Thursday, June 26, 2014
शेतकऱ्यांसाठी उपयोगी प्रमुख कृषी योजना
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सेस निधीतून शेतकऱ्यांसाठी अनेक उपयोगी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजना व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा भागविण्यासाठी जिल्हा परिषद सेस निधी मधून तरतूद करण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदे मार्फत सेस निधीमधून खालील प्रमुख योजना राबविण्यात येतात.
कृषी शैक्षणिक सहल - कृषी तंत्रज्ञानविषयक अद्ययावत प्रगतीची माहिती व फळे/पिकांच्या लागवड पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देऊन राज्यातील विविध कृषी संशोधन केंद्रांना तसेच शेतीवर आधारित उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्रे इत्यादींना भेटी देणे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शिक्षण देणे, हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल कृषी विद्यापीठे व त्याची प्रक्षेत्रे येथे आयोजित करण्यात येते.
कृषी प्रशिक्षण वर्गासाठी शेतकऱ्यांना प्रवास खर्च - शेती आणि पूरक व्यवसाय विषयक कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित होण्यासाठी शेतकऱ्यांना निरनिराळ्या केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवास खर्चाची रक्कम उपलब्ध करुन देण्यात येते.
नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक उद्भवणाऱ्या कीडरोगाचे नियंत्रण - ठाणे जिल्हा हा खरीपाचा जिल्हा असून विविध पिकांवर वातावरणातील बदलांमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कीडरोग आढळून येतात. कीडरोगाचे योग्य आणि प्रभावी नियंत्रण करुन शेतकऱ्यांच्या शेतीचे पर्यायाने उत्पन्नाचे नुकसान रोखणे, उत्पादन आणि उत्पादकता वाचविणे अपरिहार्य आहे. कीडरोग नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशके/बुरशीनाशके/तणनाशके 50% अनुदानावर या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येतात.
शेतकरी शिबिर व प्रात्यक्षिके - शेतकऱ्यांसाठी सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, सुधारित कृषी तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचा परिसंवाद आयोजित करणे, शेतकऱ्यांच्या समस्या तज्ज्ञांच्या निर्दशनास आणणे व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन यासाठी शेतकरी शिबिरे व प्रात्यक्षिके याचे गटस्तरावर आयोजन करण्यात येते.
शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने निविष्ठा संच पुरवठा - शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने त्याच बियाण्याचा वापर केल्याने शेतीच्या अपेक्षित उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे बदलाच्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकांच्या सुधारित व संकरित बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने उपलब्ध करुन देण्यात येतात. परसबागेसाठी भाजीपाला मिनिकिट बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते.
50 टक्के अनुदानाने अवजारांचा पुरवठा - हवामान, पर्जन्य यामधील लहरी बदलामुळे विविध पिकांवर कीडरोगाचे प्रमाण वाढत आहे. कीडरोगामुळे शेतीचे अतोनात नुकसान होते व उत्पन्नात घट येते. होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मजुरीच्या खर्चात बचत व वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने सुधारित कृषी अवजारे व पीक संरक्षण अवजारे उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे, स्प्रेपंप, पंपसंच, पाईप लाईन, कापणी व मळणी यंत्र, दातेरी विळ, गवत कापणी यंत्रे, रोटरी टिलर, कडबाकुट्टी यंत्र इ.पुरवठा 50 टक्के अनुदानाने करण्यात येतात.
सर्व शेतकरी या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी) अथवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment