राज्यातील
शासकीय फार्मसी महाविद्यालये तसेच मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ
अर्किटेक्चरमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु
करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास
मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी अधिकाऱ्यांना दिले.
श्री.खान यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गुरूवारी याबाबत बैठक झाली,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य
सचिव टी.एफ.थेक्केकरा, सहसचिव शाहीन काद्री, तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव
डॉ.अभय वाघ, जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा
यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.खान म्हणाले, अल्पसंख्याकांच्या विकासासाठीच्या पंतप्रधानांच्या 15
कलमी कार्यक्रमास अनुसरुन राज्यातील शासकीय आयटीआय तसेच शासकीय
पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु
करण्यात आले आहेत. या वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे अनेक
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली
आहे. याच धर्तीवर आता राज्यातील कराड, रत्नागिरी, अमरावती, जळगाव व
औरंगाबाद येथील बी.फार्मसी तसेच डी.फार्मसी महाविद्यालयांमध्ये
अल्पसंख्याकांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करता येतील. या
महाविद्यालयांमध्ये चार ठिकाणी बी.फार्मसी तर तीन ठिकाणी डी.फार्मसीचे
अभ्यासक्रम सुरु आहेत. याबाबत फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेसाठी
तातडीने पत्र पाठविण्यात यावे. तसेच संभाव्य विद्यार्थी संख्या, संभाव्य
खर्च, साधनसामग्री, स्टाफ आदींबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. यासाठीचा
खर्च अल्पसंख्याक विकास विभागामार्फत केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथेही अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करता येतील. याबाबत कॉन्सिल
ऑफ आर्किटेक्चर यांची मंजुरी आवश्यक असून त्यासाठी तातडीने पत्र पाठविण्यात
यावे. या महाविद्यालयात साधारण 60 विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्ग
सुरु करता येऊ शकेल. याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment