समाजव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या आणि ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत गुरफटून राहिलेल्या स्त्री, पुरुष, मुलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन मुळ प्रवाहात आणण्यासाठी चिखलीचे तहसीलदार प्रा. संजय खडसे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना ठाणेदार इंगळे यांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे पारधी वस्तीत सुधारणेची किरणे पोहोचली आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरानजिकच्या साकेगावात पारधी झोपडपट्टी वस्तीवर प्रा. खडसे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक पोहोचले तेव्हा तेथील लोकांना, ग्रामस्थांना पारध्यांनी आता काय नवीन गुन्हा केला असा समज होणे सहाजिकच होते. परंतु तसं काही घडले नव्हते. समाज व्यवस्था, शासन व्यवस्थेपासून नेहमीच दूर राहिलेल्या या जमातीतील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून महसूल प्रशासन पारध्याच्या दारी आल्याचे पाहावयास मिळाले.
पारधी वस्तीवर पोहोचल्यावर तेथे फक्त स्त्रियाच दिसल्या. पुरुष कोठे आहेत असे विचारले असता माणसं गेलीत शिकारीला असे सांगण्यात आले. पारधी वाड्यातील एका घरासमोर बसून तेथील परिस्थिती जाणून घेण्यात आली. पारधी वस्तीसाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करणारे माजी सरपंच देविदास लोखंडे यांनी या वस्तीवर ४० ते ५० घरं असल्याचे सांगितले. घर, जातीचा दाखला आणि इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी तहसिलदार खडसे यांना विनंती करण्यात आली.
शासकीय चमूने उपस्थित पारधी स्त्री-पुरुषांकडून अडचणी जाणून घेतल्या. अनेकांना घर नाहीत तर काहींना जातीचे दाखले पाहिजेत. गावाच्या दक्षिणेस असलेल्या इ-क्लास जमिनीवर घरे नसलेल्या कुटुंबांना जागा तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. पारधी वाड्यातील किती मुलं शाळेत जातात, असे विचारुन अनेक विद्यार्थ्यांनी कविता व गाणी तसेच एबीसीडी म्हणून दाखविली. एका आठवीतील विद्यार्थ्यांने इंग्रजीत परिचय करुन दिला. येथील पारधी वस्तीतून सुशिक्षित पिढी घडण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पुढे आले आहे. शिक्षणासोबतच कुटुंब नियोजनाकडे वळा तसेच बालविवाह करु नका असा सल्ला यावेळी वस्तीवरील लोकांना देण्यात आला.
No comments:
Post a Comment