Thursday, January 17, 2013

स्वयंसहाय्यता बचत गट महिला सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाची प्रक्रिया ख-या अर्थाने ग्रामिण भागामध्ये सुरु झाली. त्यामध्ये महिलांचे योगदान फार मोठे आहे. महिलांना सक्षम बनविणे, विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन येणे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वयंसहाय्यता बचत गट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक फार मोठे प्रभावी साधन म्हणून आज पुढे आलेले आहे. बचत गटांची संकल्पना ख-या अर्थाने डॉ. महंमद युनिस यांनी बांगला देशामध्ये राबविली असून ग्रामीण बँक म्हणून महिलांची जगातील सर्वात मोठी बँक म्हणून ही चळवळ उदयास आलेली आहे.


भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविण्यात आल्या. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू व महाराष्ट्र या राज्यात बचत गटाची संकल्पना प्रत्यक्षात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली. दि. 1 एप्रिल 1999 पासून संपूर्ण देशात स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटाची संकल्पना राबविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या प्रगत जिल्हा असला तरी या जिल्ह्यामध्ये 2002 च्या गणनेप्रमाणे 98,696 कुटूंंबे दारिद्रयरेषेखालील असून एकूण ग्रामीण कुटुंबाशी हे प्रमाण 17.60 टक्के येते. स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 1999 पासून जिल्ह्यामध्ये 11935 स्वयंसहाय्यता बचत गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 10,110 महिलांचे गट अस्तित्वात आहेत. जिल्ह्यातील 7,144 बचत गटांचे पहिले गे्रडेशन पूर्ण झाले असून त्यापैकी, 3,536 गटांना खेळते भांडवल बचत गटांना विविध व्यवसायाकरिता अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन दिलेले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यांतील बचत गटांचा प्रमुख व्यवसाय दुग्धजन्य पदार्थ,खाद्य पदार्थ बनविणे, केरसुणी तयार करणे, वॉलपिस तयार करणे, चांदीचे दागिने तयार करणे, रेडिमेड कपडे तसेच विविध प्रकारचे मसाले तयार करणे आदी व्यवसाय बचत गटामार्फत केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन 2001 मध्ये महिला स्वयंसहायता बचत गट योजने अंतर्गत गरजू महिलांसाठी दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील बचत गट तयार करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 36,217 दारिद्रयरेषेवरील महिलांचे बचत गट स्थापन झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाबार्ड, पाणलोट विकास कार्यक्रम, जलस्वराज्य, हरियाली प्रकल्प आणि तेजस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगट बँकेशी जोडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी बॅंका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बचत गटाच्या चळवळीमध्ये पुढाकार घेऊन 27,818 बचत गट स्थापन केले आहेत. त्यामध्ये दारिद्रयरेषेखालील 3,536 व दारिद्रयरेषेवरील 24,282 गट आहेत. जिल्हा बँकेकडील बचतगटांची बचत 169 कोटी 59 लाख एवढी असून या गटांचाअंतर्गत कर्ज व्यवहार 158 कोटी 25 लाख एवढा आहे. जिल्हा बँकेकडून 24,302 बचतगटांना 40 कोटी 35 लाखाचे कर्ज मंजूर केलेले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील बचतगटांचा आढावा घेण्यात येत असून जे बचतगट बंद आहेत. ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच गाव पातळीवर सर्व गटांच्या एकत्रित माहितीचा डाटाबेस घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये बचतगटांचे ग्रामसेवा संघ स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे. आतापर्यत 136 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सेवासंघ गठीत करण्यात आलेले आहेत. टप्याटप्याने ग्राम सेवासंघ, तालुका व जिल्हा सेवासंघ गठीत करण्यात येणार आहेत.

बचतगटांच्या उत्पादनास बाजारपेठ

बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजापेठ मिळावी म्हणून शासनाच्या योजनेतर्गत विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यात, विभागीय स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात प्रदर्शनाव्दारे तसेच आठवडा बाजार, ग्रामीण बाजारहाट इ. ठिकाणी महिला बचतगटांच्या उत्पादनास विक्रिसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय शासकीय कार्यालयांना लागणा-या वस्तू महिला बचतगटांकडून घेण्याचे शासनाचे धोरण असून बचतगटांकडून कॅटरिंग सेवादेखील शासकीय कार्यालयांमध्ये प्राधान्याने सुरु करण्याचा विचार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बचत गटांच्या वस्तूंसाठी जिल्हा मॉल बांधण्याची संकल्पना विचाराधीन असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 कोटी 50 लाख खर्चाचे जिल्हा मॉल प्रस्तावीत आहेत. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या मॉलचे काम लवकरच सूरु करण्यात येत आहे.

तालुकास्तरीय विक्री केंद्र - प्रशिक्षण व्यवस्था

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक विक्री केंद्र असावे असे शासनाचे धोरण असून कोल्हापूर जिल्ह्यांतील 12 तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय विक्री केंद्रे मंजूर झाली असून त्यांची बांधकामेही सूरु आहेत. अनेक गावांमध्ये शासनाच्या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेखाली महिलांसाठी बहुउद्देशिय सभागृह तसेच बाजारगाळ्यांचे काम यापूर्वी करण्यात आलेले आहे. त्याठिकाणीदेखील बचतगटांना प्राधान्याने वस्तू विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बचतगटांच्या वस्तूंना चांगली मागणी यावी, यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगले ग्रेडेशन व उत्कृष्ट पॅकींग करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी ब्रॅन्ड बचतगट उत्पादनासाठी निश्चित करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बचतगटांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन विकास योजनेमध्ये हातभार लावलेला आहे. त्यामध्ये शालेय पोषण आहार, आरोग्य तपासणी, पल्स पोलीओ यासारख्या कार्यक्रमांचा उल्लेख्र करता येईल. अलिकडेच कुपोषणमुक्त अभियानाचा धडक कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सूरु आहे. यामध्ये महिला बचतगटांनी पुढाकार घेतलेला आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात नर्सरी लागवड व व्यवस्थापन तसेच वृक्षांचे संवर्धन ही कामे पण बचतगटांसाठी उपलब्ध आहेत. पारंपारिक दुग्ध व्यवसायाव्यतिरिक्त दुधापासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण बचत गटांना दिले जात आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होत आहे. जिल्ह्यामध्ये महिला बचतगटांनी सामुहिक शेतीची संकल्पना राबविली असून त्यामध्ये भाजीपाला लागवड, भात, सूर्यफूल लागवड, आदि कामासाठीही महिलागटांनी भाग घेतला होता. कोल्हापूर जिल्हा परिषद, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराची अनेक प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत असून भविष्यकाळात महिलांच्या हाताला काम व आर्थिक स्वावलंबनाची प्रक्रिया निश्चितपणे गतीमान होणार असून ताराराणीच्या या जिल्ह्यामध्ये अनेक ताराराणी पुन्हा उदयास येतील यादृष्टीने जिल्ह्याची वाटचाल सुरु आहे.


पी. बी. पाटील, प्रकल्प संचालक,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर.

No comments:

Post a Comment