गावातील
अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या सर्व बालकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.
एकही बालक कुपोषणाच्या विळख्यात सापडू नये, यासाठी गावातील बचतगटांनी
पुढाकार घेऊन कुपोषीत बालकांना चांगल्या प्रतीचा आहार देवून कुपोषणमुक्त
केले.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील 981 लोकसंख्या असलेलं डुंडा
हे गाव. नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या या गावातील कुटुंबाचा मुख्य
व्यवसाय शेती. गावात असलेला मजूर वर्ग जंगलातील डिंक, तेंदू संकलन करुन
आपला उदरनिर्वाह करतो.
डुंडा गावात माविमने काही वर्षापूर्वी प्रवेश करुन गावातील असंघटीत
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत केलं. जवळपास 10 ते 13 महिलांचा एक
बचतगट तयार केला. माविमच्या सहयोगिनीने गावातील महिलांना बचतीचं महत्व
पटवून दिल्यामुळे जवळपास 6 महिला स्वयंसहाय्यता बचतगट तयार झाले. गावातील
सर्व 6 महिला बचतगटांना एकत्र करुन तेजस्विनी गावस्तरीय समितीची स्थापना
2009 मध्ये करण्यात आली.
दर महिन्याला बचतगटातील महिलांच्या विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी
माविमची सहयोगिनी दर महिन्याला सभा घेऊ लागली. या सभेत महिलांच्या वैयक्तिक
अडिअडचणीसह काही ज्वलंत सामाजिक प्रश्नावर चर्चा होऊ लागली.एका मासिक सभेत
कुपोषणाच्या प्रश्नावर चर्चा झाली. कुपोषणाचं गांभीर्य किती आहे हे
गावातील महिलांना समजलं. आपल्या गावातील अंगणवाडीत शिक्षण घेणारा एकही बालक
हा कुपोषीत राहू नये यासाठी गावातील सर्व बचतगटातील महिलांनी पुढाकार
घेण्याचा निश्चय केला.
बचतगटातील महिलांनी कुपोषणाचं गांभीर्य ग्रामस्थांना पटवून देण्याकरिता
गावात रॅली काढली. रॅलीमध्ये गावातील नागरिक, बचतगटातील महिला, शाळेतील
शिक्षक व मुले सुद्धा सहभागी झाली. रॅलीत घोषवाक्य, पोस्टर्सचे प्रदर्शन
करण्यात आले. रॅलीमुळे कुपोषणाच्या समस्येविषयी ग्रामस्थांमध्ये जागृती
निर्माण झाली. गावात शिक्षण घेणारी मुले ही आपलीच आहे या भावनेतून
ग्रामस्थांनी मदत केली. बचतगटाच्या महिलांनी घरोघरी जाऊन वेगवेगळ्या
प्रकारची कडधान्य जमा केली. त्याची खिचडी बनवून त्या अंगणवाडीतील सर्व
बालकांना देऊ लागल्या. गावच्या सरपंच देवांगणा हटवार व पोलीस पाटील
पुष्पाबाई उके यांनीसुद्घा याकामी सढळ हस्ते मदत केली.
अंगणवाडी सेविकेला अंगवाडीतील चार बालके कुपोषणमुक्त करण्यासाठी बचतगटातील
महिलांचे मोठे पाठबळ लाभलं. त्यामुळे आता गावातील अंगणवाडीत एकही बालक
कुपोषीत नाही. प्रयत्नाने वाळूचे कण रगडता, तेलही गळे या उक्तीनुसार
बचतगटातील महिलांनी डुंडा हे गांव कुपोषणमुक्त केले.
विवेक खडसे जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया
No comments:
Post a Comment