डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले की भारताच्या
प्रत्येक नागरिकाला आपल्या मुलभूत अधिकाराची आठवण होते हे सत्य कोणीही लपवून ठेवू
शकत नाही.समता बंधुता न्याय यावर आधारित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना
तयार केली आहे हे कोणाला सांगायची गरज नाही असे मला वाटते.परंतु हे अधिकार देत
असताना त्यांना किती कष्ट करावे लागले आहे आणि किती मोठा त्याग करावा लागला आहे
याची कल्पना आज प्रत्येक भीम अनुयायांना आहे.त्यांचे अनंत उपकार या भारताच्या
प्रत्येक नागरिकावर आहेत हे विसरून चालणार नाही.परंतु या सर्व बाबीचा उपभोग आपण
घेत आहोत हे इथल्या मनुस्मृती समर्थकांना कधीच रुचले नाही आणि रुचत नाहीये.म्हणून
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभी राहिलेली राज्यघटना आणि
त्या राज्यघटनेतून उभे राहिलेली लोकशाही बुडविण्याचे षड्यंत्र सुरु करून पुन्हा
मनुस्मृती आणण्याचा घाट इथल्या वैधिक धर्म पंडित यांनी सुरू केलेला आहे.आणि त्याचे
उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे नव्याने लागू झालेला एनपीआर आणि एनआरसी कायदा होय.ह्या
कायद्याची अमलबजावणी झाल्यास इथला एससी,एसटी आणि ओबीसी हा व्दितीय श्रेणी मध्ये
मोडला जाईल आणि राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार म्हणजे “माणूस” म्हणून त्याचे
अस्तित्व नष्ट होऊन जाईल.आणि पुन्हा मनुस्मृती लागू होऊन तो गुलाम बनणार आहे याची
मला जाणीव झाली आहे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत आहे.
काय आहे भीमा कोरेगावचा लढा आणि या विजयस्तंभाच्या महार योद्ध्यांना का
दिली जाते “मानवंदना” हे समजून घ्यायची
पुन्हा वेळ आलेली आहे.भीमा कोरेगाव हा ऐतिहासिक लढा आहे त्याला खूप मोठा इतिहास
आहे आणि हा इतिहास तुम्हाला स्वराज्याची आठवण करून देतो आणि बुध्दप्रेमी छत्रपती
संभाजी महाराज यांची आठवण करून देत्तो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या
ठिकाणी भेट देऊन म्हणाले होते की “जो
इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” या त्यांच्या वाक्याला आपण स्वीकारून
दरवर्षी या महार योद्ध्यांना मानवंदना द्यायला येतो.
छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी “बुधभूषण” नावाचा
ग्रंथ लिहून विद्वानांचा सन्मान केला आहे.वैदिक धर्म पंडित यांचेकडून केलेला वैदिक
पद्धतीचा राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत आपले वडील
छत्रपती शिवाजी महाराज यांना करावयास लावून वैदिक धर्म पंडितांचे धार्मिक अस्तित्व
झुगारून लावले आहे.वेरूळ गाव असल्यामुळे संभाजी महाराज यांनी बुध्द विचार (धम्म)
स्विकारलेला होता.त्यामुळे त्यांनी स्वराज्यात बुद्धांचे विचार पोहचविण्याचे कार्य
केले आहे.त्याच्या या कार्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना मोलाचे सहकार्य
केल्याची इतिहासात नोंद आहे.याची धास्ती वैधिक धर्म पंडितांनी घेतली होती म्हणून
त्यांनी स्वराज्याच्या गद्दारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची
विषप्रयोग करून हत्या करून शंभूराजे यांना जेरबंद करून त्यांना मृत्यूदंड देण्याची
त्यांची योजना फसली होती.शंभूराजे यांनी बुध्द विचाराने (धम्म) शाक्त पंथ पद्धतीत
राज्यभिषेक करून त्यानी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानवर कोरून घेतली.आणि त्या
गद्दारांना आणि दीडशे वैदिक धर्म पंडितांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे याचीही
इतिहासात नोंद आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अशा कार्यामुळे वैदिक धर्म पंडित घाबरले
होते.वैदिक धर्म अडचणीत आला असल्याची त्यांची खात्री पटली आणि त्यानी
औरंगाजेबाच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज यांना काही गद्दारांना बरोबर घेऊन
त्यांची हत्या करून स्वराज्य संपवून पुन्हा वैदिक धर्म उभा करण्याचे षड्यंत्र
त्यांनी आखले होते.आणि श्रुंगारपुरातून छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करून
स्वराज्यातून ३८ दिवसांची धिंड काढीत ज्या ठिकाणी शहाजीराजे यांनी स्वराज्याच्या
