पुर्णा
तालुक्यात सुहागन नावाचे गाव आहे. गावाच्या विकासासाठी असणा-या विविध
योजनांची अंमलबजावणी होत असली तरी त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला होणे
गरजेचे असते. या विकास योजनांची माहिती जनतेला झाली तरच ते याचा लाभ घेऊ
शकतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात
येत आहेत. सुहागन गावातही 5 बचतगट कार्यरत होते. या बचतगटाच्या माध्यमातून
आपली आर्थिक प्रगती साध्य करता येऊ शकते, हे लक्षात आल्यावर पार्वती संभाजी
भोसले नावाच्या महिलेने बचतगट स्थापन करायचे ठरवले. पण बचतगट कसा स्थापन
केला जातो, त्यासाठी काय करावे लागते, याची माहिती नव्हती. त्याचवेळी
त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगीनींविषयी माहिती मिळाली.
परिसरातील महिलांना प्रेरणा देऊन कल्पना चावला बचतगटाची स्थापना केली.
प्रारंभी महिला तयार होत नव्हत्या. सहयोगीनी व पार्वतीबाईंनी बचतगटाचे
महत्व पटवून दिल्यानंतर त्या तयार झाल्या. त्यानंतर ऑगस्ट 2010 मध्ये
पूर्णेच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचतगटाच्या नावाने खाते उघडले.
बचतगट तर स्थापन झाला पण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणता
उद्योग-व्य्वसाय निवडावा हे पार्वतीबाईंना सूचत नव्हते. त्यांच्याकडे 3 एकर
शेती होती. व्यावसाय करायचा तर शेतीशी निगडीतच, एवढे मात्र त्यांनी मनाशी
ठरवले होते. ब-याच विचारांनंतर त्यांनी रेशीम उद्योग करायचे ठरवले. एका
शेतक-याने रेशीम उद्योग केलेला पाहिला, तो यशस्वी झाल्याचेही त्याने
सांगितले होते. पार्वतीबाईंसाठी हे प्रेरणादायी ठरणारे असले तरी एक
प्रकारचे धाडसच होते. त्यांनी मुलाशी व सुनेशी चर्चा केली. जिल्हा रेशीम
कार्यालयाच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली रेशीम उद्योग सुरु करण्याचे
निश्चित करण्यात आले.
जिल्हा रेशीम कार्यालय सुरुवातीला 4 ट्रे व एक चंद्रिका आणि वाचन साहित्य
तसेच वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करुन देणार होते. मात्र उद्योगासाठी शेतात
शेड उभारावे लागणार होते. जास्तीचे ट्रे तसेच औषध यासाठी सुमारे 50 हजार
रुपयांची आवश्यकता होती. पार्वतीबाईंकडे स्व्त:चे 25 हजार रुपये होते. अशा
वेळी कल्पना चावला बचतगट त्यांच्या मदतीला धावून आला. बचतगटाने 20 हजार
रुपयांचे कर्ज दिले. पार्वतीबाईनी इतरांकडून 5 हजार रुपये जमा केले.
अर्ध्या एकरात तुतीची लागवड केली. याच काळात शेतात शेड उभे केले. साधारण
तीन महिन्यांनी परभणीच्या रेशीम कार्यालयातून 150 अंडी आणली. तुतीच्या
पानांवर दोन-तीन दिवस ठेवल्यानंतर अंड्यांमधून अळी बाहेर पडते. या अळ्यांना
शेडमध्ये चंद्रिकेवर ठेवले. कोसला तयार करण्यासाठी असलेल्या जाळीवर तुतीचा
पाला पसरवून आळ्या ठेवण्यात आल्या . साधारण 25 दिवसांनी या आळ्यांपासून
कोश तयार झाला. मुलगा, सून आणि इतर 4 महिला कामगारांची मदत घेऊन हा व्यवसाय
सुरु झाला. पहिलाच हंगाम असल्याने फारश्या उत्पन्नाची आशा नव्हती. हे कोश
परभणीला 150 रुपये प्रति किलो या भावाने विक्री केले.
दुस-या हंगामाचे कोश बेंगळुरुला विकले. तिथे प्रति किलो 200 रुपये भाव
मिळाला. औषध, रोजगार व इतर खर्च वगळता 7 हजार रुपये महिना निव्वळ नफा
मिळतो. नवीन उद्योग म्हटल्यावर अडी-अडचणी येणारच. पार्वतीबाईंनाही त्या
आल्या . एका हंगामात मुंग्या जास्त झाल्याने नुकसान सहन करावे लागले. पण
त्याला न डगमगता त्या सामो-या गेल्या . सध्या त्यांच्याकडे 25 ट्रे असून हा
रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. जिल्हा
रेशीम कार्यालयाचे कदम तसेच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड
यांचे सहकार्य व प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले. परिसरातील शेतक-यांना
तुतीचे बेणे उपलब्ध करुन देणे, इतर महिलांना हा उद्योग सुरु करण्यास
प्रोत्साहन देऊन त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यांचा पार्वतीबाईंनी
निर्धार केला आहे.
राजेंद्र सरग, जिल्हा् माहिती अधिकारी
परभणी
No comments:
Post a Comment