलेली राष्ट्रीय कृषी विकास योजना सादर केली. पुढील वर्षात कृषी उत्पन्नाच्या वाढीत ही योजना प्रमुख शिलेदार ठरली. या महत्त्वाकांक्षी योजनेने कृषी विकासाला वेग प्राप्त करून दिल्याने ती नियोजनकारांच्या वाखाणणीस पात्र ठरली. केंद्र-राज्य सहयोगाचं एक उत्तम उदाहरण म्हणून ती पुढे आली.
२०११-१२ च्या हंगामामध्ये विक्रमी २६० दशलक्ष टनांचे धान्य उत्पादन करून शेतकऱ्यांनी देशाची मान उंचावली. मी जेव्हा कृषी विभागाचा पदभार स्वीकारला तेव्हा धान्याचं उत्पादन जेमतेम २०० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचत होतं. पैकी तांदळाचं उत्पादन ९० दशलक्ष टन, तर गव्हाचं ७० दशलक्ष टन इतकं होतं. आज मी अभिमानाने सांगू शकतो की आपले धान्य उत्पादन २५० दशलक्ष टनांच्या वर गेले आहे. पैकी तांदळाचं उत्पादन १०० दशलक्ष टन, तर गव्हाचं ९० दशलक्ष टनांहून अधिक गेलं आहे. कापसाचं उत्पादन ३५ दशलक्ष गासड्या, डाळींचं उत्पादन १८ दशलक्ष टनांपेक्षा वर गेलं आहे. पदभार स्वीकारताना दुधाचं उत्पादन जे ९० दशलक्ष टन होतं ते आता १३० दशलक्ष टनांवर गेलं आहे.
आज भारत हा फळे आणि भाजीपाल्यांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळेच साध्य झालं आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी हे २ हेक्टरपेक्षाही कमी भूधारक आहेत. यात युपीए सरकारच्या कृषिभिमुख धोरणांचा आणि विविध राज्य सरकारांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे.
पूर्व भारतातील राज्यांमध्ये हरितक्रांतीचे अभियान राबवण्याचा माझा निर्णय यशस्वी ठरला. आज ५० टक्क्यांहून अधिक तांदळाचं उत्पादन पूर्वेकडील राज्यांतूनच होत आहे. देशातील ८२ टक्के शेतकरी हे अडीच हेक्टरच्या खालचे लहान आणि मध्यम शेतकरी असतानाही त्या शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आपण हा यशाचा पल्ला गाठू शकलो, यावर माझा ठाम विश्वास आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांत हरित क्रांतीचे अभियान मी सुरू केले आणि तत्कालीन अथमंत्री प्रणवकुमार मुखर्जी यांनी त्याला खंबीर पाठिंबा दिला, याचा मला आनंद आहे.
संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे २१ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्याचा उल्लेख मला केला पाहिजे. ते म्हणाले... देशाच्या कृषीक्षेत्राच्या आघाडीवर आनंद वाटावा अशी स्थिती असून त्याला अनेक कारणं आहेत.
तेव्हा, आकडेवारी ही नेहमीच वाईट असते, असे नाही. (क्रमशः)
शरद पवार
Original Article Link: http://www.beingsharadpawar.com/2013/12/blog-post_11.html
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment