विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाट परिसरातील निसर्ग सौदर्याने बहारलेल्या पर्वतरांगा आणि येथे सतत पडत असलेल्या पावसामुळे भिमकुंडासह विविध आकर्षक धबधब्यांचा मनोहारी व रोमांच अनुभवणासाठी पर्यटकांची चिखलदऱ्याला पहिली पसंती ठरत आहे.
चिखलदरासह मेळघाटच्या विविध भागात मागील चार दिवसापासून सततधार पाऊस पडत असल्यामुळे वातावरणातही बदल झाला असून संपूर्ण दिवस चिखलदरा नगरी खुक्याच्या आच्छादनाखाली राहत असल्यामुळे पावसाळी पर्यटनाचा अनुभव पर्यटकांसाठी एक सुखद आणि रोमांचकारी अनुभव ठरत आहे. मागील दोन दिवसात प्रत्येकी ६६ ते ७० मी.मी पावसाची नोंद झाली असून अहोरात्र पाऊस पडत असल्याने सूर्यदर्शनही होत नाही. आणि सकाळी ६ वाजल्यापासून रिमझम पावसात सोबत धुक्यातून मार्ग शोधत पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी दऊन तेथील ओल्या चिंब वातावरणात निसर्गाचा आनंद घेतात. चिखलदऱ्यात जुलै महिन्यात २९० िम.मी पावसाची नोंद झाली आहे.
चिखलदऱ्यातील आकर्षक धबधब्यांमध्ये सर्वात आकर्षण असलेला भिमकुंड येथील धबधबा उंच कड्यांवरुन खोल दरीत कोसळताना पाहताना रोमांच निर्माण होतो. भिमकुंड धबधबा पहिल्यांदाच आपल्या प्रचंड जलधारेसह दरीत कोसळताना पाहणे हा आनंद अनुभवने ही घटना मनाला मोठी आनंद देऊन जात असल्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यासह विविध राज्यातून निसर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. भिमकुंडाच्या या मनोहारी व रोमहर्षक धबधबा पाहण्यासाठी प्रचंड कोसळणाऱ्या पावसात व अतिवेगवान वाऱ्याची पर्वा न करता भिमकुंडाजवळ पोहोचलो आणि येथील दृष्य म्हणजे निसर्गाने दिलेले अप्रतिम आणि मनोहारी दृष्य पाहून आनंदीत झालो. हा धबधबा पाहताना काळ, वेळ आणि परिस्थितीचीही पर्वा न करता संपूर्ण दिवस याच परिसरात राहून निसर्गाच्या या अद्भुत दृष्याचा अनंद घेतला. हाच आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत होते. यामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय होती.
भिमकुंड म्हणजे निसर्ग सौदर्याचे रौद्य स्वरुप व्यक्त करणारे ठिकाण.चिखदरापासून ३ कि.मी असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पोहचल्यानंतर ३ हजार ५०० फूट खोल दरीत धो-धो पाण्याच्या धारा पडत असतात. दरीच्या सुरुवातीची खोली जवळपास १५५ फूट आणि पुढे ती १ हजार ५०० फूट खाली जलधारा कोसळत असतात. या कोसळत जलधाराचा आवाज आणि उंच उडणारे फवारे अनुभवताना मनाचा थरकाप होत असला तरी निसर्गाचे मनोहारी रुपही न्याहाळताना मन अगदी प्रफुल्लीत होते. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात हा धबधबा पाहाणे म्हणजे पावसाळी पर्यटनाचा सर्वोच्च आनंद घेण्यासारखेच आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या विविध आकर्षक धबधब्यामध्ये बकादरी, कलाल कुंड, देवी पॉईंन्ट, पंचबोल, जत्राडह आदी ठिकाणचे प्रमुख धबधब्यासह विविध छोट्या मोठ्या उंच पर्वतरांगावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा आंनद व येथील निसर्ग सौदर्य मनाला आनंद देऊन जाते. तसेच संपूर्ण मेळघाट परिसर हिरव्या शालूने सजलेला पहाणे एक अपूर्व मेजवानीच ठरते. मेळघाटच्या निसर्ग सौदर्य आणि पावसाळी धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मेळघाटकडे वळताना दिसतात.
