Friday, September 21, 2012

वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान


हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी संगीता मकरंद यांच्या संकल्पनेतून तयार झालेले वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान जिल्हयातील सामाजिक न्याय विभागातंर्गत  चालणाऱ्या सर्व वसतिगृहांमध्ये  यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळावे, बदलत्या काळानुरुप आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे व शासकीय वस्तीगृहामध्ये सुधारणा होऊन दुर्लक्षित घटकातील हे विद्यार्थी उद्याचे सक्षम व जागरुक नागरिक व्हावे, हा उदेश या अभियानाचा आहे.

दि. 15 ऑगस्ट् 2011 रोजी या अभियानाचा शुभारंभ झाला.  जिल्हयातील एकूण 45 वस्तीगृहांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे. सुमारे 1,608 विद्यार्थ्यांना या अभियानाचा लाभ झाला आहे. अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात भर पडली आहे. या अभियानातंर्गत शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांना सदिच्छा भेटी, विविध स्पर्धांचे आयोजन, योजनांची माहिती आपल्या गावी अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, ग्रामसभा जन जागृती कार्यक्रम, वस्तीगृह आनंद मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता उपक्रम आदी उपक्रम राबविले जातात.  या अभियाना अंतर्गत हिंगोली जिल्हयात विविध कार्यालयांना भेटी व आनंद मेळाव्याचे चाळीस पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचा आत्म्विश्वास वाढला आहे.

वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान हे अभियान कल्याणकारी राज्य म्हणून गौरवण्यात आलेल्या महाराष्ट्रातील मागास घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याच्या शासनाच्या प्रयत्नातील एक महत्वाचे पाऊल ठरले आहे. महाराष्ट्रात प्रथमच  हिंगोली जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या  वसतिगृह विद्यार्थी विकास अभियानाबाबत सविस्तर् माहिती पुढीलप्रमाणे आहे.

वसतिगृह विद्यार्थी विकास अभियानाची संकल्पना - सामाजिक न्याय विभाग, हिंगोली जिल्हयात स्वयंसेवी संस्थांमार्फत 45 वसतिगृह कार्यरत असून या सर्व वसतिगृहात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक वसतिगृहात विद्यार्थी कल्याण समिती  स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या/ शैक्षणिक प्रगती करीता कार्य केल्या जाते व मुलांच्या बाल हक्काविषयी त्यांना जागृत करुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने सोडविण्याचा या कार्यक्रमांतर्गत प्रयत्न केला जातो. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमात सहभागी करुन घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीचे अनुकूल वातावरण तयार करण्यात येते. या सर्व समित्यांचा कालावधी एक वर्षाचा असतो व या कार्यक्रमाची अंमलबजावणी मोहिम स्वरुपात करण्यात येते. तसेच या समित्यांचे स्वंतत्ररित्या वार्षिक मूल्यमापन करुन त्यांच्याकरीता प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही राबविले जाते.

अभियानाचे उदिष्टे-  सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या या अभियानाची प्रमुख उददीष्टे खालील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणारे वातावरण निर्माण करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आव्हानांना स्वीकारण्याची क्षमता विकसित करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्व् विकास, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, विद्यार्थी हक्क व वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये समस्या व त्या समस्यावर उपाय योजना करणारी एक स्वतंत्र अशी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी घरगुती वातावरण निर्माण करणे.

अभियानाचे स्वरुप - सामाजिक न्याय विभागातंर्गत  चालणाऱ्या सर्व वसतिगृहांमध्ये वसतिगृह विद्यार्थ्यांमध्ये विकास समितीची स्थापना करणे,  वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांचा समितीमध्ये समावेश असेल. या प्रतिनिधींची  निवड लोकशाही तत्वाने समाज कल्याण अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केल्या जाईल.
समितीची रचना - वसतिगृह विद्यार्थी विकास समिती प्रमुख-अध्यक्ष, वसतिगृह विद्यार्थी शैक्षणिक कार्यक्रम व शाळेशी सबंधित विषय प्रमुख- सदस्य, व्यक्तीमत्व विकास,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम प्रमुख-सदस्य,बाल हक्क व वसतिगृह सोयीसुविधा प्रमुख-सदस्य,वसतिगृह अधिक्षक-पदसिध्द सचिव
या समितीला आवश्यक सर्व सहाय्य व सहकार्य करण्याची जबाबदारी वसतिगृह अधिक्षकांची असेल व त्यांना या समितीमध्ये पदसिध्द सचिव पदावर कार्य करावे लागेल.  या समितीच्या महिन्यातून किमान दोन बैठका होतील. या बैठकांमध्ये (HSDC) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व निर्णय घेण्यात येतील. प्रत्येक वसतिगृहामध्ये तक्रार पेटी असेल व सदरील पत्रपेटी वसतिगृह निरीक्षक किंवा समाजकल्याण अधिकारी यांच्या समक्ष उघडणे बंधनकारक असणार आहे. या तक्रार पेटी मधील तक्रारी/ मुद्यांच्या आढावा सुध्दा या बैठकांमध्ये घेण्यात येईल. वसतिगृह स्तरावरील समितीच्या निवडक प्रमुखांचा समावेश असणारी एक समिती जिल्हा स्तरावर असेल. या समितीमध्ये समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव या पदावर कार्य करतील. या समितीची तीन महिन्यांतून किमान एकदा बैठक होईल.  समाज कल्याण निरक्षक हे या समित्याच्या कामकाजात सूसुत्रता व प्रभावीपणा आणण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतील.
समित्यांच्या कार्याचा तपशील - सर्व स्तरावरच्या समित्यांनी वसतिगृहातील  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांना दर्जात्मक शिक्षण मिळवुन देण्यासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. तसेच बाल हक्क व वसतिगृहातील सोईसुविधा या बाबतही कार्य करण्याची जबाबदारी समितीकडे असल्याने यासाठी अवाश्यक ते नियम तयार करुन त्याची अंमजबजावणी करण्याचे अधिकार समितीला असतील. या समित्यांना  विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचे विविध कार्यक्रम राबविता येतील. विद्यार्थी/ विद्याथिंनींच्या दैनंदिन अडचणीचे निराकरण या समित्यांना करावे लागणार आहे.
 
सचेतना उपक्रम व प्रोत्साहनपर बक्षीस योजना - जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. हिंगोली यांच्या मार्फत वसतिगृह/ विकास समितीमधील विद्यार्थ्यांना या संकल्पनेविषयी परीपूर्ण माहिती देण्यासाठी सचेतना बैठक/ कार्यशाळा आयोजित केल्या जातील. आवश्यक ती माहिती छापील स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या जाईल. या समितीच्या कार्याच्या अनुषंगाने वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा समाजकल्याण अधिकारी, जि.प. हिंगोली यांच्या मार्फत स्वतंत्ररित्या तयार करण्यात येईल. या उपक्रमांर्गत उत्कृष्टरित्या कार्य करणाऱ्या तीन वसतिगृह विकास समित्यांना प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह व बक्षीस देण्यात येईल. तसेच संबंधित वसतिगृहांना बक्षीस, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

प्रमोद धोंगडे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

No comments:

Post a Comment