गोंदिया
तालुक्यातील कवलेवाडा नावाचं गाव. संघटन शक्तीचं महत्व गावातील महिलांना
कळलं आणि गावात तब्बल 32 बचतगट स्थापन झाले. महिलांना बचतीचं महत्व पटवून
देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला आर्थिक विकास
महामंडळानं गावात 8 बचतगटाची स्थापना केली.
धम्मगिरी स्वयं सहाय्यता महिला गट हा सुद्धा माविमच्या मार्गदर्शनामुळे 11
महिलांनी एकत्र येऊन स्थापन केला. या धम्मगिरी बचतगटाच्या सदस्य असलेल्या
देवकाबाई खोब्रागडे ह्या एक. बचतगटात येण्यापूर्वी देवकाबाई मोलमजुरीचे काम
करायच्या. पदरमोड करुन देवकाबाई पैसे बचतगटाच्या सदस्य झाल्यामुळे जमा करु
लागल्या.
बचतगटातील महिला नियमीत बचत करु लागल्याने माविमने बचतगट सदस्यांना अंतर्गत
कर्ज व्यवहार व बँक लिंकेजचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणामुळे
त्यांच्यामध्ये आपण उद्योग/व्यवसाय उभारु शकतो हा आत्मविश्वास निर्माण
झाला. देवकाबाईने चहा नाश्ता व किराणा दुकान थाटण्यासाठी माविम
सहयोगिनीच्या मार्गदर्शनातून बचतगटातून 12 हजार रुपये कर्ज घेतले.
महिन्याकाठी देवकाबाईला या दुकानातून 1200 रुपये नफा मिळू लागला. घेतलेल्या
कर्जाची परतफेड वेळीच केली.
धम्मगिरी बचतगटाने बँकेकडून पुन्हा 50 हजार रुपये कर्ज घेतले. त्यापैकी
देवकाबाईने 5 हजार रुपये कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जाचा विनियोग कोंबडी
पालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी केला. या व्यवसायातून त्यांना 4 हजार
रुपयांचा नफा मिळाला.
देवकाबाईने चहा नाश्ता, किराणा दुकान व कोंबडी पालनाचा सहउद्योग सुरु
केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. देवकाबाई अर्थोत्पादनात मदत करु
लागली त्यामुळे कुटुंबातील सदस्य सुद्धा देवकाबाईवर खुष होते. कमी
गुंतवणूकीत चांगला नफा मिळाल्यामुळे हाच व्यवसाय मोठ्या स्वरुपात सुरु
करण्याचे देवकाबाईने ठरविले.
No comments:
Post a Comment