Monday, August 14, 2017

माझ्या मराठा बांधवानो आरक्षण म्हणजे एक गाजर...एक राजकारण....!





तुम्ही जरा मी दिलेली आरक्षणाची टक्केवारी वाचली आणि समजाऊन घेतली की,तुमच्या लक्षात येईल आरक्षणाच्या माध्यमातून मराठा तरुणांच्या भावनांचे कसे राजकीय भांडवल केले जात आहे...!
आरक्षण किती वाईट आहे हे सांगण्या साठी सकल समाज एकवटल्याचे जाणवले आरक्षणा मुळे कशा प्रकारे 90% वाला भाऊ घरी आहे हे सांगितले जात आहे.आमच्या देशाची जी काही अधोगति झाली ती फक्त आणि फक्त आरक्षणा मुळेच झाली अस फायनल समीकरण काढले काढले गेले आहे.बर हे आरक्षण आहे तरी किती....? ते का भेटत आहे याचा विचार कोणी करत नाही.
आला मेसेज केला फॉरवर्ड....वाईट आहे म्हणजे आहे बस विषय संपला.थोड़फार सरकारी नोकऱ्यांकडे पाहिल तर महाराष्ट्रात किती सरकारी नोकऱ्या आहेत....? याचा विचार केला जात नाही.MPSC जी जवळ पास सगळ्यांना परिचीत असणारी संस्था आहे जी दरवर्षी जागा काढ़ते.
बर यात जागा किती निघतात....? हे कोणी पहात नाही.
   आता सेल्स टॅक्स च्या जागा आल्या. टोटल 62 जागा त्यात SC ला किती असतील...? फक्त 1 जागा.ओबीसी ला किती.....?त्यांना 2 जागा,आणि ओपन ला जागा किती....? त्यांना 37 जागा आहेत.मग इथे त्या 1 जागेसाठी कोण्या ओपन कॅटेगरी वाल्या पोराचे नुकसान झाल का........?

2014 ला उपजिल्हाधिकाऱ्याच्या 44 जागा आलेल्या. त्यापैकी ओपन ला 21, SC ला 3 आणि ओबीसी ला 7 जागा मग इथे 3 जागांमुळे कोणता 90% वाला स्कॉलर अडून राहिला का......?

