Monday, January 9, 2012

मातीच्या मण्यांपासून ३० लाखांची उलाढाल..

बचतगटाच्या माध्यमातून येथील अशिक्षित, निराधार, भटक्या जमातीतील महिलांनी जिद्द आणि मेहनतीने मातीपासून बनवलेल्या मण्यांच्या निर्मितीतून आर्थिक परिवर्तनातून नवा मार्ग यशस्वी करुन दाखविला आहे. बचतगटातून आर्थिक परिवर्तन होत असल्याने १२१ महिलांनी दहा बचत गटांच्या माध्यमातून मातीपासून बनवलेल्या मण्यांना आज राज्याराज्यातून मोठी मागणी आहे. या नाविण्यपूर्ण व्यवसायातून या महिलांनी अवघ्या तीन वर्षात ३० लाखांहून अधिक उलाढाल बचत गटाच्या माध्यमातून केली आहे.

गरीबीमध्ये जीवन जगणाऱ्या दरवेशी समाजातील या महिलांना मोलमजुरी शिवाय अन्य पर्याय नव्हता, मात्र बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी एक नवी क्रांतीच घडविली असून त्यांच्यात नवा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता बचतगटाने निर्माण केली आहे. या महिलांना मदत आणि प्रोत्साहन करण्यात अब्दुल रज्जाक सुतार आणि अल्ताफ शिकलगार यांनी पुढाकार घेतला.या महिलांना या समाजसेवकांनी बचतगटाची संकल्पना सांगितली. महिलांनीही बचतगटाच्या विचाराला होकार दिला आणि बघता बघता दरवेशी समाजातील या महिलांचे एकामागोमाग अनेक बचतगट निर्माण झाले. या महिलांना एकत्रित करून त्यांचे ऑक्टोबर २००७ पासून दहा बचत गट सुरू करण्यात आले. 

बचतगटाच्या माध्यमातून या महिलांना पापड, लोणची, खाद्य पदार्थ तयार करून विविध ठिकाणी स्टॉल लावून विक्रीवर भर दिला. या विक्रीतूनही त्यांनी चांगला व्यवसाय मिळाला. या व्यवसायाबरोबरच या महिलांनी पूरक व्यवसाय म्हणून माशांच्या जाळीसाठी लागणारे मातीचे मणी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आणि या व्यवसायात त्या पारंगत झाल्या. माशांच्या जाळीसाठी लागणारे मातीचे मणी तयार करण्यात या दरवेशी समाजातील महिलांनी स्वत:च्या कल्पनांनी आर्थिक परिवर्तनाचे नवे दालन निर्माण केले आहे.

मातीचे मणी तयार करण्याच्या व्यवसायासाठी या महिलांच्या बचतगटाला नगरपालिकेच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची सांगड घालण्यात आली आणि या महिलांचे बचत गट बँकांशी संलग्न करुन अर्थसहाय्याचे नवे दालन निर्माण करण्यात आले. या महिलाचे दहा बचत गट कार्यरत असून त्यातील पाच सेंट्रल बँक आणि पाच महाराष्ट्र बँकेशी संलग्न आहेत. त्या माध्यमातून एका बचत गटाला सव्वा लाख रुपयांचे कर्ज घेतले, त्या कर्जापैकी सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज महिलांनी केवळ तीन वर्षातच परत केले आहे. या माध्यमातून बचत गटांची ३० लाखाची उलाढाल झाली आहे.

आठ एकरात डाळिंबाचे ७० टन उत्पादन

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे जवळच्या बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीत आठ एकर क्षेत्रातून विनायक मनोहर नामजोशी यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाचे ७० टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नामजोशी हे फलटण संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे नातू आहेत. ते शेती पिकविण्यात आनंद मानतात. त्यांनी येथील शेतील ऊस पीक घेतले आहे, तर बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यांनी १३ एकर क्षेत्रात डाळिंब पीक घेणे पसंत केले आहे. 

डाळिंबाला एका बाजूने तेल्या रोगाने ग्रासले असताना त्यांनी दक्षता, नियोजन व निरीक्षणाच्या जोरावर या रोगाला बागेकडे साधे फिरकूही दिले नाही. २००३ मध्ये सहा एकर, तर २००७ मध्ये सात एकर क्षेत्रावर त्यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. त्यापैकी बहर धरलेल्या आठ एकर क्षेत्रांतील दोन हजार झाडांतून ५० टन निरोगी फळांचे उत्पादन घेण्यात आघाडी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच या बागेच्या धर्तीवर इतरत्र अनुकरण होऊ लागले आहे.

