चिखलदरासह मेळघाटच्या विविध भागात मागील चार दिवसापासून सततधार पाऊस पडत असल्यामुळे वातावरणातही बदल झाला असून संपूर्ण दिवस चिखलदरा नगरी खुक्याच्या आच्छादनाखाली राहत असल्यामुळे पावसाळी पर्यटनाचा अनुभव पर्यटकांसाठी एक सुखद आणि रोमांचकारी अनुभव ठरत आहे. मागील दोन दिवसात प्रत्येकी ६६ ते ७० मी.मी पावसाची नोंद झाली असून अहोरात्र पाऊस पडत असल्याने सूर्यदर्शनही होत नाही. आणि सकाळी ६ वाजल्यापासून रिमझम पावसात सोबत धुक्यातून मार्ग शोधत पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी दऊन तेथील ओल्या चिंब वातावरणात निसर्गाचा आनंद घेतात. चिखलदऱ्यात जुलै महिन्यात २९० िम.मी पावसाची नोंद झाली आहे.
चिखलदऱ्यातील आकर्षक धबधब्यांमध्ये सर्वात आकर्षण असलेला भिमकुंड येथील धबधबा उंच कड्यांवरुन खोल दरीत कोसळताना पाहताना रोमांच निर्माण होतो. भिमकुंड धबधबा पहिल्यांदाच आपल्या प्रचंड जलधारेसह दरीत कोसळताना पाहणे हा आनंद अनुभवने ही घटना मनाला मोठी आनंद देऊन जात असल्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यासह विविध राज्यातून निसर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. भिमकुंडाच्या या मनोहारी व रोमहर्षक धबधबा पाहण्यासाठी प्रचंड कोसळणाऱ्या पावसात व अतिवेगवान वाऱ्याची पर्वा न करता भिमकुंडाजवळ पोहोचलो आणि येथील दृष्य म्हणजे निसर्गाने दिलेले अप्रतिम आणि मनोहारी दृष्य पाहून आनंदीत झालो. हा धबधबा पाहताना काळ, वेळ आणि परिस्थितीचीही पर्वा न करता संपूर्ण दिवस याच परिसरात राहून निसर्गाच्या या अद्भुत दृष्याचा अनंद घेतला. हाच आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत होते. यामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय होती.
भिमकुंड म्हणजे निसर्ग सौदर्याचे रौद्य स्वरुप व्यक्त करणारे ठिकाण.चिखदरापासून ३ कि.मी असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पोहचल्यानंतर ३ हजार ५०० फूट खोल दरीत धो-धो पाण्याच्या धारा पडत असतात. दरीच्या सुरुवातीची खोली जवळपास १५५ फूट आणि पुढे ती १ हजार ५०० फूट खाली जलधारा कोसळत असतात. या कोसळत जलधाराचा आवाज आणि उंच उडणारे फवारे अनुभवताना मनाचा थरकाप होत असला तरी निसर्गाचे मनोहारी रुपही न्याहाळताना मन अगदी प्रफुल्लीत होते. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात हा धबधबा पाहाणे म्हणजे पावसाळी पर्यटनाचा सर्वोच्च आनंद घेण्यासारखेच आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या विविध आकर्षक धबधब्यामध्ये बकादरी, कलाल कुंड, देवी पॉईंन्ट, पंचबोल, जत्राडह आदी ठिकाणचे प्रमुख धबधब्यासह विविध छोट्या मोठ्या उंच पर्वतरांगावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा आंनद व येथील निसर्ग सौदर्य मनाला आनंद देऊन जाते. तसेच संपूर्ण मेळघाट परिसर हिरव्या शालूने सजलेला पहाणे एक अपूर्व मेजवानीच ठरते. मेळघाटच्या निसर्ग सौदर्य आणि पावसाळी धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मेळघाटकडे वळताना दिसतात.
मेळघाटच्या निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच येथील मनोहारी व आकर्षक धबधबे पाहण्यासाठी जाताना पर्यटन विकास महामंडळाने तसेच चिखलदरा नगरपरिषदने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन पर्यटनाचा आनंद सर्वांनाच घेता येईल परंतु पावसाळ्यात या परिसरात पर्यटक भेट देताना अतिउत्साहामुळे अगदी धोक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचतात आणि दुर्घटना घडतात. अशा घटना सहज टाळता येणे शक्य आहे. यासाठी स्वत:च्या उत्साहावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. भिमकुंड परिसरातील धबधबा पाहताना पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. निसर्गाचा आनंद घेताना आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
पावसाळ्यात चिखलदरा व मेळघाटच्या निसर्ग सौदर्याचा व विविध धबधब्यांचा मनसोक्त आनंद घ्या आणि चिखलदऱ्याला भेट द्या.
No comments:
Post a Comment