भूमिलेख उपअधीक्षक साठी एकूण 19 जागा त्यातल्या ओपन ला 13 जागा. SC ला 1 आणि ओबीसी ना झीरो
आता कर सहाय्यक ची मोठी जाहिरात आली एकूण 450 जागा आहेत.त्यात एकट्या ओपन साठी 250 जागा आहेत. SC ला 56 आणि ओबीसी ला 80 आणि भटक्या विमुक्तांसाठी 8 आणि 5 अशा जागा आहेत.
एकट्या MPSC ने 2014 या वर्षात एकूण 668 जागा काढल्या त्यात SC ला सगळ्या मिळून 70 जागा सुद्धा न्हवत्या.
मग 70 जागांमुळे तुमचे किती 90% वाले घरी बसले.....?
बर हे झाल MPSC च बाकीच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये यापेक्षा वेगळ चित्र नाही.आता हे महाराष्ट्रा पुरते झाले. देश पातळीवर वर पण हेच आहे. भारतातील सरकारी बँकांसाठी IBPS नावाची संस्था सामूहिक परीक्षा घेते. यावेळी एकूण 8822 जागा आहेत त्यापैकी 4500 जागा ओपन ला SC ला 1338 आणि ST ला 600 जागा आहेत.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पण हेच आहे.
2014 ला बॅंकेच्या लिपिक पदासाठी 3500 जागांपैकी ओपन ला 1500 जागा आणि SC ला 300 जागा.इथे तर सगळ्यांसाठी कटऑफ एकच आहे.
*******
एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्या सरकारी नोकऱ्या पकडून 1500 च्या पुढे पण जागा निघत नाहीत. या 1500 पैकी SC ला जास्तीत जास्त 100 जागा असतील.
मग या शंभर लोकांमुळे देशाचे नुकसान झाल का…..?
या 100 पोरांमुळे किती 90% वाले घरी बसले आहेत? तुमच्या अधोगतिला या 100 जागा कारणीभूत आहेत का……….?
आरक्षणाचा गैरफायदा कसा होतो नेमका………?
गैरफायदा होत असता तर एकपण ओपन वाला सिलेक्ट झाला नसता. सगळे SC, ST, OBC आज सरकारी नोकऱ्यांमध्ये घुसले असते.
आम्ही आमच्या राखीव 100 जागांमध्ये लढत आहेत. तुम्ही तुमच्या 1000 जागांमध्ये लढा. साधा विषय आहे याचा एवढा मोठा इशू करण्याच कारण नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात SC मध्ये एकूण 59 जाती येतात ST मध्ये 47 VJ मध्ये 14 आणि ओबीसी मध्ये 346 जाती येतात.
आता विचार करा त्या सेल्स टॅक्स इंस्पेक्टर च्या 1 जागेसाठी 59 जाती लढत आहेत.
त्या 2 जागेसाठी ओबीसी च्या 346 जाती लढत आहेत, किती जीव घेण कॉम्पिटेशन आहे. आणि तुम्ही आम्हाला अगदी सहज फुकटे म्हणुन हिनवता".
आता ज़रा प्राइवेट कंपन्यांकडे पाहिले तर दिसून येईल की तिथे महिन्याला लाखो जागा उपलब्ध असतात.
यावर्षी सरकारने 60 लाख रोजगार उपलब्ध करणार असल्याच जाहिर केले आणि भारतातल्या IT, Finance, Engineering या क्षेत्रात प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत. इथे कोणतच आरक्षण उपलब्ध नसते. इथे फक्त आणि फक्त मार्क्स च्या जोरावर पोरं लाखोचे पैकेजेस घेतात.
मग तुमच दुखन नेमकं कोनते आहे…….?
100 जागांमुळे सगळा देश अधोगतीला जातो का…….?
"मुळात आरक्षण हे मागास लोकांना विविध क्षेत्रात प्रतिनिधी स्वरुपात पाठवन्याची व्यवस्था आहे". आरक्षण म्हणजे एक मार्ग आहे खैरात नाही.
कोणी SC, ST वाला दिवसरात्र झोपा काढून कलेक्टर होत नाही त्याला पण मेहनत करावी लागते.
आता परिक्षांसाठी सर्वांना सामान फी असावी ही मागणी योग्य आहे. SC ला 100 तर ओपन ला पण 100 ठेवली तर काही बिघड़नार नाही.
पण काही हुशार लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते सरसकट SC,ST ला 600 रूपये फी करा. म्हणजे किती उदात्त विचार आहेत यांचे.

Thursday, July 13, 2017

शेतकर्‍यांच्या मुलांच्या रखडलेल्या लग्नांचा प्रश्न गंभीर -हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे

सर्वेक्षण अहवाल निष्कर्ष 

शेतकर्‍यांच्या मुलांच्या रखडलेल्या लग्नांचा प्रश्न गंभीर 

सर्वेक्षणात ४५ गावात ३०६८ लग्न न झालेली तरुण मुल

 शेतकरी आंदोलन,शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरावस्था झाल्यान  शेतकरी कुटुंबात किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे एक भयावह वास्तव एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.       हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात ४५ गावात लग्न रखडलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले तेव्हा ४५ गावात लग्न रखडलेली ३०६८ तरुण मुले आढळली.त्यात ७७४ तरुण मुलांची वये ३० ते ४० च्या दरम्यान आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने व शेतीव्यवसाय उध्वस्त होण्याचा परिणाम शेतकर्‍याची कुटुंबसंस्थाच उध्वस्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे वास्तव या सर्वेक्षणाने पुढे आले आहे. विशेष म्हणजे यात सर्व जातीचे शेतकरी आहेत. या सर्वेक्षणाला पूरक म्हणून शेवगाव(पुणे) पुणे व सोलापूर जिल्ह्यातील १० गावांची पाहणी केली असता तिथेही तेच चित्र दिसले.याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक संखेने हेच वास्तव असल्याचे पुढे आले आहे.

            शेतकरी आंदोलन मागील महिन्यात सुरू झाल्यावर शेतकरी कार्यकर्ते रोहिदास धुमाळ यांनी हेरंब कुलकर्णी यांना हा प्रश्न लक्षात आणून देवून काही गावात नेवून हा प्रश्न दाखविला. सुरवातीला यावर विश्वास बसला नाही तेव्हा अकोले व संगमनेर तालुक्यात . हेरंब कुलकर्णी व विठ्ठलराव शेवाळे  यांनी ४५ गावात सर्वेक्षण केले . तेव्हा २५ ते ३० वयोगटातील २२९४ तरुण मुले व ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुण मुले आढळली. यातील बहुसंख्य मुले अल्पभूधारक असून शिक्षणही चांगले आहे. अनेकजण पदवीधरक आहेत. ४ मुले एम.बी.ए. झालेली असून बेकार असल्याने व शेती करीत असल्याने लग्न रखडले आहे. ३० वयोगट उलटलेल्यांनी तर आता लग्नाची आशा सोडून दिली आहे. दोन मोठ्या गावात तर  ३०० व २५० मुले सापडली तर १०० पेक्षा जास्त मुले आढळलेलीही १२ गावे आहेत. ५० पेक्षा जास्त मुले असलेली ८ गावे आहेत. केवळ अल्पभूधारक च नव्हे तर अगदी १० एकर जमीन असलेल्या कुटुंबात ही लग्न होत नसल्याचे दिसून आले.  एका कुटुंबात तर ६० गुंठे जमीन असल्याने ३ मुलांची लग्न रखडल्याचे भीषण वास्तव दिसल्याचे हेरंब कुलकर्णी व विठ्ठल शेवाळे यांनी सांगितले.  
           गावकर्‍यांशी बोलल्यावर हे वास्तव गेल्या ४ वर्षात अधिक गडद झाल्याचे त्यांनी सांगितले.सर्व जातीतील मुले यात असल्याने आता शेतकरी हीच एक जात असल्याचे लक्षात आले.लग्न रखडण्याची अनेक कारणे या सर्वेक्षणातून पुढे आली. त्यात २०१२ च्या दुष्काळ व त्यानंतर सतत भाव पडण्याची प्रक्रिया,वाढलेला उत्पादन खर्च यातून शेतीवर जगणे अधिक कठीण झाले.परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला अजिबात शेतकरी कुटुंबात द्यायचे नाही या निष्कर्षावर आले आहेत. मुलीही माहेरी बघितलेले शेतीचे हे भयावह वास्तव व त्यात करावे लागणारे जनावारासारखे कष्ट यामुळे लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत. पूर्वी मुली वडिलांच्या पुढे निर्णयात जात नसत पण एकूणच मुलींची संख्या कमी झाल्याने मुलींना मागणी वाढली.त्यात ८ वीपर्यंत नापासी नाही व बोर्डाच्या सोप्या परीक्षा गेल्या १० वर्षात गावोगावी झालेले ज्युनिअर कॉलेज, बालविवाह थांबविण्याची झालेली चळवळ व जागृती यामुळे मुली सहज आज १२ वी पर्यन्त शिकू लागल्या. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची तयार झालेली आकांक्षा,शहरी महिलांशी होणारी तुलना, यातून व्यक्तिमत्व विकासाची व चांगल्या जीवनशैलीची आस तयार झाली त्यामुळे शिकलेल्या मुली नोकरदार व शहर याला प्राधान्य देवू लागल्या व त्यातून हे वास्तव तयार झाले.
         एक शेतकरी म्हणाला की आज खेड्यात १० एकर असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चे दुकान असले तर लवकर लग्न होते. त्यातून अनेक गावात लग्नाच्या मुलांना सहकारी संस्थात लग्न होईपर्यंत नोकरीला ठेवा अशी गळ घालणारे कार्यकर्ते आहेत तर अनेक तरुण सिन्नर,चाकण येथील कारखान्यात लग्न जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत. एका कुटुंबात नोकरी करणार्‍या धाकट्या मुलाचे लग्न झाले व मोठ्या मुलाचे लग्न राहिले अशी विषण्ण स्थिति बघण्यात आली. यावर्षी झालेल्या लग्नात शेतकरी मुलांची किती लग्न झाली ? असा नेमका प्रश्न विचारला तेव्हा ती संख्या जवळपास नाही अशीच आढळली. एका गावात एकूण २७ लग्न यावर्षी झाली त्यात फक्त २ लग्न झाली व तीही नात्यातील होती. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे यांनी सांगितले की मी दरवर्षी १०० लग्ने कित्येक वर्षे जमवली आहेत पण गेल्या ३ वर्षात एकही लग्न मी जमवू शकलो नाही. या तीन वर्षात एकाही मुलीचा बाप माझ्याकडे आला नाही पण मुलाचे बाप मात्र विचारात आहेत.
