समाजातील दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग तसेच कुष्ठरोगमुक्त व्यक्तींकडे अपंग म्हणून नव्हे तर त्यांच्यातील कलागुण, सुज्ञ सामर्थ्याला चालना देऊन त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून शासन सामाजिक संस्थांच्या सहभागाने अनेक योजना राबवित आहे. याद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचाही प्रयत्न आहे. अपंग बांधवांना सामाजिक सुरक्षितता प्रदान हेतूने त्यांच्यासाठी अनेक क्षेत्रात आरक्षण तसेच सवलती व सूट देण्यात आली आहे. याद्वारे त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये समान संधी दिली जाते. मुळातच अपंगत्व येऊ नये म्हणून अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण, शालेय तपासणी, जनजागृती, बाल-माता संगोपन यासारखे कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जातात.
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
• सामान्य शाळेत अथवा अपंगांच्या विशेष अनिवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना दरमहा ५० रुपये, पाचवी ते सातवीपर्यंत दरमहा ७५ आणि आठवी व दहावीपर्यंत १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
• मतिमंदासाठी असलेल्या विशेष अनिवासी शाळेतील अतिमंद विद्यार्थ्याला दरमहा ७५ रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
• इयत्ता ९ वी व त्यापुढील विद्यालय- महाविद्यालयीन पदवी, पदविका,वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दरमहा ९० ते ४२५ रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीबरोबरच अंध विद्यार्थ्याला वाचक भत्ता, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव भत्ता तर वसतीगृहामधील विद्यार्थ्यांनाही भत्ता दिला जातो.
अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळातून शिक्षण
शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या अपंगासाठी असलेल्या विशेष शाळेत दृष्टीहीन, कर्ण बधिर, अस्थिव्यंग आणि मनोविकलांग विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. निवासी शाळांमध्ये निवास व भोजनाची मोफत सोय आहे. राज्यात शासनाच्या २१ तर नोंदणीकृत अनुदानित ७१० आणि विनाअनुदानित ३८ शाळा सुरु आहेत. अशा एका शाळेमध्ये ५५ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.
अपंग विद्यार्थ्यांना एकात्मिक शिक्षण
सर्वसाधारण शाळेत इतर सामान्य मुलांबरोबर दृष्टीहीन, कर्णबधिर व अस्थिविकलांग विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. एकाच शाळेत ८ पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी रिसोर्स टिचर, शिवाय पुस्तके, लेखनसामग्री व त्यासाठी मदत आणि भत्ताही दिला जातो.
शिक्षण शास्त्र व वैद्यकीय अभ्यासक्रम राखीव जागा
अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणशास्त्र अध्यापक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३ टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय, दंत वैद्यकीय तसेच शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील प्रवेशासाठी अपंग विद्यार्थ्यांकरिता अनुक्रमे ५,२ आणि ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
शासकीय वसतिगृहात अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
• शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात ३ टक्के जागा राखीव आहेत.
• शासकीय अनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात अपंग विद्यार्थी प्रवेशासाठी एकूण जागापैकी ५ टक्के जागा राखीव प्रवेश आहे.
• शालेय शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या वसतीगृहामध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
• तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वसतीगृहामधील मंजूर प्रवेश क्षमतेच्या ३ टक्के जागा अपंग विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी सवलत
दृष्टीहीन, कर्णबधिर आणि अध्ययन क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी वाचक –लेखनिक पुरविणे शिवाय परीक्षांसाठी ३० मिनीट जादा वेळ देण्यात येतो.
लेखी परीक्षेत आकृत्या, नकाशे, आलेख काढणे यालाही सूट देण्यात आली आहे. गणित, शास्त्र विषयाऐवजी हस्तकला यासारखे विषय दिले जातात.
अनुतीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त २० इतके सवलतीचे गुण आदी सवलती दिल्या आहेत.
औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थामध्ये अपंगासाठी आरक्षण
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शारीरिकदृष्टया अपंग असलेल्या उमेदवारांना तसेच व्यवसाय अभ्यासक्रम चालविणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये अनुक्रमे ३ टक्के जागा राखीव आहेत. प्रवेशासाठी वयोमर्यादा ३० ऐवजी ३५ केली आहे.
बक्षिस योजना
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या दृष्टीहीन, कर्णबधिर अस्थिव्यंग अशा अपंग विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक १००० रुपये रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येते.
No comments:
Post a Comment