डाळिंब बागेला श्री. नामजोशी यांनी विहिरीतील पाणी ठिबक सिंचनाद्वारे पुरवले आहे. ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून ते पिकांना खतही देतात. त्याबरोबर शेणखत, पेंडीसह पोटॅश अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये या रासायनिक खतांच्या मात्रा त्यांनी या पिकाला दिल्या आहेत. मध्यंतरीच्या सततच्या पावसाने बागेत तणांचा मोठा उपद्रव झाला होता. मात्र त्यांनी तणनाशकांच्या फवारणीला फाटा देऊन मजुरांकरवी हे तण आटोक्यात आणले. महत्वाचे म्हणजे बाग सतत स्वच्छ ठेवली. वातावरणातील बदलानुसार औषधे व बुरशीनाशकांचा वेळोवेळी वापर करून बागेत रोग, किडी नियंत्रणाखाली ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

फलटण आज झपाट्याने विस्तारत आहे. अशा वेळी मुंबईत इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असताना, तसेच प्लॉटिंग व ले आउटच्या क्षेत्रातील अनुभव पाठीशी असताना सुध्दा शहरालगतच्या उपनगरात त्यांनी शेतजमीन विकसित करण्यामध्ये यश मिळविले आहे. त्याचबरोबर डाळिंबासह अनेक पिकेही घेतली जात आहेत. या त्यांच्या कृतीतून त्यांची शेतीनिष्ठा अधिकच उठून दिसते आहे, हे निश्चित.

मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..

सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे. टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला आहे.

पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगाम आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते. धोम धरणाजवळील या मत्स्यबीज केंद्रात वर्षभरात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन झाले असून, १० लाख ५७ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सन २००९-१० मध्ये ८ लाख ६६ हजार एवढा महसूल मिळाला होता. जिल्ह्यातील तलावाच्या ठेक्याद्वारे ८ लाख ६२ हजार ७२१ रूपये, मोसमारी परवान्याद्वारे २८०० रूपये व इतर ३६ हजार रूपये असे मिळून एकूण १९ लाख ६० हजार ६२८ इतका महसूल वर्षभरात प्राप्त झाला.

जिल्ह्यात मत्स्यसंवर्धनास योग्य असलेल्या जलक्षेत्रात मत्स्यशेती करून गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून जलद वाढणाऱ्या जातीचे मत्स्यबीज धोम केंद्रात स्थानीकरीत्या निर्माण करण्यात येते व ते मत्स्यसंवर्धकांना पुरविण्यात येते. या ठिकाणी मत्स्यबीजाबरोबरच कोळंबी बीजही संचयन करण्यात येते. वर्षभरात ३ हजार रुपये खर्च करून ३०० मे.टन मत्स्योत्पादन व १ लाख ४२ हजार मत्स्यबीज संचयन करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातील राजेवाडी मत्स्यबीज संवर्धन केंद्रामध्ये १० संवर्धन तळी तयार करण्यात आली असून, धोम मत्स्यबीज उत्पादन केंद्रातील प्रमुख कार्य मत्स्यजिरे खरेदी करून त्याचे या ठिकाणी संवर्धन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

राजेवाडी तलावात सन २००९-१० मध्ये ३० लाख मत्स्यजिरे संवर्धन करून ४ लाख २१ हजार अर्धबोटुकली प्राप्त झाली. त्याद्वारे ८४ हजार ४१० रुपयांचा महसूल मिळाला. ही अर्धबोटुकली ११ पाटबंधारे तलावातील मत्स्योत्पादनासाठी १० मच्छीमार सहकारी संस्थांना वितरित करण्यात आले. सन २०१०-११ मध्ये ३० लाख मत्स्यजिरे धोम व उजनी केंद्र येथून आणून त्याचे संवर्धन करण्यात आले व ९ लाख २० हजार मत्स्यबीज पुरवठा करण्यात आला. त्याद्वारे १ लाख ४० हजार ४०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मच्छीमारांना किफायतशीर मासेमारी व्यवसायासाठी चांगली जाळी तयार करण्यासाठी २ हजार ७०३ किलो नायलॉन सूत खरेदीसाठी सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनांद्वारे ४ लाखांचा अर्थपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ६६ सहकारी मच्छीमार संस्था व एक मच्छीमार सहकारी संघ कार्यरत आहे. 