संकल्पनेची पेरणी केली.त्याठिकाणी म्हणजे पूर्वीचे नागरवास गाव स्वराज्याच्या
संकल्पने नंतर त्याचे नामकरण तुळापुर झाले तेथे आणून त्यांच्या शरीराचे तुकडे
तुकडे करून ते फेकून देऊन त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात बंदी घातली.परंतु वढू
गावातील महार योध्दा गोविंद महार हे शाक्त पंथ (बुध्द) विचारांचे होते.त्यांनी तो
बंदी आदेश मोडीत काढीत छत्रपती संभाजी महाराज यांचेवर अंत्यसंस्कार करून त्यांची
समाधी बांधली आहे.अशा त्या गोविंद महार योद्ध्याची त्यांच्या मृत्यू नंतर त्याठिकाणी
समाधी बांधली आहे.आज या महार योद्ध्याच्या
समाधीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वीचा महार योध्दा आणि आजचा बौध्द धम्म विचारांचा
व्यक्ती १ जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना करून त्यांच्या समाधीचे दर्शन तर
घेतोच मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन करण्यास तो विसरत नाही हे तेवढेच सत्य
आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर वैदिक धर्म पंडित यांनी
स्वराज्य संपवून टाकले.आणि लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवारवाडा करून
स्वराज्य संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आणि छत्रपती संभाजी
महाराज यांचे शाक्त पंथीय (बुध्द विचार) यांचेपासून रयतेला दूर नेऊन जातीयव्यवस्था
उभी करून पेशवाई निर्माण केली.मनुस्मृती प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची
हत्या झाली होती त्याचा बदला म्हणून आणि जातीयवादी पेशवाई संपविण्यासाठी सातारा
गादीचा सरदार वीर महार योध्दा सिद्धनाक महार याने पेशवाई बरोबर भीमा कोरेगाव
याठिकाणी युध्द करून पेशवाईचा अंत केला आहे.अशा महार योध्यांची शौर्य गाथा म्हणून
जो विजयस्तंभ उभारला आहे.त्याठिकाणी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन मानवंदना
देऊन पुण्यातील गायकवाड वाड्यात बैठक घेऊन महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देऊन यशस्वी केला आहे.त्यानंतर त्यानी
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात त्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र
भारताची राज्यघटना लिहून पुन्हा एकदा समतेचे राज्य डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभे
केल आहे.आणि ती समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी बौध्द धम्म (विचार) स्विकारून
बावीस प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यांच्या बरोबर लाखो भीम अनुयायी यांनी त्या
प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यापैकी ९ वी आणि १० वी प्रतिज्ञा असे सांगते की,”माणूस
हा समान आहे असे मी मानतो” म्हणून “मी समता प्रस्थापित करण्याचा करेन” त्यामुळे
अशी समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी हि प्रत्येक बौध्द धम्मीय व्यक्तीची
आहे.असे प्रकारचे मोठे कार्य आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी संपूर्ण देशात जगाच्या
माध्यमातून केले आहे.असे कार्य त्यानी करू नये म्हणून आजचे वैदिक धर्म पंडित
त्यांना अडसर निर्माण करीत आहे.
आजची
परिस्थिती पाहिली तर संपूर्ण देशात भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे.एनपीआर आणि
एनआरसी असंवैधानिक कायदा मंजूर करून तो भारतावर लादण्याचा प्रयत्न इथली वैदिक धर्म
मंडळी करीत आहे.या कायद्याच्या माध्यमातून स्वराज्यातील अलुतेदार याला पुन्हा एकदा
व्दितीय श्रेणीमध्ये टाकून गुलाम बनविण्याचे कार्य जोरात सुरु झाले आहे.छत्रपती
संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविताना आम्हाला औरंगाजेब दाखविला
होता.आता हे आपल्याला दुसऱ्या जातीचा आणि दुसऱ्या धर्माचा मोदी-शहा यांच्या
माध्यमातून मुसलमान दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे केलेले स्वराज्य संपवीत
आहेत.त्यामुळे हा लढा मोदी-शहा यांच्या विरोधात नसून पुन्हा पेशवाईच्या विरोधात
आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत
आहे.
No comments:
Post a Comment