महिलांनी आपली शक्ती पणाला लावल्यास काय होऊ शकते याचा परिचय यवतमाळ जिल्ह्यातील एका गावाने नुकताच अनुभवला. जिल्ह्यातील दाभडी (बोरगाव) येथील २० महिलांनी एकत्र येऊन कुटुंबाची वाताहत करीत असलेल्या दारूला हद्दपार केले. महिलांच्या आक्रमकते पुढे दारुड्यांनी हात टेकले असून, गावात १०० टक्के दारुबंदीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
अडीच हजार लोकवस्तीच्या दाभडीत पूर्वी सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दारुड्यांचा हैदोस होता. त्यामुळे गावात वारंवार भांडणे होऊन गाव विकासाकडे जाण्याऐवजी विकासापासून दूर जात होते. अलीकडचे येथे शाम रणनवरे यांनी तलाठीपदाचा प्रभार घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारामुळे प्रभावित झालेले रणनवरे महाराजांनी या गावात राष्ट्रसंताच्या विचारांची पेरणी करण्यास प्रारंभ केला.
रणनवरे, चव्हाण, सरपंच संतोष टाके व प्रकाश राऊत यांनी गावात दारुबंदीच्या उपाययोजना आखण्यास सुरवात केली. त्यात महिलांची भूमिका खूप महत्तवाची ठरणारी होती. त्यासाठी गावातील विविध बचतगटांतील, पण जिद्दी व कठोर हृदयाच्या २० महिलांच्या हाती दारूबंदीची हा प्रयोग सोपविला.
चार महिन्यापूर्वी गावात ३८ दारुच्या भट्ट्या होत्या. पण महिलांनी पदर खोचला आणि थेट दारुभट्ट्यावर धाड टाकायला सुरवात केली. काहींना समजुतीचा सल्ला, काहींनी धमकी, तर काहींना पोलिसांच्या स्वाधीन केले आणि गावात शंभर टक्के दारुबंदी केली. दारूबंदीमुळे दाभळी (बोरगाव) हे गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आले आहे.
No comments:
Post a Comment