Thursday, June 26, 2014
दहावी - बारावीनंतर रोजगार संधी
पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेऊन विद्यार्थी आपले भविष्य घडवू शकतात. विविध क्षेत्रांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या अनेक रोजगारांच्या संधीकरिता केवळ उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याकरिता १२ वी, १० वी पास किंवा १० वी नापास तसेच अल्पशिक्षितांकरिता सुध्दा रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्याकरिता आपली आवड, कल व प्रशिक्षण यांची योग्य सांगड घातली तर, रोजगाराची संधी आपल्याकडे आपोआप चालून येईल.
जेम्स अँड ज्युवेलरी डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरींग, विमान सेवा, करमणूक व प्रसार माध्यम उद्योग, समांतर वैद्यकीय (पॅरामेडिकल) व्यवसाय, पर्यटन, हॉटेल व केटरिंग उद्योग आदी क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची मागणी जास्त परंतु पुरवठा कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे या व्यवसायाची माहिती घेऊन प्रशिक्षण पूर्ण केल्यास नोकरीची संधी आपोआप चालून येणार आहे.
करमणूक व प्रसार माध्यम उद्योग :
करमणूक व प्रसार उद्योग क्षेत्रामध्ये वर्तमान पत्र, न्यूज एजन्सी, रेडिओ, दूरदर्शन, फिल्म डिव्हीजन, अँडव्हर्टायझिंग एजन्सीज, एनीमेशन, पब्लिक ओपीनियन अँड रिसर्च इन्स्टीट्यूट मॅगझीन्स, बुक पब्लिशिंग हाऊसेस आदींचा समावेश आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FIICI) ह्यांच्या संशोधनानुसार सन २०१० पर्यंत या उद्योगातील गुंतवणूक सुमारे रु.३५३०० कोटी होती ही गुंतवणूक २०११-१२ वर्षात सुमारे २० टक्क्यांनी वाढणार आहे.
रोजगाराच्या उपलब्ध संधी :
येत्या चार - पाच वर्षामध्ये सुमारे ३०० नवीन एफ एम रेडिओ स्टेशन्स् सुरु होणार असून इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालावरुन त्यामध्ये कमीत कमी १५००० ते २०००० रोजगाराच्या संधी प्रत्यक्षरित्या तसेच अप्रत्यक्षरित्या कमीत कमी १०००० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच ऍनिमेशन क्षेत्रामध्ये ३,००,००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत व या क्षेत्रात कुशल कामगारांची तिव्रतेने कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे वर्तमान पत्र, न्जूज एजन्सी, दूरदर्शन, फिल्म डिव्हीजन, ॲडव्हार्टायझिंग एजन्सीज यामध्ये सुध्दा दिवसेंदिवस कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे.
योग्य व कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे इयत्ता १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर उमेदवारांनी या क्षेत्रातील एखादा कोर्स केल्यास त्याला अतिशय कमी कालावधीमध्ये आर्थिक स्थैर्य मिळून त्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्याची सुवर्ण संधी मिळू शकेल.
भारतीय विद्याभवन, गिरगाव, मुंबई गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद एच.आर.कॉलेज, मुंबई पुणे विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग इन्स्टिटयूट ऑफ ब्रॉड कास्टिंग ॲन्ड कम्युनिकेशन, भवन्स कॉलेजजवळ, अंधेरी तसेच मुंबईत चर्चगेट जवळील के.सी.कॉलेज, नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट आदी संस्थांमध्ये वरील विषयासाठी प्रशिक्षण दिले जाते.
भारतीय नागरी विमान मंत्रालयाने जवळजवळ दुप्पट म्हणजे ५० लाख प्रवासी भारतास भेट देतील असे नियोजन आखले आहे. त्यामुळे प्रसिध्दी, जाहिरात, मार्केटींग आणि आर्थिक उलाढाल इ.विविध परस्परावलंबी क्षेत्रेही मोठ्याप्रमाणात खुली झाली आहेत. येत्या १० वर्षात ४० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणूनच महत्वाकांक्षी आणि पदोपदी आव्हान स्वीकारु इच्छिणाऱ्या युवकांना विमानसेवेची ही उत्तम संधी आहे.
