सायंकाळची सुमारे ५ ची वेळ, सीबीडी बेलापूरच्या एफ मार्केटसमोरच्या प्रांगणात अचानक कानठळ्या बसविणारे बॉम्बस्फोटासारखे एका मागून एक चार आवाज झाले. रस्त्यावरुन लगबगीने जाणारी माणसे, मार्केटमधील व्यापारी आणि आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशी मार्केटकडे धावले. काही पुरुष-महिला गडबडा लोळताहेत, काही विव्हळताहेत तर, काही निपचित पडलेली माणसे आणि त्यात एक दोन वर्षाचे मूल आईला बिलगून पडलेले अशी दृष्ये सर्वांनी पाहिली.
इतक्यात सायरनचा आवाज झाला आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तेथे धावले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जखमींना तेथून बाजूला केले.काहींवर प्राथमिक उपचार केले आणि गंभीर जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे काम केले. हे सर्व काल्पनिक होते. प्रसंग होता आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत आणि त्याबाबतची प्रात्यक्षिके दाखविणे.
नवी मुंबईतील नागरी संरक्षण दलातर्फे एफ मार्केटमध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची प्रात्यक्षिके आयोजित केली होती. बॉम्बस्फोटासारख्या परिस्थितीत स्वत:ला जमिनीवर झोकून देणे, परिस्थिती शांत होताच स्वत:चे व इतरांचे संरक्षण करणे, मालमत्तेचे रक्षण करणे, आग लागली असता ती तात्काळ विझविणे व जखमींना मदत करणे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला धैर्याने करणे आवश्यक असून प्रसंगावधान राखून लोकांनी अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशी प्रात्यक्षिके सादर करुन लोकशिक्षण केल्याबद्दल सर्वांनी नागरी संरक्षण दलाला धन्यवाद दिले.
नागरी संरक्षण दलाच्या नवी मुंबई समूह, ठाणे विभागाचे उपमुख्यक्षेत्र रक्षक दिनकर अहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात प्रात्यक्षिके सादर करण्यामागील भूमिका सांगितली.
No comments:
Post a Comment