Friday, November 1, 2019

२८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..! राजेश खडके सकल मराठी समाज



              गोलमेज परिषदेवर कॉंग्रेस पक्षाने बहिष्कार घातला होता...तेव्हा त्या गोलमेज परिषदेत जाऊन इथल्या शुद्र अतिशुद्राचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून एक इतिहास रचल्याचे आपल्याला माहित आहे.त्या गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर राष्ट्रद्रोह-देशद्रोहाचे आरोप केले होते याचीही कल्पना आज जवळ जवळ सगळ्यानाच आहेच.असे असताना स्वतंत्र भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करावे या कॉंग्रेसच्या मागणीला त्यांनी विरोध केला नाही आणि मला राष्ट्रद्रोही -देशद्रोही का म्हटले याचा जवाबही कधी त्यांनी कॉंग्रेसला मागितला नाही.कारण या संधीचा फायदा घेऊन या देशातील शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर जेवढे ताठर भूमिकेचे होते तेवढे वेळेला तडजोड कशी करायची आणि त्याचा फायदा इथल्या शुद्र आणि अतिशुद्रांना कसा द्यायचा त्यासाठीचे राजकीय चातुर्व त्यांच्यात होते याची जाण जगातील विद्वानांना आजही आहे.
                     इथल्या शुद्र अतिशुद्रांना संसदीय राजकारणात स्वतंत्र मतदार संघ मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेतली होती.त्याच्या या भूमिकेला मोहन करमचंद गांधी यांनी विरोध करून पुणे येथील येरवडा कारागृहात आमरण उपोषण केले होते.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी बरोबर तडजोड करून पुणे करार अस्तित्वात आणून इथल्या शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे.आजही आपण या पुणे कराराचा अधिकार दिवस म्हणून साजरा करीत असतो.या दोन घटनांची इतिहासात नोंद झाली आहे.हे आपण विसरता कामा नये असे मला वाटते.ताठर भूमिका हे स्वाभिमानाचे प्रतिक आहे हे कोणी नाकारणार नाही आणि तडजोड हे राजकीय चाणाक्षपणा आहे हे कोणी नाकारणार नाही कारण कोणत्याही युध्दाचा शेवट हा तहातच होतो आणि असे तह छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहेत याच्या इतिहासात नोंदी आहेत ज्याने इतिहास वाचला आहे त्याला याही कल्पना आहे असे मी मानतो.
                      प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यामुळे ते आपल्या सर्वांना आदरणीय आहेत यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु ते एका राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ज्यावेळेस ते एखादी भूमिका मांडतात त्यावेळेस इतर राजकीय पक्षातून त्यांच्या त्या भूमिकेला विरोध हा होणारच आहे कारण या देशाला संविधान लागू आहे.निवडणुकीचे राजकारण सुरु झाले की राजकीय पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतात.विचारवंत,अभ्यासू व्यक्ती आणि राजकीय विश्लेक्षक आपले मत मांडत असतात.टीकाकार आपल्या पद्धतीत टीका ही करीत असतो.आणि ज्या त्या पक्षाचे समर्थक हितचिंतक आपल्या पद्धतीत त्यांना ट्रोल करीत असतात यालाच तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली खरी लोकशाही म्हटले आहे.
                    छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार यांना बरोबर घेवून स्वराज्याचा (समतेचा) लढा उभारलेला होता आणि तो आपल्या बुद्धी चातुर्यावर यशस्वी करून दाखविला आहे.परंतु जशी त्यांची ताठर भूमिका होती तशी वेळेला त्यानी तडजोड भूमिकाही स्वीकारलेली आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी याच स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष वंचितांना न्याय देण्यासाठी उभारलेला होता.वंचितांनां न्याय देण्याची भूमिका घेऊन लोकसभेच्या ४८ जागा २६१ संघटना बरोबर घेऊन,एमआयएम बरोबर घेऊन,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत लढविल्या होत्या.एक जागा सोडली तर इतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला यश प्राप्त झाले नाही परंतु ४० लाख मतदान घेण्यास हा पक्ष यशस्वी ठरला.
                    देशात लोकसभेच्या ५४३ जागा आहेत….२0१४ ला मोदी लाट यशस्वी झालेली होती…..संपूर्ण देशात मोदी फॅक्टर असताना शासन प्रशासन आपल्या ताब्यात असताना सर्व यंत्रणा स्वत:कडे असताना त्यांनी २०१९ ला एकूण सर्वच्या सर्व ५४३ जागा स्वबळावर लढविण्याची हिम्मत दाखविली नाही.मित्र पक्ष आणि समविचारी पक्षासोबत युती आघाडी करून त्यानी ५४३ जागा लढविलेल्या आहेत.महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता त्यानी शिवसेना हा समविचारी पक्ष आणि इतर मित्र पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढविलेल्या आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत यांनीही स्वबळावर निवडणूक न लढविता इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन २०१९ च्या लोकसभा निवडणूक लढविलेल्या आहेत.
                               २०१४ मध्ये सर्वच पक्षांनी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या होत्या.महाराष्ट्र राज्यातील प्रमुख चार पक्ष असणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना यांचेकडे निवडूक यंत्रणा राबविण्याची क्षमता असताना सर्व साधन सामुग्री असताना संसाधन साधने असताना ह्या प्रमुख पक्षांनी २८८ मतदार संघात उमेदवार दिलेले नाहीत. कारण हे प्रमुख पक्ष आपल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील आणि जनतेचे प्रश्न विधानसभेत कसे मांडता येतील यावर त्यानी त्यांचे लक्ष केंद्रित केले होते….आणि त्यामध्ये हे सर्व पक्ष यशस्वी पण झाले परंतु सत्ता परिवर्तन झाले आणि आघाडीच्या हातातील सरकार हे युतीकडे गेले.२०१४ ची झालेली चूक २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत होऊ द्यायची नाही असे त्यानी ठरविले होते त्यामुळे त्यांनी युती आणि आघाडी करून २८८ जागा लढविण्याचे ठरविले होते.त्यामुळे २०१४ ला वेगवेगळे लढलेले पक्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आले होते.
                           २३ मार्च २०१९ ला स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडी यांनी एमआयएम पक्ष आणि भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने,धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी एकत्र येऊन लोकसभेच्या ४८ जागा लढविल्या होत्या.कोणत्याही पक्षाला निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका पोचविण्यासाठी बोलणारी इतर वक्ते आणि प्रचारक असावे लागतात.लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमचे असूउद्दीन ओवीसी आणि इम्तियाज जलील तसेच भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर असे लोक होते.त्यामुळे ४८ लोकसभा मतदार संघात एक खासदार आणि चाळीस लाख मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती.परंतु ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही कारण साधन सामुग्रीचा प्रश्न निर्माण झालेला होता.संसाधन साधने कमी पडली होती आणि त्याची पूर्तता वंचित बहुजन आघाडी करू शकत नाही याची जाण वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांना झालेली होती.त्याबाबतची भूमिका पक्षाचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे समोर त्यांनी मांडलेली होती अशा चर्चा नंतरच्या काळात समोर आलेल्या होत्या.
                            महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी पक्षाकडे तशी टीम असावी लागते यंत्रणा असावी लागते.परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून गेल्या ७० वर्षात काम करणाऱ्या पक्षांना आजपर्यंत २८८ जागा तेवढ्या ताकदीने लढविता आल्या नाहीत.आदरणीय प्रकाश आंबेडकर हे गेल्या ३५ ते ३७ वर्षापासून राजकारणात आहेत.दोन तीन वेळा ते खासदार राहिलेले आहेत.त्यामुळे संसदीय राजकारणाचा त्यांना चांगला अभ्यास आहे.ह्या सर्व राष्ट्रीय पक्षाचा २८८ विधानसभा मतदार संघातील घडामोडी त्यानी अनुभवलेल्या आहेत.पक्षाचा एक नेता सर्व भूमिका पार पाडू शकत नाही.वंचित बहुजन आघाडीकडे आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर त्या प्रमाणात २८८ मतदार संघात पक्षाची भूमिका मतदार यांचे पर्यंत पोहाविणारे दुसरे कोणीही नव्हते.प्रकाश आंबेडकर सोडले तर प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते.कारण त्यांच्याकडे कोळसे पाटील नव्हते,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने नव्हते ,धनगर नेते गोपीचंद पडळकर नव्हते,२६१ संघटना नव्हत्या आणि विशेष करून त्यांच्याकडे एमआयएम सुध्दा नव्हती.मग एवढी मोठी २८८ विधानसभेची यंत्रणा राबविण्यास आणि तेही १२ दिवसात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना शक्य नव्हते याची जाण त्यांना होती व आहे.असे असताना २८८ विधासभेच्या जागा स्वबळावर लढविण्याची ताठर भूमिका आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी का…..? घेतली कोणतीही तडजोडीची भूमिका का स्वीकारली नाही असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
                                 २८८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे कोणती यंत्रणा होती.पक्षाची भूमिका आणि पक्षाचा जाहीरनामा कितीही चांगला असला तरी तो मतदार यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संसाधन साधने कोणती होती.पक्षाची भूमिका १२ दिवसात मतदार यांचे समोर पोहचविण्यासाठी कोणते नेते होते….? एकंदरीत पाहिले तर स्वत: आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर कोणतेही परिचयाचे चेहेरे किंवा नेते भूमिका मांडायला नव्हते.म्हणजे २८८ विधानसभेच्या जागा लढविण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम नव्हती.मग असे असताना वंचितांचा लढा यशस्वी करण्यासठी तडजोड करण्याची भूमिका आवश्यक होती.मग तडजोडीचे मार्ग भरपूर होते.त्या मार्गाचे अवलंबन करणे गरजेचे होते त्या तडजोडीत विधानसभेच्या ४० जागा लढविल्या असत्या तर त्यातील ५ जागा नक्कीच निवडून आल्या असत्या आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका विधानसभेत मांडता आली असती..रस्त्यावरच्या लढाई बरोबर संसदीय पटलावर भूमिका मांडणे गरजेचे असते तेव्हाच वंचितांना न्याय मिळेल.मी भूमिका फार मोठी मांडलेली आहे.परंतु जे दिसतय त्यावर मी बोललो माझे मत मांडले.जे आभ्यासलेले आणि जे दिसले ते मांडले आहे.त्यामुळे २८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..!

1 comment:

  1. तुमचं बरोबर आहे छान वाडल वाचून��������

    ReplyDelete