जेम्स अँड ज्युवेलरी डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरींग :
भारत हा जगामध्ये हिऱ्याचा तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये १२ टक्के निर्यात ही केवळ डायमंड व ज्युवेलरी उद्योगाची आहे. जगभरात ३००० भारतीय ज्युवेलरी कार्यालये वितरण व विक्रीसाठी पसरलेली आहेत. दरवर्षी ३० टक्के प्रमाणे जेम्स आणि ज्युवेलरी उद्योगाची वाढ व विस्तार होत आहे. केवळ मुंबईतील सीप्झ (Seepz) अंधेरी विभागात ६८ ज्यूवेलरी युनिट असून सिप्झबाहेर अंदाजे ५०० लहान मोठे युनिट्स आहेत. इतरत्र १०० कारखाने असून १५० कारखाने सीप्झ येथे सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी केवळ मुंबईतील असून राष्ट्रीय पातळीवर विशेषत : सुरत व जयपूर येथील हा उद्योग
विस्तारत असून प्रशिक्षित मनुष्यबळाची खूप कमतरता आहे. बृहन्मुंबई विभागातच आज या क्षेत्रात १०,००० आसपास नोकऱ्या उपलब्ध आहेत.
सेंटर फॉर मॉनिटरींग ऑफ इंडियन इकॉनॉमी व जेम्स अँड ज्युवेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी केलेल्या पाहणीनुसार हे उद्योगक्षेत्र अपेक्षित असलेले १६ बिलीयन डॉलरचे लक्ष पार करणार आहे. यामुळे या उद्योगातरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी मुंबईत सेंट झेवीयर कॉलेज, धोबी तलाव तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) येथे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण करुन नोकरी मिळविणे शक्य आहे.
समांतर वैद्यकीय (पॅरामेडिकल व्यवसाय) :
वैद्यकीय क्षेत्रामध्ये तांत्रिक युगामुळे नवीन क्रांती घडून येत असून हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रामध्ये कोट्यावधी रकमेची आर्थिक उलाढाल होत असून भविष्य काळामध्ये अनेक नवीन उपचार पध्दती येत आहेत. यामुळेच या क्षेत्रांमध्ये असंख्यप्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. गरज आहे त्या संधीचे लाभ घेऊन भविष्यामध्ये स्थिरता प्राप्त करुन घेण्याची.
शिक्षणानंतर काय ?
यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांनी याकरिता या महाविद्यालयाशी संपर्क साधायचा आहे.
पर्यटन हॉटेल व केटरिंग उद्योग :
हॉटेल व्यवसायाला मनुष्यबळाची गरज असून या उद्योगाच्या गतीचा विचार करता या पुढेही ही गरज वाढणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी, बारावी किंवा पदवी नंतर जे उमेदवार हॉटेल व पर्यटन या व्यवसायातील अभ्यासक्रमाला प्राधान्य देतील त्यांना अतिशय कमी कालावधीमध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत मिळेल. याशिवाय त्याला प्राप्त होणाऱ्या अनुभवातून भविष्यामध्ये तो स्वतंत्रपणे व्यवसाय करु शकेल. या व्यवसायामध्ये पुरुष तसेच महिला उमेदवारांना सुध्दा करिअर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
उपलब्ध रोजगार :
अमरावती विद्यापीठ, अमरावती भारती विद्यापीठ, नवी मुंबई तसेच कात्रज पुणे येथील डायरेक्टोरेट ऑफ टेक्नीकल इन्स्टिट्यूट , महापालिका मार्ग मुंबई डायरेक्टोरेट ऑफ व्होकॅशनल इन्स्टिट्यूट डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट, नेरुळ, नवी मुंबई तसेच पिंपरी, पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, दादर आदी ठिकाणी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment