ग्रामीण क्षेत्रातील महिलानी स्वत:ला मर्यादित क्षेत्रापुरते न ठेवता, महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून, कुटुंबाचीही जबाबदारी स्वीकारलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती अंतर्गत येणा-या माणिकवाडा ता. आष्टी जि. वर्धा येथील अन्नपूर्णा महिला स्वयंम सहाय्यता बचत गटाची कामगिरी अशाच प्रकारचे महिलाचे यश अधोरेखीत करणारी आहे.
अन्नपूर्णा बचत गटाची स्थापना दिनांक 3 ऑगस्ट 2005 ला करण्यात आली. ग्रामीण महिलांनी एकत्र येवून 12 सदस्यांचा गट करण्याचे ठरविले. सर्वानुमते सौ. पुष्पा दशरथ घागरे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून सौ.बेबी रामराव गंधळे यांची निवड केली. बँक ऑफ इंडिया साहुर शाखे कडून गटाची प्रथम प्रतवारी दिनांक 8 नोव्हेंबर 2007 रोजी झाली आणि रु 25000/- फिरतानिधी गटाअंतर्गत कर्ज वाटपा करिता उपलब्ध करुन दिला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातुन प्रगती साधण्याचे महत्त्व कळु लागल्यावर त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले.दुग्ध व्यवसायाकरिता तीस दुधाळू संकरित गायी खरेदी करण्या साठी बँक ऑफ इंडिया साहूर शाखेने दिनांक 9 सप्टेंबर 2010 ला व्दितीय प्रतवारी करुन गटाला दुग्ध व्यवसायाकरिता एकूण दोन लाख रुपये कर्ज मंजूर केले
बचतगटाला कर्जाचा पहिला टप्पा दिनांक 4 फेब्रुवारी 2011 ला 10 संकरित गायी खरेदी करण्याकरिता देण्यात आला. संकरित गायीचे संगोपन महिला उत्तम रित्या करु लागल्या. दररोज दुध विक्रीच्या माध्यमातून पैशाची आवक सुरु झाली. जास्त शिक्षण नसले तरी स्व:ताच्या पायावर उभे राहून, आपल्या संसारासाठी हातभार लावण्याची धावपळ या गटाच्या सदस्यामध्ये दिसुन येवू लागली
दरमहा 5 तारखेला गटाची मसिक बैठक होते. व्यवसायात मिळणारा नफा तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी विक्री उत्पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या जमाखर्चाचे सर्व हिशोब या विषयी चर्चा केली जाते. गटातील सर्व महिला एकत्र येवून सण समारंभ साजरा करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा टिकून आहे.
गावात ग्रामसफाई, वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम अन्नपुर्णा गटात राबविले जातात. बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. त्या ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मदतीने स्त्रियांचा व त्यांच्या कुटुंबाचा संसार फुलू लागल्याचे निदर्शनास आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना बँकेचे व्यवहार सुध्दा कळू लागले तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या आधारावर प्राप्त केले आहे. या आदर्श गटाची कार्यप्रणाली व भरभराट पाहुन इतर गावातील ग्रामीण भागातील स्त्रियासुध्दा आशेचे किरण म्हणुन हया आदर्शाने प्रेरीत झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment