एका विशिष्ट कालखंडातील कलाजीवन आणि समाजजीवन यांचा सुंदरसा आलेख या पुस्तकातून वाचायला मिळतो. ‘बनारसची अभ्याससहल’, ‘भोपाळचे भावबंधन’, ‘छोटा उदेपूरचा नबाबी थाट’! अशी शीर्षकं असलेल्या लेखांमधून त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा आणि तिथे भेटलेल्या व्यक्तींचा परिचय त्यांनी करून दिला आहे. तर रावबहादूर धुरंधर, शिल्पकार रघुनाथ फडके, बालगंधर्व यांच्या सहवासाच्या मनोज्ञ आठवणीही जागवल्या आहेत.
कलाजगतात वावरताना एक स्त्री म्हणून अंबिकाबाईंना कसे अनुभव आले, एक चित्रकार म्हणून त्यांचा अनुभव काय राहिला हे सारं या लिखाणातून उलगडत जातं. एक कलाशिक्षक आणि कलावंत म्हणून धुरंधरांचं असलेलं स्थान व विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर, गुरुशिश्यामधील कौटुंबिक स्वरूपाचं नातं याच्या साक्षीदार बनून अंबिकाबाई वाचकाला त्याबद्दल सांगतात. बनारसला गेलेल्या अभ्याससहलीने पुस्तकाची सुरुवात होते. सहकुटुंब बनारसला गेलेले धुरंधर आणि एका कुटुंबाप्रमाणे तिथे झालेलं साऱ्यांचं वास्तव्य, त्यातील गंमत, वेगळेपण आणि खुमारी यांचं वर्णन लेखिकेने छान पद्धतीने केले आहे. भोपाळच्या संस्थानी नबाबी वातावरणातला थाट, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनाची झलक, गोषात असलेल्या नबाबाच्या सुनांचा बुरख्यातच काढलेला फोटो अशा वेगवेगळ्या आठवणी यात आहेत. छोटा उदेपूरचाही माहौल नबाबी. तिथे आपल्या राजवाड्यातील युरोपातील म्युरल पेंटिंग्जच्या धर्तीवर भित्तिचित्रे करून घेण्याची कल्पना साकार करण्यासाठी रावसाहेब धुरंधर सहकुटुंब तिथे गेलं होतं. त्याचवेळी राजन्येचा विवाह असल्याने शाही विवाहसोहळा बघायला मिळाला. तिथल्या वास्तव्यात गप्पा, गाणी रंगत. चित्रांच्या व्यवहारात दलाली करणाऱ्या मंडळींचे फसवणुकीचे अनुभवही आले. सरळ मनाच्या धुरंधर यांना त्यामुळे मनस्ताप झाला.
औंधच्या संस्थानातील कलेचं शिक्षण आणि संवर्धन अंबिकाबाईंना प्रभावित करून गेलं. युवराज्ञी अक्कासाहेब यांना कलाशिक्षण देण्यासाठी धुरंधर गेले होते. अत्यंत कलानिपुण आणि रसज्ञ अशा अक्कासाहेब शिवण, भरतकाम यातही तरबेज होत्या आणि साहित्यप्रेमीही. त्या पुढे युरोपातही शिकून आल्या पण त्यांची एकही कलाकृती आपणास पाहायला मिळाली नाही, अशी खंत अंबिकाबाईंनी व्यक्त केली आहे. औंधप्रमाणे बडोदा संस्थानातील अनुभवही यात येतात. तेथील संस्थानाचा हीरकमहोत्सव होता त्याप्रीत्यर्थ अंबिकाबाईंना निमंत्रण होतं. तिथल्या सरकारांना आहेर करण्याचा प्रसंग अंबिकाबाईंनी रंगवून लिहिला आहे. पालनपूरच्या राजघराण्याशी संबंध अंबिकाबाईंचा संबंध आला तो धुरंधर यांच्या निधनानंतर. त्यांचा चित्रसंग्रह सांभाळणं ही समस्याच असल्याने, पालनपूरच्या नबाबांनी ती घ्यावी या हेतूने त्या तिथे गेल्या होत्या. दुसरं महायुद्ध संपतानाचा हा काळ होता. चित्रं लावून घेण्याचं कामही अंबिकांनाच करायचं होतं. तिथे लॉर्ड माउंटबॅटन येणार होते. त्यांची ओळख नबाबसाहेबांनी करून दिल्याची आठवण अंबिकाबाईंनी दिली आहे.
एकूणच संस्थानिकी आणि नबाबी वातावरण, संस्कृती आणि रीतिरिवाजांचा तपशील तसंच तेथील वस्त्रप्रावरणांपासून दागदागिन्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांच्या वर्णनांपर्यंत बारीकसारीक गोष्टी अंबिकाबाई यात कलावंताच्या नजरेने नोंदवतात. सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक भान यांनी ही सारी प्रकरणं सजलेली आहेत. अत्यंत चित्रमय शैलीत हे लेखन झालं आहे.
वडील रावसाहेब धुरंधर आणि शिल्पकार फडके यांच्या हृद्य आठवणी तर अंबिकाबाईंनी अत्यंत आस्थेने आणि मार्मिक शब्दांत लिहिल्या आहेत. धार संस्थानात वास्तव्य करणारे फडके उत्तम चित्रकार आणि संगीतज्ञ होते. त्यांची दहाबारा पानं लांबीची पत्रं येत व त्यातून अंबिकाबाईंना विविध कला व साहित्यप्रकारांबद्दल नवनव्या गोष्टी कळायच्या. बालगंधर्वांनाही त्यांनी पाहिलं होतं. एकदा पुरुषवेशात अचानक घरी आलेल्या बालगंधर्वांना आपण कसं ओळखलंच नाही ती आठवणही त्यांनी यात दिली आहे. बालगंधर्वांची विविध रूपं वर्णन करतानाच अंबिकाबाई त्यांच्या आयुष्यातील गोहरबाईपर्वाकडे निखळपणे आणि तटस्थ नजरेने बघतात.
चित्रकलेशी संबंधित असलेल्या या पुस्तकात रावसाहेब व अंबिका धुरंधरांच्या चित्रांची व त्यांची स्वतःची रंगीत छायाचित्रंही आहेत, त्यामुळे तत्कालीन कलेच्या नमुन्याची झलकही वाचकांना अनुभवता येते. चित्रमय आणि वास्तवदर्शी लेखनाचा उत्तम असा नमुनाच या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर आला आहे. विशिष्ट कालखंडातील चित्रकलेचा इतिहास या लेखनातून जागा होतो, तसंच त्या काळातील समाजाचं, सांस्कृतिक वातावरणाचं आणि रीतीरिवाजांचं दर्शनही घडतं. एका संवेदनशील आणि मर्मज्ञ चित्रकर्त्रीच्या लेखणीतून उतरलेली ही स्मरणचित्रं खरोखरीच संस्मरणीय आहेत.
No comments:
Post a Comment