Friday, May 4, 2012

गावाची गोष्ट न्यारी

गावात सांडपाण्याचा निचरा व त्याचा योग्य वापर, स्वच्छतेबरोबरच गावातील साथरोगांना आळा घालून निरोगी व प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते ते मान्याच्या वाडीमध्ये. गावकऱ्यांनी भविष्याचा वेध घेऊन मान्याच्या वाडीला सक्षम बनविले. येणाऱ्या स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी या गावाने आधुनिकतेची कास धरली. ग्रामपंचायतीबरोबरच प्राथमिक शाळेला संगणक व प्रत्येक वर्गातील संगणकाला इंटरनेटची जोडणी. यामुळे नवी पिढी माहितीच्या महाजालाशी जोडली गेली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील केवळ १०० घरांच गाव असलेल्या मान्याची वाडी येथे एकविसाव्या शतकातील आधुनिकतेचं दर्शन होत आहे.


महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श खेडं म्हणून जिल्ह्यात नव्हं राज्याचं लक्ष वेधून घेणारं गाव म्हणजे मान्याची वाडी. आधी केले नी मग सांगितलं ! ही उक्ती कृतीतून साकार करणारं असं हे गाव. गावाची ख्याती ऐकून मी गावाला भेट देण्यासाठी गेलो. गावातील प्रगती पाहून व ऐकून ऐकावे ते नवलच अशी माझी गत या गावाची यशोगाथा ऐकताना झाली होती. शासनाची मिळाली मदत तर ठिक नाही तर स्वकर्तृत्वावर गावानं केवळ एकीच्या बळावर अनेक जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील पोरितोषिक खेचून घेतली आहेत. एवढच नव्हं तर इतर गावांनाही निर्मल करण्यासाठी स्वखर्चानं, स्वत:चं जेवण बरोबर घेऊन इथल्या महिला पुरुषांनी शौचालयासाठी खड्डे खनून शौचालयांची उभारणी करुन दिली. अशा या मान्याच्या वाडीनं यशोगाथांचा कळसावर कळस रचला आहे.

गावाची माहिती घेत असतांना समजले त्या गावाचे सुपूत्र उत्तमराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच स्व. तात्यासो माने (तात्या), पत्रकार रविंद्र माने आणि त्यांचे सहकारी यांनी गावाला नवी दिशा दिली आहे. गावकऱ्यांनीही त्याला साथ दिली आहे. इतर गावांचेही प्रबोधन केलं आहे. गावकऱ्यांनी हातात हात घालून गावच्या विकासाचा एकेक टप्पा पूर्ण करीत आज राज्याला नव्हं देशाला भेडसावणाऱ्या वीज आणि भारनियमनाला फाटा देऊन बचतगटाच्या माध्यमातून घर तिथ 'सौर ऊर्जा' हा अभिनव संकल्पही पूर्ण केला आहे. आज अंधारातून प्रकाशाकडं जाणारा मार्ग कृतीतून साकार केला. आता केवळ सरासरी ३० रुपये एवढेच घरटी विद्यूत देयक येतं आहे.

यापूर्वी आर्थिक परिवर्तनासाठी घर तिथ हरियानातून आयात केलेली मुऱ्हा म्हैस, घर तिथं गांडूळखत, शौचालय, परसबाग, बचत खातं, घर आणि शेती पती-पत्नीच्या नावे, वृक्ष लागवड-संवर्धन, जलसंधारण, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, शासन जी योजना राबविण्याचा संकल्प करील ती ती योजना मान्याच्या वाडीत साकार करण्याची किमया या गावानं करुन दाखविली आहे.

आजपर्यंत गावातील सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या. गावच्या विकासाचे निर्णय सर्वानुमते घेतले जातात. ग्राम सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. गावच्या आणि घरच्या अर्थकारकारणाला हातभार लावणारा इथला दूध व्यवसाय. दूध काढणे, दूध संकलन केंद्रात जमा करणे आणि त्याचा मोबदला स्वीकारणे ही कामेही महिलाच करतात. इथे पुरुषांचा हस्तक्षेप चालत नाही. महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी अनेक प्रकारचे लघुव्यवसाय सुरु करुन प्रपंचाला हातभार लावलेला आहे. सभोवतालच्या डोंगरावर माथ्यापासून पायथ्यापर्यंत श्रमदानातून समतलचर, दगडी बंधारे, सिमेंट बंधारे तर कुठे भूमिगत बंधारे बांधून पाण्याची साठवणूक गावकऱ्यांनी केलेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तर चार लाख रुपये, राज्यस्तरावरचे पहिले पाच लाख रुपये, पर्यावरण संतूलन समृध्द गाव प्रथम पुरस्काराचे दोन लाख रुपये, निर्मल ग्राम पुरस्काराचे दोन लाख रुपये, यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर तीन लाख व राज्यस्तरावरचे पाच लाख, महात्मा गांधी तुटामुक्त गाव एक लाख रुपये, स्व. बाबासाहेब खेडेकर पुरस्कार ५० हजार रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २० हजार रुपये, सावित्री बाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार ५० हजार रुपये, आदर्श शाळा पुरस्कार ११ हजार रुपये अशा अनेक पुरस्कारानं सन्मानित झालेल्या मान्याच्या वाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला तो गेल्या वर्षी ग्रामपंचायतीस 'आयएसओ' नामांकन मिळाल्यामुळे.

आज समाजाला भेडसावणारा ऐरणीवरला विषय म्हणजे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यातही मान्याच्या वाडीने पुढाकार घेतला आहे. शासन एक/दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य करते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायत स्व निधीतून अशा जोडप्यांचा सत्कार व अर्थसहाय्य करते. छोट्याशा पण आदर्श मान्याच्या वाडीला मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. येणारे मान्यवर ऊर्जा घेऊन मान्याच्या वाडीचे अनुकरण करीत आहेत. या गावाला त्रिवार मानाचा मुजरा !

  • हंबीरराव देशमुख, पुणे
  • Wednesday, May 2, 2012

    एकात्मता जपणारा विवाह सोहळा


    शिर्डी येथून साईबाबांनी दिलेला श्रध्दा आणि सबुरीचा संदेश जगभर पोहोचविण्यात येतो. सबका मालिक एक ही शिकवण देणारे साईबाबा. त्यांची ही शिकवण आचरणात आणण्यासाठी सर्व साईभक्त सातत्याने प्रयत्नशील असतात. सर्वधर्मीयांना साईबाबा प्रिय आहेत हे लक्षात घेवून श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई सिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट,दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सूर्योदय नगरीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळयाचे निमंत्रण मिळाल्यानंतर या सोहळयाला उपस्थित रहायचे ठरविले होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरज मुहूर्तावर सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा होणार होता.

    विवाहस्थळ असलेली सूर्योदय नगरी या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खास सजविण्यात आली होती.संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

    शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते त्यांची आई वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या प्रेरणेतून दरवर्षी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतात. यंदाचे वर्ष हे सोहळयाचे ११ वे वर्ष आहे. यंदाच्या या सोहळयात ७५ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ४७ हिंदू,१२ बौध्द, १५ आंतरजातीय व एक मुस्लिम अशा ७५ जोडप्यांचा थाटात सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

    यावेळी हिंदू, बौध्द, मुस्लिम समाजाचे धर्मगुरु उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात सर्वप्रथम मुस्लिम जोडप्याच्या लग्नाने झाली. त्यानंतर बौध्द धर्मियांचा विवाह आणि हिंदू धर्मियांचा विवाह त्यांच्या धर्मगुरुंच्या साक्षीने मंत्रोच्चारात पार पाडण्यात आला.

    स्त्री भ्रूणहत्येचा प्रश्न आज देशभरात आहे. यावेळी कोते यांनी नवविवाहितांनी भविष्यात भ्रूणहत्या, गर्भपात, मुलामुलींची तपासणीसाठी सोनोग्राफी करु नये असे आवाहन केले. मुलामुलींचे कर्तृत्व सारखेच आहे. यासाठी मुलामुलीत भेदभाव करु नका, माहेरची शिकवण न विसरता सासरची कीर्ती सतत वाढवित जाण्याचा सल्ला यावेळी उपस्थित साधुसंत, लोकप्रतिनिधींनी दिला.