महाराष्ट्रात इतरत्र चित्र कसे आहे ?हे बघण्यासाठी काही मित्रांना विनंती केली तेव्हा सोलापूरजिल्ह्यातील सतीश करंडे (४ गावे )पुणे जिल्ह्यातील विठ्ठल पांडे(४गावे) व शेवगावचे उमेश घेवरीकर (२ गावे) यांनी पाहणी केली.तेव्हा या १० गावात ३१९ मुलांची लग्न रखडल्याचे आढळले. महाराष्ट्राच्या जिल्हया जिल्ह्यात पाहणी केल्यास हेच वास्तव असल्याचे  आढळले. 
       या शेतकरी अगतिकतेतून अनेक विधायक व विघातक गोष्टी घडत आहेत. विधायक बाबीत मुलीच्या बापाचे लग्नातील शोषण कमी होत आहे.हुंडा प्रथा कमी होते आहे .अनेक ठिकाणी मुलाकडच्यांनी लग्न करून मुली लग्न करून आणल्या आहेत.विधवा व परित्यक्ता,अनाथ आश्रमातील मुली यांच्याशी लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे. नाशिक,यवतमाळ ,ठाणे या भागातील आदिवासी भागातील मुलींशी आंतरजातीय विवाह करण्याचेही अल्प पण लक्षणीय उदाहरणे आढळली हे सकारात्मक पैलू आहेत तर अडलेल्या शेतकर्‍यांचा गैरफायदा घेणारे एजंटही निर्माण झाले आहेत. अगदी मुली दाखविण्याचे ५००० रुपये घेणे,इतर जिल्ह्यातील मुलीशी लग्न लावून देणे असे उद्योग ते करतात.यातून अनेकांची फसवणूक ही झाली आहे.शेतकर्‍याच्या वेदनेचा असा बाजार मांडला जातो आहे.
       जिरायती गावात तर हा प्रश्न खूप गंभीर होतो आहे.त्यातून गावाबाहेर व शेतीबाहेर पडण्याची मानसिकता तयार होते आहे. सारोळा पठार या दुष्काळी गावातील ३०० कुटुंबातील ४१२ मुले गावाबाहेर नोकरी किंवा व्यवसायाला गेले असल्याचे प्रा.दिलीप पोखरकर यांनी लक्षात आणून दिले. वाढते नागरीकरण हे उध्वस्त होणार्‍या शेती धंद्यातून तयार झाल्याचे हे वास्तव अधोरेखित करते.बागायती गावात हा प्रश्न नसेल असा समज होता पण अनेक बागायती व प्रतिष्ठित असलेल्या गावातही हा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले.  
      यावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे शेतीमालाला भाव देवून शेती करण्यातली प्रतिष्ठा उंचावणे हाच आहे. नोकरीत व्यवसायात जसे शाश्वत उत्पन्न मिळते तसे शेतीत जेव्हा मिळेल व शेतीतील अमानुष कष्ट यांत्रिक वापराने कमी होतील तेव्हाच शिकलेल्या मुली आनंदाने शेतकरी जोडीदार निवडतील. पण तात्कालिक उपाय म्हणून शेतकरी कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित यांनी अशा गावनिहाय याद्या करून जिल्ह्यात व जिल्हयाबाहेर अनेक गावांशी संपर्क करून अशा गरजू कुटुंबांचा शोध घ्यावा असे अनेकांनी सुचविले. प्रगतीशील उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर यांनी परभणी जिल्ह्यातील एक गाव व त्यांचे गाव अशी गाव ते गाव सोयरीक करण्याचा प्रयत्न केला होता. असेही प्रयत्न व्हायला हवेत . निराश होत असलेल्या या मुलांचे समुपदेशन करणे ही आवश्यक आहे. या कुटुंबाशी संवादी राहण्याची गरज आहे.या मुलांचे पालक सतत चिंतेत असल्याचे आढळले.नैराश्यातून अल्प संख्येने काही मुले व्यसनाकडे ही वळत आहेत.   
         ही समस्या अशीच दुर्लक्षित राहिली तर १० वर्षानी खेड्यात वेगळेच गंभीर प्रश्न निर्माण होतील. या मुलांची  नैराश्यातून शेतीतील कार्यक्षमता ही कमी होईल.   
          शेतीच्या प्रश्नांची चर्चा करताना इथून पुढे या गंभीर पैलूची चर्चा करायला हवी. ज्येष्ठ शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले की “ या नव्या आर्थिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेत  शेतकरी आता नवशूद्र ठरतो आहे हेच विदारक वास्तव हे सर्वेक्षण पुढे आणते आहे.सुखासिन इंडिया निर्माण होताना अमानुष कष्ट असलेल्या या भारतात शेतकरी अधिक केविलवाणा झाला आहे . “
        या सर्वेक्षणासाठी रोहिदास धुमाळ, शांताराम गजे, निलेश तळेकर, दिलीप पोखरकर,विनोद हांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.   
१०० पेक्षा जास्त रखडलेली लग्न  असलेली गावे =    
५० ते १०० रखडलेली लग्न असलेली गावे =   
         १२
         