मेळघाटच्या निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच येथील मनोहारी व आकर्षक धबधबे पाहण्यासाठी जाताना पर्यटन विकास महामंडळाने तसेच चिखलदरा नगरपरिषदने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन पर्यटनाचा आनंद सर्वांनाच घेता येईल परंतु पावसाळ्यात या परिसरात पर्यटक भेट देताना अतिउत्साहामुळे अगदी धोक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचतात आणि दुर्घटना घडतात. अशा घटना सहज टाळता येणे शक्य आहे. यासाठी स्वत:च्या उत्साहावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. भिमकुंड परिसरातील धबधबा पाहताना पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. निसर्गाचा आनंद घेताना आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
पावसाळ्यात चिखलदरा व मेळघाटच्या निसर्ग सौदर्याचा व विविध धबधब्यांचा मनसोक्त आनंद घ्या आणि चिखलदऱ्याला भेट द्या.
अनिल गडेकर
अमरावती जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटापर्यंत बालकांमध्ये असलेल्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात ९२४ ग्रामबाल विकास केंद्र सुरु करण्यात आली असून कुपोषण श्रेणीत असलेल्या सर्व बालकांना ३० दिवस विशेष काळजी घेण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५६ हजार ७३० बालके असून या सर्व बालकांच्या आरोग्याची व कुपोषणाची काळजी घेण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत गाव पातळीवर ग्राम बाल विकास केंद्र सुरु झाल्यामुळे बालकांच्या आरोग्याची तसेच पोषणाची नियमितपणे तपासणी होत असल्याने बालकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे त्याचे चांगले परिणामही दृष्टीस पडत आहे.
मेळघाटसह जिल्ह्यातील बालकांची पोषणस्थिती सुधारुन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता एकात्मिक बालकविकास सेवा योजना तसेच आरोग्य विभागातर्फे गाव पातळीवर ९२४ ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत सप्टेंबर २०१० पासून या केंद्रांमध्ये ८ हजार २७३ बालकांवर विशेष उपचार करण्यात आले असून ३० दिवसाच्या उपचारानंतर ७ हजार ११३ बालकांच्या वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्रांमध्ये प्रत्येक गावातील सर्वच बालकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांच्या वजनाच्या नोंदीही ठेवण्यात येतात.
जिल्ह्यातील सर्व बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता ग्राम बाल विकास केंद्रात वैद्यकीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडी केंद्र स्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामध्ये बालकांना ३० दिवस ठेवण्यात येऊन दिवसातून ८ वेळा आहार देण्यात येतो. तसेच बालकांच्या मातांना बालकांचा आहार, आहाराची नियमितता, पोषण आहारामध्ये असलेले घटक तसेच आरोग्य व संगोपनाबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.
ज्या केंद्रांमध्ये बालकांच्या वजनामध्ये वाढ दिसून येत नाही अशा बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या बाल उपचार केंद्रात २१ दिवस दाखल करण्यात येते. अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली विशेष उपचार व आहार देण्यात येतो.
यामध्येही सुधारणा न झाल्यास ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच बाल रोग विशेष तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात येतात.
अमरावती जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्राची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण १ लाख ५६ हजार बालकांची तपासणी केली असता तीव्र कमी वजनाची तसेच कमी वजनाच्या सर्व बालकांना औषधोपचार व आहार नियमित सुरु आहे.
या बालकांपैकी उंची व वजनाचे प्रमाणे गृहित धरल्यास सॅमची ९०४ बालके असून मॅमची ५ हजार ७५७ ऐवढी बालके आहेत. या सर्व बालकांची पोषणस्थिती सुधारुन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाला यश आले आहे.
कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सर्व बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती रिचा बागला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. पराडकर,उप मुख्य कार्यकारी अधिकरी बी.जी. सोमवंशी विशेष कार्यक्रम राबवित आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष संतोष महात्मे, आरोग्य समितीचे सभापती बाळासाहेब वानखडे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण भागात बाल आरोग्याबाबत विशेष जागृती अभियान राबविण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळे कुपोष्ाणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व बाल आरोग्याच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातील पालकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावातील बालकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्कतेने कार्यरत असल्यामुळे बालकांच्या आरोग्याचे रक्षण करणे सुलभ झाले आहे.
अनिल गडेकर
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांच्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात स्त्री भ्रृणहत्येमुळे मुलींचा जन्मदर एक हजाराला ८४२ पर्यंत घसरला आहे. या भयावह प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने सामाजिक विचारवंतानी एकत्र येऊन स्त्री भ्रृणहत्ये विरोधात डॉ. पडघान दाम्पत्यांच्या पुढाकाराने मुलगी वाचवा बुलडाणा जिल्हा मंच स्थापन करण्यात आला.
या अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली, कन्याज्योत कार्यक्रम, स्वातंत्र्य दिनी प्रत्येक गावात फोरमची स्थापना तसेच ५ सप्टेंबर पासून युवा विद्यार्थी चेतना आंदोलन राबविण्यात येणार आहे. या मंचच्या नुकत्याच बुलडाण्यात झालेल्या बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातून वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक, महिलांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी तसेच पत्रकार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बैठकीला कोणी अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणा नव्हता, सर्वच आले ते मुलगी वाचली पाहिजे या भावणेने.
१६ जुलै रोजी या अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी बुलडाणा शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्वारुढ जिजाऊ, अहिल्यादेवी, ताराबाई शिंदे, झाशीची राणी यांची वेशभूषा परिधान केलेल्या मुलींनी रॅलीचे नेतृत्व केले.
एका ट्रकवर मुलींच्या जन्मानंतर तिच्यासाठीचा पाळणा ठेवण्यात आला होता. वेगवेगळ्या वाहनावर गोंधळी, कलापथक, भारुड, वासुदेव, भजणी मंडळ सहभागी झाले होते. कर्तबगार महिलांचे विविध रुप साकारणाऱ्या मुली, डॉक्टर्स, वकील, खेडाळू अशा विविध रुपातील लेकी या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. हातात, मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे वेगवेगळे फलक, स्त्री भ्रृणहत्येच्या विरोधातील घोष वाक्य लिहिलेले पोस्टर हातात घेऊन १० हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी, समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेला बुध्दीजिवी वर्ग प्रथमच रस्त्यावर उतरला असल्याचे रॅलीमध्ये पाहायला मिळाले. विविध सामाजिक संघटना, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, कर्मचारी संघटना, लोक कलावंत, पत्रकार, युवा संघटना यामध्ये स्वयंस्फुतीने सहभागी झाल्याने संपूर्ण शहर दणाणून गेले.
जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेऊन प्रसुतीपूर्व लिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे धडक तपासणी मोहिम राबवून एकाच दिवशी ६१ सोनोग्राफी आणि ४७ गर्भपात केन्द्राची तपासणी केली. या तपासणीत तृटी आढळलेले ८ गर्भपात केंद्र आणि ५ सोनोग्राफी केंद्र सिल करण्यात आले, तर ८ सोनोग्राफी आणि २ गर्भपात केद्रांना नोटीसा बजावण्यात आल्या.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होणार आहे. यापुढे मुलींच्या जन्माचे बॅण्डबाजा वाजवून आणि साखरपान वाटून
बचतगटामुळे महिला अभ्यासू, बोलक्या झाल्या, एवढेच नव्हे, तर दु:खामधून सावरण्याची शक्ती त्यांना आली. आज बचतगटाच्या माध्यमाव्दारे सर्वच व्यवसाय महिला यशस्वीपणे करायला लागल्या. महिलाजवळ पैसा जमा करण्याची जिद्द निर्माण झाली. अगदी तशीच जिद्द पैसे फेडण्याची झाली. पुरुषापेक्षा महिला या बचतगटाच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय सुरु करुन घेतलेले कर्ज लवकर फेडण्याची ताकद सुध्दा दाखवु लागल्या.
बचतगटाच्या माध्यमातून महिला अन्यायाविरुद्ध रस्त्यावर आल्यात. आपली ताकद दाखविण्यात कमी पडल्या नाही. दारुबंदीसारखे निर्णय घेऊ लागल्या. सर्व गोष्टीतून महिला मागे न हटता पुन्हा त्याच जोमाने बचतगटाच्या माध्यमातून काम करीत आहे. गावातील पिण्याच्या पाण्यासारखा प्रश्न बचतगटाच्या महिलांनी सोडविला.
महिलांनी कितीही उंच भरारी घेतली तरी त्यांचे सगळे लक्ष आपल्या मुलांकडे असते. अनेक सुप्त गुण असूनही वेळप्रसंगी तिला चार भिंतीतच राहावे लागते. पण बचतगटाच्या माध्यमातून त्या चारभिंतीतच राहून रोजगार न करता. चारभिंतीपल्याडही पाऊल टाकू न देता व्यवसाय करु लागल्या त्याला अपवाद आहे त्या महादुर्गा बचतगटाच्या महिला.
नागपुर जिल्हयातील सुरेन्द्रगड येथील उर्मिला भुजाडे यांनी १० महिलासह मिळुन महादुर्गा नावाचा बचत गट तयार केला. आपण काही तरी केले पाहिजे, असा विचार सर्वांनी व्यक्त केला. सर्वांच्या विचारातून १ जानेवारी २००५ रोजी बचत गटाची स्थापना झाली. अध्यक्ष म्हणून श्रीमती उर्मिला शेषरावजी भुजाडे यांची एकमताने निवड झाली. महिलांच्या बैठका होऊ लागल्या.
दरमहा प्रत्येकी ५० रुपये बचत करण्याचा निर्णय झाला. नागपूरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी खाते उघडले. सुरुवातीलाच त्यांनी अंगणवाडयाचे खिचडी बनविण्याचे ठेके घेतले. त्याबरोबरचं आणखी व्यवसाय सुरु करायचा ध्यास त्यांच्या मनात आला, व्यवसाय कोणता करावा? यावर बैठकीत चर्चा झाली. अन्य बचत गटाची माहिती घेतली. व्यवसाय करायचा तर यश मिळालाच पाहिजे. महिलांनी आपापले विचार व्यक्त केले. बचतगटाच्या माध्यमातुन चा व्यवसाय सुरु शिवणकामाचा व्यवासाय करायचा निर्णय या महिलांनी घेतला,
या गटाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला भुजाडे सांगत होत्या. व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना भांडवलाची गरज होती, प्रशिक्षणाची, साधनसामुग्रीची आवश्यकता होती. पैशाची जुळवाजुळवं कशी करावी, असा प्रश्न आमच्यासमोर उभां होता. शेवटी महानगरपालिका नागपूर मार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया नागपूर शाखेकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. बॅकेने चक्क ५० हजार रुपये मंजूर केले.
कर्जाच्या रक्कमेतुन २ पिको फॉल मशीन आणि ५ शिवणकामाच्या मशीन विकत घेतल्या, सुरुवातीला प्रशिक्षणार्थ्यांकडून शिवणकाम शिकुन शिवणक्लासेस चालविण्यात आले. आणि त्यानुसार महादुर्गा बचतगट प्रशिक्षणसंस्था सुरु केली. तसेच या संस्थेत शिवलेल्या कपडयांना बाजारपेठ लाभली असुन ८ ते १० हजार रुपये प्रति महिना आम्ही घरबसल्या कमवू लागलो. गटाला ३० हजार ५०० रुपयांचा नफा मिळाला. त्यातून २० हजार रुपयांची बँकेची कर्ज वसुली नियमितपणे भरली आहे.
व्यवसाय कुठलाही असो, तो जिद्दीने करावा लागतो. महिलांमध्ये एकोपा असणे आवश्यक असते. मिळालेल्या नफ्याचा घर चालविण्यासाठी खूपच फायदा होतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
म्हणूनचं बचतगट हा महिलांसाठी आधारगट बनलेला असुन त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कविता फाले

नामवंत चित्रकार रावसाहेब एम व्ही धुरंधर यांच्या कन्या अंबिका धुरंधर यांनी आपल्या वडिलांचा वारसा सार्थपणे चालवला. रावसाहेब धुरंधर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डायरेक्टर होते. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेचं उत्तम भान जागावं यासाठी ते मनापासून धडपडत. त्यांची कन्या अंबिका हीसुद्धा एक उच्च दर्जाची चित्रकार. जे. जे.चा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली विद्यार्थिनी बनण्यचा मान त्यांच्याकडे जातो. वडिलांमुळे त्यांना कलाजगताची आतबाहेरून ओळख झाली. ब्रिटिशकालीन संस्थानिकांच्या पारंपरिक व आधुनिक कलाभिरुचीचा स्पर्श असलेल्या वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर घडले. कलाशिक्षणाच्या संदर्भातील सुवर्णयुग मानल्या गेलेल्या काळाच्या अंबिकाबाई महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. वडिलांच्या बरोबर चित्रकलेच्या अध्ययनानिमित्ताने देशभरात त्यांना प्रवास करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने कलावंत, कलाप्रेमी आणि जाणकार व्यक्तींचा सहवास लाभला. संस्थानिकांच्या संग्रहातील दुर्मिळ कलाकृती पाहण्याचे भाग्यही त्यांना लाभले. १९३० व त्यापुढील दशकातील कालखंडात मौजूद असलेल्या कलाजीवनाची झलक टिपणारं लेखन अंबिकाबाईंनी केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सहवासातील अनेक व्यक्तींच्या आठवणी त्यांनी लिहिल्या होत्या. या लेखांचा संग्रह अलीकडेच ‘माझी स्मरणचित्रे’ या नावाने मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. ९५ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या अंबिकाबाईंच्या हयातीत मात्र हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही.
एका विशिष्ट कालखंडातील कलाजीवन आणि समाजजीवन यांचा सुंदरसा आलेख या पुस्तकातून वाचायला मिळतो. ‘बनारसची अभ्याससहल’, ‘भोपाळचे भावबंधन’, ‘छोटा उदेपूरचा नबाबी थाट’! अशी शीर्षकं असलेल्या लेखांमधून त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा आणि तिथे भेटलेल्या व्यक्तींचा परिचय त्यांनी करून दिला आहे. तर रावबहादूर धुरंधर, शिल्पकार रघुनाथ फडके, बालगंधर्व यांच्या सहवासाच्या मनोज्ञ आठवणीही जागवल्या आहेत.
