Thursday, June 26, 2014
संरक्षण ग्राहक हिताचे...
ग्राहक हिताचे संरक्षण हा वैधमापन शास्त्र यंत्रणेचा मूळ उद्देश असून त्यासाठी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या व्यापारी आस्थापना आवेष्टक व उत्पादक, आयातदार आवेष्टनाचे काम करणा-या आस्थापना, औद्योगिक संस्था यांना अचानक भेट देऊन वेळच्या वेळी तपासण्या केल्या जातात.
त्यांच्याकडे वापरात ठेवलेली व ताब्यात असलेली वजने, मापे, तोलन व मापन उपकरणे यांची विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकनाचे काम केले जाते.तसेच माल कमी देणे, ज्यादा किंमतीने मालाची विक्री करणे, खरेदीच्या वेळी ठरलेल्या मोजमापापेक्षा फसवणुकीने जादा माल घेणे यासारख्या वजनमापे कायद्याअंतर्गत तरतुदीच्या भंगाबद्दल संबंध्ितांवर गुन्हे दाखल केले जातात.
ग्राहक या नात्याने, सुज्ञ नागरिकाने आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे.वैधमापनशास्त्र, म्हणजे वजन मापाचे शास्त्र.
या यंत्रणेमार्फत पुढील अधिनियम व नियमांची अंमलबजावणी करण्यात येते.
वजने व मापे मानके अधिनियम १९७६,
वजने मापे मानके (आवेष्टीत वस्तू) नियम १९७७,
वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम १९८५,
महाराष्ट्र वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम १९८७.
प्रत्येक वस्तू मार्केट मध्ये वजने वा मापाने दिली जाते.हे करीत असताना व्यापा-याने वजन बरोबर करुन दिले किंवा कसे ? घेतलेली वस्तू द्रव स्वरुपात असेल तर ती बरोबर दिली किंवा नाही याबाबत या यंत्रणेकडून खातरजमा केली जाते. ही मेट्रीक पध्दत असून ती १९५८ ला लागू झाली. पूर्वी लांबीची मोजणी फूटामध्ये व्हायची मात्र त्यावर कायद्याने बंधन घातले आहे.
एखादी वस्तू जर पॅकेटमध्ये बंद असेल तर त्या पॅकेटवर ६ गोष्टी असणे कायद्याने बंधनकारक आहे.
वस्तूच्या मॅन्युफॅक्चरचे नाव पॅकेटवर असायला पाहिजे.
त्या पॅकेट मध्ये काय आहे ?
वजन किती आहे?
युनिट असेल तर किती युनिटस् आहे?
पॅकेटस् वर निर्मितीचा महिना व वर्ष.
अधिकतम विक्री किंमत...(सर्व करासहित)
कन्झुमर केअर क्रमांक.
बाजारात मिळणा-या आयातीत वस्तूंवरदेखील त्यांच्या आयातदाराचे तसेच त्याची पॅकिंग करणा-यांची (इम्पोर्ट व पॅकर) नावे व पत्ते असणे आवश्यक आहे.त्यापैकी एखादीही माहिती वस्तूवर नमूद नसेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो आणि आणि गुन्ह्यासाठी कायद्यात शिक्षाही नमूद केली आहे.
वरील प्रकारचे सर्व गुन्हे हे खात्यामार्फत सामोपचाराने मिटविले जातात.संबधितावर नोंदविलेल्या गुन्ह्यात त्यांनी आरोपाचा इन्कार केल्यास ते गुन्हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविला जातो.
वरील ६ गोष्टी पैकी एखाद्या पॅकेटवर आवश्यक माहिती लिहिली नसल्याचे आढळले तर त्या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागास तक्रार करायला हवी.
विभागाच्या नजिकच्या कार्यालयात,दूरध्वनीद्वारे किंवा इमेलव्दारे कोणाताही ग्राहक तक्रार नोंदवू शकतो.
ग्राहकांचे तक्रारीनुसार किंवा त्यांनी पुरविलेल्या माहितीनुसार विभागाचे निरिक्षक किंवा सहाय्यक नियंत्रक त्या दुकानावर छापा मारु शकतात.
थोडक्यात कोणताही विक्रेता, दुकानदार आपली फसवणूक करणार नाही याची दक्षता जागरुक नागरिक या नात्याने प्रत्येक ग्राहकाने घ्यावी.ही दक्षता घेवूनही अपयश आल्यास आपल्या नजिकच्या संबधित यंत्रणेशी संपर्क साधावा.
फारुक बागवान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment