सर्वत्र
पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असतांना वाशिम जिल्हयातील आदिवासी
कोळद-यात मात्र खळखळ पाणी वाहते आहे. जलस्वराज्यमार्फत करण्यात आलेल्या
नियोजनाने येथील पाणीपुरवठा योजना अंखड कार्यरत आहे. विहिरीसुध्दा कासराभद
अंतरावर तुडुंब भरलेल्या आहेत.
वाशिम, अकोला जिल्हयाच्या सीमेवर वसलेले आणि मालेगावपासून 20 किलोमीटर
अंतरावर लहानशा कोळदरा गावाची संपूर्ण आदिवासी लोकवस्तीची वाडी डोंगराळ
भागात द-याखो-यात वसलेली आहे. तत्कालीन सरपंच आत्माराम होंडे कार्यरत
असतांना शासनातर्फे जलस्वराज्य योजना सुमारे सहा वर्षापूर्वी सुरु करण्यात
आली. या योजनेकरिता 22 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला होता. या योजनेचे काम
दर्जेदार करुन गावक-यांनी तेव्हा शासनाला यामधून शिल्लक राहिलेले 3 लाख 15
हजार रुपये परत केले. तब्बल तीन वर्षापासून जलस्वराज्यची ही योजना अखंडपणे
कार्यरत आहे. या योजनेकरिता कामावर असणा-या व्यक्तीला 1 हजार 500 रुपये
प्रतिमाह मानधन दिले जाते. तसेच समस्त गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रमुख
प्रत्येक महिन्याला ठरल्याप्रमाणे 40 रुपये पाणीपट्टी जमा करतात.
सकाळ आणि सायंकाळी दोनवेळ नळाचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होते. प्रत्येक
नळाला तोटया असून ग्रामस्थ पाण्याचा अपव्यय कटाक्षाने टाळतात. त्याचप्रमाणे
सर्वत्र पाण्याची बोंबाबोंब असताना कोळद-यात पिण्याच्या पाण्याच्या
विहिरीत तुडुंब पाणी भरलेले दिसून येते. कासराभर दोरावर पाणी काढता येते.
या गावाला निर्मलग्राम पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे.
जलस्वराज्य योजना समिती आणि ग्रामपंचायतची पदाधिकारी मंडळी यामध्ये
वेगळेपणा राखून या योजनेत राजकारण येऊ दिले नाही. या जलस्वराज्य समितीचे
अध्यक्ष गजानन अंभोरे, सचिव आत्माराम हांडे असून 22 जणांची समिती आहे.
विशेष म्हणजे या समितीत महिलांना तसेच महिला बचत गटानाही समाविष्ट केले
आहे. योजनेच्या विद्युत विलाचा भरणाही नियमित केला जातो.
सरपंच आत्माराम हांडे यांच्या कार्यकाळात गावात झालेल्या सिमेंट रस्त्याला
जवळपास सात ते आठ वर्ष उलटली असून अद्यापही सिमेंट रस्ते मजबूत अवस्थेत
आहेत. कुठेही साधी रेती सुध्दा उखडलेली दिसत नाही. कोळदरा ग्रामस्थांनी
शासनाच्या योजनांची या भागात चांगल्याप्रकारे निर्मिती करुन त्याचा
नियोजनातून उपयोग करुन घेत विकास साधला असल्याचे चित्र दुर्मिळच आहे.
No comments:
Post a Comment