                                           
     एकूण गावे
२५ ते ३० वयोगटातील रखडलेली लग्ने
३१ ते ४० वयोगटातील रखडलेली लग्ने
     ४५
      २२९४
       ७७४

                                       सर्वेक्षण केलेले
          हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१) विठ्ठलराव शेवाळे (९३७२०१२२२१)

Tuesday, November 1, 2016

व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे

फेब्रवारी महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आंतरराष्ट्रीय नेव्ही डे कार्यक्रमाला 51 देशातील नौदलाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात नौदल अधिकारी सुनिल भोकरे यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. व्हाईस ॲडमिरल पदापर्यंत पोहोचलेल्या सुनिल भोकरे यांची ही यशोगाथा...

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गुढे हे सुनिल भोकरे ह्याचे जन्मगाव. त्यांचे आई-वडिल सध्या चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडील वसंत भोकरे हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असतांना सेवानिवृत्त झाले. नोकरी निमित्त होत असलेल्या बदलीमुळे मुलांचे शिक्षण हे वेगवेगळ्या गावामध्ये झाले. सेवानिवृत्तीनंतर ते चाळीसगाव येथे गेल्या 25 वर्षापासून स्थायिक आहेत. 

सुनिल भोकरे यांना लहानपणापासून नौदलात जाण्याची इच्छा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड तालुक्यातील नागद येथे झाले. पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर खडकवासला येथे शिक्षण घेऊन ते नौदल ऑफिसर झाले. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम भारतीय नौदलाकडून होते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. 1971 साली भारताच्या नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणम वरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या युद्धामध्ये भारतीय नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाल्याची माहिती व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडिल वसंत भोकरे यांनी भेटी दरम्यान दिली. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील वसंत भोकरे यांचे मोठे चिरजीव सुनिल भोकरे यांची भारतीय नौदलाच्या व्हाइस ॲडमिरलपदी नियुक्ती झाल्याची माहिती देतांना त्याचे डोळे पाणावले. ग्रामीण भागात जन्मलेले सुनिल भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने ग्रामीण भागातील इतर होतकरु तरुणांच्या प्रयत्नांना नक्कीच ऊर्जा मिळणार आहे. हे पद नौदलातील अत्युच्च पद असल्याने या नियुक्तीमुळे चाळीसगावच्या लौकिकात विशेष भर पडली आहे. सुनिल भोकरे यांची नियुक्ती ही चाळीसगावकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. सुनिल भोकरे हे केरळ राज्यातील इझिनाला येथील इंडियन नेव्हल ॲकडमीत व्हाइस ॲडमिरल म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. ऑक्टोबर 2013 मध्ये विशाखापट्टणम येथे रिअल ॲडमिरल म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. आतापर्यत सुनिल भोकरे यांनी नऊ विशेष सेवा पदके प्राप्त केली आहेत. त्याचप्रमाणे कारगिल युद्धाच्यावेळी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना तत्कालिन राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ग्रामीण भागातील अनेक तरुण संरक्षण खात्यातील आर्मी विभागाकडेच लक्ष केंद्रित करतात, मात्र संरक्षण खात्यातील नौदल, हवाई दल देखिल तितकेच महत्त्वाचे क्षेत्र आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी न्यूनगंड न धरता परिश्रम, चिकाटी, सातत्याने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्यास ते नौदलात सहभागी होऊ शकतात हे व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. 

एमईआरएस, एनएमईआर आयटी फिटर ॲक्रॅण्टिसेस आणि डायरेक्टर एण्ट्री डिप्लोमा होल्डर्स या पदासाठी दरवर्षी फेब्रवारी आणि ऑगस्टमधील रोजगार समाचार आणि सर्व आघाडीच्या राष्ट्र प्रादेशिक वृतपत्रांमध्ये नौदलाकडून जाहिरात दिली जाते. नौदल भरती संघटना नौदलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये असणाऱ्या मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालयांतर्गत नौदल भरती संघटना काम करते. नौदलामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी या संघटनेवर असते. भारतीय नौदलात खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

-निलेश परदेशी 
चाळीसगाव