महाराष्ट्र
शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती उत्पादनात व उत्पादकतेत वाढ व्हावी
म्हणून विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून “ शेती
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात शेती उत्पादनात वाढ घडवून आणण्याचे
उदिदष्ट आहे. त्याबरोबरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतपूरक व्यवसाय
कौशल्याचे ही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.सदरचा कार्यक्रम हा विदर्भ शेती
विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर योजला असून राज्यातील 33 जिल्हयांमध्ये शेती
कौशल्य व विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीची जबाबदारी कृषि अधिकारी तथा आत्मत्याचे प्रकल्प संचालक
यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधून अधिकचे उत्पादन
घेण्याबरोबरच पूरक व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करता येईल जेणे करुन शेतकरी
पूरक व्यवसायातून स्व:उत्पन्न वाढीबरोबरच कुटुंबातील इतरांना रोजगार देऊ
शकतील. सदरचे प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या शेतीवर किंवा संस्थांमध्ये देण्यात
येणार आहे. हा कार्यक्रम कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र, वसंतराव नाईक
राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था व कृषि विज्ञान केंद्र यांच्या
समन्वयातून राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्येक जिल्हयातील हवामान व परिस्थितीचा विचार
करुन पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय,
शेळी /मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उत्पादन, शेतमाल उत्पादन प्रक्रिया,
रोपवाटिका, फवारणी यंत्र देखभाल व दुरुस्ती, औषधी व सुगंधी वनस्पती
उत्पादन, मधुमक्षिका पालन, मत्स्यउत्पादन, ठिबक सिंचन संच देखभाल व
दुरुस्ती व कृषि अवजारे देखभाल दुरुस्ती आदि व्यवसाय कौशल्यत प्रशिक्षणाचा
समावेश आहे.
सदरच्या व्यवसायामधून शेतकऱ्यांनी निवडलेल्या प्रत्येक व्यवसायासाठी कोणते
कौशल्य तंत्र सुलभ आहे व ते त्यांना आत्मसात व्हावे म्हणून त्याची एक यादी
केली जाईल. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठी विषय तज्ञ यशस्वी व्यावसायिकांची
मदत घेतली जाणार आहे. या प्रशिक्षणाकरिता शेतकरी, भूमिहीन शेत मजूर, महिला
शेतकरी, अल्प भूधारक तसेच समूह शेती गटातील शेतकऱ्यांची निवड करतांना
त्यांची गरज, व्यवसाय वाढीला वाव, त्याकरिता त्यांच्याकडे असलेल्या सुविधा व
आवड आदिचा विचार केला जाणार आहे.
सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम चालविणे व समन्वय ठेवणे याकरिता जबाबदार
अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना नागपूर येथील वनामती अथवा
रागेती येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शेती कौशल्य विकास प्रशिक्षण्
कार्यक्रमांतर्गत जळगांव जिल्हयात 30 ते 35 शेतीशाळाव्दारे प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. गट शेतीतील शेतकऱ्यांना किंवा प्रशिक्षण घेऊन रोजगार
उभा करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची यात निवड होईल. या कार्यक्रमांच्या
आयोजनातून शेतीला पूरक व्यवसाय व शेतकरी कुटूंबातील व्यक्तींना रोजगार
मिळेल. म्हणजेच सदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरच मोठया
प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाणार आहे.
--र.दे.वसावे, जळगाव
No comments:
Post a Comment