    आयोजकांतर्फे वधूवरांना पोशाख, साडी, वधूसाठी मंगळसूत्र,संसारोपयोगी वस्तू, साईप्रतिमा तसेच वऱ्हाडी मंडळीसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विवाहप्रसंगी वरांची शिर्डी शहरातून सजविलेल्या वाहनातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. लग्नानंतर आतषबाजी करण्यात आली.

    विवाह सोहळा साजरा करण्यासाठी शिर्डी नगरीतील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, संस्थानचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

  • सुरेश काचावार, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी
  • गाळ काढण्याची मोहीम बनली लोकचळवळ

    तीव्रतेने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर उतारावरील जमिनीतील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन नापीक बनत जाते. तर ही वाहून जाणारी माती पाण्याच्या जलाशयात साठून जलाशयांची साठवण क्षमता कमी होते. या साठलेल्या गाळामुळे जलाशयाची पाझरण्याची क्षमता कमी होऊन परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही घट होते. अशा परिस्थितीत या जलाशयातील गाळ काढून शेत जमिनीत टाकल्यास नापीक जमीन सुपीक बनेल आणि जलाशयांची पाणी साठवण क्षमता वाढेल असा दुहेरी फायदा समोर ठेवून अहमदनगर जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

    अहमदनगर जिल्हा अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४९७ मि.मी. एवढे आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे ९७४१ तलाव आहेत. यामध्ये लघुपाटबंधारे अंतर्गत ८१, पाझर तलाव १६०६, गाव तलाव ३९५, साठवण बंधारे ९५४, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे १५५ तर माती व सिमेंट बांध ६५५० यांचा समावेश आहे. या सर्वांची साठवण क्षमता ९८६५ लक्ष घन मीटर आहे. परंतु या तलावामध्ये साठलेल्या गाळाचे अंदाजित परिमाण ६०५ लक्ष घन मीटर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे तलाव असूनही पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

    सध्या जिल्ह्यात टंचाई परिस्थिती उद्भवली आहे. अशा वेळी तलावामधील गाळ काढून नापीक जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादकता वाढविणे शक्य होणार आहेच त्याचबरोबर जलाशयाची पाणी साठवण क्षमता आणि पाझर क्षमताही वाढविता येणार आहे. हाच उद्देश समोर ठेवून लोकसहभागातून महात्मा ज्योतिबा फुले जल-भूमी संधारण अभियानांतर्गत गाळ काढण्याची विशेष मोहीम १४ एप्रिल ते ३० जून २०१२ या कालावधीत हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात आला.

    लोकसहभाग व लोकशिक्षणातून शेतकऱ्यांना गाळाचे व जलसाक्षरतेचे महत्व पटविणे, लोकसहभागाबरोबर सर्व शासकीय यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयातून कार्यक्रम राबविणे, गाळ काढण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करणे आणि विस्तृत प्रमाणात गाळ काढणे हा मोहिमेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे तलावातील गाळ शेतकऱ्यांनी कोणतीही रॉयल्टी न देता स्वतः घेऊन जायचा आहे. त्यामुळे या मोहिमेस शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.

    या मोहिमेत जिल्हाधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशासकीय संस्था, पाणलोट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळ, बचतगट, सहकारी साखर कारखाने, मजूर फेडरेशन आदी यंत्रणा सहभागी झालेल्या आहेत. यासाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मोहीम प्रभावीपणे राबविली जावी आणि काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे. तालुका व ग्रामस्तरावर अधिकाधिक गाळ काढण्याचे काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांना उत्कृष्ट काम केल्यानंतर यथोचित पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

    शेतीला पोषक ठरणारी लोकसहभागातून गाळ काढण्याची विशेष मोहीम नापीक व पडीक जमिनीचा पोत सुधारण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या मोहिमेस जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाळ काढण्याविषयीच्या या मोहिमेत कोणी बेकायदेशीर अडथळा केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कायदेशीर करवाई करण्यात येणार आहे. शेतकरी व सर्वसामान्याच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या या मोहिमेस लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शेतकरी, नागरिक यांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे. यासाठी शासकीय यंत्रणादेखील युद्ध पातळीवर काम करीत आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर ही मोहीम खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनली आहे.

  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • ‘बांधावर खत’ उपक्रम

    राज्यात मागील तीन-चार वर्षात विशेषत: खरीप हंगामात एकाच वेळी रासायनिक खतांची मोठया प्रमाणावर मागणी वाढत असे. मागणीप्रमाणे पुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. राज्याच्या काही भागात शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत असे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने विविध उपाय योजना राबविल्या जात होत्या. परंतु शेतकऱ्यांची ही गरज पूर्ण होत नव्हती. ही गरज ओळखून औरंगाबाद जिल्हयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या पुढाकाराने कृषी विभागाच्या वतीने मागील वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम यशस्वीही झाला. हे यश लक्षात घेवून हा उपक्रम यावर्षी संपूर्ण राज्यात राबविला जात आहे.

    या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खत पुरवठा संनियंत्रण समितीमार्फत खताचा पुरवठा व नियोजन याबाबत सातत्याने आढावा घेण्यात यावा. विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांना थेट खत वितरण कार्यक्रमाची रुपरेषा हंगामापूर्वीच ठरविण्यात यावी असे निश्चित करण्यात आले.

    राज्य शासनामार्फत जिल्हयात करण्यात आलेल्या रासायनिक खतांच्या संरक्षित साठयाचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. त्यानुसार गटनिहाय खत वितरणाचा कालावधी निश्चित करुन त्याप्रमाणे गटातील सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात एकाच वेळी खत वाटप करण्यात यावे.संरक्षित खत साठयांचे वितरण पूर्णत: शेतकऱ्यांना थेट स्वरुपात वितरित करण्यात यावे, तसेच रासायनिक खते विक्रेत्यांची बैठक आयोजित करुन गावनिहाय, तालुकानिहाय खत वितरण कार्यक्रमाची रुपरेषा आखून शक्यतो एकाच वेळी परिसरातील शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांकडील खत साठा वितरित करण्यात यावा असे ठरले.

    यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपाचा कार्यक्रम स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समक्ष आयोजित करावा, किंवा याबाबत लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी. शेतकऱ्याची रासायनिक खतांपोटी लागणाऱ्या रक्कमेचा धनादेश एमएआयडीसी/ मार्कफेड/व्हीसीएमएफ यांच्या नावाने काढून कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत जमा करावा या बाबींचा समावेश होता.

    यानंतर कृषी विकास अधिकाऱ्यांनी संबंधित पुरवठा संस्थांना त्यांचे धनादेश रक्कमेच्या बदल्यात रासायनिक खत पुरवठा करण्याचे आदेश काढावेत. या आदेशामध्ये गटांचे नाव,गटप्रमुखाचे नाव,त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक व रासायनिक खतांची ग्रेड या बाबींचा समावेश करावा. यानुसार पुरवठादार संस्थांनी रासायनिक खत पुरवठयांचे ट्रक भरतेवेळी प्रत्येक गट प्रमुखांशी संपर्क साधून रासायनिक खतांचा ट्रक थेट गावात पाठविण्यात यावा, व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष वाटप करावे. याप्रमाणे सर्व सूचनांसह मागील वर्षी औरंगाबाद व पुणे जिल्हयाने खत वितरणाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. या उपक्रमाची फलश्रृती लक्षात घेवून याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हयात खत वाटप करण्याबाबतचे निर्देश कृषी आयुक्तामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतक-यांना बांधावरच खत उपलब्ध होणार आहे.

  • गोविंद अहंकारी, जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद
  • व्यवसायात यशस्वी भरारी

    वर्धा जिल्‍ह्यातील हिंगणी हे सेलू तालुक्‍यातील बोरधरण रोडवर वसलेले. २००० पर्यंत लोकसंख्‍या असलेल्या या गावात एकूण ४० ते ४५ बचतगटांची स्‍थापना झालेली आहे. त्‍यापैकी माविम अंतर्गत पाच गट आहेत. यातील एक असलेल्या उन्‍नती स्‍वयंसहायता गटातील सदस्‍य ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांनी चूल आणि मूल या चौकटीबाहेर पडून व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे.

    ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांना उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा होती. परंतु बचतगटामध्‍ये येण्‍यापूर्वी फक्‍त चूल आणि मूल इतपतच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. मात्र गटामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आले.

    माविम सहयोगीनी मार्फत जेव्‍हा उन्‍नती बचतगटाची स्‍थापना झाली तेव्हापासून त्‍या गटामध्‍ये सक्रिय सभासद म्‍हणून सहभागी आहेत. गटाच्‍या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्‍ये सहभागी होणे, यामुळे त्‍यांच्‍यात आत्‍मविश्वास निर्माण झाला. उद्योजकता जाणीवजागृती प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून व्यवसाय करण्‍याची त्यांची इच्‍छा पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आणि गटातून ४००० रूपये कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपड्याच्‍या व्‍यवसायाला त्यांनी सुरुवात केली.

    व्‍यवसायाच्‍या उत्‍पन्‍नातून त्यांनी गटाच्‍या कर्जाची परतफेड केली. त्‍यानंतर माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने महात्‍मा फुले महामंडळातील योजनेच्‍या माध्‍यमातून २० हजार रूपयांचे कर्ज घेऊन त्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये वाढ केली. व्‍यवसाय वाढला तसे उत्पन्नही वाढू लागले. त्या माध्‍यमातून एका वर्षामध्‍ये या कर्जाचीही परतफेड झाली. ज्‍योत्‍स्‍ना यांची व्यवसायातील प्रगती आणि कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. यातून ज्योत्स्ना यांचा आत्मविश्वास आणि उत्साह देखील वाढला.

    मेहनत करण्याची तयारी असल्याने व्‍यवसायवाढीसाठी त्यांनी सर्व ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवली. यामध्ये बचतगट आणि बँकेचीही साथ मिळाली. पहिले कर्ज वेळेत परत केल्याने बँकेकडे पत निर्माण झाली. या परिस्थितीचा लाभ घेण्याचे ठरवून व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले. बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेकडे त्यांनी ५० हजारांच्या कर्जाची मागणी केली. बँकेनेही कर्ज मंजूर केले. त्यानंतर व्यवसायाला भरभराट आली असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

    ज्‍योत्‍स्‍ना यांच्‍या अल्पावधीतील प्रगतीमुळे गाव विकास समितीमध्‍ये त्यांची अध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. गाव विकास समितीच्‍या माध्‍यमातून त्यांच्या पुढाकाराने आणि सर्व गटातील महिलांच्‍या सहभागाने गावात वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एड्स जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्‍लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्‍यादी महत्‍वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले.

    ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांची बचतगटात येण्‍यापूर्वीची परिस्थिती आणि संधी मिळाल्यानंतर व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून त्यांनी घेतलेली भरारी हे इतर महिलांसाठी आदर्श ठरावे असेच उदाहरण म्हणता येईल.

    Tuesday, May 1, 2012

    हळदीने घडविली सोनेरी क्रांती



    निसर्गाची नवलाई, नयनरम्य हिरवाई तसेच दाभोसा धबधब्याबरोबरच आदिवासींचा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्याची ओळख. कुपोषणाचा शाप मिळालेल्या या तालुक्याचे एक नवे बारसे होऊ घातले आहे. होय... आता हळद उत्पादक तालुका अशी या तालुक्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. आतापर्यंत पारंपरिक भातशेती पिकवणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याच्या मनात हळद लागवडीच्या माध्यमातून नव्या बदलाची नांदी सुरू झाली आहे. त्याला येथील शेतकऱ्यांनीही उत्साहाने प्रतिसाद दिलाय.

    ठाण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांची कल्पना, जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधीक्षक आर.एस.नाईकवाडी यांच्या प्रयत्नांनी आणि महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील काळी आई आता हळदरूपी सोन्याने मढवणार आहे. जव्हारचे कृषी अधिकारी, कृषी सहायक अजित घोरपडे, प्रकाश विश्वासराव यांच्या प्रत्यक्ष पुढाकाराने हे स्वप्न सत्यात उतरलेय.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या मार्च महिन्यात जव्हार परिसरातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर हळदीच्या लागवडीची तयारी दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना सातारा, सांगली परिसरात हळदीच्या पिकाची माहिती घेण्यासाठी नेण्यात आले. तर जव्हारच्या कृषी सहायकांनी हळदीचे बियाणे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, महाराष्ट्रात बियाणे न मिळाल्याने त्यांनी थेट तामिळनाडूतील सेलम येथे धाव घेतली. तामिळनाडूतील सेलम परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. तेथील परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आठ दिवसांत चित्रा सेलम जातीचे ५०० किलो बियाणे जमा केले. ते तीन ट्रकमधून जव्हार येथे आणण्यात आले. या दर्जेदार बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

    मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना जमीन तयार करणे व बियाणे लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर न्याहाळे, पिंपुर्णा, सारसुन, वांगणपाडा आदी ११ गावांमधील १०२ शेतकऱ्यांनी ६० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली. जिल्हाधिकारी जऱ्हाड यांनी उत्तम पीक येण्यासाठी सेंद्रीय खतांच्या वापराचा आग्रह धरला. शेतकऱ्यांना निधीची अडचण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर प्रती हेक्टर एक लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले. तर, कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व आदिवासी उपयोजनेतून एकरी १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रकाश विश्वासराव यांनी महत्वाची भूमिका बजावली.

    शेतकऱ्यांनी केलेली हळदीची लागवड यशस्वी झाली आहे. वांगणपाडा येथील शेतकरी दांपत्याला १२५ क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले आहे. सध्या हळदीवर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये बॉयलरमध्ये १५ दिवस हळद वाळविली जाते. त्यानंतर पॉलिशिंग आणि या पॅकिंग या प्रक्रिया केल्या जातात. हळदीच्या लागवडीसाठी एक एकर क्षेत्रामागे सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. त्यातून ओल्या हळदीचे १०० क्विंटल उत्पादन होते. प्रक्रियेनंतर वाळलेली व पॉलिश केलेली २४ ते २५ क्विंटल हळद शेतकऱ्यांना मिळू शकते. महिनाभरातच आदिवासी नृत्य असलेल्या तारपा या ब्रँडने जव्हार तालुक्यात पिकलेली तब्बल १ लाख किलो उच्च प्रतीची हळद बाजारात विकली जाणार आहे. सध्या हळदीचा भाव नीच्चांकी आहे. तरीसुद्धा यातून मिळणारे उत्पन्न या शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा निश्चितच अधिक असणार आहे.

    या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक भात व नागली पिकांऐवजी हळद पिकांची लागवड करून ही सोनेरी क्रांती घडविली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर
  • थोडसं...स्वाईन फ्लू बाबत

    राज्यात मुंबई,पुणे,नाशिक येथे आढळलेल्या स्वाईन फ्लू चा सोलापूर शहर व जिल्ह्यात अद्याप प्रभाव आढळलेला नाही.या रोगाचा प्रार्दूभाव नाही म्हणून सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग निश्चिंत आहे अशातला भाग नाही. या रोगाची साथ आलीच तर त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सुसज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. दिनकर रावखंडे यांनी दिली.

    स्वाईन फ्ल्यू चा मुकाबला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सोलापूर) येथे एकाच वेळी १० पेशंट (रुग्णांची) सोय होईल असे एक स्वतंत्र वार्ड सिव्हील हॉस्पिटल मध्ये उघडण्यात आले आहे.

    यामध्ये १ व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या बाबींची सोय करण्यात आली आहे. स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी ‍तीन युनिटची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ ठेवण्यात आला आहे.

    सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता टॅमी फ्लू च्या गोळयांचा साठा मोठया प्रमाणात उपलब्ध करण्यात आला असून सिव्हील हॉस्पीटलमध्ये ७५mg च्या १७४००, ४५ mg च्या १८५० व ३० mg च्या ५०० अशा सुमारे १९७५० इतक्या गोळया असून जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मागणीनुसार वितरीत करण्यात येणार आहेत.

    जिल्ह्यातील अकलूज, करमाळा व पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातही गोळया उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पंढरपूरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुमारे ८५० गोळया उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

    या लेखाव्दारे स्वाईन फ्लू म्हणजे काय? याच्याशी कसा लढा द्यायचा, कशी काळजी घ्यावयाची? आजार झाल्यावर नेमके काय करायचे? प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आदी गोष्टींची आपण माहिती करुन घेऊ या....

    स्वाईन फ्लू :-
  • हा रोग संसर्गजन्य रोग असून तो एका माणसापासून दुस-या माणसाला होतो.हा रोग प्रामुख्याने इनफ्ल्यूंझा या विषाणूपासून होणारा आजार आहे.
  • सध्या ह्या आजारावर ' नॅसोव्हॅक आणि व्हॅक्स फ्लू ' या दोन लसी उपलब्ध असून तीन वर्षापुढील कोणतीही व्यक्ती ही लस घेऊ शकते.विशेषत: लहान मुले, गर्भवती ‍महिला आणि अस्थमा रुग्णांनी ही लस काळजीपूर्वक घ्यावी.

    लक्षणे :-
  • श्वास घेण्यास त्रास होणे,घसा दुखणे, खोकला येणे, ताप येणे, अतिसार, अंग दुखणे आदी लक्षणे स्वाईन फ्लू होणा-या रुग्णांना जाणवतात.

    घ्यावयाची काळजी :-
  • खोकताना, शिंकताना रुमाल तोंडावर धरावा.
  • सर्दी,खोकला,ताप असताना कामावर जाऊ नये.
  • प्रवास टाळावा.
  • वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • नळाच्या पाण्यात धारेत किमान २० सेकंद हात धुवावेत.
  • सिनेमा, नाट्यगृहे, बाजारपेठ, उद्याने,‍ मॉल आदी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
  • साथीच्या रोगांच्या कालावधीत दर दोन तासांनी कोमट पाण्यांनी हात धुवावेत.
  • सतत खोकणा-यांनी फेसमास्कचा वापर करणे चांगले.
  • हा आजार झाल्यास धुम्रपान टाळावे.(एरवी ते टाळल्यास उत्तमच) साथीच्या रोगांच्या काळात नाक, तोंड, डोळयांना हात लावू नये.
  • या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच भोंदूबाबा,वैद्याकडे न जाता किंवा घरगुती उपचार न करता सरळ जवळच्या वैद्यकीय केंद्रात जाऊन आवश्यक ते उपचार करुन घेणे योग्य ठरते.
  • डी-हायड्रेशन टाळण्यासाठी रुग्णांनी भरपूर पाणी घ्यावे तसेच आरोग्यदायी,समतोल आहार घ्यावा.
  • आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी ‍िव्हटॅमीन असलेल्या पदार्थाचा समावेश जरुर करावा.
  • साथीच्या रुग्णांपासून किमान एक हात दूर राहण्याची दक्षता घ्यावी.
  • एकाच व्यक्तीने वापरलेला मास्क इतरत्र न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
  • या सर्व गोष्टींबरोबरच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती, झोप घ्यावी.

    आपल्यामुळे इतरांना या रोगाचा त्रास न होऊ देणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, योग्य वैद्यकीय उपचार वेळेत घेणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केल्यास तुम्ही स्वाईन फ्लू वर मात करू शकता.

    हे टाळा :- स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
  • शक्यतो एखादी प्रिय व्यक्ती भेटल्यास आलिंगन देणे, हस्तांदोलन करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे अथवा गर्दीत मिसळणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करणे.
  • विनामास्क फिरणे.
  • विनाकारण एन-९५ मास्कचा आग्रह धरु नका.

    लक्षात ठेवा :-
  • स्वाईन फ्लू हा अतिगंभीर आजार नाही.
  • योग्य उपचाराने आणि आपल्या थोड्याश्या काळजीने हा लवकर आटोक्यात येतो.
  • औषधाने तो नक्की बरा होतो यासाठी राज्य शासनाने (आरोग्य विभागाने) ' टॅमी फ्लू ' च्या गोळया उपलब्ध केल्या आहेत.
  • ऑसेल्टामिव्हिर' हे औषध राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत विनामूल्य उपलब्ध आहे.याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे या रोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास कसलाही संकोच न बाळगता थेट जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जा.
  • फारुक बागवान