अमरावती जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५६ हजार ७३० बालके असून या सर्व बालकांच्या आरोग्याची व कुपोषणाची काळजी घेण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत गाव पातळीवर ग्राम बाल विकास केंद्र सुरु झाल्यामुळे बालकांच्या आरोग्याची तसेच पोषणाची नियमितपणे तपासणी होत असल्याने बालकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे त्याचे चांगले परिणामही दृष्टीस पडत आहे.
मेळघाटसह जिल्ह्यातील बालकांची पोषणस्थिती सुधारुन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता एकात्मिक बालकविकास सेवा योजना तसेच आरोग्य विभागातर्फे गाव पातळीवर ९२४ ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत सप्टेंबर २०१० पासून या केंद्रांमध्ये ८ हजार २७३ बालकांवर विशेष उपचार करण्यात आले असून ३० दिवसाच्या उपचारानंतर ७ हजार ११३ बालकांच्या वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्रांमध्ये प्रत्येक गावातील सर्वच बालकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांच्या वजनाच्या नोंदीही ठेवण्यात येतात.
जिल्ह्यातील सर्व बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता ग्राम बाल विकास केंद्रात वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडी केंद्र स्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामध्ये बालकांना ३० दिवस ठेवण्यात येऊन दिवसातून ८ वेळा आहार देण्यात येतो. तसेच बालकांच्या मातांना बालकांचा आहार, आहाराची नियमितता, पोषण आहारामध्ये असलेले घटक तसेच आरोग्य व संगोपनाबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.
ज्या केंद्रांमध्ये बालकांच्या वजनामध्ये वाढ दिसून येत नाही अशा बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या बाल उपचार केंद्रात २१ दिवस दाखल करण्यात येते. अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली विशेष उपचार व आहार देण्यात येतो.
यामध्येही सुधारणा न झाल्यास ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच बाल रोग विशेष तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात येतात.
अमरावती जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्राची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण १ लाख ५६ हजार बालकांची तपासणी केली असता तीव्र कमी वजनाची तसेच कमी वजनाच्या सर्व बालकांना औषधोपचार व आहार नियमित सुरु आहे.
या बालकांपैकी उंची व वजनाचे प्रमाणे गृहित धरल्यास सॅमची ९०४ बालके असून मॅमची ५ हजार ७५७ ऐवढी बालके आहेत. या सर्व बालकांची पोषणस्थिती सुधारुन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाला यश आले आहे.
कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सर्व बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती रिचा बागला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. पराडकर,उप मुख्य कार्यकारी अधिकरी बी.जी. सोमवंशी विशेष कार्यक्रम राबवित आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष संतोष महात्मे, आरोग्य समितीचे सभापती बाळासाहेब वानखडे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण भागात बाल आरोग्याबाबत विशेष जागृती अभियान राबविण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळे कुपोष्ाणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व बाल आरोग्याच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील पालकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावातील बालकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्कतेने कार्यरत असल्यामुळे बालकांच्या आरोग्याचे रक्षण करणे सुलभ झाले आहे.
No comments:
Post a Comment