अन्न ,वस्त्र,निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा पण याच बरोबरीला आता शिक्षण देखील मुलभूत गरजांपैकीच एक मानली जाते.पण बऱ्याच जणांना नियमित व पारंपरिक शिक्षण घेणे परवडत नाही. तसेच दहावी/बारावी परीक्षेत नापास झालेल्या निराश विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट् मुक्त विद्यापीठाने एक नवा पर्याय खुला करुन आशेचा किरण निर्माण केला आहे.
ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमात १० वी / १२ वी (माध्यमिक/उच्चमाध्यमिक) परीक्षा उत्तीर्ण अशी किमान अर्हता विहीत केलेली असेल त्या बाबतीत,महाराष्ट्र राज्य शिक्षण मडंळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होवून पदवी परिक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार हा पात्र समजण्यात येतो.
राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था,नवी दिल्ली यांच्यामार्फत माध्यमिक शालांत परीक्षेबाबत दिलेले प्रमाणपत्र,माध्यमिक शालांत परीक्षा अशी अर्हता असलेल्या पदांवर नियुक्तीसाठी ग्राहय धरण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था, नवी दिल्ली यांची (मराठी व इंग्रजीसह किमान ५ विषयासंह) शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सदर प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांनी, राज्य शासन सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अशी अर्हता विहीत केली असेल त्या त्या ठिकाणी शासन सेवेसाठी शालांत परीक्षा समकक्ष पात्रता आपोआप धारण केली आहे असे समजण्यात येते. समाजातील अविकसित घटकांपर्यंत पोहचून त्यांना सुशिक्षित करण्याचा वसा घेतलेल्या मुक्त विद्यापीठाने नुकतेच २२ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
प्रचलित शिक्षण पध्दतीने अपात्र ठरविलेल्या विदयार्थ्यांना कला,वाणिज्य, कृषी,आरोग्य,अभियांत्रिकी,संगणक, पत्रकारिता, या शिक्षणक्रमांच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी,पदव्युत्तर पदवीस सुलभतेने प्रवेश घेता येतो. कारण इथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट,मायग्रेशन सर्टिफिकेट इ. कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.केवळ शाळा सोडल्याचा दाखल्याची व गुणपत्रकाची साक्षांकित छायाप्रत या कागदपत्रांवरच विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो.
या विद्यापीठाचा एवढा एक फायदा नसून अन्य विद्यापीठात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला तेथील पदवीसोबत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए./बी.कॉम. पदवीसाठी प्रवेश घेता येऊ शकेल. म्हणजेच विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेवून बाहेर पडतो ते दोन पदव्या घेवूनच!
थोडक्यात विद्यार्थी तीन वर्षात दोन पदव्या मिळवू शकतो. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना राज्यातील इतर विद्यापीठाच्या पदव्यांप्रमाणेच शासन आणि विद्यापीठ आयोगाची मान्यता आहे. या विद्यापीठाच्या पदव्या इतर विद्यापीठाच्या पदव्यांशी समकक्ष आहेत. आवड व सवड यानुसार शिक्षण घेता येत असल्यामुळे या विद्यापीठांकडे शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
नाशिक विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,अहमदनगर या जिल्हयातील अभ्यासकेंद्रावर शिक्षण घेणाऱ्यांची मागील वर्षाची संख्या ५०,००० पेक्षाही अधिक होती. नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शेतकरी,कामगार,महिला बचत गटाच्या सदस्या,वरिष्ठ पोलिस अधिकारी,सरकारी कर्मचारी व अधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,गृहीणी, व्यापारी यांचेसह तुरुंगातील कैदी,अंधजन,लष्करी जवान, मोलकरीण, नाभिक, चर्मकार,मुंबईतील डबेवाले,राज्य परिवहन महामंडळाचे वाहक व चालक, यशनिर्माण प्रकल्पांतर्गत दत्तक घेतलेल्या खेडयांतील आदिवासी विद्यार्थी तसेच कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी असे अनेक घटक या ज्ञानगंगेच्या प्रवाहात मिसळून त्यांनी आपलं कर्तुत्व सिध्द केलं आहे. २०११-१२ या शैक्षणिक वर्षात ज्ञानगंगा घरोघरी येण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
दिंनाक १ जुलै ते ३१ जुलै २०११ या कालावधीत मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु राहतील. या कालावधीत बी.ए./बी.कॉम, एम.कॉम,एम.बी.ए, एम.एस.डब्ल्यू, बी.लिब, एम.लिब, बी.सी.ए.,पत्रकारीता, शालेय व्यवस्थापन पदविका,एम.एड, आर्किटेक्चर, बालसंगोपन,रुग्णसहायक,डोटा, बी.एस्सी , एम.एल.टी.इत्यादी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल.
अधिक माहितीसाठी ०२५३-२३१७०६३/२५७६७५६ या क्रमांकावर संपर्क साधावा. मुक्त विद्यापीठाच्या या दूरशिक्षण पध्दतीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं लाभ घ्यावा व भविष्यकाळ उज्वल करावा व आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सातासमुद्रापार न्यावा !
मोहिनी राणे
No comments:
Post a Comment