कलाजगतात वावरताना एक स्त्री म्हणून अंबिकाबाईंना कसे अनुभव आले, एक चित्रकार म्हणून त्यांचा अनुभव काय राहिला हे सारं या लिखाणातून उलगडत जातं. एक कलाशिक्षक आणि कलावंत म्हणून धुरंधरांचं असलेलं स्थान व विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर, गुरुशिश्यामधील कौटुंबिक स्वरूपाचं नातं याच्या साक्षीदार बनून अंबिकाबाई वाचकाला त्याबद्दल सांगतात. बनारसला गेलेल्या अभ्याससहलीने पुस्तकाची सुरुवात होते. सहकुटुंब बनारसला गेलेले धुरंधर आणि एका कुटुंबाप्रमाणे तिथे झालेलं साऱ्यांचं वास्तव्य, त्यातील गंमत, वेगळेपण आणि खुमारी यांचं वर्णन लेखिकेने छान पद्धतीने केले आहे. भोपाळच्या संस्थानी नबाबी वातावरणातला थाट, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनाची झलक, गोषात असलेल्या नबाबाच्या सुनांचा बुरख्यातच काढलेला फोटो अशा वेगवेगळ्या आठवणी यात आहेत. छोटा उदेपूरचाही माहौल नबाबी. तिथे आपल्या राजवाड्यातील युरोपातील म्युरल पेंटिंग्जच्या धर्तीवर भित्तिचित्रे करून घेण्याची कल्पना साकार करण्यासाठी रावसाहेब धुरंधर सहकुटुंब तिथे गेलं होतं. त्याचवेळी राजन्येचा विवाह असल्याने शाही विवाहसोहळा बघायला मिळाला. तिथल्या वास्तव्यात गप्पा, गाणी रंगत. चित्रांच्या व्यवहारात दलाली करणाऱ्या मंडळींचे फसवणुकीचे अनुभवही आले. सरळ मनाच्या धुरंधर यांना त्यामुळे मनस्ताप झाला.
औंधच्या संस्थानातील कलेचं शिक्षण आणि संवर्धन अंबिकाबाईंना प्रभावित करून गेलं. युवराज्ञी अक्कासाहेब यांना कलाशिक्षण देण्यासाठी धुरंधर गेले होते. अत्यंत कलानिपुण आणि रसज्ञ अशा अक्कासाहेब शिवण, भरतकाम यातही तरबेज होत्या आणि साहित्यप्रेमीही. त्या पुढे युरोपातही शिकून आल्या पण त्यांची एकही कलाकृती आपणास पाहायला मिळाली नाही, अशी खंत अंबिकाबाईंनी व्यक्त केली आहे. औंधप्रमाणे बडोदा संस्थानातील अनुभवही यात येतात. तेथील संस्थानाचा हीरकमहोत्सव होता त्याप्रीत्यर्थ अंबिकाबाईंना निमंत्रण होतं. तिथल्या सरकारांना आहेर करण्याचा प्रसंग अंबिकाबाईंनी रंगवून लिहिला आहे. पालनपूरच्या राजघराण्याशी संबंध अंबिकाबाईंचा संबंध आला तो धुरंधर यांच्या निधनानंतर. त्यांचा चित्रसंग्रह सांभाळणं ही समस्याच असल्याने, पालनपूरच्या नबाबांनी ती घ्यावी या हेतूने त्या तिथे गेल्या होत्या. दुसरं महायुद्ध संपतानाचा हा काळ होता. चित्रं लावून घेण्याचं कामही अंबिकांनाच करायचं होतं. तिथे लॉर्ड माउंटबॅटन येणार होते. त्यांची ओळख नबाबसाहेबांनी करून दिल्याची आठवण अंबिकाबाईंनी दिली आहे.
एकूणच संस्थानिकी आणि नबाबी वातावरण, संस्कृती आणि रीतिरिवाजांचा तपशील तसंच तेथील वस्त्रप्रावरणांपासून दागदागिन्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांच्या वर्णनांपर्यंत बारीकसारीक गोष्टी अंबिकाबाई यात कलावंताच्या नजरेने नोंदवतात. सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक भान यांनी ही सारी प्रकरणं सजलेली आहेत. अत्यंत चित्रमय शैलीत हे लेखन झालं आहे.
वडील रावसाहेब धुरंधर आणि शिल्पकार फडके यांच्या हृद्य आठवणी तर अंबिकाबाईंनी अत्यंत आस्थेने आणि मार्मिक शब्दांत लिहिल्या आहेत. धार संस्थानात वास्तव्य करणारे फडके उत्तम चित्रकार आणि संगीतज्ञ होते. त्यांची दहाबारा पानं लांबीची पत्रं येत व त्यातून अंबिकाबाईंना विविध कला व साहित्यप्रकारांबद्दल नवनव्या गोष्टी कळायच्या. बालगंधर्वांनाही त्यांनी पाहिलं होतं. एकदा पुरुषवेशात अचानक घरी आलेल्या बालगंधर्वांना आपण कसं ओळखलंच नाही ती आठवणही त्यांनी यात दिली आहे. बालगंधर्वांची विविध रूपं वर्णन करतानाच अंबिकाबाई त्यांच्या आयुष्यातील गोहरबाईपर्वाकडे निखळपणे आणि तटस्थ नजरेने बघतात.
चित्रकलेशी संबंधित असलेल्या या पुस्तकात रावसाहेब व अंबिका धुरंधरांच्या चित्रांची व त्यांची स्वतःची रंगीत छायाचित्रंही आहेत, त्यामुळे तत्कालीन कलेच्या नमुन्याची झलकही वाचकांना अनुभवता येते. चित्रमय आणि वास्तवदर्शी लेखनाचा उत्तम असा नमुनाच या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर आला आहे. विशिष्ट कालखंडातील चित्रकलेचा इतिहास या लेखनातून जागा होतो, तसंच त्या काळातील समाजाचं, सांस्कृतिक वातावरणाचं आणि रीतीरिवाजांचं दर्शनही घडतं. एका संवेदनशील आणि मर्मज्ञ चित्रकर्त्रीच्या लेखणीतून उतरलेली ही स्मरणचित्रं खरोखरीच संस्मरणीय आहेत.
नंदिनी आत्मसिध्द
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कतृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट यांच्या सभा सुरू होण्यापूर्वी शाहिरांचे डफ खणखणायचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवे उधाण यायचे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज १८ जुलै रोजी स्मृतिदिन. या स्मृतिदिनी अण्णाभाऊंच्या कार्याची दखल घेणे आवष्यक आहे. मराठी मातीत 'लोकनाट्य` हा शब्द सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांनी रुजवला व वाढवला. अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रचारक होते. त्यांनी पक्ष प्रचारासाठी तमाशा रंगभूमीचे माध्यम निवडले. अण्णाभाऊंनी जी वगनाटय़े निवडली त्यांना तळागाळातील मजुरांचा, शेत मजुरांचा, कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णाभाऊंच्या या वगनाटय़ांना 'नवे तमाशे` या नावाने एक नवी ओळख मिळाली.
मराठी साहित्य परंपरेत अण्णाभाऊंनी जवळजवळ सर्वच महत्त्वपूर्ण साहित्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे हाताळला. कविता, लावण्या, शाहिरी, वग, लोकनाटय़ांपासून कथा, कादंबरी, प्रवास वर्णनात्मक लेखनापर्यंत आपला व्यापक ठसा उमटविला. त्यांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेले नायक विपन्नावस्थेत असूनसुद्धा लाचार ठरत नाही. तर अत्यंत दणकट जीवन व्यक्त करतात. जगण्यातील संघर्शाला मूल्यात्मक करतात. कारण असे म्हणतात की, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, या म्हणीप्रमाणे अण्णाभाऊंनी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती केलेली आहे. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी गिरणी कामगार म्हणून जीवन व्यतित करायला सुरुवात केली. मातंग समाजातील अण्णाभाऊ अठराविष्व दारिद्र्य घेऊन जन्माला आले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णाभाऊंनी हमाल, बुटपॉलीशवाला, घरगडी, वेटर, डोअरकीपर, क़ुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळवणारा, उधारी वसूल करणारा अशी वेगवेगळय़ा प्रकारची कामे केली, यावरून अण्णाभाऊंचे जीवन किती कश्टमय होते याची आपल्याला प्रचिती येते. दीड दिवसाची षाळा षिकणारे अण्णाभाऊ, चित्रपटांच्या पाटय़ा आणि रस्त्यावरील दुकानाच्या बोर्डावरील अक्षरे जुळवीत निरक्षर असलेले खर्या अर्थाने साक्षर आणि त्यातूनच त्यांना वाचनाची आवड लागली. वाटेगावमधील जीवन हे अतिषय कश्टमय जीवन अण्णाभाऊ जगले.
गिरणी कामगार म्हणून रुजू झाल्यानंतर मोर्चा, सभा-सत्याग्रह या सर्वांषी त्यांचा परिचय झाला. अचानक गेलेल्या नोकरीमुळे या सर्व गोश्टींवर पाणी सोडून पुन्हा वाटेगावात राहणे त्यांना षक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या तमाषात प्रवेष केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळीही अण्णाभाऊंनी जनजागृतीची प्रचंड कामे केली.
अण्णाभाऊंची काही कवने अषाप्रकारे -
१) प्रथम मायभूच्या चरणा।
छत्रपती षिवना चरणा।
स्मरोनि गातो कवना।
२) जग बदल घालूनी घाव।
सांगून गेले मला भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात।
रुतूनी बसला का ऐरावत।।
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनी वरती धाव।
सांगून गेले मला भीमराव।।
३) पाहा बेटावर वस्ती बसविली चौभोवती
जषी रावणाची लंका
दुसरी कोणी कोणाला पुसती
४) मुंबई नगरी बडी बाका
जषी रावणाची दुसरी लंका
वाजतो डंका चहू मुलखी
५) मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती
परळात राहणारे रात दिवस राबणारे
मिळेल ते खाऊनिया घाम गाळती
६) माझी मैना गावाकडे राहिली
माझ्या जिवाची होतेया कायली
लौकिकार्थाने कोणतेही षिक्षण न घेता साहित्यक्षेत्रात जगप्रसिद्ध झालेले अण्णाभाऊ दुदैवी संघर्शामुळे खचत गेले. त्यांच्या षेवटच्या काळात महाराश्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचलेल्या अण्णाभाऊंचे १८ जुलै १९६९ रोजी दुदैवी निधन झाले. म्हणून हा स्मृतीषेश.
डॉ.प्रकाश खांडगे
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि त्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विना विलंब, विना तारण आणि विना जमीन असा क्रांतिकारी मदतीचा हात देऊ केला आहे. या सोनेरी संधीचा रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या धाटाव शाखेचे व्यवस्थापक चंद्रकांत पराते यांनी केले आहे.
भात शेतीच्या कामाची सुरुवात चिखळणीपासून केली जाते. भाताची लागण केल्यानंतर भाताचे पिक जोमात येते. सुगीच्या दिवसांत शेतात उगवलेले डोमदार भात कापून त्याचे भारे बांधण्यात येतात. या भाऱ्यांची नंतर मळणी केली जाते. या मळलेल्या भाताची घरापर्यंत उपलब्ध साधनांद्वारे वाहतूक केली जाते. घरात आलेला भात कणग्यांत भरुन पुढील वर्षभराच्या वापरासाठी ठेवला जातो. चिखळणीपासून ते भात कणगीत भरेपर्यंतचा खर्च एकरी बारा हजार येतो, असा नाबार्डचा दावा आहे. शेतकऱ्यांची शेती अनेक खंडीची असेल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुस्थितीत असेल तर त्या शेतकऱ्याला एकरी वीस हजार रुपये मदत मिळते, अशी माहिती श्री. पराते यांनी दिली.
किसान क्रेडिट कार्ड ऊर्फ पीक कर्ज योजना या नावाने राष्ट्रीयकृत बँकेने सुरु केलेल्या योजनेचा मूळ व्याज दर हजारी नऊ टक्के असा आहे. परंतु शेतकऱ्यांनी सदर कर्जाची फेड जर मुदतीत केली तर त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे तीन टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शिवाय पंजाबराव देशमुख कृषी योजनेतून सुद्धा ४ टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यावर फक्त २ टक्के व्याजाचा बोजा पडणार आहे.
या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मतदान कार्डाची झेरॉक्स, सातबारा व ८ अ चा उतारा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत घेऊन गेल्यास त्यांना विना विलंब किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकतो.