बचतगटांना योग्य मार्गदर्शन मिळालं की, बचतगटातील महिला उद्योग व्यवसाय उभारुन स्वावलंबी तर होतातच सोबत कुटुंबाचा गाडा हाकण्यास कुटुंब प्रमुखाला मदतही करुन शकतात. दुर्दम्य इच्छाशक्ती व परिश्रम करण्याच्या तयारीमुळे रमाबाई बचतगटाने विट निर्मीतीच्या व्यवसायातून आर्थिक परिस्थिती भक्कम केली.
धान उत्पादक जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातील बोरकन्हार हे गाव. आमगावपासून केवळ 7 कि.मी. अंतरावर वसलेलं. गावात माविमनं पुढाकार घेऊन 20 महिला बचतगटाची स्थापना केली. त्यापैकीच दारिद्रयरेषेखालील महिलांचा रमाबाई आंबेडकर महिला बचतगट. बचतगटातील 12 सदस्य दरमहा प्रति 50 रुपये याप्रमाणे 600 रुपये मासिक बचत करतात. आमगांव येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत या बचतगटानं खातंही उघडलं.
रमाई बचतगटातील महिला ह्या दर महिन्याला एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करायच्या. मासिक बचत नियमीत करीत असल्यामुळे बचतगटात अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण वाढली. अडीअडचणीच्या वेळी गटातील सदस्य महिला एकमेकीला धावून येऊ लागल्या. बचतगटाच्या रजिस्टरमध्ये देवाण-घेवाणीच्या नोंदी योग्यप्रकारे घेतल्यामुळे त्यांना पैशाचं महत्व चांगल्या प्रकारे कळलं.
बचतगटातील महिलांनी सक्षम होण्यासाठी एखादा उद्योग, व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. गाव परिसरात कुठला उद्योग व्यवसाय उभारण्याला वाव आहे याच्यावर बचतगटाची चर्चा झाली. तालुक्याच्या ठिकाणापासून आपलं गाव कमी अंतरावर असल्यामुळे अनेक इमारतीच्या बांधकामासाठी विटाची गरज लक्षात घेता विट निर्मितीचा उद्योग स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
विट निर्मीतीचा उद्योग स्थापन करण्यासाठी आमगांव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेने बचतगटाचे कर्ज प्रकरण मंजूर केले. 25 हजार रुपयांचा कर्जाचा पहिला हप्ता व 1 लाख रुपयांचा दुसरा हप्ता बँकेकडून मिळाला. विट उद्योग सुरु करण्यासाठी बचतगटातील एका महिलेची शेती भाड्याने घेतली. कच्च्या मालाकरिता बचतगटातील महिलांनी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली. बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये आणि गटाचे 50 हजार रुपये गुंतवणूक केली.
विटा निर्मितीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला उद्योग नवीन असल्यामुळे नफा कमी मिळाला. गाव परिसरात बचतगटाच्या विटा उद्योगाची ओळख झाल्यामुळे विटाचा पुरवठा करण्याचा अनेकांच्या ऑर्डर मिळाल्या. ऑर्डर जास्त आणि विटा निर्मीती मर्यादित स्वरुपात होऊ लागल्याने उद्योग मोठ्या स्वरुपात सुरु करण्याचे बचतगटातील महिलांनी ठरविले. महिन्याकाठी या उद्योगातून त्यांना 20 ते 25 हजार रुपये मासिक नफा मिळत आहे.
व्यवसायात जम बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विटांची विक्री वाढली. विटा संबंधित ग्राहकाला थेट पाहिजे त्या ठिकाणी पोहचवून देण्यासाठी आता ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय त्यांच्या मासिक सभेत घेतला. विट उद्योग निर्मितीचा व्यवसाय थाटण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे सव्वा लाख रुपये घेतलेले कर्जफेड केल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करण्याचे ठरविले.
आत्मविश्वासातून आत्मनिर्भरतेकडे बचतगटातील महिलांची वाटचाल झाली. स्वत: त्या महिला विटा निर्मितीचे काम सुरु करु लागल्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला. माविमच्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात आपण यशस्वी ठरलो असल्याचे पुस्तकला खैरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment