Tuesday, September 18, 2012

'संगमेश्वरी' प्रसाद ..

रत्नागिरीतील गणेशोत्सवात मोदकांच्या प्रसादाची चंगळ असते. ढोलकीची थाप, लयबद्ध जाखडी आणि सोबत मोदकाचा प्रसाद...हे सर्व एकत्र आल्यावर उत्साहाला रंग चढतो. मोदकांचा प्रसाद घरोघरी असतो. तळलेले किंवा उकडीचे मोदक तसे कॉमनच. खवय्यांसाठी खास खव्याचे मोदक हलवायाकडे सजवून ठेवलेले असतात. मात्र या सर्वांच्या पलिकडे लक्षात राहते ती संगमेश्वरी मोदकांची चव. परदेशी भारतीयदेखील या चवीच्या प्रेमात पडले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे गणेशभक्त संगमेश्वरच्या अलिकडे 'गणेश कृपा' फलक पाहिल्यावर थांबतात आणि मोदकांची चव घेऊन पुढे जातात. या मोदकांना श्रीगणेशाच्या नावाने वैभव उभे करताना 'संगमेश्वरी मोदक' अशी ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते रंजना घडशी या 60 वर्षाच्या महिलेला.कल्पकता आणि परिश्रम यांचा सुंदर समन्वय करीत त्यांनी आपल्या उत्पादनाला नवी ओळख मिळवून दिली आहे.

रंजनाताईंचे मुळ गाव संगमेश्वर तालुक्यातील आंगवली. शिक्षक असलेल्या रघुनाथ घडशी यांच्याशी विवाह झाल्यावर त्या संगमेश्वर येथे आल्या. पतीचा पगार कुटुंबासाठी पुरेसा नसल्याने त्यांनी आरोग्य रक्षकाची नोकरी, चहा विक्री आदी विविध कामांपासून सुरूवात केली आणि शेवटी प्रयत्नपूर्वक हॉटेल व्यवसायात यश मिळविले. त्यांचे गोड बोलणे आणि चांगलीसेवा यामुळे व्यवसाय वाढत गेला. काही काळ एमटीडीसीच्या निवास-न्याहरी योजने अंतर्गत त्यांनी केंद्रही चालविले.

एरवी गणेशोत्सवात मोदक घरी होतातच. तसे गणेशोत्सवाच्यावेळी रंजनाताईंकडे घरात तांदळाचे मोदक केले जात असत. मात्र त्यातल्या केवळ पुरणाचा मोदक करण्याचा प्रयोग त्यांनी पाच वर्षापूर्वी केला आणि तो यशस्वी झाला. हेच मोदक त्यांनी विक्रीसाठी ठेवल्यावर ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पुढे अशा मोदकांना मागणी येऊ लागली. मोदकांच्या रुपात आणि चवीत बदल करण्यात आला. आंबा, सीताफळ, किवी, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा विविध चवीत हे मोदक विक्रीस उपलब्ध करून दिल्यावर मागणी वाढतच गेली. आकर्षक रंग आणि चवीमुळे या मोदकाला मागणी सातत्याने वाढते आहे. अगदी लालबागच्या राजालादेखील या मोदकांचा नैवेद्य असतो.

आज प्रत्येक दिवशी 500 ते 1000 नारळांचे मोदक तयार केले जातात. महामार्गावरून जाणारे बरेच पर्यटक इथे फराळासाठी आणि खरेदीसाठी थांबतातच. चविष्ट आणि काही दिवस टिकणारे असल्याने कोकणची आठवण म्हणून मोदक सोबतही घेऊन जातात. मोदकासाठी लागणारे नारळ स्थानिक बागायतदारांकडून खरेदी केले जातात. मोदक तयार करण्याच्या प्रक्रीयेमुळे दहा मुली आणि चार गड्यांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. पर्यटनाचा हंगाम आणि आंगणेवाडीसारख्या मोठ्या जत्रा असताना विक्री सर्वाधिक असते.

दोन वर्षापासून राज्य तसेच देशाबाहेरील पर्यटकदेखील सोबत मोदक नेत आहेत. मुंबईत दररोज मागणीप्रमाणे मोदक पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व यशामागे रंजनाताईंचे अविश्रांत परिश्रम आणि धैर्य आहे. मोठा मुलगा सुनिल यानेदेखील त्यांच्या या कामात लक्ष घातले आहे. मायलेकांनी विश्वासाने आपला व्यवसाय पुढे नेला आहे. पण त्याचबरोबर त्यांनी संगमेश्वरचे नाव देशाबाहेरही पोहचविले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या मोदकांची गोडी भक्तांना चाखायला मिळणार आहे.

-डॉ.किरण मोघे

No comments:

Post a Comment