कर्तृत्व,वक्तृत्व आणि जनसंपर्क राजकीय व्यासपीठावरील यशस्वी व्यक्तिमत्वाच्या कीर्तीचे तीन मूलभूत अंग असतात...अशी कीर्ती मग चिरकाल टिकते. दरवेळी अशा व्यक्तींच्या इतिहासाला नवी झळाळी मिळते... नव्याने व्यक्तींची ओळख होते. गुरुवारी अशीच ओळख गेल्या पाऊण शतकात अनेक इतिहासाची पाने लिहिणा-या दरबार हॉलला झाली. राष्ट्रपती भवनातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमाचे घटनास्थळ ! आज या ठिकाणी देशाच्या प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांच्या धीरगंभीर आवाजात नव्या पिढीला एका महान गांधीवादी नेत्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळाली. औचित्य होते स्वर्गीय वि.स.पागे अर्थात विठठ्ल सखाराम पागे यांच्यावरील डाक तिकीटाच्या विमोचन कार्यक्रमाचे.
वि.स.पागे यांच्या कर्तृत्वाची ओळख पत्रकार म्हणून काम करताना विधान परिषदेचे सलग १८ वर्षे सभापती या नात्याने होती. मात्र आज त्याच कालखंडात काम करणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्यांची वेगळी ओळख उपस्थितांना करुन दिली. ही केवळ ओळख नव्हती, एका ज्येष्ट नेतृत्वाची त्यावेळेच्या तरुण नेतृत्वावर पडलेली छाप होती. १९६२ च्या सुमारास महाराष्ट्राची निर्मिती आणि राज्य उभारण्याच्या प्रक्रीयेत स्वत:ला झोकून देणा-या पिढीतील समर्पणाच्या आठवणीची कहाणी होती. ही नवी ओळख महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी नवी होती.
दुष्काळी काम,त्यातून रोजगार हमी योजनेचा जन्म, पुढे जलसंधारणाची मोहीम मात्र या दरम्यान वि.स. पागे यांनी नशाबंदी कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार यावर राष्ट्रपती महोदयांनी अधिक प्रकाश टाकला.. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या यशस्वीतेसाठी आणि दुष्काळाची झळ गरीबांना पोहचू नये यासाठी मजूरीचे भाव तिप्पट करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी मजुरांच्या हातात मोठया प्रमाणात पैसा आला होता. मात्र हा पैसा खरोखर कुठे जातो. यामुळे दुष्काळाच्या सावटातून परिवार बाहेर पडतात काय ? याचा अभ्यासही या लोकनेत्याने केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मोठया प्रमाणात संग्रही पैसा नशा करण्यात खर्च होतो. तेव्हा याच काळात वि.स.पागे यांच्या पुढाकाराने शासनाने नशाबंदी कार्यक्रम सुरु केला. रोजगार हमी योजनेसोबत पागे यांचे हे काम अविस्मरणीय असून तत्कालिन व्यवस्थेने त्यांचे कौतुकही केले होते, असे त्यांनी यावेळी वेगळी आठवण म्हणून सांगितले.
पागे यांच्या संत साहित्याचा अभ्यास आणि समाजाच्या विविध घटकांसोबतची त्यांची जवळीक, त्या प्रश्नांची जाण,महात्मा गांधी,विनोबा भावे,साने गुरुजी अशा ऋषितुल्य समाज धुरिणांची त्यांच्यावर पडलेली छाप, यातून वि.स.पागे उभे राहील्याची आठवणही त्यांनी सांगितली. पूर्वीच्या काळात नव्याने निवडून येणा-या आमदारांचे बौध्दीक घेतले जायचे.. तेव्हा पागेंचे मार्गदर्शन प्रत्येकाच्या कायम अनुभवाच्या गाठीशी बांधले असायचे.नवी पिढी हुशार असल्याचे आता सांगितले जाते. परंतू अशा आदरणीय व्यक्तिमत्वातून आम्ही घडलो, हे सांगतांना मला आनंद होतो, असेही त्यांनी सांगितले.
अशा कितीतरी आठवणींना आज दरबार हॉलमध्ये उजाळा मिळत होता. एरव्ही महाराष्ट्राशी संबंधीत कार्यक्रमातही राष्ट्रपती महोदया राष्ट्रभाषेतच बोलतात. परंतू आजचे संबोधन सुरुवातीपासून मराठीत होते. मनातल्या आठवणी मातृभाषेतच बोलण्याची आमची संस्कृती त्यामुळे दरबार हॉल भारवला होता. पागे यांच्या जन्मशाताब्दी वर्षाला यापेक्षा वेगळी आदरांजली काय असू शकते... .. त्यांच्या उच्च कोटीच्या कर्तृत्वाला ही राष्ट्रपती भवनाची सलामी होती.
प्रवीण टाके
No comments:
Post a Comment