अंध मुले, मुली यांच्या जीवनात प्रकाशाचा किरण पसरवण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. अंध म्हणून जीवनात दु:खी न राहता त्यांना माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल ब्लाईंड स्कूल सुरु करुन जीवनाचा नवा तेजोमय प्रकाश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे प्रायोगिक तत्वावर मोबाईल ब्लाईंड स्कूल सुरु झाले असून हळूहळू जिल्ह्यातील १५ तालुक्यातही हे स्कूल सुरु होणार आहे. मुलांना शाळेत आणण्याऐवजी या प्रकल्पांतर्गत शाळा त्यांच्या घरापर्यंत नेण्यात येणार आहे.
या शाळेची मूळ संकल्पना चेन्नई येथील विद्यावृक्ष संस्थेची आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाची जबाबदारी नॅबने उचलली असून जिल्ह्याच्या समन्वयक म्हणून निरजा संगमनेरकर काम पहात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन स्तरावर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु आहे. तालुक्यात ३०० ते ३५० गावे आहेत. एकाच वेळी या गावाचे सर्वेक्षण सुरु असून त्यावेळी ६ ठिकाणी शाळा सुरु झाली आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणासाठी सर्व शिक्षा अभियानाशी समन्वय साधला जात आहे. त्याशिवाय घरातील व्यक्तींबरोबरच तेथील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, शाळा यांच्याशी संपर्क साधला जातो आहे. यात ५ वर्षापर्यंतच्या अंध मुलांना शोधून त्यांना शाळेच्या वतीने पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंत १०० गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
शंभर गावांमध्ये सापडलेल्या ज्योती शिंदे-मुळेगांव, मनोज गायकवाड-तळवाडे, देवीदास उघडे-वेळुजे, सौरभ शिंदे-लव्हाळी पाडा (वाधेरा) आणि तुकाराम शेवरे (खरवळ ) या ६ अंध मुलांची शाळा सुरु झाली आहे. ३ दिवस शाळा आणि ३ दिवस सर्वेक्षण असे वेळापत्रक आहे.
या शाळेत या मुलांना शाळापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना ब्रेल किट देण्यात येत आहे. या किटमध्ये बाराखडी असलेली एक पाटी आहे. ज्यात सामान्य बाराखडी आणि त्याखाली ब्रेलमधील बाराखडी आहे. ज्यावरुन त्यांना अक्षर ओळख करुन देणे सुरु आहे. याच किटमध्ये स्टायलस म्हणजे लेखक पाटी आहे. जिच्या मदतीने या मुलांना लिहायला शिकवले जाणार आहे. यातच गणित पाटीदेखील आहे. मोठी गणिते शिकवण्यासाठी अबॅकसचा आधार घेतला जाणार आहे. या मुलांची पहिलीला शाळेत जाण्यासाठीची पूर्ण तयारी करुन घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त या मुलांना मूलभूत प्रशिक्षण देखील दिले जाते आहे. ज्यात वैयक्तिक स्वच्छता, स्वावलंबन, संवाद कौशल्य शिकविले जात आहे.
याच्या व्यतिरिक्त शाळेसाठी या मुलांच्या कागदपत्राची तयारीदेखील पूर्ण केली जाणार आहे. यात सिव्हिल सर्जनचे त्यांच्या अंधत्वाबद्दलचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला व शाळेसाठी लागणाऱ्या अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. पालकांमध्ये जागरुकता वाढविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. पालकांमधील जागरुकता वाढवून मुलांची घरी उजळणी करुन घेण्यासाठी त्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. हा प्रकल्प जरी ४ ते ५ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी राबवला जात असला तरी सर्वेक्षणात जर यापेक्षी मोठी मुले आढळली तर त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उदाहरणार्थ ज्योती भोरु नावाची साडेनऊ वर्षाची मुलगी अद्यापही शाळेत गेलेली नाही. तिला नॅबच्याच विशेष शाळेत दाखल करण्यात आले असून तिची अक्षर ओळख सुरु झाली आहे.
चेन्नई येथील संस्थेतर्फे एक गाडी नॅबला देण्यात आली आहे. तिचेच सध्या शाळेत रुपांतर केले जात आहे. या गाडीतच एक वर्ग तयार केला जाईल. त्यात अंध मुलांना शिकविण्यासाठीच्या आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या आहेत. महिनाभरात हे काम पूर्ण होईल. सध्या ६ मुलांना त्यांच्या घरी शिकवले जाते. गाडीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही मुले गाडीतल्या शाळेतच शिकतील. मुलं शाळेत येण्याऐवजी अशा पध्दतीने शाळाच त्यांच्या दाराशी जाईल. त्र्यंबकेश्वर नंतर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असून प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षाचा राहील.
No comments:
Post a Comment