चंद्रपूर जिल्हयातील वरोरा कृषी विभागाच्या वतीने शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. मे महिण्यात तयार करण्यात आलेली शेततळे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरली आहेत. सिंचनाची कुठलीही सोय नसणा-या शेतक-यांसाठी शेततळे वरदान ठरणार आहेत. वरोरा तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषी विभागाने राबविलेला शेततळे कार्यक्रम शेतक-यांना नवी संजीवनी देणारा ठरला आहे. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव बु., शेगांव, खेकडी रिठ, जामणी रिठ या गावात करण्यात आलेल्या 105 शेततळयात काठोकाठ पाणी भरले असून यामुळे 325 हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे.
कोरडवाहू शेत्रातील शेतक-यांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम असून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने हा विशेष कार्यक्रम केवळ विदर्भातच राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव, शेगांव, खेकडी व जामणी या गावात कृषी विभागाच्या वतीने ढाळीचे बांध व शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत 105 शेततळे व 900 हेक्टर ढाळीचे बांध तयार करण्यात आले. ढाळीच्या बांधामुळे पावसाचे पाणी शेतातच जिरणार असून अतिरीक्त पाणी नालीवाटे निघून शेततळयात जमा होणार आहे. यामुळे शेतातील गाळ वाहून जाण्याचे प्रमाण कमी होवून शेताच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
सोयाबिन, कापूस व हरभरा या पिकासाठी शेततळे नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत. महालगांव परिसरातील शेतक-यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून कृषी विभागाच्या सहाय्याने शेततळयाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचे अभिनंदनीय पाउल उचलले आहे. या चार गावांत 30 बाय 30 चे 55 मोठे शेततळे व 20 बाय 20 चे 50 लहान शेततळे तयार करण्यात आले आहे. या शेततळयाच्या माध्यमातून 325 हेक्टर जमिनीचे संरक्षित सिंचन होणार आहे.
वरोरा तालुका कोरडवाहू म्हणून गणला जात असून या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात. सोयाबिन, कापूस व हरभरा हे पिक घेणारे शेतकरी या परिसरात मोठया प्रमाणात असून या शेतक-यांना सिंचनासाठी शेततळयांचा मोठा हातभार लागणार आहे. शेततळयासोबतच ढाळीच्या बांधामुळे 900 हेक्टर जमिनीला पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे. कृषी विभागाचा ढाळींचे बांध व शेततळे कार्यक्रम राबविण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, कृषी पर्यवेक्षक जी.एस.भोयर व मंडल अधिकारी मनोज केचे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
सिंचनासाठी शेततळे वरदान - राजवाडे
महालगांव परिसरातील शेतक-यांनी शेततळयाची योजना प्रभावीपणे राबवून 105 शेततळे तयार केले. याचा फायदा शेतक-यांना मोठया प्रमाणात होणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी असलेल्या कार्यक्रमातून घेतलेले शेततळे संरक्षित सिंचनासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत व यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल असे उपविभागीय कृषि अधिकारी शिवचरण राजवाडे यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी मोठया प्रमाणात शेततळे निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment