थोडया प्रमाणात ही परंपरा िजवंत आहे.त्यातील शेती विषयाशी संबधित व्यवसाय अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.आता त्यासाठी जातीचे बंधन मात्र नाही.परंतु ही परंपरा केवळ महाराष्ट्राचीच नव्हती थोडयाबहुत अंतराने तमाम ग्रामीण भारताची ही अर्थव्यवस्था होती.
या पंरपरेला भाषेनुसार व विभागानुसार वेगवेगळी नावे आहेत. मात्र हे चित्र शंभर-दिडशे वर्षापूर्वी तमाम भारतातील होते.आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्माण झाल्यावर माणसाला भविष्याची आखणी करायचे स्फुरण चढते. अशा वेळी तो नकळत आपला इतिहासही जाणायला सुरूवात करतो. त्यामुळे नव्याने शिक्षित झालेल्या सर्व समाजाला आपण बलुतेदारीत कुठे हा प्रश्न कायम पडत असतो.
हाच प्रश्न सध्या दिल्लीतील प्रगती मैदानावर जागतिक व्यापार मेळा पाहायला येणा-या हजारो भारतीयांना पडत आहे. विशेषत: प्रगती मैदानावरील महाराष्ट्र दालनाच्या दर्शनी भागातील बारा बलुतेदारांचे शिल्प आपला इतिहास शोधण्यास प्रवृत्त करते.
प्रगती मैदानावरील व्यापार मेळा आणि प्रत्येक राज्यांची अस्मिता तसेच या अस्मितेचे राजधानीत होणारे जाहीर प्रदर्शन या देशाच्या विविधतेतून एकतेचे प्रतिक असते. हा भारत इतक्या विविधतेत विभागला असतानादेखील, इतक्या वेगवेगळया अस्मितांना जपत असताना देखील एक देश म्हणून प्रभावीपणे जगापुढे कसा उभा राहतो याचे प्रात्याक्षिकही विदेशी पाहुण्यांना या ठिकाणी दिसते.
महाराष्ट्राचे यंदाचे दालन राज्याच्या लघु-उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका राधिका रस्तोगी यांच्या सर्व व्यापक व सर्व समावेशक भूमिकेतून आणि कल्पनेतून साकारले आहे. अस्सल ग्रामीण कला, कल्पकता आणि अभिव्यक्तीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
दालनाच्या बाहेरील प्रदर्शनी भागात बारा बलुतेदाराचे अप्रतिम शिल्प आहे. सोबतच बाराबलुतेदाराची माहिती देणारे विशाल माहितीपत्रकही लावण्यात आले आहे. शिल्पामध्ये बाराबलुतेदार असणारे चौगुला, महार, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सोनार, जोशी, परिट, गुरव, कोळी यांची कामे दर्शविली आहेत. तर आतमधील बहुतांश विक्री आणि प्रदर्शनाचे स्टॉल याच बलुतेदारीतून साकारलेल्या वस्तूंचे आहे.
आतमध्ये सर्वसमावेशक असा महाराष्ट्र आपआपल्या जिल्ह्याचे नाव घेऊन उभा आहे.धारावीच्या चामडयांच्या वस्तूंपासून कोल्हापूरच्या चपलेपर्यंत, पाचगणीच्या खाद्यपदार्थापासून लातूरच्या हस्तशिल्पापर्यंत सारेच दिसून येते. थोडक्यात गाव आणि गावगाडा चालविणारी बारा बलुतेदारी याचा ठसा संपूर्ण दालनात दिसून येतो.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या महिला बचतगटांच्या कार्यकुशलतेने हस्तशिल्पाला नवा आयाम मिळत असून त्याचे प्रात्यक्षिकही दिल्लीच्या या मैदानावर दिसत आहे. लहान मुलांच्या लाकडी खेळण्यांपासून गृहपयोगी अनेक वस्तू येथे उपलब्ध आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याची ओळख असणारे हातमाग, काचेच्या वस्तू, पैठणी साडया, दागिने, काष्टशिल्प व विविध भागातील सांस्कृतिक अभिव्यक्ती जपणारे पेहराव, राहणीमान, व जीवन पद्धती मांडणा-या वस्तूंचे प्रदर्शनही या दालनाचे आकर्षण ठरते.
यावर्षी दालनाच्या मुख्य दरवाज्याजवळ ग्रामीण भागातील धोतर अणि लुगडं घातलेल्या गावाचे पाटील आणि पाटलीण बाई यांचे िजवंत शिल्प उभे आहे.पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या देहबोलीत हा पाटीलकीचा थाट दारावर उभा आहे.जणू प्राचीन गावाचे दर्शन घडवावे, बारा बलुतेदारी समजून सांगावी याचसाठी ही दोघे उभी असल्याचा भास होतो.ही जोडी प्रगती मैदानावर आमच्या अस्मितेला बहुराष्ट्रीय संस्कृतीशी मेळ घालण्याचे कार्य करीत आहे.
No comments:
Post a Comment