राज्यातील
पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृष्य परिस्थिती विचारात
घेता जलसंवर्धनाच्या कार्यक्रमास अनन्य साधारण महत्व आहे. त्यादृष्टीने
राज्यातील पडिक जमिन विकास, पाण्याच्या उपलब्धतेकरिता, जलसंधारणाचे महत्व
लक्षात घेऊन पाणलोट विकासावर आधारित पाणलोट विकासाचा कार्यक्रम राज्यात
विविध राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येतो.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पर्जन्यधारित क्षेत्र प्राधिकरणाद्वारे ग्रामिण
मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागामार्फत महत्वाकांक्षी असा एकात्मिक पाणलोट
व्यवस्थापन कार्यक्रम सन 2009 पासून कार्यान्वित केला आहे. या
महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत गेल्या 3 वर्षामध्ये राज्यात 35.41 लाख
हेक्टर क्षेत्र उपचारित करण्यासाठी 828 प्रकल्प मंजूर करण्यात आले असून
त्यांचा एकूण प्रकल्प आराखडा रुपये 4473.03 कोटी रकमेचा आहे. सध्या हा
प्रकल्प राज्यातील 6238 ग्रामपंचायतीमधील 7880 गावामध्ये राबविण्यात येत
आहे. मंजूर प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण होणे बंधनकारक असल्याने ते पूर्ण
करण्यासाठी सर्व स्तरावर यथोचित प्रयत्न होणे आवश्यक आहे.
पाणलोट विकास कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात लोकसहभाग घेणे,
पाणलोटांच्या निरनिराळ्या कामांची देखभाल लोकसहभागातून करणे, उपलब्ध
होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे
यासाठी जलसंधारण कार्यक्रमाचे विशेष महत्व आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन
कार्यक्रमाच्या खर्चाच्या प्रगतीचा वेग वाढविणे, पाणलोट विषयक कामे
जनमाणसांत रुढ करणे, त्याचप्रमाणे योजनेतील लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी
व्यापक चळवळ निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियानाची घोषणा केली आहे.
भारताने दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना स्वीकारुन अंगीकृत
केली, त्या दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर 2012 पासून ते डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत अर्थात दिनांक 6
डिसेंबर 2012 या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील
जलसंपदा विकसीत करण्यामधील योगदानाची जाणीव ठेवण्याच्या दृष्टीने या
अभियानास " डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम
जनजागृती अभियान " असे समर्पक नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाला ग्रामस्थांमध्ये व्यापक प्रसिध्दी
देणे. जल, भूमि व इतर नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये
आस्था निर्माण करणे, जलसंधारण कामांना अधिक गती देणे, पाणलोट विकासाच्या
विविध कामांसाठी जनजागृतीव्दारे अधिक लोकसहभाग घेणे, पाणलोट विकास
कार्यक्रमांतर्गत निर्माण केलेल्या विविध उपक्रमांचे जतन करण्यासाठी
जनमानसात जाणीव जागृती करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करुन कृषि उत्पन्न व
उत्पादन वाढविण्यासाठी चालना देणे, ग्रामिण कारागीर, मत्ताहीन व्यक्ती
यांना स्वयंरोजगाराच्या संधीबाबत माहिती देणे, सुक्ष्म उद्योजकता कृषि
उत्पादन वाढ याबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे, पिण्याच्या पाण्याची समस्या
सोडविणे असे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहेत.
या अभियानांतर्गत जिल्हा / तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करणे, जल
साक्षरता मोहीम सुरु करणे, प्रेरक प्रवेश उपक्रमांच्या लोकप्रतिनिधींच्या
हस्ते उद्घाटन करणे, शालेय विद्यार्थ्यांचा पाणलोट व्यवस्थापन व संलग्न
विषयावर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच
ग्रामस्थांना माहितीसाठी सभेचे/मेळाव्याचे आयोजन करणे.असे प्रमुख कार्यक्रम
राबविण्यात येणार आहेत.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याकरिता स्वतंत्र संस्थात्मक
रचना तयार करण्यात आली आहे. गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली
ग्रामपंचायतीची उपसमिती म्हणून पाणलोट समिती कार्यरत आहे. सदर समितीमार्फत
जलसंधारणाची कामे करण्यात येतात.
एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी कोरडवाहू क्षेत्राची व्याप्ती, दारिद्र्य
निर्देशांक, अत्यल्प भूधारकांचे प्रमाण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,
जमिनीची धूप होण्याचे प्रमाण या गोष्टी विचारात घेऊन केंद्र शासनामार्फत
पाणलोट कार्यक्रमास मंजुरी देण्यात येते. पाणलोटातील समाविष्ट गावांच्या
प्रस्तावित उपचारात क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. 15,000/- निधी उपलब्ध
केला जातो. एकूण प्रकल्प रक्कमेच्या 90 टक्के निधी केंद्र शासनामार्फत व 10
टक्के निधी राज्य शासनामार्फत दिला जातो.
या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यातील 34 प्रकल्प मंजुर
झाले असून त्यांचा एकूण प्रकल्प आराखडा 214.46 कोटी रक्कमेचा आहे. तसेच सन
2012-13 करिता 181 गावांमधील 0.89 लाख हेक्टर क्षेत्र उपचारीत करण्यासाठी
रु. 132.14 कोटी रक्कमेचा प्रकल्प आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर
जिल्ह्यामध्ये सन 2009-10 ते 2012-13 या सालापर्यंत 10 तालुक्यांमध्ये 55
प्रकल्प मंजूर झाले असून त्यामध्ये 619 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत सन 2009-10 सालामध्ये भुदरगड,
पन्हाळा, शाहुवाडी या तालुक्यांमधील 129 गावांमध्ये 43973 हेक्टर इतके
उपचारीत क्षेत्र करण्यात आले आहे.सन 2010-11 या साली पन्हाळा, राधानगरी,
आजरा या तालुक्यांमधील 83 गावांमध्ये 34387 हेक्टर इतके उपचारीत क्षेत्र
करण्यात आले आहे. सन 2011-12 सालामध्ये हातकणंगले, गडहिंग्लज, राधानगरी,
आजरा, चंदगड या तालुक्यांमधील 166 गावांमध्ये 58525 हेक्टर इतके उपचारीत
क्षेत्र करण्यात आले आहे. असे एकूण सन 2009-10 पासून ते सन 2011-12 या
सालापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 378 गावांमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन
प्रकल्पांतर्गत 136885 हेक्टर इतके उपचारीत क्षेत्र करण्यात आले आहे.
विभागीय माहिती कार्यालय,
कोल्हापूर.
No comments:
Post a Comment