काही कारणास्तव जर आपल्याला नियमित सैन्यदलात जाण्यास अपयश आले असेल तर निराश होऊ नका... भारतीय सैन्यात सैन्याधिकारी म्हणून काम करण्याची तुमची अजूनही इच्छा असेल तर प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून आपले स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी खास तुमच्यासाठीच हा लेख...
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी.राजगोपालाचारी यांनी ९ ऑक्टोबर १९४८ साली प्रादेशिक सेनेची स्थापना केली. हुद्दा, वेतन,सोईसुविधा,सवलती सर्व काही नियमित सैन्यदलासारखेच....
वर्षातून काही आठवडे आपण नियमित सैन्यदलाच्या एका युनिटबरोबर राहायचे तर बाकी दिवस मात्र आपला दैनंदिन व्यवसाय, नोकरी जे काही असेल ते करायचे.
ही संधी फक्त पुरुष उमेदवारांकरिता आहे.
प्रादेशिक सेनेची असलेली विविध कमांड्स -
• प्रादेशिक सेना मुख्यालय - ॲडिशनल डायरोक्टोरेट जनरल प्रादेशिक सेना, जनरल स्टाफ ब्रान्च, आयएचक्यू ऑफ एमओडी (आर्मी), एल ब्लॉक, चर्चरोड, न्यू दिल्ली -११०००१
• दक्षिण कमांड - हे कार्यालय घोरपडी, पुणे ,पश्चिम कमांड - हे कार्यालय चंदीगढ, पूर्व कमांड - हे कार्यालय कोलकता तर मध्य कमांड हे कार्यालय लखनऊ येथे आहे.
प्रादेशिक सेनेमध्ये सैन्याधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेबद्दल आपण जाणून घेऊ या ...
शिक्षण - कोणत्याही शाखेचा पदवीधर
वय - १८ ते ४२ वर्ष.
शारिरीक पात्रता - शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम.
इतर - कोणत्याही विहित सनदशीर मार्गाने मासिक उत्पन्न कमीत
कमी ५ ते ७ हजार असणे आवश्यक.
(खाजगी किंवा सरकारी नोकरी करीत असलेले तसेच स्वत:चा व्यवसाय करणारे पुरूष उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.)
आता जाणून घेऊ या की, प्रादेशिक सेनेत अधिकारी पदासाठी निवड कशा प्रकारे होते ? -
• प्रत्येक वर्षी दोन वेळा अर्ज करता येतात.
• साधारणत: मे आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये एम्लॉयमेंट न्यूज, टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, डीएनए यासारख्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात येते.
• यावेळी दिनांक ५ नोव्हेंबर २०११ च्या एम्लॉयमेंट न्यूज या वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली आहे.
• विहित नमुन्यातील अर्ज प्रादेशिक सेना, गृप हेडक्वॉटर्स , दक्षिण कमांड, घोरपडी, पुणे ४११००१ येथे सादर करावा.
• अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांक ३१डिसेंबर २०११ आहे.
• फेब्रुवारी आणि ऑगष्ट महिन्याच्या साधारणत: शेवटच्या रविवारी लेखी परीक्षा होते.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
• शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र(दहावी, बारावी आणि पदवी).
• एमबीबीएस डॉक्टरांनी दिलेले शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र.
• मासिक उत्पन्न ५ ते ७ हजार किंवा त्याहून अधिक असल्याचा पुरावा.
• रेशनकार्ड, पॅनकार्ड, स्वत:चे छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र.
• ज्या ठिकाणी आपण नोकरी करीत आहात, तेथील सक्षम अधिकाऱ्याचा ना-हरकत दाखला.
आता लेखी परिक्षेविषयी -
• लेखी परीक्षा शंभर गुणांची असते.
• यापैकी ५० गुण सामान्य ज्ञान तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असलेल्या प्रश्नांना असतात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकरिता चार पर्याय दिले जातात.
• १० गुण बुद्धीमत्ता चाचणीकरिता दिले जातात.
• ३० गुण निबंध लेखनासाठी असतात. आणि उर्वरित १० गुण संक्षिप्त टिपणीसाठी असतात.
• निबंध लेखनाचे विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर आधारित असतात.
• निबंध एकूण चार विषयांपैकी एका विषयावर साधारणत: ३०० शब्दांमध्ये लिहावयाचा असतो.
• लेखी परीक्षेचा निकाल दुसऱ्याच दिवशी सायंकाळपर्यंत जाहीर केला जातो.
• लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लागलीच मौखिक चाचणी घेण्यात येते.
• मौखिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना साधारणत: दोन महिन्यानंतर अलाहाबाद, भोपाळ, बंगळूर यापैकी एका सर्विस सिलेक्शन सेंटरकडून एसएसबी इंटरव्ह्यूकरिता बोलाविण्यात येते.
• एसएसबी इंटरव्ह्यू एकूण ५ दिवसांचा असतो. या इंटरव्ह्यूमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होते.
• वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील तीन महिन्यात सैन्यात लेफ्टनंट या पदावर नियुक्त केले जाते...आणि सैन्याधिकारी म्हणून त्यांची पुढील वाटचाल सुरु होते.
• या अधिकाऱ्यांना योग्य वेळी प्रथम देवळाली, नाशिक येथे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि यानंतर डेहराडून येथील भारतीय सैन्य प्रशिक्षण संस्थेमध्ये (IMA) प्रशिक्षण दिले जाते.
अधिक माहितीसाठी -
www.joinindianarmy.nic.in आणि www.indianarmy.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा मनोज सानप, सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय यांच्याशी ८६५२ १९८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रादेशिक सैन्याच्या माध्यमातून आपले सैन्याधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होऊ शकते. तर मग...लागताय ना तयारीला... जय हिंद !
No comments:
Post a Comment