पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)
सहकारनगरजवळ तळजाई पठार येथील बांधकाम सुरू असलेली ४ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १0 जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. पुण्यातील अशा प्रकारची ही पहिलीच दुर्घटना आहे.
दुपारी पावणदोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोसळलेली इमारत अनधिकृत असून, निकृष्ट बांधकामामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. माजी नगरसेवक संजय नांदे आणि बांधकाम व्यावसायिक लहुजी सावंत यांची ही इमारत आहे. दुपारी पावणेदोनला मजुरांची जेवणाची सुट्टी झाली होती. त्यांची मुले शाळेतून जेवणासाठी घरी आली होती त्याच वेळी इमारत कोसळल्याने मृतांचा आकडा वाढला. इमारत पत्त्याप्रमाणे कोसळल्याने मोठय़ा ढिगार्याखाली मजूर अडकले गेले. ढीग उचलण्यासाठी रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांसह पोलीस व पालिका कर्मचारी ७ ते ८ जेसीबीच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत काम करीत होते.
भारत विष्णू शिंदे (वय ६५, रा. खोली क्र. १0, अप्पर ओटा), अर्जुन नामदेव गोपाळ (३२, रा. सर्वे क्र. १६, आंबेगाव पठार), राजाराम पांडुरंग खाडे (५0, रा. संजयनगर, धनकवडी), देविया उर्फ सोनूचंद राठोड (२), नयना नागेश कांबळे (१२), राजू भिमलाल पवार (१५), मिता देवकाते, अण्णा देवकाते अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील एक महिला व पुरुषाची ओळख पटलेली नाही. ढिगार्यातून काढलेल्या ४ जखमींना ससून, भारती, राव रुग्णालय, पुरोहित व सिद्धी रुग्णालयात हलविले आहे.
ढिगार्याखाली अडकलेल्या सायली कांबळे (५), नम्रता नागेश कांबळे (७), समाधान गोपाळ, दीपक देवकाते तसेच तीन महिला व एका मजुराला वाचविण्यात यश आले.
नांदे, सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करणार
दुर्घटनेप्रकरणी जागामालक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे आणि विकसक लहुजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या घटनेतील जखमींचा खर्च महापालिका करेल. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी पालिकेकडून घेण्यात आली नव्हती. हे बांधकाम थांबविण्याची नोटीस जागामालक आणि विकसक यांना १ सप्टेंबर रोजीच देण्यात आली होती. मात्र, तरीही संबधितांनी काम सुरूच ठेवले होते. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत अतिक्रमण कारवाई बंद असल्याने गडबडीत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेल्यानेच ते कोसळले. शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत आत्तापर्यंत २३00 बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ८५0 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. - महेश पाठक, महापालिका आयुक्त
घाईघाईत उरकले बांधकाम
तळजाई पठारावरील तळजाई माता मंदिराजवळ ही अनाधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू होते. ही मिळकत संजय नांदे व लहुजी सावंत यांच्या नावे असून महापालिकेने या दोघांना १ सप्टेंबरला नोटिस पाठविली होती. बांधकाम बंद ठेवण्यासही सांगितले होते. गणेशोत्सवामुळे गेल्या पाच दिवसांपासून ही मोहिम बंद ठेवण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या काळात कारवाई होणार नसल्याने घाईघाईने या इमरातीचे बांधकाम उरकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. इमारतीचे काम पूर्ण झालेले नसतानाही तेथे सुरक्षा रक्षक कुटुंबासह रहायला होता. इमारत कोसळली तेव्हा तेथे या कुटुंबासह कामगार होते.
या इमारतीला जाण्यासाठी केवळ ५ ते १0 फुटांचा अरुंद रस्ता असल्याने त्याठिकाणी मदतीसाठी अग्निशमक दलाची गाडी व जेसीबी जाण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. इमारत कोसळल्याने परिसरातील धुरळा उडाला होता. आजुबाजूचे नागरिक तातडीने मदतीस धावले. तिस-या मजल्यावर ढिगाखाली मृतावस्थेत असलेल्या ५ मजुरांना दुपारी तीन वाजता बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सायंकाळी चार वाजता २ मजुरांना जीवंत बाहेर काढण्यात अग्निशमक दलांच्या जवांनांना यश आले. तब्बल पाच तासाने रॅपीड फोर्स मदतीसाठी दाखल झाला. सायंकाळी सायली व नम्रता नागेश कांबळे या दोन चिमुकलींना बाहेर काढण्यात आले.
याबाबत अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, महापालिकेचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहिम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवामुळे ही मोहिम बंद ठेवण्यात आली होती.
घटनास्थळी महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. अभय छाजेड, नगरसेवक शिवलाल भोसले, वर्षा तापकीर, राष्ट्रवादीचे गटनेते सुभाष जगताप, महापालिका आयुक्त महेश पाठक, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी भेट दिली.
महापौर बनकर म्हणाल्या, ही इमारत अनाधिकृत असल्याने काम थांबविण्याची नोटिस देण्यात आली होती. गणेशोत्सवामुळे पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यात आली होती.
खासदार सुळे म्हणाल्या, ही घटना दुर्देवी आहे. या इमारतीच्या अनाधिकृत बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने येथील नगरसेवकांनी पालिका अधिकार्यांकडे तक्रार केली होती. सध्या शहरातील ८२५ अनाधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. राजकारण्यांशी संगतमत करून अनाधिकृत बांधकामे सुरू असलेल्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
स्थानिक नगरसेवक शिवलाल भोसले म्हणाले, हे अनाधिकृत बांधकाम आम्ही पालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अधिकार्यांनी लवकर पहाणी करून इमारत पाडली असती तर ही दुर्घटना घडली नसती.
अधिकार्यांच्या दूर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वर्षा तापकीर यांनी केला.
इमारत मालकाला काम बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. १ सप्टेंबर रोजीच त्याप्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात कारवाई होणार नसल्याने घाईघाईने बांधकाम उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच हे बांधकाम कोसळल्याची शक्यता आहे.
-विवेक खरवडकर,
बांधकाम विभागप्रमुख
माननीयांचा मदतीपेक्षा अडथळाच..
बांधकाम कोसळल्याचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांनी जागेवर पाहणी केली. त्यामुळे जमलेल्या कार्यकत्या्र्रंमुळे मदत करणा-या पोलीस व अग्निशमक दलाच्या जवांना मदत होण्यापेक्षा अडथळा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नगरसेवक विसरले ‘आदर्श’शपथ..
अनाधिकृत बांधकामांमुळे धनकवडी अगोदरच बदनाम झाली आहे. त्यामुळे परिसरातील आदर्श मित्र मंडळाने महापालिका निवडणुकीपूर्वी या परिसरातील इच्छुक उमेदवारांकडून आपला परिसर स्वच्छ व पर्यावरण पूरक ठेवणार. कोणतेही अनाधिकृत बांधकाम व अनाधिकृत नळजोड घेण्यासाठी मदत करणार नसल्याची शपथ घेतली होती. परंतु, निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवकांना घेतलेल्या शपथीचा विसर पडल्याचे चर्चा आहे.
..अन् गणपती बाप्पा मोरया !
अग्निशमक दलाचे जवान व पोलीसांच्या मदतीने सायंकाळी तीन मजूर, दोन मुली, तीन महिला व दोन चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्य़ा वाजवून व गणपत्ती बप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. डॉ. राजेंद्र जगताप व डॉ. विजय वारद यांनी लाईफसेव्हर म्हणून अनेकांचे जीव वाचविण्यासाठी तातडीने मदत केली.
माननीयांच्या इमारतीकडे काणाडोळा भोवला
या अनाधिकृत बांधकामाला महिन्यांभरापूर्वी नोटीस देण्यात आली. सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई करणा-या महापालिका प्रशासनाने माननीयांचे बांधकाम असल्याने कानाडोळा केला. प्रशासनाने तातडीने कारवाई केली असतीतर मजूरांचे जीव वाचले असते, अशी हळहळ परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
इमारतीचा पायाच तकलादू
इमारतीचे कॉलम कमकुवत असल्याचे माहीत असूनही बांधकाम मालकाच्या हट्टामुळे तकलादू कॉलम सांधण्याचे धोकादायक काम हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वीच अशा पद्धतीचे काम झाले होते. आणखी एका कमकुवत कॉलमला बाहेरून मलमपट्टी करण्याचे काम सोमवारी हाती घेतले होते. यामुळेच तळजाई पठारावरील इमारत कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक रहिवासी व घटनेचे प्रत्यक्षदश्री सचिन वरखडे म्हणाले, ‘‘या इमारतीचा चारमजली सांगाडा दीड वर्षापूर्वीच तयार झाला आहे. इमारतीचे बांधकाम तकलादू असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच लक्षात आले होते. इमारतीच्या दर्शनी बाजूकडील मधल्या कॉलमला तडे गेले होते. हा कॉलम डागडुजी करून पुन्हा दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतर आणखी एका कॉलमला तडा गेल्याने तो सांधण्याचे काम सोमवारी सुरू होते. यासाठी कामगारांनी सकाळी तयारी केली. त्यानंतर दुपारी ते जेवायला बसले होते. इतक्यात माझ्यासमोरच इमारतीच्या तळमजल्यावरील उजव्या बाजूचा कॉलम तुटला. त्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारत उजव्या बाजूकडे कोसळली.’’
कलाजगत मंडळाचे कार्यकर्ते तत्काळ मदतीला आले. त्यांनी एका महिलेला ढिगार्यातून बाहेर काढले. जखमी महिलेला धनकवडीतील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या महिलेबरोबरचा एक माणूस मरण पावला. कॉलमखाली गाडला गेल्यामुळे त्याला बाहेर काढता आले नसल्याचे वरघडे यांनी सांगितले.
महिनाभरापासून या इमारतीत वीट, प्लॅस्टर, पेंटिंग, सेंट्रींग व ग्रिल बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पार्किंगमध्ये २ खोल्या काढण्यात आल्या होत्या. ३ मजल्यांवर वन बीएचकेचे प्रत्येकी २ फ्लॅट होते. चौथ्या मजल्यावरही खोल्या काढल्या असल्याचे एकाने सांगितले.
दिगंबर स्वामी म्हणाले, ‘‘मोठय़ाने आवाज आला म्हणून बाहेर आलो. समोरची इमारत क्षणात कोसळली. सगळीकडे धुराळाच.. धुराळा. काही समजलेच नाही.’’ रजनी नाईक म्हणाल्या, ‘‘बाहेरून घरातच पाऊल ठेवले तोच मोठा आवाज आला. सुरुवातीला बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. बाहेर येऊन पाहिल्यावर इमारत जमीनदोस्त लेकरांना आवाज तरी द्या.
पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)
पोटच्या तिनही लेकी ढिगार्याखाली गाडल्या गेलेल्या.पती गावी गेलेला..आपल्या लेकरांचे नक्की काय झाले असेल या भावनेने माता स्तब्ध झालेली. नातेवाईक व शेजार्यांना ढिगार्याकडे बोट दाखवून तुम्ही जरा आवाज द्या ना अशी विनवणी ती माता करीत होती. मुलींच्या चिंतूने व्याकूळ झालेल्या या मातेचे हाल पाहून सारेच हेलावून गेले होते. अखेर तब्बल साडेचार तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दोन मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात जावानांना यश आले. मात्र तिच्या एका मुलीचा यात दुर्देवी मृत्यू झाला.
तळजाई पठार येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत एकाच कुटूंबातील तीन मुली गाडल्या गेल्या होत्या. त्यातील सायली (वय ५), नम्रता कांबळे (वय ७) यांना वाचविण्यात जवानांना यश आले. नयनाचा (वय १२) यात दुर्देवी मृत्यू झाला. चौथी मुलगी नीलम शुक्रवार पेठेतील जिजामाता शाळेत इयत्ता नववीत शिकते. दुर्घटना घडली तेव्ही ती शाळेत गेली होती. नागेश व लक्ष्मी कांबळे हे दाम्पत्य या इमारतीच्या तळमजल्यावर बांधलेल्या दोन रुममध्ये दहा सप्टेंबरलाच रहायला आले होते. नागेश मार्केट यार्डात हमालीचा व्यावसाय करतात. तसेच सायंकाळी भाजीची गाडी लावतात. तर लक्ष्मी सहकार नगर येथील रिलायन्स फ्रेश या दुकानात काम करतात. नागेश सांगली जिल्ह्यातील धामवडे या गावी गेले होते. तर लक्ष्मी कामास गेल्या होत्या. सायली व नम्रताची काळजी घेण्यासाठी नयना शाळेला सु्टटी घेऊन घरीच थांबली होती. दुपारची घटना घडल्यानंतर लक्ष्मी अक्षरश: कावर्या बावर्या झाल्या होत्या. शेजारी त्यांची समजूत काढत होते. मात्र दुपारी शाळेत गेलेली नीलम घरी आली. आणि तिने बहिणी कोठे आहेत अशी आर्त हाक दिली, अन दोघींच्या भावनेचा बांध फुटला. दुपारी साडेचारच्या सुमारास एका इसमाला सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आल्याने लक्ष्मीच्या जिवात जीव आला.
‘लाईफ सेव्हर’ टीमने वाचविले जीव
तळजाईची बहुमजली इमारत कोसळल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत वाहतूक पोलीस व वैद्यकीय ्अधिकार्यांची आपत्कालीन टीम घटनास्थळी पोहचली. त्या टीमने लाईफ सेव्हर कीटचा वापर करून तब्बल ११ जीव वाचविले.
वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांच्या समन्वयाखाली आपत्कालीन टीम दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आली. सप्टेंबर २0१0 ला गणेश विसर्जन मिरवणुकीत चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रशेखर लुनिया यांच्या वडिलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या वेळी लुनिया यांनी वाहतूक पोलिसांना आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची विनंती केली. त्या वेळीपासून वाहतूक पोलीस व डॉक्टरांची आपत्कालीन टीम तयार करण्यात आली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत ही यंत्रणा यशस्वी ठरली.
या वर्षीसाठी दोन दिवसांपासून तयारी सुरू आहे. हीच तयारी आजच्या घटनेवेळी कामी आली, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. डॉ. विजय वारद, डॉ. जगताप, डॉ. सुनील केलगणे,
डॉ. प्रशांत चिपाडे, सहायक
पोलीस निरीक्षक विठ्ठल
चव्हाण यांच्या टीमने घटनेत सापडलेले मजूर, महिला व
मुलांना लाईफ सेव्हर कीटचा उपयोग करून प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अँम्ब्युलन्सचा उपयोग करून तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते.
महापौरांच्या गाडीची ‘अँम्ब्युलन्स’..
महापौर वैशाली बनकर घटनास्थळी आल्या. त्या वेळी अनेक जणांना ढिगार्याखालून काढण्यात आले. अँम्ब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग नसल्याने पोलिसांनी महापौरांना विनंती केली. महापौर बनकर यांनीही तातडीने दिलेली गाडी सायरन वाजवीत अम्ब्युलन्सप्रमाणे एकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली.
No comments:
Post a Comment