Thursday, January 5, 2012

मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम १८६९ मध्ये सुधारणा

पक्षकारांचा वेळ वाचावा आणि अधिकचा खर्च टाळण्यासाठी मुंबई दिवाणी न्यायालये अधिनियम १८६९ मध्ये सुधारणा करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्र, भाग-चार मध्ये दिनांक ३० डिसेंबर २०११ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा सुधारित नियम १६ जानेवारी २०१२ पासून अंमलात येणार आहे.

यात दाव्याच्या वादाविषयाची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, असे दावे जवळच्या तालुका न्यायालयांकडे दाखल करण्यात यावेत, दाव्याच्या वादाविषयीची रक्कम दहा लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा दाव्यामधील अपील जवळच्या जिल्हा न्यायाधीशांकडे दाखल करण्यात यावेत आणि ज्या दाव्यांच्या वादाविषयीची रक्कम दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा दाव्यांमधील अपील उच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात यावे, अशी सुधारणा मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम १८६९ मध्ये करण्यात आली आहे.

ज्या अपिलांच्या वादाविषयीची रक्कम दहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल आणि जे अपील अशा प्रारंभापूर्वी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असतील असे सर्व अपील लगेचच संबंधित जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित होणार आहेत.

परंतु हे कलम, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयाकडे किंवा यथास्थिती उच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेले कोणतेही दावे ज्यांची अशा न्यायालयाकडे संबंधित अधिनियमान्वये सांविधिकरित्या तरतूद केलेली आहे. त्यांना लागू असणार नाही.

याकरिता मुंबई दिवाणी न्यायालये अधिनियम १८६९ मध्ये २८ ब हे नवीन कलम समाविष्ट करण्यात येत आहे.

तंबाखू मुक्त नवी मुंबई मोहिमेचा आरंभ

नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाने सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन ‘तंबाखू मुक्त नवी मुंबई मोहीम’ सुरु केली आहे. या मोहिमेचा आरंभ गुरूवारी रुग्णालयात आयोजित समारंभात करण्यात आला. गृह राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ.डी.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष विजय पाटील, संचालक डॉ.प्रिया पाटील-छोलेरा, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ.रश्मीन छोलेरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आपल्या देशात दरवर्षी तंबाखू, गुटखा यांच्या सेवनाने तसेच धुम्रपानाने सुमारे १० लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. यात तरुण पिढी ओढली जात असल्याने हे हानीकारक ठरत आहे. यातून आपल्या देशातील मौल्यवान मनुष्यबळाला धोका पोहोचत आहे. तरुणांनी तंबाखू व अन्य अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे व इतरांनाही यापासून रोखले पाहिजे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

तंबाखूमुक्त नवी मुंबई मोहीम पाच महिने राबविण्यात येणार असून या मोहिमेत पथनाट्ये, आरोग्यरक्षण, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. याद्वारे तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम दाखवून तरुणांनी यापासून दूर राहण्याचा संदेश दिला जाणार आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

मराठी वृत्तपत्रांनी नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या भरारीने वैश्‍विक सीमारेषा पुसून टाकल्या आहेत. म्हणूनच मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रुजविणारे कै. बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण आजही होते. त्यांनी घातलेला पाया आता वेगळ्या तंत्रज्ञानाच्या टप्प्यावरून सामाजिक सुधारणेकडे वृत्तपत्रांनी नेला. जागतिकीकरणानंतर मराठी वृत्तपत्रांचा चेहरामोहराच नव्हे तर मांडणी आणि सजावटीसह माहितीपूर्ण मजकूरही प्रकाशित होऊ लागला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे मनोरंजन करणे, चालत्या काळाची वर्तमाने कळविणे, आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टीची 'दर्पण' छापणाऱ्यास मोठी उत्कंठा आहे. म्हणून या गोष्टी साध्य होण्याविषयी जितका प्रयत्न करवेल तितका ते करतील. 

