मी प्रियंका डोंगरे. लाखोरी येथील कनिष्ठ महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत शिकतेय. माझे गाव परसोडी. मी शिकत असलेल्या महाविद्यालयापासून परसोडी 10 किलोमीटर अंतरावर आहे. इयत्ता 8 वी पासून मी रोज या शाळेत सायकलने जाते. रोज 20 किलोमीटर सायकल चालवावी लागल्यामुळे माझा बराच वेळ जातो. भर पावसात, कडाक्याच्या थंडीत तर कधी रखरखत्या उन्हातही वेळेत शाळा गाठावी लागते. पण मी कधीही शाळा बुडवली नाही की, अभ्यासाचा कंटाळा केला नाही. मला इंजीनीयर व्हायचंय. त्यामुळे मी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. पण माझ्या आईला मात्र मी घरी जाईपर्यंत माझी काळजी लागलेली असते. कारण माझ्या गावातुन मी एकटीच या शाळेत जाते. इतर मुलींनी 7 वी नंतर शाळा सोडून दिली आहे. पण यावर्षी मात्र माझा हा सर्व त्रास कमी झाला आहे तो हया निळया बसमुळे ! मी आता अभ्यासाला सुध्दा जास्त वेळ देवू शकते. शिवाय आईला सुध्दा माझी काळजी राहत नाही.
भंडारा जिल्हयाच्या लाखनी तालुक्या तील परसोडी या छोटया गावातील प्रियंका डोंगरे या विद्यार्थींनीची ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीव करून देणारी. शासनाच्या मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मुलींसाठी खास बससेवा सुरु करण्यात आली आहे.या बसमुळे प्रियंका सारख्या शिक्षणाची आवड असणा-या अनेक मुलींना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम या बसेस मुळे झाले आहे.
महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहे. 12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिली आहे. तरीही ग्रामीण भागातील मुलींचे इयत्ता सातवी नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण मोठे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात 10 ते 15 गावांकरिता एक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेपासून गावाचे अंतर साधारणत: 3 ते 15 किमी एवढे आहे. सर्वच गावांना एस.टी.ची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी कोणतेही साधन नाही. तसेच आईवडील मुलींना गावापासून दूर असणाऱ्या शाळेत एकटीला पाठवायला तयार नसतात. यामध्ये मुलींच्या सुरक्षेची काळजी हा त्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेचा विषय असतो. या दोन्ही कारणामुळे ग्रामीण भागातील बऱ्याचशा मुली 8 वी पासून पुढचे शिक्षण घेवू शकत नाहीत. म्हणुनच सर्व मुलींना इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या 22 जिल्हतयातील 125 तालुक्यांकरिता मुलींसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या बसेस सुरु केल्या आहेत. या बसेस गाव ते शाळा या दरम्यान धावतात.
भंडारा जिल्हयात पाच तालुक्यांमध्ये अशा 25 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. लाखनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर आणि साकोली या पाच तालुक्यातील वेगवेगळया 25 मार्गावरुन हया बसेस धावताहेत. ही बस सकाळी 9 वाजता मुलींना घेण्यासाठी निघते. ठरवून दिलेल्या मार्गावरील गावातून मुलींना घेवून बरोबर शाळेच्या वेळेवर त्यांना शाळेत सोडते. तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत त्या-त्या ठिकाणाहून मुलींना घेवून त्यांच्या गावांपर्यंत पोहचवते. यामुळे 208 गावातील 3405 मुलींना याचा फायदा मिळत आहे. मुख्य म्हणजे या मुलींना वेगवेगळया 125 शाळांमध्ये पोहचवण्यात येते. या बसमुळे यावर्षी अनेक मुलींची आठवीनंतरही शाळा सुरळीत सुरु आहे. तसेच सायकलने शाळेत जाणाऱ्या मुलींचे शारिरीक श्रम तर वाचले आहेतच पण त्यांच्या आईवडीलांना वाटणारी सुरक्षेची काळजीही मिटली आहे. ही निळी बस मुलींच्या शिक्षणाला दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
मनीषा सावळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा
No comments:
Post a Comment