‘चूल आणि मूल’ ह्या बंधनातून बाहेर पडलेल्या स्त्री ने आता घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही बाबी उत्कृष्टपणे सांभाळण्यात यश मिळविले आहे. उद्योग, व्यवसाय शिक्षण या क्षेत्रातील सर्व यशाची शिखरे महिलांनी सर केली आहेत. आता तर शासनही विविध स्तरावर स्त्रियांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांमधून मदत करीत आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात येत आहे.
गोंदिया येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी गृहोपयोगी वस्तू तयार करुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला आहे. गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जिल्हा असल्यामुळे शैक्षणिक बाबतीत फारसा विकास येथे झाला नाही. धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण बघता या भागात उद्योग व व्यवसायाला बराच वाव आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता येथील महिला पूढे सरसावल्या व त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्याचा निर्धार केला. त्याचेच फलित म्हणजे गोंदियातील रेलटोली, लाला लजपतरॉय वॉर्डातील बचतगटाच्या महिलांनी गृहउद्योग उभारुन विविध वस्तूंची निर्मिती केली. बाजारपेठेत भरपूर प्रमाणात मागणी असलेले फिनाईल, हार्पीक, भांडे धुण्याचे लिक्वीड, वॉशिंग पावडर या उत्पादनाची निर्मिती केली. त्यामुळे असंख्य महिलांना रोजगार मिळाला.
या बचतगटातील महिला सदस्यांना लघु उद्योगाकरता प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे असंख्य महिला बचत गटातील महिलांनी स्वबळावर उद्योग सुरु केले आहेत. शासनाच्या वतीने दारिद्ररेषेखालील महिला बचत गटांना विशेष सुविधा दिल्या जात आहे. प्रशासन, नगर परिषद व विविध बँकाच्या माध्यमातून महिला बचत गटांना कर्ज दिले जाते. गृहोउद्योगामध्ये विविध व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ बनविणे, कलाकुसरीचे कामे, हस्त कौशल्य, विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे त्याचप्रमाणे शिवणकाम, पाककला इत्यादींचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाते.
जिल्हा ग्रामीण विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 7 हजार 896 बचत गट असून यापैकी 5 हजार 321 बचतगट कर्ज व शासनाच्या निधी मिळविण्याकरीता पात्र ठरले आहे. 4930 बचत गटांना कर्जाचे वाटप झाले असून 2 हजार 657 बचतगटाच्या कर्जाचे प्रस्तावदेखील तयार करण्यात आले आहे. 959 बचतगटाच्या कर्जाची प्रकरणे बँकानी मंजूर केली आहे आणि त्या बचत गटाच्या सदस्यांना लघूउद्योगाकरीता प्रशिक्षणही देण्यात येत आहे. प्रशासन व बँकेच्या सहकार्याने बचतगटात सहभागी होणाऱ्या स्त्रीयांचा आत्मविश्वास तर दुणावलाच पण आर्थिक स्तरही उंचावला.
No comments:
Post a Comment