Thursday, January 17, 2013

सूर्या कालवा तीरी श्रमदानाने 'पाट' वाहती

नागरिक बऱ्याचदा शासकीय योजनांच्या हक्काबद्दल, अधिकाराबद्दल बोलताना दिसतात. परंतु, हक्काबरोबर येणारी कर्तव्ये पार पाडताना मात्र बहुतेक लोक दूर असतात. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वधना येथील गावकरी व शेतकरी मात्र याला अपवाद ठरले आहेत. सिंचनासाठी हक्काच्या पाण्याची मागणी करतानाच, स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमदान करून कालव्यातील गाळ काढला आहे. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे पाट त्यांच्या शेतापर्यंत पोहोचले आहेत.

सिंचन शाखा क्रमांक 3 अंतर्गत असलेल्या सूर्या उजवा तीर कालव्यावरील सिंचन क्षेत्रामध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, निधीअभावी कालव्यामधील गवत व गाळ मात्र काढता येत नव्हता. त्यामुळे सोडलेल्या पाण्याचा लाभ लाभधारकांना होत नव्हता. गाळ न काढल्यामुळे पाटातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्य होत होते. शेवटी सिंचन शाखा क्र. 3, सूर्यानगरचे शाखा अधिकारी श्री. प्र. गो. संखे यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन निधीची समस्या व वस्तुस्थिती समजावून सांगितली.

त्यानंतर लघुपाट क्र. 8 वरील मौजे वधना येथील सडकपाडा व लिंगपाडा येथील लाभधारक शेतकऱ्यांनी श्रमदानाची तयारी दर्शवली. दोन्ही पाड्यावरील सर्व गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी दोन जेसीबी लावले. त्यासाठीचा खर्च वर्गणी काढून गोळा केला. त्याबरोबरच स्वतः दोन दिवस श्रमदान केले. 30 पुरूष व 20 स्त्रियांनी श्रमदानामध्ये सहभाग घेतला. जवळपास 1400 मीटर लांबीच्या लघुपाट क्रमांक 8 मधील गवत व गाळ त्यांनी काढला. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ त्यांना मिळाला आहे. या श्रमदानासाठी शाखा अधिकारी श्री. प्र. गो. संखे यांच्यासह सिंचन शाखा क्र. 3 च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. शाखा क्र. 3 व गावकऱ्यांचे या कामाबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे.

डॉ. संभाजी खराट

No comments:

Post a Comment