कै.बाळशास्त्री यांचा जन्म पोंभुर्ले, ता. देवगड येथे खाडीच्या किनाऱ्यावरील एका दुर्गम परंतु निसर्गरम्य अशा खेड्यात २० डिसेंबर १८१२ रोजी झाला. त्यावेळी पोंभुर्ले गाव कोल्हापूर संस्थानच्या अंतर्गत बावडा जहांगिरीपैकी एक होते. सुमारे ५०० वर्षापासून तेथे जांभेकर घराणे आहे. बाळशास्त्रींचे वडील गंगाधर शास्त्री उपाध्ये होते. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण परंपरागत पध्दतीने वडिलांच्या सान्निध्यातच झाले. बालबोध, मोडी लेखन, वाचन, व्यावहारिक अंकगणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम, ज्ञानेश्‍वर, वामन, मोरोपंत आदींची अभंग, गाथा, श्लोक, आर्या, कविता, रामायण, महाभारत, भागवत, पुराणातील कथा आदींचा अभ्यास त्यांनी ८ व्या वर्षीच पूर्ण केला. वेदपठण, गीतापठण आदींबरोबर अमरकोश, लघुकौमुदी आदी संस्कृत अध्ययन त्यांनी १३ व्या वषापर्यंत पूर्ण केले. 

बाळशास्त्री १८२५ च्या सुमारास दि.बॉम्बे नेटिव्ह बुक अँण्ड स्कूल सोसायटी या शाळेत दाखल झाले. बाळशास्त्रींच्या कुशाग्र, तल्लख व एकपाठी बुध्दीचा प्रत्यय लगेचच या शाळेतील शिक्षकांना आला. त्यांच्या असाधारण बुध्दीमत्तेमुळे रॉयल एशियाटिक सोसायटी ह्या जगप्रसिध्द संस्थेच्या मुंबई शाखेचे नेटिव्ह सेक्रेटरीपदही (१८३१) त्यांना मिळाले. भारतीय नागरिकाला हा मान प्रथमच त्यांच्यामुळे मिळाला होता.

दर्पण संग्रहात बाळशास्त्रींनी अनेक लेख लिहिले. त्यापैकी शास्त्रे व परलोकसिध्दी, हिंदूचा धर्म, दर्पणातील प्रतिबिंबे, ईश्‍वर आहे याविषयीचे प्रमाण, पुनर्विवाह प्रकरण, गुडगुडी ओढणे, जातीभेदाचा प्रश्न, मनुष्याची जात, जनावरातील जाती, सरकारी नोकऱ्यांचे हिंदीकरण, सरकारी नोकरीतील जातीयता, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, रहदारी जकाती हे लेख विशेष गाजले.

इंग्रजांच्या कालखंडात आक्रमणाला तोंड देण्यासाठी नवा माणूस घडवायचा असेल तर मरगळलेल्या मराठी माणसात शैक्षणिक व वैचारिक क्रांतीची गरज होती. सांस्कृतिक व शैक्षणिक आक्रमणाचा धोका व त्याचा पुढील १०० वर्षात होणारा परिणाम जांभेकरांनी ओळखला होता. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने वृत्तपत्र काढायचा धाडसी निर्णय घेतला. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी पहिले मराठी इंग्रजी संमिश्री पाक्षिक वृत्तपत्र 'दर्पण' या नावाने सुरु केले. एकीकडे भारतीय संस्कृती टिकविण्याची चेतना द्यायची, ज्ञानाचा प्रसार करून अवघा समाज शिक्षित पर्यायाने जागृत करायचा. सोबत पाश्चात्य ज्ञानही द्यायचे आणि हे सर्व करीत असताना तत्कालीन सरकारची मर्जी सांभाळण्याचा देखावा करावयाचा अशी तिहेरी कसरत जांभेकरांना आधुनिक भारताच्या उभारणीसाठी करावी लागली. पत्रकारिता, समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, इतिहास व पुराणवस्तू संशोधक, ग्रंथकार आदि भूमिकेतून जांभेकरांचे काम पुढील पिढ्यातील संबंधित क्षेत्रातील मान्यवरांना प्रेरणादायी ठरले आहे. बाळशास्त्रीचे ग्रंथ कर्तृत्व प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या अनुषंगाने झाले. 

बाळशास्त्री जांभेकरांचे ३३ वर्षाचे अल्पायुष्य १७ मे १८४६ साली संपले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सर अस्क्रिन पेटी यांनी जांभेकरांच्या निधनानंतर भर न्यायालयात त्यांना विनम्र श्रध्दांजली वाहिली होती. तत्कालीन 'बॉम्बे कुरिअर' या इंग्रजी वृत्तपत्राने १० जुलै १९४६ च्या अंकात सर पेटी यांचे भाषण प्रसिध्द केले होते. कै. बाळशास्त्री यांच्या दु:खद मृत्यूने पश्चिम भारतावर जेवढी महान आपत्ती ओढवली आहे. तेवढी आपत्ती मुंबईतील कोणाही पुरुषाच्या मृत्यूने मग तो युरोपियन असो की एत्‌द्देशीय असो अथवा तो कितीही मोठ्या दर्जाचा असो ओढवणार नाही. असे न्यायमूर्तींनी म्हटले होते. एकूणच या सर्वांचा विचार करता असे म्हणता येईल की, मराठी पत्रसृष्टीत भले कितीही बदल झाले तरीही बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विशेष म्हणजे ते सिंधुदुर्गातल्या मातीतले आहेत हा वेगळा अभिमान आपल्या सर्वांच्या मनात आहे. 

  • डॉ. ग.व.मुळे
  • ''अन्नपूर्णा'' महिला स्वयंम सहाय्यता बचत गट

    ग्रामीण क्षेत्रातील महिलानी स्वत:ला मर्यादित क्षेत्रापुरते न ठेवता, महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून, कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती अंतर्गत येणा-या माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा येथील अन्नपूर्णा महिला स्वयंम सहाय्यता बचत गटाची कामगिरी अशाच प्रकारचे महिलाचे यश अधोरेखीत करणारी आहे.

    अन्‍नपूर्णा बचत गटाची स्थापना दिनांक 3 ऑगस्‍ट 2005 ला करण्यात आली. ग्रामीण महिलांनी एकत्र येवून 12 सदस्यांचा गट करण्याचे ठरविले. सर्वानुमते सौ. पुष्पा दशरथ घागरे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्‍हणून सौ.बेबी रामराव गंधळे यांची निवड केली. बँक ऑफ इंडिया साहुर शाखे कडून गटाची प्रथम प्रतवारी दिनांक 8 नोव्‍हेंबर 2007 रोजी झाली आणि रु 25000/- फिरतानिधी गटाअंतर्गत कर्ज वाटपा करिता उपलब्ध करुन दिला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातुन प्रगती साधण्याचे महत्‍त्व कळु लागल्यावर त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले.दुग्ध व्यवसायाकरिता तीस दुधाळू संकरित गायी खरेदी करण्या साठी बँक ऑफ इंडिया साहूर शाखेने दिनांक 9 सप्‍टेंबर 2010 ला व्दितीय प्रतवारी करुन गटाला दुग्ध व्यवसायाकरिता एकूण दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले

    बचतगटाला कर्जाचा पहिला टप्पा दिनांक 4 फेब्रुवारी 2011 ला 10 संकरित गायी खरेदी करण्याकरिता देण्यात आला. संकरित गायीचे संगोपन महिला उत्तम रित्या करु लागल्‍या. दररोज दुध विक्रीच्या माध्यमातून पैशाची आवक सुरु झाली. जास्त शिक्षण नसले तरी स्व:ताच्या पायावर उभे राहून, आपल्या संसारासाठी हातभार लावण्याची धावपळ या गटाच्या सदस्यामध्ये दिसुन येवू लागली

    दरमहा 5 तारखेला गटाची मसिक बैठक होते. व्यवसायात मिळणारा नफा तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी विक्री उत्पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या जमाखर्चाचे सर्व हिशोब या विषयी चर्चा केली जाते. गटातील सर्व महिला एकत्र येवून सण समारंभ साजरा करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा टिकून आहे.

    गावात ग्रामसफाई, वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम अन्नपुर्णा गटात राबविले जातात. बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. त्या ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मदतीने स्त्रियांचा व त्यांच्या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना बँकेचे व्यवहार सुध्दा कळू लागले तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या आधारावर प्राप्त केले आहे. या आदर्श गटाची कार्यप्रणाली व भरभराट पाहुन इतर गावातील ग्रामीण भागातील स्त्रियासुध्दा आशेचे किरण म्हणुन हया आदर्शाने प्रेरीत झाल्या आहेत.