Monday, September 10, 2012

कामधेनू योजना


पशुधनाची संख्या कमी होत असून गुणवत्ताही खालावते आहे. म्हणूनच आज पोळा साजरा करताना पशुधनाची आरोग्य तपासणी, लसीकरण असे उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. पशुधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागान सुरू केलेल्या 'कामधेनु दत्तक ग्राम योजनेत' सहभाग घ्यायला हवा.

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 'कामधेनू दत्तक ग्राम योजना' 2010-11 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जनावरांना जंतनाशक औषध पाजणे, गोचिड-गोमाशा निर्मुलन कार्यक्रम, निकृष्ठ चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन, दुग्ध स्पर्धांचे आयोजन, लसीकरण शिबीर, वंध्यत्व निवारण शिबीरे, रक्तजन व रोगनमुने तपासणी आदी कार्यक्रम दत्तक गावात एकत्रित रित्या मोहिम स्वरुपात राबविण्यात येतात.

दुध संकलन केंद्राच्या मार्गावरील आणि पैदासक्षम गाई/म्हशींची संख्या किमान 300 असलेल्या गावाची निवड या योजनेसाठी करण्यात येते. पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील दुधाळ जनावरांची संख्या जास्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येते. गावांची निवड करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पशुगणनेपासून योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात होते. विविध 12 टप्प्यांमध्ये पशुसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येतात. सहा महिन्याच्या कालावधीत योजना पुर्णपणे राबविल्यावर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादनाबाबत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येते. पशुपालकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. योजने अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी एका दत्तक गावाकरिता साधारण दीड लाख रुपयापर्यंत खर्च करण्यात येतो.

यावर्षीदेखील 'कामधेनु दत्तक ग्राम योजना' प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली आहे. पशुपालकांनी स्वत: पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी केल्यास पशुधनाची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल. केवळ योजना कालावधीसाठी असे प्रयत्न मर्यादीत न ठेवता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष दिल्यास येणार पोळा आणखी आनंददायी असेल.


-डॉ.किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी

No comments:

Post a Comment